Ritbhatmarathi

Search
Close this search box.

प्रभाकर अग्निहोत्री नेहमीप्रमाणे आपला चष्मा सावरत काठी टेकवत-टेकवत गार्डनमध्ये फिरत होते…गार्डन मध्ये काही मुलं खेळत होते, काही तरुण मुलं आपल्या प्रेयसीला घास भरवत मस्त सेल्फी काढत होते, प्रभाकर काका मात्र ते दृश्य कधी न अनुभवल्यासारखं पाहत होते…दृश्य पाहता-पाहता त्यांचं मन कधी भूतकाळात गेलं हे त्यांना कळलंच नाही डोळे मिटून ते फक्त आपला फ्लॅशबॅक आठवत होते…

प्रभाकर – आशा…अगं आशा…आवरलंस की नाही…साडी नेसायला किती वेळ लागतो तुला…देशपांड्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला जायचंय…संपून जाईन वाढदिवस…पाहुणे निघून जातील…

आशा    – अहो…आलेच…मी काय यंत्र मानव आहे काय ? एक तर सगळी आवरा-आवर करायला खूप वेळ जातो माझा…

नंदाताई – घेतलंस माझं नाव…काय करायला लावणारे मला या वयात आता…बसून खाण्याचं वय माझं…

प्रभाकर – काय…तू माझ्या आईकडून कामाची अपेक्षा करते…आशा अगं तुला सगळं जमलं पाहिजे…एक तर तू गोगलगाई…साडी नेसायला एवढा वेळ लागतो…तरी बरं सहावारी साडी नसतेस…आईसारखी नऊवार साडी नाही नेसायची तुला …जरा उरक हवा कामाचा…

आशा    – सासूबाई…तुम्हाला ना काही ना काही तरी कुरापत काढायची असते…दोघे कुठं बाहेर जायला निघालो की खुपतंच तुम्हाला… मी कुठे तुमचं नाव घेतलं का ? तरी बरं..नेत्रावन्स नाहीयत इथं…नाहीतर आगीत तेल टाकायचं काम चांगलं जमत त्यांना…

प्रभाकर  – तुला नसेल यायचं तर नको येउ…पण भलतं सलत ऐकून घेणार नाही मी माझ्या आई आणि बहिणीबद्दल…

आशा    – मी येणारच नाहीय…तुम्हीच जा…नाहीतर सासूबाईंना घेऊनच जा…

प्रभाकर  – आई…चल ग…इथं थांबण्यात काहीच अर्थ नाहीय…

असे म्हणून प्रभाकर तिथून निघून जातो…आशाच्या मात्र अश्रूंचा बांध फुटतो…ती आपली रडत-रडत स्वतःसाठी काहीतरी खायला बनवते….नंतर भांडी घासून टाकते…रागारागाने साडी काढून बेडवर टाकून देते…आणि मुसमुसत बेडवर अंग टाकून देते…खाल्लेलंही अंगी लागत नाही अशा अवस्थेत पडते…पडल्या-पडल्या विचारचक्र सुरु होत…” आता नाहीय माझा उरक कामाचा…घरात कुणी इकडची काडी तिकडं करत नाही. सगळं कसं एकटीला करायचं….आता मला काय दहा-दहा हात आहेत का…पण समजून घ्यायचं नाही…’ असा विचार करत आशाच्या मनात भीतीने धडधडायला लागत…दारावरची बेल वाजते…समोर आपला नवरा प्रभाकरला पाहून आणखीनच घाबरते…घसा कोरडा पडतो भीतीने…

प्रभाकर – अशी का पाहतेस…भूत पाहिल्यारखं…आणि घाम का आलाय एवढा…आम्ही नाही म्हणून काय स्फुरण चढलं की काय कामाचं…

आशा    – तूउऊऊ…..तुम्ही केव्हा आलात…आणि सासूबाई कुठाय..?

प्रभाकर – काय झालंय…बोबडी वळलीय तुझी…तब्येत बरीय ना तुझी…माहेरी जाऊन येतेस का परत…खूप खंगल्यासारखी दिसतीयस तू …एक काम करतो…घरच्या लँडलाईन वरून फोन करतो …

गार्डनमध्ये प्रभाकर काका मात्र अचानक जागे होतात…त्यांचा मित्र त्याना जोराने हलवतो…आणि म्हणतो…

हेमंतराव  – प्रभाकर…अरे …कुठे गायब झालास…काय झालं ?

प्रभाकर   – काही नाही या जोडप्याना पाहून आधीचे दिवस आठवले…मी उगाच आई आणि बहिणीचं ऐकून आशाला घटस्फोट दिला…मी माझ्या बायकोच्या बाजूने कधीच विचार केला नाही…त्या माय-लेकीच्या सांगण्यावरून आशाला आणि मला मुलंही होऊ दिली नाहीत…

हेमंतराव  – प्रभाकर…आता झाल्या गोष्टी उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाहीय…झालं-गेलं गंगेला मिळालं

प्रभाकर   – हेमंता…अरे परत दुसऱ्या लग्नाचा घाट घातला तेही या नेत्रा आणि आईच्या सांगण्यावरून…काय झालं ? गर्भाशयाच्या आजाराचं निमित्त झालं आणि मला सोडून निघून गेली तीही कायमची…

हेमंतराव  – प्रभाकर…संजीवनी वहिनी काय अशाच नाही गेल्या हा …पदरात एक मुलगा देऊन गेल्या तुला सुभाष …चांगला सेटल्ड आहे की तो…सुनबाईही आहेत की…

प्रभाकर   – अरे …पण काय उपयोग त्याचा…बाप इथं भारतात आहे आणि तो स्वतः लंडन ला आहे…माझी साधी चौकशी करायला फोनही नाही करत तो… ..माझ्या चितेला अग्नी द्यायला तरी ये म्हणावं…

हेमंतराव  – प्रभाकर…तू कधीच तुझ्या स्वतःच्या मनाचं ऐकलंच नाही…तू नेहमी दुसऱ्याचं ऐकत आलास…मान्य आहे नेत्रा आणि काकूंचा तू म्हणणं ऐकायचास…त्यांचा आदर करायचास…अरे पण बायकोचा आदर करायचं राहूनच गेलं तुझ्याकडून…तीच म्हणणं कधीच ऐकलं नाही तू …आता नेत्राताई तुझी चौकशी तरी करते का रे ?

प्रभाकर   – ह्म्म्म…संजीवनी गेल्यापासून तिनं कधीच ढुंकून पाहिलं नाही इकडं…खरं तर तिची गरज मला माझ्या आईच्या आजारपणात भासत होती…पण तिच्या संसाराचं कारण सांगून नेहमी टाळाटाळ करत राहिली…खरंच तिला आईबद्दल काळजी असू नये साधी…

हेमंतराव  – प्रभाकर…अरे तुला इथेच काहीतरी शिकण्यासारखं होत…नेत्राताईंनी नेहमी आपल्या संसाराचा विचार केला…आपल्या स्वतःच्या आईपाशीही त्या येऊ शकल्या नाहीत…तिथे त्यांनी आपला स्वार्थ पाहिला…प्रभाकर..तू फार नाही पण थोडासा स्वार्थी व्हायला पाहिजे होतास…निदान आशा वहिनींसाठी तरी…

प्रभाकर   – ह्म्म्म…आशा त्यादिवशी आपल्या माहेरी निघून गेली ती कायमचीच…परत आलीच नाही…तबियत बरी नाही म्हणून मीच आशाला माहेरी जाण्याची परवानगी दिली होती… परत तिनं धास्ती घेतली होती की काय पण…साधा मला फोनही नाही केला तिनं…

हेमंतराव  – मित्रा…मी खरं सांगू, आशा वहिनींना सुखाचा संसार करायचा होता तुझ्याबरोबर…पण मुलं-बाळ नको अशी अट तू आशावहिनीना घातली का तर…तुला त्यांचं वागणं पटत नव्हतं…तुझा असा समज की पोर झाले की तिचे वाईट संस्कार त्यांच्यावर होतील म्हणून जोवर वहिनी नीट वागत नाही तोवर तू त्यांना मुलं होऊ दिल नाहीत..

प्रभाकर  – खरंच…खूप हेकेखोरपणाने वागलो मी तेव्हा…

हेमंतराव – अरे मुलं-बाळ नकोत संसार व्हायला…अशा विचित्र अटी घातल्या तू…मग आई होयचं वयही निघून  गेलं त्यांचं…मग काय घटस्फोट झाला ना…

प्रभाकर  – आयुष्यात शेवटी सोबत लागतेच ना… ..खरंच खूप वाईट वागलो मी तेव्हा…

हेमंतराव – प्रभाकर…चल..एका भजनी मंडळात जातोय मी…तू पण चल तेव्हडाच तुला विरंगुळा प्रसाद म्हणून पुलाव वाटणार आहेत तिकडे चल…

हेमंतराव आपल्या हातात साऊंड घेऊन उभे राहतात आणि जायला निघतात….इतक्यात गाणं ऐकू येत..

नसतीस घरी तू जेव्हा…

जीव तुटका-तुटका होतो…

जगण्याचे विरती धागे…

संसार फाटका होतो…

गाणं ऐकून प्रभाकर काका ही खजील होऊन गाणं पुटपुटायला लागतात…

नसतीस आयुष्यात तू जेव्हा… नसतीस आयुष्यात तू जेव्हा…. ”

प्रभाकर काकाही मंदिराची वाट धरतात.  

आई बहिणीचं ऐकून त्यांनी स्वतःचा संसार उध्वस्त केला….पण आता रिटायर झाल्यापासून ते एकटेच राहिलेला प्रत्येक क्षण मोजत होते. आई निघून गेली आणि आई गेल्यापासून बहिणीनेही माहेराला पूर्णविराम दिला होता. सगळेजण आपल्या आयुष्यात व्यस्त होते. मागे राहिले होते ते फक्त प्रभाकर काका. ज्यांना क्षणोक्षणी त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चाताप होत होता.

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories