Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सुंदराने नाचाचा सराव करण्यासाठी पायात घुंगरू बांधायला घेतले. त्यातला एक घुंगरू खळकन निसटून बाजूला वेगळा झाला. तिने त्या घुंगराकडे बघितलं. ती अशीच तर होती. फडातल्या सगळ्यांपासून वेगळी! सुंदरा… नाव देखील आक्कानेच ठेवलं होतं. तमाशातला हरकाम्या मुरली,हाच फक्त तिला चिमणी म्हणायचा. तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा! त्याच्याचकडून सुंदराला कळलं होतं. कुठल्यातरी गावात फड टाकला होता,तेव्हा रात्री आक्काच्या तंबूसमोर सुंदराला कोणीतरी टोपलीत ठेऊन गेलं होतं. आक्का तमाशा संपवून तंबूत आली तर तिला दाराशी टोपली दिसली होती.
…….

तमाशा संपवून आक्का तंबूकडे चालली होती. इतक्यात तंबूच्या दाराशी तिला एक टोपली दिसली.
“आरं,कुणी हाय का?” आक्काला त्या छोट्या टोपलीत एक बाळ रडताना दिसलं.
“काय ग आक्का? का ओरडतीस?”
“मुरली, आरं ही टोपली कुणी आणून टाकली इथं? जेमतेम महिन्याचं बाळ दिसतंय हे! कोणाला अवदसा आठवली?”
“देव जाणे! कसं नक्षत्रावाणी लेकरू हाय ग आक्का.” मुरली त्या छोट्या बाळाला न्याहाळत म्हणाला.
“धर जरा ह्या बाळाला. मी हे दागिने काढते. टोचतील त्या बाळाला.” आक्काने टोपलीतलं बाळ उचलून,ते मुरलीच्या हातात धरलं. मुरलीच्या हातात आल्यावर ते बाळ खुदकन हसलं.
आक्काने मुरलीला तंबूत बोलावलं. त्याच्या हातातून तिने ते बाळ घेतलं.
“मुरली,पोलिसात तक्रार करायची का रं? हे नसतं लफडं आपल्याला नको. मुलगी दिसतेय. फडातल्या पोरी सांभाळते तेच लई झालं मला. हिची आणखी भर नको.”
“आक्का,राहू दे की ग. मी सांभाळेन तिला. तिच्या जन्मदात्यांना ती जड झाली. तिची आणखी फरपट नको. चिमणीसारखी नाजूक हाय पोर.माझी चिमू.” तिच्या कपाळावर ओठ टेकत मुरली म्हणाला.
“तुझ्या भरवशावर ठेवते हिला. पुढंमागं आपल्याच कामी येईल. पोरीची जात हाय.”
मुरलीच्या मनात आलं,पुढचं पुढे! आत्ता तरी ती आपल्या सावलीत आहे.

मुरली म्हटल्याप्रमाणे चिमणीला खरंच सांभाळत होता. आक्का आणि इतर बायका तमाशात नाचत,तेव्हा रात्रभर तिला मांडीवर घेऊन बसायचा. आक्का तोंडाने फटकळ असली तरी चिमणीचं सगळं मायेने करत होती. चिमणीला दहा वर्षे पूर्ण झाली आणि आक्का एक दिवस मुरलीला म्हणाली,” पोर नक्षत्रावाणी दिसू लागलीय. माझ्या जवानीचा जोर काय,अजून दहा वर्ष! माझा फड आता चिमणी पुढं चालवेल. तिला आता नाचाचे धडे देते.”

ते ऐकून मुरलीला धस्स झालं. हे कधीतरी होणार ह्याची जाणीव त्याला होती,आणि ती वेळ आली होती.
“आक्का,मी काय म्हणतो,जरा थांब की. लहान,नाजूक साजूक हाय ती अजून.”
“तू गप रं! मला नको शिकवू. एवढी देखणी पोर घेऊन गावोगावी फिरू का? तिला तयार करायलाच हवं. तिच्या नशिबात हेच होतं, म्हणून तर पोर माझ्या दारात येऊन पडली. आजपासून तिचं नाव ‘सुंदरा’. आपल्या सौंदर्याने आणि नाचण्याने लोकांना ही वेड लावेल, बघच तू!”
आक्कासमोर मुरलीचे काही चालले नाही. दुसऱ्या दिवसापासून त्याची चिमणी नाचण्याचा सराव करू लागली. तिला नाच शिकायला मिळतोय ह्यातच मजा वाटत होती. त्यातलं गांभीर्य काहीही कळत नव्हतं.

सुरुवातीला नाचून सुंदराचे पाय दुखायचे. मग मुरली रात्री झोपताना तिच्या पायाला तेल चोळीत असे.
“मुरलीदादा,किती मजा येते नाच करायला. मी कशी नाचते? आक्कासारखी मी पण लोकांसमोर नाचणार! मग ते पैसे फेकतील.”
तिचे शब्द ऐकून मुरलीच्या काळजात कळ उठली. पण तो तरी काय करू शकणार होता? तो देखील अनाथ म्हणून आक्काने त्याला जवळ केलं, खाउपिऊ घातलं. पोटच्या पोरासारखं वाढवलं. सुंदराला नाचण्यासाठी विरोध करणारा तो होता तरी कोण? त्याच्या स्वतःच्या हिमतीवर तो तिला सांभाळू शकणार नव्हता.
“मुरलीदादा,अरे सांग न,मी कशी नाचते?” सुंदराने मुरलीला भानावर आणलं.
“लई झ्याक नाचते बघ. आक्कापेक्षा भारी.” मुरली डोळ्यातलं पाणी थोपवत म्हणायचा.

सुंदरा वयात आली तसं तिला ह्या व्यवसायाची थोडीफार कल्पना आली. आपण अनाथ आहोत आणि आक्काने आपल्याला स्वीकारलं हे देखील माहिती झालं होतं. तमाशा सुरू असताना आक्काकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा तिला खूप राग यायचा.

“तुझं डोस्क जर शांत ठेवत जा सुंदरा. आपलं आयुष्यच असं आहे. हे सगळं सहन करावंच लागतं. नाहीतर उपासमारीची वेळ यायची.” आक्का एकदम उठली आणि सुंदराचा चेहरा धरत म्हणाली,”आणि तू पण लक्षात ठेव. हे तुलाच पुढे न्यायचं आहे. तुझे जादा नखरे खपवून घेणार नाही. त्यासाठीच तुला नाच शिकवला हाय.”
आक्काची ती भेदक नजर बघून सुंदरा घाबरली. हतबल झाली. पुढ्यात आलेलं ताट स्वीकारण्यापलीकडे तिच्या हातात काही नव्हतं.

सुंदरा तमाशात उतरली आणि आक्काच्या फडाला रातोरात प्रसिद्धी मिळाली. सुंदराचं घायाळ करणारं सौंदर्य, तिच्या लकबी,तिच्या अदा, तिचा नाच बघून लोकं वेड्यासारखे शिट्ट्या मारत असत. ………. एका गावातला तमाशाचा आज शेवटला दिवस होता. पहाटे सुंदराला जाग आली. नुकतंच उजाडू लागलं होतं. तिच्या रोजच्या सवयीप्रमाणे तिने स्वामींना,नटराजाला आणि त्यापुढे ठेवलेल्या घुंगरूंना नमस्कार केला. तंबूत सगळे शांत झोपले होते. तिने शाल अंगावर घेतली आणि जवळच्या बागेत फेरफटका मारायला निघाली. बागेत पक्षांचा चिवचिवाट,नुकतीच उमललेली फुलं बघून तिला खूप प्रसन्न वाटलं. एका झाडाखालच्या बाकावर ती बसली. सुंदराचा आवाजही गोड होता. नकळत तिच्या गळ्यातून सूर निघू लागले.

किसनची सकाळची बागेतली फेरी सुरू होती. फिरताना त्याला बाकावर एक मुलगी सुमधुर गाताना त्याला दिसली. रोज बागेत भेटणाऱ्यांपैकी ही मुलगी दिसत नाही हे त्याने ओळखले. तो तिच्या जवळ येऊ लागला आणि काही अंतरावर आल्यावर त्याला कळलं की गावात तमाशाचा फड आला आहे,तिथे नाचणारी ही सुंदरा आहे. तो मंत्रमुग्ध होऊन तिचे गाणे ऐकत होता. सुंदराचं किसनकडे लक्ष गेलं आणि तिने गाणं थांबवलं. ती सावरून बसली. पुरुष जवळ आला की त्याची नजर तिला नकोशी वाटायची.
“का थांबला? तुम्ही अतिशय सुंदर गाता.” किसन तिच्याकडे बघत म्हणाला.
“पण मी एक तमासगीर आहे हे माहिती आहे न तुम्हाला? गावात पोश्टर लागलेत की. माझा चेहरा बघितलाच असेल.गाणं माझा छंद आहे आणि नाचणं माझा व्यवसाय!” सुंदरा परखडपणे बोलली.
“तुमचा व्यवसाय कुठलाही असू दे. ती तुमची पोट भरण्यासाठी गरज आहे. आणि ती एक कला आहे. तिचाही मान राखायलाच हवा. परिस्थितीपुढे माणूस हतबल असतो. तसंच तुमचं झालं असावं ही मला खात्री आहे. कारण तुमचा सात्विक चेहरा,तुमच्या आवाजातील कारुण्य, आर्तता सांगते आहे की तुम्ही चंदनासारख्या पवित्र आहात.”

किसनचे ते शब्द ऐकून सुंदराच्या डोळ्यात पाणी आलं. आजपर्यंत कुठलाही पुरुष तिच्याविषयी इतकं आदराने बोलला नव्हता. तिची पारख एका तरी पुरुषाला झाली ह्याचं तिला समाधान वाटलं.
“आभारी आहे! तुमचे शब्द ऐकून भरून पावले. ह्या तमासगीरिणीला तुम्ही शब्दाने का होईना पण एका पवित्र स्त्रीची जागा दिली. मी हे शब्द मनात कोरून ठेवेन. परत कधी कुणा पुरुषाकडून ऐकायला मिळतील की नाही ठाव नाही. आज रात्री तमाशा बघायला या.” सुंदराने हात जोडले आणि झपझप तिथून चालत गेली. तिच्या दूर जाणाऱ्या कोवळ्या,निरागस रूपाकडे किसन बघत राहिला.

सुंदराने नऊवारी चापून चोपून नेसली. चेहऱ्यावर भडक रंगरंगोटी केली. अंबाड्यावर चार भरघोस गजरे माळले. तिने स्वतःला आरशात निरखून बघितलं. तिचं हे रूप तिला कधीच आवडलं नाही. सगळं मनाविरुद्ध करावं लागत होतं. सकाळपासून आक्काने डोकं खाऊन तिला बेजार केलं होतं. “आजचा तमाशा गाजला पाहिजे सुंदरा! एक बडं प्रस्थ तुझा नाच बघायला येणार आहे. त्याची तुझ्यावर मर्जी जडली तर पैकाच पैका मिळेल बघ.”

“मर्जी जडली म्हणजे? आक्का,मी फक्त तमाशात नाच करून रिझवते. ते देखील तुझ्यावर अवलंबून आहे म्हणून! त्या पलीकडे माझ्याकडून अपेक्षा करायची न्हाय,सांगून ठेवते.”
“चांगलं ठाव हाय मला. तेच तेच नको ऐकवू. आज थिएटर समदं फुल्ल हाय. जीव तोडून नाच.” आक्का फणफण करत तंबूच्या बाहेर गेली.

आजवर सुंदरा फक्त कला आणि
पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून नाचत होती, पण आत्ता आक्का जे काही बोलली त्याने तिचा जीव घाबरा झाला. एका क्षणी तिला वाटलं, सगळं सोडून पळून जावं. उपाशी मरावं पण त्या जमीनदारासमोर नाचणं नको. पण हे सगळं मनातच राहिलं.

सुंदरा तमाशासाठी तयार होऊन बसली होती,इतक्यात आक्का जमीनदाराला घेऊन तिच्या तंबूत आली. सुंदरा उठली आणि तिने चमकून बघितलं. जमीनदाराच्या मागे तो काल तिला बागेत भेटलेला देखणा,सज्जन मुलगा होता. जमीनदाराबरोबर हा मुलगा? म्हणजे हा देखील त्याच जातकुळीचा असणार. काल बागेत तर अगदी सज्जन असल्याचा आव आणत होता. तिने रागाने दोघांकडे बघितलं. तमाशातली बाई म्हणजे ह्यांना खाजगी मालमत्ता वाटली का? ती तंबूतून बाहेर पडायला लागली.

“सुंदरा, थांब! तुझ्याशी बोलायला जमीनदार साहेब आले आहेत आणि तू कुठं निघाली?”
“काय वेगळं बोलणार हे माझ्याशी आक्का? माझ्या रूपाची आणि माझ्या नाचाची तारीफच करणार नं? माझ्याविषयी दुसरं बोलण्यासारखं आहे तरी काय?”
“तुम्ही लई रागावता बघा. पण त्यामुळे तुमचं सौंदर्य आणखीनच लाजवाब दिसतंय.” जमीनदार मिशीला पीळ देत म्हणाला.
सुंदराने जमीनदाराकडे तिरस्काराने बघितलं.
“आणि हे कोण तुमच्याबरोबर? तुमची हाजी हाजी करणारे का? काल बागेत तर लई सरळसुतासारखे वाटत होते.” सुंदराने त्या तरुणाकडे रागाने बघत विचारलं.
“काय सांगताय? तुमची भेट झाली आहे? काय रं किसन्या, मला काही बोलला नाहीस ते! छान छान,आता तुमची ओळख करून देतो. हा माझा पुतण्या. ह्याच्या लहानपणीच ह्याचा बाप मेला. तवापासून ह्याला आम्हीच पोसतोय. आमचं रक्त असून जरा बुजरा आहे,पण होईल तयार! शिकेल हळूहळू. अहो आत्ता कुठे पंचविसावं लागलं त्याला. कोवळं पोर हाय.तो अत्तरदाणीतल्या कापसापरी हाय.मंद सुगंध देणारा.अत्तराच्या फायाचा मादक सुगंध अजून त्याने घेतला न्हाय.” जमीनदार कुत्सित हसत म्हणाला.

किसनला ते ऐकून संकोचल्यासारखं झालं. “काका,मी बाहेर थांबतो.” तो झटक्यात तंबूच्या बाहेर आला. काकांची गलिच्छ भाषा त्याला नकोशी वाटली. सुंदरा त्याला पहिल्या भेटीतच खूप आवडली होती. तिचं निरागस कोमल रूप बघून तो भाळला. त्याच्या मनात आलं, काल तिने मला स्पष्ट सांगितलं,मी तमाशात नाचते. तिचा तो खरेपणा खूप आवडला पण मन कौल देत होतं, सुंदरा फक्त कलेसाठी नाचतेय. ती पवित्र आहे. सुंदराचा देखील नाईलाजच तर होता. आक्काच्या तालावर नाचण्यापलिकडे तिच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. ती देखील माझ्यासारखीच आश्रित! इथून निघून जावं का? सुंदराला असं नाचताना मी बघू शकणार नाही.
“काय रं किसन्या,कसला एवढा विचार करतोस? चल,तमाशाची वेळ झाली. आपल्यासाठी पहिल्या रांगेत खास जागा आहे.” जमीनदार किसनच्या पाठीवर थाप मारत म्हणाला. काकापुढे किसन मूग गिळून गप्प बसायचा. तो नाईलाजाने काकाबरोबर चालू लागला.

आज रोजच्यासारखा सुंदराच्या नाचात प्राण नव्हता. तिची नजर वारंवार किसनकडे जात होती. एरवी बेफाम नाचणारी सुंदरा, आज संकोचल्यासारखी नाचत होती. लावणीचा जोश कुठेही दिसत नव्हता. किसनकडे नजर गेली की तिची शरमेने मान खाली जायची. एका अनामिक भीतीने शरीर थरथरत होतं. काय होतं तिचं आणि किसनचं नातं? तिने नाच संपवला आणि तंबूत परत आली. डोकं ठणकायला लागलं होतं. ती पलंगावर जरा आडवी झाली आणि इतक्यात पडदा सारून जमीनदार आत आला. त्याला बघून सुंदरा घाबरली. तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागली. इतक्यात जमीनदाराने तिचा हात धरला.”थांबा की!कसली एवढी घाई झाली तुमास्नी. जरा डोळे भरून तुमचं रूप बघू तरी द्या.” जमीनदाराने तिच्या हातावरची पकड घट्ट केली.
सुंदरा कळवळून किंचाळली,
“आक्का”.

सुंदराचा आवाज ऐकून आक्का धावत तंबूकडे आली. तिथे तिने जमीनदाराला बघितलं. आक्काने आवेशाने पायातली चप्पल काढली आणि जमीनदारावर उगारत म्हणाली,”आधी इथून बाहेर व्हा. नाहीतर माझ्याइतकी वाईट कुणी न्हाय. पोरीच्या अंगाला हात जरी लावला तर जीव घेईन तुमचा.”

आक्काचं आणि सुंदराचं ओरडणं ऐकून मुरली, तमाशातली माणसं आणि किसन तंबूजवळ आले.
“आक्का” म्हणत सुंदराने आक्काला मिठी मारली.
“उगी,नको रडू!आज ह्या आक्काचा शब्द हाय तुला,काहीही झालं तरी,तुझं कौमार्य मी भंगू देणार नाही. आपलं आयुष्य असंच ग! संसाराची फक्त स्वप्न बघायची. आपली जागा कानावर ठेवलेल्या अत्तराच्या फायासारखी! पण ही आक्का आहे तुझ्या पाठीशी. तू कलेची उपासना कर. ही आक्का असताना,तुझा केसही कोणी वाकडा करू शकणार न्हाय. जमीनदारसाहेब, आम्हाला काही इज्जत नसतेच पण तुमची इज्जत घालवायची नसेल तर निमूटपणे इथून बाहेर व्हा.”

सुंदरा हुंदके देत आक्काला बिलगली. आक्काचं हे रौद्ररूप आणि प्रेमळ रूप,एकाच वेळी तिने बघितलं.

“गावच्या जमीनदाराला धमकी देतेस होय? फुटक्या कवडीची बाई तू! माझ्याशी दुश्मनी महागात पडेल.” जमीनदाराचे डोळे आग ओकत होते.
“काका, मला तुझी लाज वाटते. आरं, सुंदरा माझ्या वयाची. तुझ्या पोरीसारखी आणि तिच्याकडे तू वंगाळ नजरेने बघतोस? मला वाटलं, तू एक कला बघण्यासाठी तमाशाला आला आहेस. तुझं हे नीच कृत्य बघून माझीच मान खाली गेली. सुंदराकडे वाईट नजरेने बघायची हिम्मत करू नको. आक्का,तुमची हरकत नसेल तर मी सुंदराशी लग्न करायला तयार आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल फक्त आदर आहे. एका स्त्रीची अवहेलना पुरुष करतो तसंच तिचा मानही राखू शकतो,हे मी तिच्या गळ्यात डोरलं घालून सिद्ध करून दाखवेन.”
“ए किसन्या,माझ्या तुकड्यांवर जगणारा तू! ह्या दिडदमडीच्या बायकांसाठी तू मला शिकवतोस? तुला मी माझ्या इस्टेटीतून बेदखल करतो. ह्यापुढे माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही.” तिरीमिरीने जमीनदार तंबूच्या बाहेर पडला.

आक्का ते सगळं बघून घाबरली.
“किसनजी,तुम्ही आपल्या घरी जावा. आम्हाला ह्या असल्या तमाशाची पण सवय असते. तुमचं अख्ख आयुष्य आमच्यामुळे बरबाद करू नका.” आक्का रडत म्हणाली.
“नाही आक्का, माझा निर्णय झाला आहे.” किसन ठामपणे म्हणाला.
“किसनजी, तुमचे उपकार कसे मानू? अहो,आम्हाला चिखलातल्या कमळावाणी समदे समजतात,आमचा वापर करून घेतात पण तुम्ही अत्तरदाणीतला कापूस होऊन आलात. सुंदराच्या हातावर हळुवार तो सुगंध पसरवून तिचा हात मागताय. तुमची आजन्म ऋणी राहीन. मला जे संसारसुख मिळालं नाही,ते माझ्या ह्या पोरीला तुम्ही देताय.” आक्का रडत किसनचे पाय धरू लागली.
“आक्का, हे काय करताय? आधी डोळे पुसा. आजपासून सुंदरा माझी. आक्का,फक्त एकच विनंती आहे. मला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी थोडा अवधी द्या. काका मला आता घरात घेणार नाही. सुंदराची जबाबदारी घेण्यासाठी,तिला आधार देण्यासाठी मला आता काहीतरी मार्ग शोधावाच लागेल. काकाच्या बाबतीत माझ्या कानावर कुणकुण आलीच होती. पण माझ्यावर माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत. माझं पाऊल कधीही वाकडं पडलं नाही आणि पडणार नाही. माझ्या मित्राबरोबर नुकताच मी एक व्यवसाय सुरू केला आहे. थोडी पुंजी साठली की मी स्वतः येऊन सुंदराला लग्न करून घेऊन जाईन. आक्का, माझ्यावर विश्वास ठेवा.” किसन भावुक होऊन म्हणाला.
“अवो जावईबापू,तुम्ही याल त्याआधी निरोप धाडा. बँडबाजासकट आम्ही समदे तयार राहतो. आमच्या चिमणीला विदा करायला.” मुरली डोळे पुसत म्हणाला.

आक्काने सुंदरा आणि किसनला जवळ घेतलं. तिची सुंदरा आता सौभाग्यवती होणार होती. तिच्यासाठी ह्यापेक्षा दुसरा आनंद कुठला होता?…

××××××××××××

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

=====================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *