Ritbhatmarathi

Search
Close this search box.

शिल्पा घरी बसून खूप कंटाळवाणी झाली होती…कोरोनामुळे शाळा नव्हती म्हणून घरीच ऑनलाईन पद्धतीने अभ्यास चालू होता…सकाळचे तीन तास…ऑनलाईन वर्ग अटेंड करण्यात जात असे…सकाळी अंघोळ करून,स्कूल युनिफॉर्म घालून बसावे लागत असे त्यात ब्रेकफास्टही सकाळीच उरकून बसावे लागत असे म्हणून आईची म्हणजेच सीमाची खूप दमछाक होत होती.घरातली सगळी काम एकटीच आवरत असे तेवढं आवरून…

आपल्या नवऱ्याला म्हणजेच अविनाशालाही बिझनेस च्या कामात मदत करत असे…म्हणून शिल्पाबरोबर असं खेळण्यासाठी कुणीच नसे कारण गावापासून थोडंसं लांब असणाऱ्या शहरात शिल्पा आपल्या आई-वडिलांबरोबर राहत असे…शिल्पाच्या मैत्रिणीसुद्धा घरी खेळण्यासाठी येत नसे…कारण शिल्पाचं घर हे एक प्रतिष्ठित असं समजलं जात होत…म्हणून घरात साधं कार्पेट जरी विस्कटलं तरी अविनाशला म्हणजेच शिल्पाच्या वडिलांना आवडत नसे म्हणून घरात शिल्पाच्या मैत्रिणींना सक्त मज्जाव असे…

लहान मुलं म्हटलं कि पसारा होणारच हे…न समजणारे शिल्पाचे आई-बाबा असावे…म्हणून घरात फक्त…लॅपटॉप,मोबाईल,यावरच काय ते मनोरंजनाचे साधन असायचे….असंच विडिओ गेम्स खेळून खेळून शिल्पा फार कंटाळली…म्हणून शिल्पा लगेच आपल्या आईपाशी जाऊन आपलं मनं मोकळं करते…

शिल्पा – मम्मा…मम्मा…मला ना रोज-रोज बोअर होतंय…काय गं…काय करू..?

सीमा – पिलू अगं…तुला कुठे घेऊन जाऊ मी आता…घरात एवढे सगळे एन्टरटेन ची साधन आहेत तरीही तुला बोअर होतंय…तुला पर्सनल कॉम्पुटर घेऊन दिलाय मी त्यातून काही नवीन शिकता येतंय का ते पहा…विडिओ गेम्स तर नेहमी खेळतेसच की तू…

शिल्पा – मम्मा…नको मला ते गेम्स…काहीतरीच वाटत आहेत मला ते…मला ना कुठे तरी बाहेर घेऊन जायला सांग ना डॅडूला…

सीमा – सीमा…एक तर इथे कामाचा व्याप आहे आणि तुला काय गं बाहेर जायचं सुचतंय…[चिडून म्हणते ] एवढं आहे इथे…काय कमी पडतंय गं तुला…ऐषोआराम सगळी श्रीमंती जागतीयस तू आणखी काय पाहिजे तुला?

[बायकोचा चिडलेला आवाज ऐकून अविनाश येतो आणि शिल्पाला जवळ घेऊन म्हणतो]

अविनाश – शिल्पा…आधी रडणं थांबव …परवा दिवशी तुझी बॅग भरून ठेव आपल्याला बाहेर मुक्कामी जायचंय..

सीमा – अवि…अरे शेफारून ठेऊ नकोस तिला…आधीच का कमी लाड झालेत तिचे…

अविनाश – [सीमाकडे रागाने एक कटाक्ष टाकतो आणि म्हणतो] शिल्पा…परवा तुला श्रीमंती आणि गरिबी नेमकी कशी असते ते कळेल…येशील ना परवा दिवशी…

सीमा – अवि…मला इग्नोर करतोयस तू…

अविनाश – [परत त्याच आवेशात एक कटाक्ष सीमाकडे टाकतो मग शिल्पाला म्हणतो] शिल्पा…सगळं भरून ठेव तुझं सामान…जे काही एका दिवसासाठी लागणारे ते सगळं …आणि हो फक्त तुझंच सामान भर…

सीमा – अवि …तिच्या एकटीचं म्हणजे…तू नाही का जाणार तिच्यासोबत…?

अविनाश – मी कशाला जाऊ…श्रीमंती आणि गरीबीतील फरक मला समजतो…खरी समजण्याची गरज शिल्पाला आहे…हेच तर वय आहे तिचे गोष्टीतील तफावत कळली पाहिजे…आपण सांगितलेलं कळत नाही तर अनुभव घेऊ देत तिला…

सीमा – परत यायचं आहे एका दिवसात शिल्पा…समजलं ना ?

शिल्पा – हो मम्मा…मी आताच बॅग भरायला घेते…

असे म्हणून शिल्पा लगेचच आपली बॅग भरायला घेते….दुसऱ्यादिवशी अविनाश आपल्या फोरव्हीलर मधून जवळच्या गावातल्या त्याच्याच एका मित्राच्या शेतावर जातो…खोल विहीर,शेतात सगळ्या प्रकारच्या भाज्या,गोठ्यात गाई-म्हशी,कोंबड्या,चार-पाच कुत्रे आणि मांजरं….असं सगळं भरगच्च वाटत होत…त्या शिवारातच छोटंसं घर…त्यात अविनाशचा बालपणीचा मित्र…आत्माराम आपल्या बायको मुलांसह राहत असतो.आत्मारामच्या घराच्याजवळ गेल्यावर लगेच अविनाश आपल्या मित्राला आवाज देतो…

अविनाश – आत्माराम…अरे आत्माराम…बाहेर येशील…?

आत्माराम – अरे…अव्या…किती दिसांनी आलास…आत तरी ये की…

अविनाश – नाही रे…तूच ये इकडे…सरळ कामाचेच बोलतो…कारण तेवढा वेळ नाहीय माझ्याकडं…

आत्माराम – आरे असं काय म्हणतुयास…आलास तर बरं होईल की…तेव्हढेच आमच्या गरीबाच्या घराला पाय लागतील तुझे…

अविनाश – नको रे…परत शिल्पाला न्यायला येईल ना तेव्हा भेटेन…आत्ता गडबडीत आहे रे…बरं ऐक ना…ही शिल्पा माझी मुलगी एक दिवसासाठी तुझ्याइथे राहतीय…चालेन का ?

आत्माराम – हो का नाही…अरे रमल ती हिथं…माझी पोरगी हौसा बी हाय इथं…तिलाबी शिकाय मिळंल शिल्पेकडून….काय गं शिल्पा…शिकिवशील ना माझ्या पोरीला…

शिल्पा – शिकवेन की…

अविनाश झर्र्कन गाडी वळवून तिथून निघून जातो… …सात वर्षाच्या शिल्पाला आपल्या वडिलांपेक्षाही त्याच्याच वयातला आत्माराम यांच्यातला पहिला फरक कळतो…शिल्पा विचार करत घरात जाते…आपल्या बाबाने आपल्याला साधं बाय पण नाही केलं…उलट त्याच्यापेक्षाही जास्त जिव्हाळ्याने हौसाच्या बाबानी मला घरात बोलावलं…पण जेवताना आपल्या बाबाचा विसर शिल्पाला पडलाच…कारण हौसाच्या आईची म्हणजेच रेणुकाबाईंची झुणका भाकरी…शिल्पाला खूप आवडली…त्याच रात्री अंगणात जमिनीवर झोपलेलं असताना चांदण्यांनी भरलेलं आकाशही जणू शिल्पाला स्वर्गच भासलं…

शिल्पाला झोप केव्हा लागली हे कळलंच नाही…दुसऱ्या दिवशी पहाटे कोंबड्याने बंग दिली तेव्हा सहा वाजताच शिल्पाला जग आली…नेहमी अलार्म वाजला की उठायचे…पण कोंबड्याच्या बांगेने झोप गेली…याच नवल सात वर्षाच्या पोरीला वाटणारच…त्यानंतर मस्त चहा आणि चपातीचा ब्रेकफास्ट शिल्पाने केला…पण त्याला ब्रेड बटर पेक्षाही कमालीची गोडी होती…नंतर अंघोळ उरकून मस्त शिवारात भटकायचीही मजा शिल्पाने घेतली…त्यात हौसाबरोबर शेळीचं करडू मांडीवर घेऊन त्याला अंजारण..गोंजारून…कुशीत घेणं…खूप भारी वाटलं…

बैलगाडीमधून आत्मारामकाकांबरोबर फिरणं हे चारचाकीमधून बंदिस्तासारखं फिरण्यापेक्षा स्वैर वाटलं…झाडावर कसं चढायचं…भाज्या कशा तोडायच्या…दूध कसं काढायचं…हे सगळं जवळून शिल्पाने पाहिलं…त्याच दुपारी मस्त सोलाण्याची भाजी आणि भाकरी मनसोक्त खाल्ली…आपल्या आईच्या हातची चव एका क्षणात शिल्पा विसरलीच की…संध्याकाळी मात्र निघायचं म्हणून चेहरा पाडून बसलेली शिल्पा…खूपच कासावीस होऊ लागली…कारण निर्मळ मन अस्लेल्याचं निरोप घेऊन जाताना खरंच मनातून गहिवरून आलं होत…आपल्या वडिलांचा फोन येताच आपली बॅग चटकन भरून ठेवली.

निघताना…आत्माराम काका आणि रेणुकाताईंच्या न चुकता पाया शिल्पा पडली…आत्मारामकाकांनीही शेतातला भाजीपाला,फळ आणि गाईचे दूध असं वानवळा म्हणून दिल…जाताना शिल्पाच्या डोळ्यातून पाणी आलं…परत गाडीत आपल्या वडिलांशी बोलू लागली–

शिल्पा – पप्पा…खूप मज्जा आली पण तिथे…मी कधीच या आधी गेले नाही अशा प्लेस वर…मला परत घेऊन जाशील ना…

अविनाश – मी ड्राईव्ह करतोय बेटा…घरी गेलो न आपण मग तुझ्या मम्मा ला सांग सगळं…

शिल्पा – ओके…पपा…   

घरी आल्यावर दोघेही फ्रेश होऊन येतात…आल्या-आल्या शिल्पाच्या तोंडाचा पट्टा चालू होतो…

शिल्पा – मम्मा….मम्मा…..इकडे ये आधी…

सीमा – काय झालं…असं काय जग जिंकून आलीस…सॅनिटाईझ केलं ना पाहिलं तू…

शिल्पा – हो मम्मा…अगं काय सांगू तुला…खूप मस्त वाटलं मला तिथं…

सीमा – काय ही भाषा…तिथं‘….असं म्हणतो का आपण…तिथेअसं म्हणतो आपण…भाषा बदलली तुझी तरी अवि तुला सांगत होते मी नको पाठवू म्हणून…तेव्हा मारे म्हणालास अनुभवातून शिकू देत असं …झालं गरीब कोण आणि श्रीमंत कोण याचा छडा लावून…?

शिल्पा – मम्मा…ते गरीब नाहीत…कारण त्यांचं शेत…म्हणजे फार्म केवढं मोठं होत…कुठेही कसही जाऊ शकत होतो आम्ही…आपण ना सगळ्या भाज्या…फळ…पैसे देऊन आणतो…पण तिथे तर काहीच पैसे द्यावे लागले नाही काकांना…आपण जे दूध आणतो ना ते ही तिथेच…मला मिळाले…तेही पैसे न देता…आपल्याकडं तर एकच डॉगी आहे…टॉमी…पण हौसाकडे तर…राम्या,वाघ्या,पिल्या,काळ्या असे चार-चार डॉगी आहेत…कुणी फार्म मध्ये एंट्री केली की लगेच भुंकतात ते…आपण किती गरीब आहोत ना त्यांच्यापेक्षा…?

आपल्या मुलीने केलेल्या या प्रश्नावर मात्र सीमाकडे उत्तर नव्हते…गरीब कोण आणि श्रीमंत कोण यातला बराच फरक एका सात वर्षाच्या आपल्या मुलीने अगदी अनुभवामधून सांगितला…सीमा मात्र अवाक होऊन शिल्पाकडे पाहत राहिली.