Ritbhatmarathi

Search
Close this search box.

अवंतिका झालं कि नाही ग तुझं आवरून,किती गं तू वेंधळी या डब्यातली हळद संपलीय ना मग कालच यादी बनवली मी…सांगता आलं नाही का तुला…आता लग्न झालंय तुझं जबाबदाऱ्या पडतील…की अजून लहानच राहायचं तुला…आम्ही आहोत म्हणून ठीक आहे…आम्ही नसल्यावर काय होणार कोण जाणे..! नंदा काकूंच्या तोंडाचा पट्टा आपला चालूच होता आणि अवंतिका आपली काम आवरता आवरता गप्प सगळं ऐकत होती. बिचारी काय करणार..आपल्या नवऱ्यासाठी सगळं निमूटपणे ऐकत होती…. 

अवंतिका एक होतकरू मुलगी, लहानपणापासून आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडणारी मुलगी…. आई-वडील खूप लहान असतानाच गेले म्हणून मातृछत्र आणि पितृछत्र दोन्हीही नाही आणि लहानाची मोठी काकांकडे झाली. त्यामुळे स्वतःची जबाबदारी निष्ठेनं पेलणारी अवंतिका अशी तिची ओळख..शिक्षणातही आपल्या नवऱ्यापेक्षा एक पाऊल पुढे तरीही गर्व म्हणून नाही कसला…….अभिमन्यू काळे अवंतिकाच्या नवऱ्याचे नाव… यांचं नामकरण नंदकाकुंच्या भाषेत अभि.. नाहीतर पिल्लू..!

बाई गं बाई…! आलं गं माझं पिल्लू…लग्न मानवले नाही बाई माझ्या अभिला…केवढी खराब झाली तब्येतअसं म्हणणारच कारण अभि म्हणजे लाडकं शेंडेफळ….”आई…अगं केस खराब होतील ना केव्हडी आंजारते गोंजारते..आता लग्न झालंय माझं बायको आहे आता मला” 

पहा…कोण म्हणतंय याची जाणीव मुलाला आहे पण आईला नाहीय…. 

खूप लवकरच जबाबदारी येऊन पडली माझ्या पिल्लुच्या खांद्यावर…पण लोकांना काय त्याच..?” हा…टोमणा परस्पर अवंतिकाला होता..हे अभिमन्यूच्या लक्षात आले…तसे सुपुत्र बोलले…म्हणजे काय झालंय आई..असं का बोलते”? तशा नंदा काकूही लेकाकडे सुनेच्या कागाळ्या करू लागल्या.. 

अरे काही नाही रे…साधी हळद आणायची लक्षात राहिली नाही तिच्या…आणि कामाचा वेग तर एवढा कमी की गोगलगाई फिकी पडेल हिच्यापुढे …आणि हो परवाच सांगितलंय..कपड्याचा साबण पाण्यात जास्त भिजवु नको म्हणून…. जास्त भिजला गेला की गळतो आणि मग साबण फारच लवकर संपतो..मी एक साबण अगदी १५ दिवस आरामात चालवायचे…सांग बाबा तू तुझ्या बायकोला संसारात कशी दक्षता पाहिजे.. 

अभिमन्यू समजावून सांगेन असं आईला आश्वासन देतो…आणि फ्रेश होण्यासाठी जातो..तोपर्यंत अवंतिका सगळा स्वयंपाक करून ठेवते…बरं जेवताना शांत बसावे की नाही तरी साऊबाईंचे तिरके शेरे चालूच… 

भाजीत मीठ खूप कमी झालंय …. केवढी अळणी भाजी आहे..आणि बेसणपोळी कशी पातळ हवी …माझ्या अभिला नाही आवडत बाई एवढी जाड पोळी .. ..काय माहित बाई माझ्या पिल्लूचा संसार कसा चालणार….आयुष्यभर काय असं अळणी आणि बेचवच  जेवायला घालशील का त्याला…एवढ्या दिवस मी शिकवलं तुला ते गेलं का वाया???? ” 

तसं एवढ्यावेळ शांत बसलेली अवंतिका शांतपणे बोलली…आई…मी भाजीत मीठ खूप कमी घालते…ब्लड प्रेशर साठी चांगलं नसतं हे पहिलं कारण आणि दुसरं कारण असं की जास्त झालेलं मीठ परत काढता येत नाही…आणि जाड बेसणपोळी बद्दल मला माहिती नव्हतं त्याबद्दल माफ करा आई…. 

सासूबाईंचा आवाज चढतो…बाई…बाई..बाई…कहरच झाला आता…. आमच्यावेळेला नव्हतं गं असं…जीभ फार चुरु चुरु चालते..तू मला अक्कल शिकवू नकोस…आणि आई अजिबातच म्हणू नकोस मला…मला काही पाझर फुटणार नाही हो…मी आई आहे ती फक्त माझ्या मुलाची …काय उंडग ध्यान आणलंय गं  बाई…अवंतिकाला रडू कोसळले आणि ताटावरून उठून जायला नको म्हणून बळेच घास पोटात ती ढकलते.   

सगळी आवरा-आवर करून अवंतिका बेडवर मुसमुसत झोपलेली असते…मग अभिमन्यू आत येतो तशी अवंतिका आपली कूस बदलते आणि काहीही न बोलता तशीच पडून राहते….. 

अभिमन्यू   – अवंती…आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस…ती फटकळ आहे गं…. तिने स्वयंपाकातल्या चुका काढल्या असतील तर पोटात घाल…वाईट वाटून घेऊ नकोस… 

अवंतिका – मला स्वयंपाकातल्या चुका काढल्या म्हणून वाईट नाही वाटलं…सासूबाईंनी आई म्हणायला मज्जाव केला याच वाईट वाटतंय…मला आई वडील कुणी नाही.. लग्नानंतर वाटलं…सासू आईसारख्या असतील…पण आता कुणाला आई म्हणू मी…माझ्या वर्मावर बोट ठेवलं त्यांनी ..आणि एरवी काहीही तुम्हाला सांगतात माझ्याबद्दल मी ब्र तरी चहाडी करते का त्यांची… 

अभिमन्यू   – मी आईच्या वतीनं तुझी माफी मागतो…मग तर झालं.. 

अवंतिका   – माफी मागून काय होणार आहे…तुम्हालाही एक स्टॅन्ड घ्यावाच लागेल…. तुम्ही घरात काहीच पैसे देत नाही असं मला जाणवतंय…कारण सगळा घरखर्च आलेल्या भाड्यातून होतोय…म्हणून मला सारखं बोलत असतील त्या…हे तुम्ही कितीही नाकारा पण कारण हेच आहे…आणि त्यामुळे आपलं नातं स्पॉईल होतंय हे समजतंय का तुम्हाला…सासूबाई मला म्हणाल्या की जबाबदारी कधी घेणार तू….बालिशपणाने वागते…हे साफ खोटं आहे कारण मी लहानपणापासून माझ्या जबाबदाऱ्या स्वतः पेलल्या आहे….  ५ वर्षांची होते तेव्हापासून मला जाणीव आहे परिस्थितीची..पण तुम्ही अजून   लहान मुलांसारखंच वागताय…सासूबाई पिल्लू…पिल्लू म्हणतात…. त्यांच्या दृष्टीने तुम्ही अजून मोठे झालाच नाहीत..मी तर लहान आहे खूप..तरी मी घराची जबाबदारी चोख सांभाळायची प्रयत्न करते … 

अभिमन्यू   – [चिडून] अवंती…फार बोललीस…तुला काय म्हणायचंय…मी जबाबदार  नाहीय???? 

अवंतिका   – अहो…पण बायकोचा मान ठेवणं हे नवऱ्याचं आद्यकर्तव्य असतं…निदान ग्रोसरीचा खर्च तरी तुम्ही करायला पाहिजे..असं चिडून काहीही साध्य होणार नाहीय…शांतपणे विचार करा.. 

अभिमन्यू   – ठीक आहे…मी आईचा मूड पाहून बोलतो … 

अवंतिका   – असं जबाबदार आधीच व्हायला पाहिजे होतं तुम्ही…झोपा आता उशीर होईल…दुसऱ्या दिवशी सकाळीच अभिमन्यू आपल्या आईशी बोलतो…. 

अभिमन्यू  – आई …ए…आई ….बाहेर ये लवकर… 

सासूबाई   – काय झाले…आज एवढ्या लवकर कसं उठलं माझं पाडस… 

अभिमन्यू  – हात पुढे कर…हा माझा पगार..यातून तू  वाण-सामानाच्या खर्चासाठी लागतील तसे पैसे घेत जा…. 

सासूबाई   – खूप मोठा झालास आज तू…पण काही गरज नव्हती याची..!!!! 

अभिमन्यू   – याआधीच द्यायला पाहिजे होते ..मलाही आई सवय नको का घर सांभाळण्याची……जोवर जबाबदारी नाही पडणार तोवर शिकणार कसं…            

आज दिवसभर सासूबाईंचा मूड चांगला होता…. घरात मुलाकडून पैसे मिळायला लागले तशा सासूबाई अवंतिकाशी चांगल्या बोलायला लागल्या होत्या कारण अभिमन्यूनेही तसं खडसावून सांगितलं होतं कि मी आईच्या हातात जरी पैसे देत असलो तरी घरात काय हवं नको ते सासू सुना दोघीनीं  मिळून ठरवायचं आणि हळू हळू मग घरातलं वातावरण निवळत गेलं ….

तात्पर्य   –  आपल्या सुनेला जशी जबाबदारी घ्यायला शिकवतो तशीच जबाबदारी मुलालाही घ्यायला संगितली  पाहिजे…आणि सारासार विचार नेमका कुठे करावा हेही घरातील प्रौढांचे काम असते

===============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories