Ritbhatmarathi

Search
Close this search box.

अंतर (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा _जाने_२२”

©️®️ सायली कुलकर्णी

एरवी स्वयंपाकाचा कंटाळा करणारी मधुरा आज भराभर हात चालवत होती. मधुराने सारा स्वयंपाक आपल्या सासूबाईंच्या आवडीचा बनवला होता. तयार झालेला स्वयंपाक टेबलावर तिने अगदी छान रीतीने मांडून ठेवला आणि समाधानाने मान डोलावली. “माई येतीलच इतक्यात” असे मनातल्या मनात म्हणत ती खिडकीजवळ येऊन उभी राहिली. थोडयाच वेळात सासूबाई गाडीतून उतरताना दिसल्या, तसे मधुराने  पटकन जाऊन दार उघडले आणि शेजारी खेळायला गेलेल्या आपल्या दोन छोट्या पिल्लांना “आजी आली” म्हणून हाक मारली.
 

“या माई” मधुरा आपल्या सासूबाईंच्या हातातील सामानाची पिशवी घेत म्हणाली. निर्विकार चेहेऱ्याने  आत येत सारं घर न्याहाळत होत्या. “चला माई पटकन हात-पाय धुवून घ्या, लगेच जेवायलाच वाढते”. मधुरा माईंच्या समोर पाण्याचा तांब्या ठेवत म्हणाली. “माई आज सारा स्वयंपाक तुमच्या आवडीचा आहे हा”. असे म्हणत मधुरा आग्रहाने माईंना जेवू घालत होती. माईंनी मात्र काही न बोलता शांतपणे जेवण केले आणि त्या बाहेर बैठ्कीच्या खोलीत येऊन बसल्या. आपल्या लहानग्या नातवंडांना पाहून त्यांना एकदम भरून आले. तसे त्यांनी आपल्या मुलाकडे ‘मिलिंदकडे’ पाहिलं. त्याने डोळ्यांनीच होकार दिला, तशा माई पुढे आल्या आणि आपल्या नातवंडांना बिलगल्या. हे पाहून मधुराच्या ही डोळ्यात पाणी आले.

”माई मला माफ करा हो. हे सारे सुखाचे क्षण मी तुमच्या पर्यंत पोहोचू दिले नाहीत. तुमच्याच घरात तुम्हाला परकं केलं”. असे म्हणत मधुरा ही माईंना जाऊन बिलगली. तशा माई पटकन बाजूला झाल्या. तिच्याकडे न पाहताच आपले डोळे पुसत मिलिंदला म्हणाल्या, “चल मिलिंद सामान घे माझे”.
“माई कुठे चाललात आम्हाला सोडून? मिलिंद..अहो माई कुठे निघाल्यात? “माफ करा माई मला”..माईंचे पाय धरत मधुरा रडू लागली. माईंनी तिला निग्रहाने बाजूला केले आणि म्हणाल्या “मधुरा झालं गेल कशी विसरून जाऊ मी? असे म्हणत माईंनी डोळ्याला पदर लावला.

“आजपासून माई आपल्या पलीकडच्या रिकाम्या घरात राहणार आहे. पुन्हा तुला ‘अडचण’ नको म्हणून”. ‘अडचण’ या शब्दावर जोर देत मिलिंद मधुराला म्हणाला.  
मधुराने साधारण चार वर्षांपूर्वी काळेंच्या घरात ‘सून’ म्हणून पाऊल टाकले. घरात माईंनी तिचे आपल्या लेकीप्रमाणे स्वागत केले. आनंदाने, मोकळ्या मानाने त्यांनी सारं घर मधुराच्या ताब्यात दिलं आणि फार अपेक्षा ही नाही लादल्या तिच्यावर. स्वभावाने ‘हट्टी’ असलेली मधुरा माईंचे प्रेम समजू शकली नाही. तिला वाटे माई आपल्यावर हक्क गाजवतात. मनाप्रमाणे संसार करूच देत नाहीत आपल्याला चुकलेले समजावून सांगून देखील तिला वाटे की, माई आपल्या कामात सारख्या चुकाच काढतात. माईंनी, मिलिंदने तिला समजवायचा खूप प्रयत्न केला. पण मधुराच्या मनात मात्र माईंविषयी अढी बसली. हळू -हळू त्याचे रुपांतर रागात झाले
अंतर ठेऊन वागू लागली ती माईंसोबत. मधुराची आई ही आता तिच्या संसारात लुडबूड करू लागली, त्यामुळे मधुराच्या माईंविषयीच्या रागाला खात-पाणी घातले गेले. मधुराला आता अडचण होऊ लागली माईंची. काही ना काही कारणाने ती भांडण काढू लागली माईंसोबत.

अशातच मधुराला दिवस गेले तेव्हा माईंनी तिला अगदी छान जपले. खूप काळजी घेतली तिची. मात्र “त्यांचे कर्तव्यच आहे हे” म्हणून मधुराने याकडे दुर्लक्ष केले.
सातव्या महिन्यात मधुरा बाळांतपणासाठी माहेरी गेली. नऊ महिने सरल्यावर तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. सारे विसरून आनंदाने माई तिला भेटायला आल्या, पण तिने माईंना आपल्या मुलांना पाहू दिले नाही. शिवाय “माई त्या घरात राहणार असतील तर मी सासरी पाऊल ही ठेवणार नाही”, अशी अट तिने मिलिंदला घातली. मिलिंद ने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण मधुराने आपली अट कायम ठेवली. अखेर आपल्या मुलाच्या संसारासाठी माघार घेत माई अस्वस्थ मनाने ‘वृद्धाश्रमात’ राहायला गेल्या. तेव्हा कुठे मधुरा आपल्या घरी आनंदाने परत आली. आता तिच्यावर लक्ष ठेवणारे इथे कोणी नव्हते. आपल्या मर्जीप्रमाणे हवी तशी वागू शकत होती ती.

मिलिंदने माईंना घरी परत आणायचा खूप प्रयत्न केला. पण माई काही घरी परतल्या नाहीत. मिलिंद मात्र एक दिवसाआड माईंना भेटायला जाऊ लागला. याला मधुराचा आक्षेप नव्हता आपल्या मुलांना मात्र तिने एकदा ही माईंकडे भेटायला पाठवले नाही. मधुरा खुश होती. मिलिंद मात्र मनातून दु:खी होता. त्याचे आपल्या आईवर ही तितकेच प्रेम होते, जितके मधुरावर होते.

अचानक एक दिवस कोरोना महामारीची साथ आली. सार्वजनिक ठिकाणी शासनाकडून कडक निर्बंध घातले गेले. मिलिंदला माईंना भेटायला जाणे ही मुश्किल झाले. त्याचे ऑफिस चे काम घरातूनच चाले.

एक दिवस मधुराला अचानक त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने काही चाचण्या करून घेतल्या. त्यात तिची कोरोना चाचणी ‘पोझिटिव्ह’ आली. मिलिंद आणि दोन्ही मुलांची चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्याने ती तिघे ही पलीकडच्या रिकाम्या घरात शिफ्ट झाली. आता मधुरा चार खोल्यांच्या घरात एकटीच राहत होती, चौदा दिवसांसाठी. पहिले चार दिवस ठीक गेले. पण नंतर मात्र मधुराला आपल्या मुलांच्या, मिलिंदच्या आठवणीने घर खायला उठलं. चार खोल्यात एकटीने राहणं आता मुश्कील होऊ लागलं तिला. मुलांच घरभर बागडणं, खाऊसाठी हट्ट करणं, मिलिंदच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली.

“आज माई इथे असत्या तर”? त्यांनी मुलांना संभाळलं असत. शिवाय मला ही काय हवं, काय नको हे अगदी व्यवस्थित पाहिलं असतं. माई कशा राहत असतील तिथे ‘एकट्या’? त्यांना ही आठवण येत असेल का आमची? वर्ष होऊन गेलं.. आपण माईंना भेटायला ही नाही गेलो. फोनवरुन साधी त्यांची विचारपूस ही केली नाही. किती मोठी चूक केली आपण, त्यांना त्यांच्याच हक्काच्या घरातून बाहेर काढलं”. माईंच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने पटकन वृद्धाश्रमात फोन लावला. “माई मी खूप वाईट वागले तुमच्याशी. मला माफ कराल माई?  तुम्ही घरी परत या हो”..म्हणत मधुरा फोनवर बराच वेळ रडत राहिली. माईंनी मात्र  काहीही न बोलता फोन ठेऊन दिला. लागलीच मधुराने मिलिंदला फोन करून माईंना घरी घेऊन येण्यास सांगितले. तसा मिलिंदला आनंद झाला. उशीरा का होईना मधुराला तिची चूक कळली होती.

मधुराच्या चौदा दिवसाच्या ‘क्वांरटाईन’ पिरीयड नंतर मिलिंद वृद्धाश्रमात गेला. त्याने माईंना घरी परत येण्याविषयी खूप आग्रह केला, पण माई काही ऐकायला तयार नव्हत्या. अखेर मिलिंदने माईंचे सामान बळेबळेच गाडीत भरले, तेव्हा मात्र माईंनी त्याला अट घातली. “मिलिंद मी येईन तुझ्याबरोबर मात्र आपल्या घरात न राहता शेजारच्या रिकाम्या घरात भाड्याने राहीन. देवधरांचा नंबर असल्यास आत्ताच बोलून घे त्यांच्याशी”. माई घरी यायला तयार झाली, हेच खूप होत मिलिंदसाठी म्हणून तो माईंसमोर तोंड देखलं हो म्हणून त्याने माईंच्या समाधानासाठी देवधरांना फोन लावला. तसेच त्याने मधुराला ही फोन करून माई घरी येत असल्याचे सांगितले, तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि आज सारा स्वयंपाक माईंच्या आवडीचा करायचा म्हणून ती चटकन स्वयंपाक घरात शिरली.

आता माई निघालेल्या पाहून मधुराला धक्काच बसला. “तुम्ही एकट्याच राहून काय करणार माई? इथे आम्ही आहोत सारे. प्लिज जाऊ नका ना माई”. मधुरा माईंचा हात आपल्या हातात घेत म्हणाली. काही क्षण माईंच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास झाला तिला. पण माई निग्रहाने म्हणाल्या “मी इथे यायला तयार झाले कारण, तुझी इच्छा होती म्हणून नव्हे मधुरा, तर माझे अखेरचे दिवस आपल्या मुला – नातवंडांच्यासोबत जावेत म्हणून. माझी नातवंडे पाहायला आसुसले होते रे मी. मिलिंदा, माझी आठवण आलीच तर मी अगदी पलीकडेच आहे रे तुमच्या. आई म्हणून तू कधी ही येऊ शकतोस माझ्याकडे आणि ही मुलं आज्जी म्हणून”.  माझी सासूची भूमिका केव्हाच संपली, जेव्हा मधुरा म्हणाली, “माई जर इथे राहणार असतील तर मी सासरी येणारच नाही, अगदी तेव्हाच”.

“कुठे कमी पडले मी मधुरा? पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम केलं तुझ्यावर. मनाप्रमाणे संसार मांडण्याचं स्वातंत्र दिलं तुला. नसत्या अपेक्षा ही नाही लादल्या तुझ्यावर..अगं..तुझ्या सांगण्यावरून घर ही सोडलं मी. तू फक्त स्वतःचा विचार केलास मधुरा, फक्त स्वतःचा.

“तुझी ‘सासू’ जरी असले तरी मिलिंदची ‘आई’ आहे मी. हे विसरलीस तू”.

“तुझ्या माझ्या नात्यात पडलेलं ‘अंतर ‘ आता कधीच कमी होणार नाही मधुरा, कधीच नाही”.. इतके बोलून डोळे पुसत माई आपले सामान घेऊन बाहेर पडल्या आणि मधुरा मात्र माईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे केवळ भरल्या डोळ्यांनी पाहत राहिली. 

================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *