Ritbhatmarathi

Search
Close this search box.

जेवणाची चव द्विगुणित करण्यासाठी हे पदार्थ नक्की करा.

chutney recipe in marathi: गारठावून टाकणाऱ्या थंडीत शरीराचे तापमान राखण्यासाठी,विषाणूजन्य आजारांपासून आपला बचाव करण्यासाठी, एवढंच नाही तर खवळणाऱ्या जीभेचे लाड पुरवण्यासाठी  भरपूर पोषणमूल्य असणाऱ्या साहित्यांपासून बनवता येणारे चटकदार, चमचमीत असे निवडक पारंपारिक पदार्थ

कारळे चटणी (Niger Seeds Chutney):

कारळे/खुरसणी हे तेलजन्य बी आहै. त्वचेवरील सुरकुत्या घालविण्यासाठी, निद्रानाश दूर करण्यासाठी, शांत झोपेसाठी, त्वचेच्या संरक्षणासाठी, दुखण्यावरील सूज कमी करून आराम मिळविण्यासाठी, हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी खुरसनी  खूपच उपयुक्त आहे. थंडीच्या दिवसांत काही बाया हे कारळे विकायला आणतात. एक ग्लास दहा रुपये दराने विकतात.

वाटीभर कारळे/खुरसणी, एक गड्डी लसूण, पाच ते सहा लाल ब्याडगी मिरच्या, चवीपुरते मीठ.

कारळे नीट निवडून घ्या. खडा किंवा तुसं असतील तर काढून टाका.

कढईत घेऊन मंदाग्नीवर परतत रहा. भाजत आले की यांना तकाकी येते. खमंग वास दरवळतो. 

मिक्सरमध्ये आधी लसूणपाकळ्या फिरवून घ्या. त्यात कारळे, मिरच्यांचे तुकडे,मीठ टाकून पल्समोडवर फिरवा. जाडसरच ठेवा.

चटणीला हवा न लागू देता काचेच्या बरणीत भरुन ठेवा. यात कारळ्याच्या समप्रमाणात पांढरे तीळ घालुनही चटणी करतात. वरणभात नं कारळ्याची चटणी फर्मास लागते. यात थोडे कच्चे तेल टाकूनही पोळीसोबत खातात.

आवळा चटणी:

थंडी सुरु झाली की बाजारात रसरसीत आवळे दिसायला सुरुवात होते. थंडीच्या दिवसांत आहारात यांचा आवर्जून वापर करावा.

आवळे खाल्ल्याने सी जीवनसत्व मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, केसाच्या वाढीसाठीही आवळ्यांचं सेवन फायदेशीर आहे. आवळ्यात फायबरचं प्रमाण अधिक असल्याकारणाने पोट साफ होते.  रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित रहाते.

दोन आवळ्याच्या फोडी, वाटीभर ओले खोबरे, अर्धी वाटी हिरवी कोथिंबीर, चार पाच पोपटी मिरच्या, सात-आठ लसूणपाकळ्या, चवीपुरतं मीठ.

ताज्या आवळ्यांच्या फोडी करुन घ्याव्यात.

लसूणपाकळ्या सोलून घ्याव्या.

मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे, खोवलेला नारळ, आवळ्यांच्या फोडी, लसूणपाकळ्या, कौथिंबीर, मीठ  व थोडेसे गरजेपुरते पाणी घालून गंध वाटून घ्यावे.

ही चटकदार आवळाचटणी जीभेची चव वाढवते. आंबोळ्या,घावण,पोळी, आमटीभात..या साऱ्यांसोबत पटतं हिचं. बारमाही चटणी करायची झाल्यास एका बरणीत पाणी भरावे. त्यात मीठ घालावे..त्यात आवळे टाकून बरणी फ्रीजमधे ठेवावी. हे आवळे महिन्याभरात मुरतात. पित्तावर गुणकारी. चटणी करायच्या आधी बरणीतनं दोन आवळे काढून चटणी करावी.

भुरका:

सव्वा वाटीभर तेल, साताठ कढीपत्त्याची पाने, दहा ते बारा सोलून ठेचलेल्या लसूणपाकळ्या, एक टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून जिरे, तीन टेबलस्पून तीळ(भाजून, किंचीत भरडून), तीन टेबलस्पून शेंगदाणा कुट, मीठ, आवडीनुसार लाल तिखट

कढईत तेल गरम करत ठेवावं.

तेल गरम झालं की मोहरी टाकावी.

मोहरी तडतडली की जिरे टाकावे. कढीपत्ता टाकावा. चिमटीभर हिंग टाकावं.

ठेचलेल्या लसूणपाकळ्या घालून चमच्याने परतावं.

भरडलेले भाजके तीळ व शेंगदाण्याचं कुट घालावं नि जरा परतावं.

गॅस बंद करुन तिखट,मीठ पेरावं.

भुरका थंड होऊ द्यावा. चपाती,भाकरी,वरणभात यासोबत तोंडीलावणं म्हणून भुरका जमून जातो. शिवाय घरात असलेल्या नेहमीच्या साहित्यापासून कमीतकमी वेळात होतो.

हेही वाचा

पुण्याला भेट देताय? मग अस्सल महाराष्ट्रीयन चमचमीत पदार्थ ट्राय करण्यासाठी इथे नक्की भेट द्या.

घरच्या घरी इम्युनिटी वाढवण्यासाठी हे पदार्थ नक्की करून पहा.

हिरवी मिरची ठेचा:

गावाकडे शेतावर जाताना बायामाणसं फडक्यात भाकरीची चळत बांधून नेतात. दोन भाकरीमधे हिरव्या मिरचीचा ठेचा न्हेतात.

ठेच्यात असणाऱ्या हिरव्या मिरचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराला बॅक्टेरियापासून मुक्त ठेवण्यास मदत करतात. हिरवी मिरची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. लसणामुळे रक्तदाब,मधुमेह नियंत्रणात रहातो. वजन आटोक्यात रहाते. त्वचेचे,केसांचे आरोग्य राखले जाते. पाहूया कसा करतात हा झणझणीत ठेचा.

दहा ते बारा हिरव्या मिरच्या, अर्धी लहान वाटी भाजके शेंगदाणे, दोन टीस्पून जिरे, एक लसूणगड्डा, चवीपुरतं मीठ, दोन टीस्पून तेल.

ठेचा करण्यासाठी हिरव्या मिरच्या धुवून,पुसून घ्या. त्यांचे देठ काढून घ्या.

शक्यतो लोखंडी कढईत या मिरच्या घेऊन परतत रहा. पाचेक मिनटात मिरचीचा गंध सुटेल.

यात एक गढ्ढा लसूणपाकळ्या सोलून घाला नं परतत रहा.

आता यात हातावर घसटवून दोन चमचे जिरं टाका.

दाणे भाजून , सालं काढून ,तळहाताने चिरडून एकाचे दोन करुन घ्या नं हे दाणे मिरच्यांत टाकून परतत रहा. यात चिमुटभर हळद घाला. चवीपुरतं मीठ घाला. खडेमीठ असेल तर उत्तम.

हे सारं साहित्य खलबत्त्यात घालून जाडंभरडं कुटा. खलबत्ता नसल्यास मिक्सरच्या भांड्यात पल्समोडवर दोनतीनदा फिरवून घ्या. 

कढईत दोन टीस्पून तेल गरम करा. त्यात हा ठेचा दोन मिनटं परतून घ्या.

हा ठेचा चपाती,भाकरी, वरणभात,दहीभात यासोबत तोंडी लावणं म्हणून भाव खाऊन जातो. हिरव्या मिरच्या कफाचे प्रमाण कमी करतात, रक्त पातळ करतात.

शेंगदाणा चटणी:

शेंगदाण्यांच्या नियमित सेवनाने रक्तवाहिन्यांतील दोष कमी होतात. वजन नियंत्रणात रहाते. ह्रद्याचे आरोग्य राखले जाते. शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याकारणाने मधुमेहींसाठी गुणकारी आहेत. सोलापूरची शेंगदाणा चटणी प्रसिद्ध आहे.

एक वाटीभर शेंगदाणे, एक गड्डा लसूण, एक टीस्पून काश्मिरी तिखट, एक टीस्पून साधं तिखट, दोन टीस्पून जिरे, चवीपुरतं मीठ,एक टीस्पून तेल

शेंगदाणे सालं निघतील इथपर्यंत भाजून घ्यावे. सुपात घेऊन तळहाताने घसटून त्यांची सालं काढावी व पाखडून घ्यावे.

कढईत एक टीस्पून तेल तापवावं. त्यात हे साल काढलेले शेंगदाणे परतत रहावे.

त्यात एका गड्डी लसणाच्या सोललेल्या लसूणपाकळ्या जरा ठेचून घालाव्या व परताव्या.

यात जिरे,काश्मिरी तिखट,साधे तिखट घालून परतावे.

हे साहित्य खलबत्त्यात सरबरीत/जाडंभरडं कुटावं किंवा मिक्सरमध्ये पल्समोडवर फिरवून घ्यावं. चटणी हवाबंद बरणीत भरुन ठेवावी. ही शेंगदाणा चटणी पोळी,भाकरीसोबत छान लागते.

==================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *