Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® गीता गजानन गरुड.

तब्बल दोन महिन्यांनी राणू आज्जीकडे आली होती. नवीनच कामावर रुजू झाल्याने रजा घेणं अवघड होतं. ही चारेक दिवसांची सुट्टी जोडून आली तसं तिला शहरातल्या खोलीत रहावेना. कधी एकदा रत्नागिरीला जाऊन आज्जीला भेटते असं झालं.

गाडी वेळेवर पोहोचली. आज्जीआजोबांना सरप्राईज द्यावं म्हणून तिने येणार असं कळवलं नव्हतं. रिक्षाने पाणंदीपर्यंत सोडलं..पुढे मग ती आपलं सामान सांभाळत झाडाझुडपांची ख्यालीखुशाली घेत चालू लागली.

राणूने फाटक उघडलं. आज्जी तोंडाने मंत्रजप करत तुळशीला प्रदक्षिणा घालत होती. तुळशीत रोवलेल्या उदबत्त्यांची  वलयं हळूवार वरच्या दिशेने जात वातावरणात लुप्त होत होती. झोपाळ्यावर आजोबा बसले होते. त्यांच्या डोळ्यांवर चष्मा नं हातात तरुण भारत होता. राणू आली गो..आजोबा एवढंच म्हणाले नि पुन्हा त्यांनी वर्तमानपत्रात डोकं घातलं.

राणूला पहाताच आजी प्रसन्न हसली.” प्रवास नीट झाला नं..तिने विचारलं. राणूने होकारार्थी मान हलवली. कळवलं असतस तर रिक्षा नाही का पाठवली असती! आंबोळ्यांना पीठ ठेवलं असतं”..आज्जी तक्रारीच्या सुरात म्हणाली.

“रहाणार आहे गं आज्जी चारेक दिवस. सावकाश काय ते करून घाल. घाई नको हो. मी जरा अंग धुवून येते.”

पाणचुलीवर तापवलेलं गरम पाणी अंगाखांद्यावर ओघळताच राणू त्रुप्त झाली. तो धुरकट वास तिने रंध्रांत भरून घेतला. राणू न्हाऊन आली. अगदी नुकत्याच ओघळलेल्या प्राजक्तफुलासारखी टवटवीत भासत होती राणू.

आज्जीने तिच्यापुढे न्याहारीचं ताट वाढलं. वांग्याचं भरीत, गुबगुबीत भाकऱ्या , लसणीचा ठेचा नि तिच्या आवडीचं अधमुरं दही.

“आज्जी,  काय झक्कास झालंय भरीत. ही अशी भाजी तिकडे काहीही घाला होत नाही बघ. तू चलतेस का माझ्यासोबत शहरात..मग रोज मला भाजीभाकरी करून घालशील.”

“मी लाख येईन गो पण तुझे आजोबा काय हे घर सोडून यायचे नाहीत. एवढुसं खातात पण वेळेवर समोर लागतं. इथे फिरायला जागा आहे मोकळी. तिथे मेलं कुशीने परतायचे वांदे, त्यापेक्षा तूच लग्नाचं घेना मनावर. तुझ्या लग्नाला येऊ आम्ही दोघंही, नातीला आशीर्वाद द्यायला.”

“पण आज्जी मला एक सांग..Is it obligatory to get married? लग्न करणं आवश्यक असतं का?”

“तसं नाही गं  राणू पण करावं गं लग्न माणसानं. सगळं कसं वेळात झालेलं बरं असतं बघ.”

“वेळात..शिकले की मी वेळात. एमएससी झाले..सलग एकाही वर्षी नापास नं होता. कामालाही लागले. पुरेसा पगार आहे. शहरात भाड्याने घर घेतलय. इथे  हे डोक्यावरचं छत अर्थात तुमचं, पण तुमचं तरी कोण आहे माझ्याशिवाय. एकुलली एक लेक होती ती बाळंतपणात गेली नं तिच्या नवऱ्याने नुकत्याच जन्मलेल्या माझं बोचकं तुझ्या स्वाधीन केलं. तू नाही का म्हणाली नाहीस आज्जी? का त्यांनी अव्हेरलेली त्यांची जबाबदारी वहात राहिलीस पुढचं आयुष्यभर?”

“तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत माझ्याकडे राणू. तुझी आई गर्भार होती त्याचवेळी मला नेमकं संधिवाताने जखडलं होतं. तुझ्या बाबाची आई म्हणजे माझी विहिणबाई म्हणाली की आम्ही आमच्या सुनेचं सारं लेकीप्रमाणे करू. तुम्ही अगदी बारशालाच या नं मग तिला वाटल्यास घेऊन जा तुमच्याकडे. मला खरंच काही उठबस करण्याची शक्ती नव्हती आणि तुझ्या आजोबांचा स्वभाव तुला ठाऊकच आहे..इथली काडी तिथे म्हणून करणार नाहीत.”

“तुच लाडावून ठेवलयस त्यांना. तुझ्या लाडाने बिघडलेत ते.”

”तसं म्हण हवं तर .. हां तर काय सांगत होते मी.. तुझ्या आईचं बाळंतपण तिकडेच झालं..अगदी आठव्या महिन्यात जन्मलीस तू..रक्त जास्त गेलं म्हणे माझ्या लेकीचं. बीपी वाढलं..सतरा कारणं..यांनी निघायला हवं, निघायला हवं..बेबीकडे जायचय जायचय म्हणून घाई केली.

माझ्या एकाही प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत. माझ्या मनात अभद्राची चाहूल लागलीच. तोंडात पदराचा बोळा घालून होते हो संपूर्ण प्रवासभर..टक्क जागी होते रातराणीत. डोळ्याच्या कडांतून अश्रू वहात होते..एका लयीत.

इस्पितळातत पोहोचेस्तोवर तेही आटले. माझी बेबी अगदी गाढ निजली होती. लहानपणी माझ्या मांडीवर घेऊन डोकं थापट थापट थापटलं की निजायची तशी निजली होती आणि तू ..तुला दिलं माझ्या हातांत. भूक लागल्याने मुठी चोखीत होतीस. चोवीसेक वर्षाची लेक गेल्याचं दु:ख करायचं की तुझं ते गोजिरं रुप पाहून हर्ष करायचा. मी अगदी संभ्रमित झाले होते.

तिथल्या परिचारिकेने धीर दिला मला. सावरले मी. सावरावं लागलं. तुझ्या बाबाकडे तुला देऊ केलं तर मान फिरवली त्यांनी. माझ्या रक्तामासाची लेक निश्चल पडली होती नि तिची शेवटची निशाणी..कशी आणि का अव्हेरणार होते मी तुला!

घरी आणलंं तुझं इवंलुसं गाठोडं आणि तो बसलाय नं वरती तो समस्या देतो तसं त्या सोडवण्याची ताकदही देतो बघ. मी माझा संंधिवात विसरूनच गेले. माझ्या मनाने तयारी केली, नातीला सांभाळायची. आपली कामवाली, तुझी छबुमावशी..तिचा बाळ वर्षाचा होता तेंव्हा. एकदा मी भाजी म्हणून आणायला गेले तुला पाळण्यात झोपवून.

तुझे आजोबा कोचावर नि छबु भांडी घासत होती वाटतं. येऊन बघते तर पाळणा रिकामी. काळीज हललं माझं. अहो आपली राणू कुठेय..आं कुठेय मला काय माहीत! मी लक्षच नाही दिलं यांच्याकडे.. आत धावले तर लाकडी कपाटाला टेकून छबू तुला पाजत होती. तू तुझ्या इवल्या मुठींनी तिचा पदर गच्च धरला होतास. पाय हलवत होतीस.”

मला पहाताच छबु दचकली..”ताई ते राणू रडत होती मोठ्यामोठ्याने..मला पान्हा आला नि नकळत मी हातातलं काम टाकून हिला छातीशी धरलं. ताई मी खालच्या जातीची..चुकलंच माझं..माफ करा.”

मी तिच्या पाठीवरनं हात फिरवला नि म्हणाले,”छबु, आईविना पोर ही. कसली जात नि कसला धर्म घेऊन बसलीस गं. आईच्या दुधाला जात नसते पोरी. अम्रुत असतं ते ईश्वराघरचं. तुला शक्य होईल तेंव्हा पाजत जा माझ्या राणूला. तुझे उपकार जन्मात विसरणार नाही मी..आणि छबुने तुला तिच्या दुधापासून कधी अव्हेरलंं नाही. तिच्या बाळूने दूध सोडलं पण तू पाच वर्षाची होईस्तोवर लुचायचीस तिला. हे जे आईपण माझ्यात, छबुत होतं ना ते दैवी असतंं राणू..हे अनुभवण्यासाठी तरी आई होणं गरजेचं आहे राणू आणि लग्न झाल्याशिवाय आई होता येत नाही बाळा.”

मोरीजवळ हात धुत राणू म्हणाली,”कोणत्या जमान्यात वावरतेस आज्जी? मुल दत्तक घेऊनही आई बनता येतं आज्जी. एखादं बाळ अनाथालयातनं घेता येतंं, त्याला जीव लावता येतो.. पण हे कुणासाठी तर ज्यांना आई होता येत नाही पण आई होण्याची तीव्र इच्छा असते त्यांच्या मनात.”

“काय सांगावं पोरी तुला. एक सांगायला गेलं तर दुसरंच सुनवतेस. तरणीताठी पोर तू. खायला अन्न लागतं, प्यायला पाणी तसं तुझ्या देहाचीही भूक असेल की नाही!”

राणी आज्जीसमोर जाऊन बसली व म्हणाली,”ती भूक भागवण्यासाठीही लग्नच केलं पाहिजे नि सौभाग्यवती असा शिक्कामोर्तब असला पाहिजे असं राहिलं नाही आज्जी आता. तुमचा काळ वेगळा होता. आता सगळंच बदललय.”

आज्जीला काही राणूचं म्हणणं पटेना. तिने नकारार्थी मान फिरवली नि टोपात दही घेऊन घुसळू लागली.

इतक्यात छबुमावशी आली.

“अरे वा आमची राणुताई किती दिवसांनी आली. आम्हाला वाटलं, शहरात गेली नि विसरली आम्हाला.”

“विसरेन कशी गं मावशी तुला. ही बघ तुझ्यासाठी साडी आणलेय धारीपदराची. पदर तर बघ किती सुरेख आहे.”

“कशाला गं एवढी महागाची साडी आणलीस! मी कुठे जातेय नेसून.”

“आज्जी खरवस आणलाय हो डब्यात. बरं झालं राणू आली ते. तिलाही मिळेल खायला.” छबुच्या हातातला डबा घेऊन आज्जीने त्यातला खरवस आजोबांना न्हेऊन दिला, मग त्या दोघींसाठी घेतला.

“छबुमावशी किती सुंदर झालाय खरवस. अगदी जीभेवर ठेवताच विरघळतोय.” राणूने छबुच्या पाककलेचं कौतुक केलं.

बरं बाळू काय म्हणतोय गं छबुमावशी?”

“काय म्हणणार. एवढा पैसाअडका साठवून लग्न लावून दिलं तर घरात पाय टिकत नाय त्याचा. बायको सोन्यासारखी गावलीय तर तिच्या अंगावर येतो. मारायला धावतो. तीही कमी नाही. नुसतं घालूनपाडून बोलत असते त्याला.

घरात नुसतं धुमशान असतं. त्यात त्यांचं ते चार महिन्याचं बाळ सतत रडत, रात्र बघाया नको की दिवस. दोघा नवराबायकोचं पटत नसलं की असे हाल होतात. सुनेला समजवायला जावं तर सून निब्बर हट्टी. दोघातलं एक माघार घेत नाय. रोज उठून शेजाऱ्यापाजाऱ्यांना तमाशा.’

इतका वेळ छबुमावशीचं बोलणं ऐकत असलेली राणू आज्जीला म्हणाली,”बघ आज्जी ऐक. हे असं लग्न करून हमरीतुमरी करत रहाण्यापेक्षा, घरातल्या घरात लढाया करत रहाण्यापेक्षा स्वतंत्र रहिलेलं काय वाईट!

यावर छबुमावशी हसत म्हणाली,”एक फळ नासकं निघाल म्हणून सगळेच तसे निघतील असं नसतंं बरं राणू. मी चार घरची कामं करू शकले ते माझ्या नवऱ्याच्या साथीमुळे.

कधी मी आजारी झाले की हवालदिल व्हायचे. माझा पाय प्लास्टर झाला होता तेंव्हा आई  जशी लेकराची सेवा करते तशी सेवा केलती माझी.

मी परत उभी राहीन हीसुद्धा शाश्वती नव्हती गं. यांनीच मला धीर दिला. यांच्या खांद्यावर हात ठेवून एकेक पाऊल टाकू लागले. नवरा म्हणजे आई,बाप,भाऊ सगळं काही असतो बाईचा. मुलांना जन्माला घालणं हेच लग्नाचं इस्पित समजत असशील तर चुकतेस राणू तू.

आपल्या सुखात सामिल होण्यासाठी आपल्या हक्काच्या साथिदाराची गरज असते. आपलं दु:ख हलकं करण्यासाठी हक्काचा खांदा लागतो..म्हणून बाईच्या जातीला पुरुषाची नं पुरुषाच्या जातीला बाईची आवश्यकता असते राणू आणि ते एकनिष्ठतेचं पवित्र बंधन दोघांत घालून घेणं म्हणजेच तर लग्न.

पटतय ना तुला माझं म्हणणं. शंभरातली दहा लग्नं अयशस्वी झाली तर तो परिस्थितीचा,जोडप्याच्या आडमुठेपणाचा दोष मानावा पण बाकीची जोडपी आपापल्या घरात सुखदु:ख वाटून घेतात म्हणून तर गोकुळ झालंय या विश्वाचं.”

राणी काहीच न बोलता तिच्या खोलीत गेली. टेबलवरील फ्लॉवरपॉटमधील गुलाबांचा मंद सुगंध येत होता. राणुला छबुमावशीचं बोलणं आठवत होतं..आणि आठवत होता नेहमी बसस्टॉपवर भेटणारा, बोलू पहाणारा राजस.

तीही टाळत नव्हतीच त्याला, टाळता येणं तसं अशक्य नव्हतंच पण मग का टाळत नव्हती..कारण तिला राघवचं बोलणं,आर्जवं करणं हवंहवंस वाटत होतं पण त्याचसोबत एक मन लग्नप्रथेविरुद्ध बंड करून उठत होतं, म्हणत होतं..कशाला स्वतःला लग्नाच्या बेडीत अडकवू पहातेस..स्वत:चं स्वातंत्र्य का हिरावून घेतेस पण दुसरं मन ओढ घ्यायचंच राजसकडे.

त्याचे चमकते दात, लाघवी हसणं,सिल्की केस, तरतरीत,सरळ नाक, मजबूत बांधा, भरदार छाती जिच्यावर डोकं टेकवून मनमोकळं करावी अशी..

राणूने खिडकीतून बाहेर पाहिलं. उन्हं उतरणीला लागली होती. समोरच्या बालकनीतल्या कुंडीत कबुतराचं जोडपं आळीपाळीने पिल्लांवर बसत होतं, त्यांना ऊब देत होतं. मुक्या जीवांना जे कळतं ते आपल्याला कळू नये! पैसाअडका सारं आहे आपल्याजवळ. एखादं मुल घेऊन वाढवू शकते सहज पण मुलांना आई नं बाप दोघांचीही गरज असते..त्यासाठी तरी लग्न..

राणू धावतच आज्जीकडे गेली. आज्जी ओसरीवर गोधडीला टाके घालत बसली होती. आज्जीच्या गळ्यात हात घालत म्हणाली,”आज्जी मला समजलय..Though it’s not obligatory to get married, it’s nIce and good to get married.

“म्हणजे लग्न करायचंय असंच म्हणतेस ना.”

“हो गं आज्जी हो.”

मेंदीच्या ताटव्यांना झारीने पाणी घालताना आजोबांनी आजीनातीचं बोलणं ऐकलं नि त्यांचा चेहरा समाधानाने उजळला.

–समाप्त

=================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *