Ritbhatmarathi

Search
Close this search box.

‘बंध जुळती हे प्रीतीचे’ भाग 5

रेवती आणि सारंग तिथेच चार दिवस राहिले पण अबोला घेऊनच. एकमेकांच्या सोबत असूनही नसल्याप्रमाणे. रेवती कधी कधी सारंगशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र सारंग तिच्याशी बोलत नव्हता.

चार दिवसानंतर दोघेही घरी आले. तात्यांची तब्येत बरी नसल्याने दुसऱ्याच दिवशी रेवती पुन्हा माहेरी आली.
रेवतीला पाहून तात्यांना आनंद झाला. तात्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, “कशी आहेस बाळा? ठीक आहेस ना? आणि जावईबापू कसे आहेत?”

“आम्ही दोघेही ठीक आहोत. पण तात्या तुम्ही लवकर बरे व्हा आधी. मग बाकीची चौकशी करा. आई डॉक्टर काय म्हणाले? म्हणजे तात्या सहसा कधी आजारी पडत नाहीत ना?”रेवती.

“थोडा ताण आला असल्याकारणाने बीपी वाढलं त्यांचं. डॉक्टर म्हणाले, आता कुठल्याही गोष्टीचा जास्त ताण घ्यायचा नाही. निवांत राहायचं. दोन दिवस झाले, सारखी तुझी आठवण काढत होते. म्हणून मालतीबाईंकडे निरोप पाठवला, पोरीला दोन दिवस पाठवून द्या म्हणून.” नीताताई तात्यांना उठवून बसवत म्हणाल्या.

“रेवू, जावई बापू आले नाहीत तुझ्यासोबत? त्यांना म्हणावं, सासरा आठवण काढतो आहे तुमची.” तात्या.

“हो. सांगेन मी निरोप. पण हल्ली त्यांचे काम वाढले आहे ना. घरी यायलाही उशीर होतो त्यांना. म्हणून नाही आले ते.” रेवतीने काही सांगून वेळ मारून नेली.

“पोरी मी खरचं चुकलो तर नाही ना? या विचाराने मन फार अस्वस्थ होतं. पण तू आनंदात आहेस हे पाहून मनाला समाधान वाटतं.” तात्या.

“मोठी माणसं चुकली तर लहानांनी ती चूक विसरून जावी. तुम्हीच तर शिकवलं ना हे? आणि आता माझी काळजी करू नका. मी खूप सुखात आहे. समजून घेणारे सासू-सासरे आणि प्रेम..कर..करणारा नवरा. जाऊ दे ना तात्या. तुम्ही विश्रांती घ्या. आपण नंतर बोलू.” असे म्हणत रेवती आईला मदत करायला स्वयंपाकघरात गेली.

दुसऱ्या दिवशी मालतीबाई आणि रेवतीचे सासरे येऊन तात्यांना पाहून गेले. जाताना मालतीबाई रेवतीला म्हणाल्या, “तात्या थोडे थकल्यासारखे वाटतात. त्यांची तब्येत बरी होईपर्यंत इथेच राहा. तिकडची काळजी करू नको. तू इथे असशील तर आईलाही मदत होईल आणि मानसिक बळही मिळेल. मी उद्या सारंगला इथे पाठवून देईन. तो इथे राहील, नाहीतर येऊन जाऊन करेल. म्हणजे तुम्हाला काही लागलेच तर त्याची आपली तेवढीच मदत होईल.” मालतीबाईंच्या या बोलण्याने रेवतीला धीर मिळाला.

मालतीबाईंच्या आग्रहाखातर सारंग तात्यांना पाहायला आला. जावई आल्याच्या आनंदात तात्या आता हिंडू -फिरू लागले. तरी पुढचे दोन- तीन दिवस सारंग इथेच राहिला. तात्यांना काय हवं नको ते जातीने पाहू लागला. संध्याकाळी कामावरून आल्यानंतर त्यांना फिरायला घेऊन जाऊ लागला. हे पाहून रेवतीला खूप छान वाटत होतं. तात्यांची निवड चुकीची नव्हती या विचाराने तिला खूप बरं वाटलं.

“हे दुखावले गेले आहेत. मी यांना विश्वासात घेऊन सारं काही सांगायला हवं होतं. पण त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. शिवाय यांनी लग्नाला नकार दिला असता, तर तात्यांना संशय आला असता माझ्याबद्दल. आता यांना समजवायचे तरी कसे?” रेवतीला समजत नव्हतं.
आता ती सारंगशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण सारंग आता तिच्याशी फक्त कामापुरते बोलत होता. घरात कोणाला काही कळू नये म्हणून, सगळ्यांसमोर छान वागायचे नाटक करत होता.

तात्यांची तब्येत आता सुधारली असल्याने रेवती आणि सारंग दोघेही घरी परतले. या दरम्यान श्वेताचे कॉलेज संपले आणि तिला एक छानशी नोकरीही मिळाली. रेवतीच्या लग्नाआधी तात्या नुकतेच रिटायर्ड झाले होते. तशी फारशी गरज नसली तरी, आता घरी कमावणारे कोणीतरी हवे म्हणून श्वेताने हट्टाने नोकरी धरली. मग निताताई आणि तात्यांनी तिला लग्न ठरेपर्यंत नोकरी कर, म्हणून तिला परवानगी दिली.

दिवाळी तोंडावर आल्याने आता घरी दिवाळीची लगबग सुरू झाली. सारंग आणि रेवतीची पहिलीच दिवाळी! मालतीबाईंनी फराळाचे पदार्थ करण्याचा घाट घातला. चिवडा, चकली, लाडू, करंज्या असे सारे पदार्थ केले. निताताई आणि तात्या येऊन दिवाळसणाला घरी येण्याचे आमंत्रण देऊन गेले. मात्र मालतीबाईंनी त्यांना आपल्या घरी येण्यास सांगितले. “तात्यांची तब्येत बरी नव्हती. उगीच दगदग , धावपळ करू नका. तुम्ही तिघे इकडेच या. इथेच सण साजरा करू.” आढेवेढे घेत शेवटी तात्या तयार झाले.

दिवाळीचा पहिला दिवस उजाडला. रेवतीने भल्या पहाटे उठून साऱ्या घरभर पणत्या लावल्या. छान रांगोळी घातली. अभ्यंगस्नान करून घरचे सारे रीतीप्रमाणे देवीच्या दर्शनाला गेले. नंतर मालतीबाईंनी फराळाची ताटं वाढून शेजारी – पाजारी वाटली.
दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन पार पडले. पाडवा आला. मालतीबाईंनी घेतलेली साडी रेवतीने नेसली. सारंगला ओवाळले.
“अरे सारंग आज आपल्या बायकोला भेटवस्तू द्यायची असते.” मालतीबाई सारंगला म्हणाल्या.
“आई मी विसरलो गं. आणेन नंतर.” असे म्हणत सारंग तिथून निघून गेला.

इतक्यात तात्या, निताताई आणि श्वेता आले. इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी होऊन फराळ झाला. नंतर रेवती आणि सारंगला पाटावर बसवून निताताई आणि तात्यांनी दोघांना आहेर केला. रेवतीला साडी, जावयाला अंगठी. तसेच मालती बाईंना साडी आणि रेवतीच्या सासऱ्यांना कपडे.

“अहो आम्हाला कशाला काय आणायचे? त्या दोघांची पहिली दिवाळी. त्यांना आहेर केला. बस् झालं. उद्या भाऊबीज आहे. मग मी काय म्हणते, श्वेताला उद्या आमच्या सारंगला ओवाळायला पाठवून द्या. त्या निमित्ताने एक नवं नातं जोडलं जाईल.” मालतीबाई निताताईंना म्हणाल्या.
काही वेळातच नीताताई, तात्या आणि श्वेता बाहेर पडले.
दुसऱ्या दिवशी श्वेता सारंगला ओवाळून गेली. जाता जाता रेवतीला म्हणाली,
“ताई, आमच्या ऑफिसमध्ये काही जागा रिकाम्या आहेत. तिथे अर्ज करतेस का बघ. नोकरी मिळाली तर तुझा वेळही जाईल आणि पगारही मिळेल.” रेवतीला श्वेताचे म्हणणे पटले. तिने
सारंगला विचारुन पाहिले. पण तो काहीच बोलला नाही.

सारंगचे वागणे पाहून दोघांत काहीतरी बिनसल्याचा थोडा फार अंदाज मालतीबाईंना आला होता. पण त्यात त्यांनी लक्ष घातले नव्हते. मात्र सारंगचे रेवतीशी तुटक वागणे पाहून एक दिवस मालतीबाईंनी त्याला विचारलेच, “तुम्हा दोघांत काही भांडण वगैरे झाले आहे का? बऱ्याच दिवसांपासून पाहते आहे मी. दोघेही असे वागता आहात, जसे लग्नाला दहा -बारा वर्षे झाली आहेत.”

“नाही तर. काहीच नाही झाले आई. ते आपले असेच..”

“तू मला काही सांगावस असं माझं म्हणणं नाही. पण जे काही असेल ते मिटवून टाका. इतकेच माझे म्हणणे आहे.”

इतक्यात तिथे रेवती आली.
“आई, बरेच दिवसांपासून विचारेन म्हणते, मीही नोकरी करू का? म्हणजे श्वेताच्या कामाच्या ठिकाणी काही जागा रिकाम्या आहेत. तिथे अर्ज करून पाहते. मी यांना विचारुन पाहिलं. पण हे काहीच बोलत नाहीत.”

“हो. तू कर अर्ज. आमची काही हरकत नाही. तेवढाच तुझा वेळ जाईल. नव्या ओळखी होतील. नवे अनुभव मिळतील.” मालतीबाई म्हणाल्या.

“काय गरज आहे नोकरीची? मी पुरेसं कमावतो ना? ती घर सांभाळते तेवढं पुरेसं आहे. आता अजून तिचे उपकार नकोत मला.” सारंग चिडून म्हणाला.

“हे काय बोलणं झालं सारंग? तिला नवीन काहीतरी करायला आपण पाठिंबा द्यायला हवा की.. ते काही नाही..रेवती तू कर अर्ज.” मालतीबाई सारंगकडे न पाहताच म्हणाल्या.

तसा सारंग उठून आपल्या खोलीत निघून गेला. त्याच्या मागोमाग रेवतीही आत आली.
“तुमची इच्छा नसेल तर मी नोकरी नाही करणार. पण हा अबोला सोडा आता. माझं चुकलं खरचं. मला माफ करा. मी तुम्हाला विश्वासात घेऊन सारं काही सांगायला हवं होतं. पण त्यावेळची परिस्थितीच तशी होती.” रेवती सारंगच्या जवळ जात म्हणाली. तसा सारंग तिच्यापासून दूर जाऊन उभा राहिला.
“अहो, सारं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करू. हा राग सोडा आता.” रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं.
“असं सगळं विसरून जाणं सोप असतं, तर किती बरं झालं असतं रेवती. तूच याचा विचार कर.” असे म्हणून सारंग तिथून निघून गेला.

“रेवती तू आपल्या लग्नानंतर नोकरी करावीस अशी माझी इच्छा आहे. कारण आजकाल स्त्रिया नोकरी करतात, कमावतात. आपल्या कमाईचे पैसे हाती असले ना तर चेहऱ्यावर एक प्रकारचा आत्मविश्वास येतो.” शंतनू कॉलेजच्या कट्ट्यावर बसून रेवतीला सांगत होता. शंतनूच्या आठवणीने रेवती गहिवरली.
नकळत तिचे मन शंतनू आणि सारंगची तुलना करू लागले. ‘आज शंतनू असता तर त्याने लगेच परवानगी दिली असती. पण लग्नानंतर शंतनूचा विचार करणे चूकीचे नाही का? नशिबाने माझी गाठ सारंगशी बांधली गेली. जे झालं त्यात चूक कोणाचीच नव्हती. पण सारंग माझ्याशी बोलत नाहीत, याचे मला का वाईट वाटते? त्यांचं माझ्या अवती -भवती असणं मला कसलीशी जाणीव करून देतं? आणि तात्यांनाही किती आधार वाटतो त्यांचा! श्वेताला ते आपल्या बहिणीप्रमाणे वागवतात.’ आपलं मन नक्की काय सांगायचा प्रयत्न करत आहे हेच रेवतीला कळत नव्हतं.

“आपण थोड जास्तच ताणवलं का? खरं तर यात रेवतीची चूक ती काय? तिने सारं काही मला आधीच सांगितलं असतं, तर मला त्याचं इतकं वाईट वाटलं नसतं. पण यात माझी तरी काय चूक? पाहताक्षणी मी रेवतीच्या प्रेमात पडलो आणि तिला वेळ न देताच मी तिच्याकडून अपेक्षा ठेवू पाहतो आहे, की तिनेही माझ्यावर तितकचं प्रेम करावं! असा कसा वागलो मी? तिला समजून घ्यायला आपण कमी पडतो आहोत काय? हे सारंगला समजत नव्हतं.

क्रमशः

====================

मागील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag4/

पुढील भाग:

https://www.ritbhatmarathi.com/bandh-julati-he-pritiche-bhag6/

====================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *