Ritbhatmarathi

Search
Close this search box.

उध्वस्त शलाका (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा _जाने_२२”

©️®️ रोहिणी पांडे

वडेपूरी गावात सावंतांचं चांगलच प्रस्थ होतं.त्यांची प्रतिष्ठा किर्ती फक्त गावातच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीत होती. कारण मधुकरराव सावन्त हे खूप मोठे व्यापारी आणि आधुनिक प्रगत शेतकरी होते आणि समाजकार्यही करत असत.स्वत:सोबतच गावातल्या शेतक-यांचं भलं व्हावं यासाठीही ते  खूप धडपडत असत.त्यामुळे त्यांचा खूप रुबाब होता.त्यांचा शब्द कोणीही खाली पडू देत नसे.पांढरे शुभ्र धोतर त्यावर तसेच पांढरे शुभ्र नेहरु शर्ट त्यावर तसाच शुभ्र पंचासारख्या लांब रुमालाची घडी खांद्यावर घेतलेली आणि हात मागे घेऊन त्यांचं ताठ मानेनं रुबाबात चालणं, कपाळावर चंदनाचा टीका आणि मागे पुढे नेहमी चार दोन माणसं..असा त्यांचा थाट. पण एक गोष्ट त्यांना प्राणाहूनही जास्त प्रीय होती ती म्हणजे त्यांची प्रतिष्ठा.शिस्त, संस्कार आणि रूढी- परंपरा यांचा बडगा फारच अधिक होता. त्यांची सुविद्य पत्नी “दामिनी मधुकरराव सावंत” ही सेट परीक्षा पास होऊन प्राध्यापिका झालेली पण स्त्रियांनी नौकरी करणं सावंतांच्या घरी चालत नसे म्हणून त्यांची ही दामिनी घरातच चमकत राहिली. कालांतराने मधुकररावांनी एक “सावंत एज्युकेशन सोसायटी” नावाची शैक्षणीक संस्था काढली आणि दामिनीबाईंना त्याचं अध्यक्षपद बहाल करून त्यांची खंत कमी केली.दामिनीबाई पण मुलींसाठी आणि महिलांच्या प्रगतीसाठी पुष्कळ समाज कार्य करायच्या. त्यामूळे घरात काय वर्दळअसायची.माणसांचा राबता असल्यामूळे घरात नौकर-चाकर ही बरेच होते. शिवाय शेतात काम करणारे गडी ,सालदार या सर्वांवर लक्ष ठेवण्याचं काम ही दामिनी बाईचंच !

         मधुकरराव आणि दामिनी सावंत यांना एक मुलगी
शलाका आणि तिच्या पाठीवर एक मुलगा शुभंकर.शुभंकर आता दहावीत होता तर शलाका बी.कॉम.च्या दुस-या वर्षाला होती.तिने एम.बी.ए.करून व्यवसायात स्वत: चं नाव निर्माण करावं अशी दामिनीबाईनची इच्छा होती.तसा स्पार्क ही होता शलाकामध्ये.दामिनीबाई शलाकाला आपल्या सोबत ठेवायच्या बरेचदा जेणेकरून समाज कारणाचे
धडे ही तिला मिळावेत.कॉलेज सांभाळून शलाका मदतही करायची आईला.पण घरातलं अती परंपरावादी वातावरण तिला आवडायचं नाही असं ही” उन्मुक्त स्वातंत्र्य बेगडी बंधनांना भीक घालत नाही” म्हणतात हेच खरं आणि ही सावंतांची अवाजवी प्रतिष्ठा ही तिला बेगडी आणि पोकळ वाटायची.तिचा स्वभाव वाहत्या नदीसारखा स्वछंद होता.गाणं नि चित्रकला हे तिचे आवडीचे विषय.निसर्ग चित्र काढणे तर तिला खुपच आवडायचे.कधी हिरवे,कधी बोडखे डोंगर,सूर्योदय, सुर्यास्त, आकाशाची निळाई..चांदणं..पक्ष्यांचा कलरव..पीकांमधील सळसळ सगळचं तिला नेहमी
साद घालत असायचं. ही निसर्गाची साद ऐकू आली की
ती चित्रकलेचं सामान घेऊन निघायची शेतात…दिमतीला
नौकर असायचाच एखादा…सामान घेऊन मागे मागे.

    आज ही ती अशीच चित्र काढण्यासाठी शेतात आली
होती.शेतात एका बाजुला “तुकाराम काका” जे नेहमी तिच्या सोबत असत आणि त्यांच्या लहानपणापासून सावंतांकडे काम करत असत त्यांनी तिला स्टैंड आणि त्याला ड्रॉइंग शीट लावून दिली.हातात पेन्सिल घेऊन शलाका नदी आणि त्या काठचा डोंगर न्याहाळू लागली..आणि तिची तंद्रीच लागली..ती एक टक ते दृश्य पाहू लागली.

शालीनतेच्या पानांमध्ये
एक कलिका मुग्ध बावरी,
भुरभुरणा-यां कुंतलांसवे
अल्लड थोडी ..थोडी हसरी

  या कवितेच्या ओळिंच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली.आणि त्या लयदार, मधुर तरीही भारदस्त आवाजाच्या दिशेने बघता बघता न कळत तिच्या तोंडून “वाह ” असे उद्गार निघाले.तिने पाहिले तर तिच्या मागे एक तरूण उभा होता.. उंच पुरा, पीळदार शरीरयष्टी, सावळा रंग आणि टपोरे डोळे,नेटकीशी केशरचना अन आत्मविश्वासपूर्ण डोळे..तिने वळून बघताच तो पुढच्या ओळी म्हणाला,

वा-यासवे अशी ती
डुलणारी कलिका वळते,
मोहित या मनाला
का क्षणात इतके करते

तिला त्या फारचं आवडल्या.तिला पाहून तो जसा मोहित झाला होता तशीच ती सुद्धा त्याच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित झाली होती. ती हात जोडत म्हणाली, ” नमस्कार..मी शलाका सावंत…आणि आपण…?” तो काही बोलणार एवढ्यात तुकाराम जवळ येत म्हणाला,

“आवं ताई सायेब ह्यो माजा पोरगा हाय…शहरात शिकतो.”

ती हसत आनंदाने म्हणाली,

“ओह, हा तुमचा मुलगा  सुशांत का..?”

तो म्हणाला, “हो ss,अगदी बरोबरं पण तुम्हाला माझं नाव कसं माहित..!”

ती म्हणाली, “अहो ss,हे तुका काका सतत तुमच्याबद्दल
बोलत असतात घरी..तुमचं फार कौतुक आहे त्यांना.”

तो म्हणाला,” बाबा जरा जास्तच बोलतात..एवढं काही
नाही हो..आता तर कुठे मी एम.बी.ए. ला ऐडमिशन घेतलीय..अजून खुप काही करायचं आहे.”

ती म्हणाली, “उलट काकांनी कमीच सांगितलं वाटतं
तुमच्याबद्दल कारण तुम्ही एवढे सुरेख कवी आहात हे नव्हतचं सांगितलं त्यांनी..!”

तुकाराम दूर गेलेला पाहून सुशांत म्हणाला,

“मुर्तिमंत काव्य समोर ऊभं असेल तर शब्द आपोआप
प्रगट होतात म्हंटलं..!”

ती मोहरून गेली आणि लाजली पण स्वत: ला सावरत
म्हणाली,

“तुम्ही खरचं प्रतिभावान आहात..! छान वाटलं तुम्हाला
भेटून..!”

एवढ्यात तुकाराम ने त्याला आवाज दिला,
“सुश्या..आरं सुश्या..जरा हिकडं ये रं…मला हे उचलू
लाग जरा..”

सुशांत म्हणाला,
” आलो आलो बा ss…!”

आता तिच्याकडे बघत तो म्हणाला,

“मला ही खूप आनंद झालाय तुम्हाला भेटून पण  बोलणं नाही नं झालं…तुम्ही रोज येता का इथे चित्र काढायला..!

ती म्हणाली,

“नाही हो..सुट्टीच्या दिवशी येते..हं पण उद्या नक्की येणार  आहे हं…उद्या रविवार आहे नं..!

तो “बरं..उद्या भेटू ..” म्हणत हात हलवत निघून गेला.

ही त्यांची पहिली भेट आणि love at first sight  म्हणातात तसं काहिसं झालं.सुशांतच्या डोळ्यांसमोरून
शलाकाचा सुंदर चेहरा, बोलके हरिणीसारखे डोळे, पातळ नाजुक ओठ , लांब पोनी घातलेले आणि कपाळावर रुळणारे केस आणि लाघवी बोलणं आणि तिच्या हास्याची थेट काळजात घुसलेली “शलाका” ..खरोखरीच ही पोरगी पहिल्या भेटीतच त्याच्या काळजात ठाण मांडून बसली होती. हिरवागर्द टॉप आणि पिवळसर रंगांची डिझाइनर प्लाझो घातलेली ,चेहऱ्यावर दिलखेचक हासू आणि डोळ्यातले लाजरे खट्याळ भाव असलेली  तिची मूर्ती त्याचा हृदयात कोरली गेली होती.

  इकडे शलाकाचीही काही वेगळी अवस्था नव्हती. तिच्या कानात त्याची कविता घुमत होती, ऐकू येत होती.मनात तो रेंगाळत होता त्याचं बोलणं, त्याची प्रतिभा, त्याचं व्यक्तिमत्व सगळचं तिला खूप आवडलं होतं.आज ती दिवसभर त्याच तंद्रीत होती.मनाशीच हसत होती. तिला”काय गवसल्याचा आनंद झालाय ” हे तिचं तिलाही समजत नव्हतं..पण ती मात्र खूप आनंदात होती.

     देखणं शब्द चित्र काढणारा तो आणि हुबेहुब चित्र रेखाटणारी ती दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले
होते.त्यांच्या भेटी गाठी वाढल्या.शलाका आता वारंवार शेताकडे जाऊ लागली.पण कधीही चित्र अपूर्ण न ठेवणा- या शलाकाचं एकही चित्र पूर्ण होईना ही बाब हुशार दामिनी बाईंनी हेरली.सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण तिच्या वागण्या बोलण्यातील बदल..तिचं अचानक उजागर झालेलं कवितेवरचं प्रेम..कवी- कविता त्यांची प्रतिभा या विषयी सतत बोलणं…रोमांटिक गाणी ऐकण..स्वत: शीच हसणं,लाजण…अचानकच सुंदर दिसण्यासाठीची तिची धडपड हे सगळचं त्यांनी निरिक्षण केलं आणि त्यांना समजून
चुकलं की “पोरगी प्रेमात पडली आहे!” पण ती नेमकी कोणाच्या प्रेमात आहे याची त्यांना प्रचंड काळजी वाटू लागली.त्यांनी आडून आडून तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण  तिने थांग लागू दिला नाही.” तो मुलगा कोण असेल…चांगला असेल ना..शलाकाला फसवेल का.. मधुकररावांना समजलं आणि पटलं नाही तर ते त्या मुलाला जीवंत सोडणार नाहीत.” या सगळ्या विचारांनी त्यांची झोप उडाली.असेच दिवस उलटत होते..दामिनीबाईची काळजी
वाढतंच होती कारण त्यांना अजूनही नेमकं काय चालू आहे
हे समजलेलं नव्हतं.

दरम्यान एक दिवस शलाकाला खूप उलट्या होऊ लागल्या. पोटात अन्नाचा कण ही टिकेना.डॉक्टर घरीआले .. काही तपासण्या केल्या आणि त्यांनी दामिनी बाईला सांगितलं ,
” मुलगी प्रेग्नेंट आहे.””त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.आता गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. शलाका मलूल पडली होती. त्यांनी तिला विचारलं ..आता तिला “सुशांत”
चं नाव सांगावंंच लागलं..”आम्ही लग्न करणार आहोत” हे
ही तिने सांगितलं.हे सगळ तुका काकांनी ऐकलं आणि
परिणामांचा विचार करून ते पटकण घरी गेले आणि
लगेच कुणालाही काहीही न बोलता सुशांतला घेऊन कुठेतरी निघून गेले.

      इकडे दामिनीबाईने सगळा प्रकार मधुकररावांना सांगितला ते थेट माणसं घेऊन तुकाच्या घरी गेले तर तिथे कोणी सापडलं नाही.ते प्रचंड रागात घरी आले आणि शलाकाच्या खोलीत गेले ती सुद्धा तिथे नव्हती.मग ते शेताकडे वळले तिथे मात्र शलाका होती..सुशांत ची वाट बघत होती.तिला कोणितरी आल्याची चाहूल लागली तिला वाटलं सुशांतच असेल…ती म्हणाली,

“सुशा ..तू आलास ..मला खात्री होती तू..”

असं म्हणत तिने मागे वळून पाहिलं तर तिचे बाबा आणि सोबत हत्यारधारी माणसे.ती प्रचंड घाबरली पण म्हणाली,
“बाबा..मला लग्न  करायचय त्याच्याशी…आयुष्यभर
सोबत रहायचंय त्याच्या..”

बाबा म्हणाले,
” पळून गेलेला तुक्या आणि त्याच्या त्या पोराशी का..?तुझी
हिम्मत कशी झाली असं वागून सावंतांची अब्रू धुळीला
मिळवण्याची..पोटात पोर वाढवेपर्यंत मजल गेली तुझी..!
जात- पात, प्रतिष्ठा, संस्कार सगळं सोडलसं..स्वत:चं
चारित्र्यही असचं बहाल केलंस…लायकी नाही तुझी
सावंतांची पोरगी म्हणून जगण्याची..तुला जन्म दिला
आन आम्ही तुला सांभाळू शकलो नाही म्हणून स्वत:ला
ही माफ करणार नाही आम्ही.”

असं म्हणून त्यांनी धारक-यांना इशारा केला आणि स्वत:
पिकातून चालत निघून गेले.एक आर्त किंकाळी रानात
घूमून शांत झाली.त्यानंतर शलाका हे नाव सावंतांच्या
घरी कधीच कोणी काढलं नाही की कधी कोणी तिला
पाहिलं ही नाही…शिल्लक राहील्या काही अफवा..
दबक्या आवाजातील लोकांची कुजबुज..आणि  सावंतांच्या  वाड्यातील काही अस्वस्थ हुंकार..

समाप्त

©रोहिणी पांडे(शब्द नक्षत्र)

=============================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *