Ritbhatmarathi

Search
Close this search box.

ॲड. अश्विनी सचिन जगताप

तिने वडाला उलट्या सात फेऱ्या मारल्या आणि ती सात वर्षे मागे गेली.लग्नानंतरची आठवी वटपौर्णिमा होती राधाची. नुकतीच तिच्या वाढदिवसाला समीरने आणलेली साडी तिने घातली आणि छान तयार झाली. मी वडाची पूजा करून तशीच आईकडे जाणार आहे असं रात्रीच तिने समीरला सांगितले होते. सगळी आवराआवर करून ती निघणार तेवढ्यात तिला आठवलं दूध फ्रिजमध्ये ठेवायचं आहे, ती पुन्हा किचनमध्ये गेली तिने दुधाचे पातेले फ्रीजमध्ये ठेवायला फ्रिज उघडला तसा तिच्या नाकात मोगर्‍याचा सुगंध भरला. तिने फ्रिजमध्ये पाहताच तिला मोगऱ्याच्या गजरा सापडली. ती मनोमन सुखावली. कदाचित समीर मला सांगायला विसरला असावा. तिने तो गजरा केसात मळला आणि निघता निघता समीरला थँक्यू असा मेसेज देखील केला. नखशिखांत नटलेली राधा खूप सुंदर दिसत होती आणि समीरच्या प्रेमाचा रंग तिचं सौंदर्य अजूनच खुलवत होता. ती वडाला गेली सांग साग्रसंगीत पूजा करून आईकडे जायला निघणार तेवढ्यात तिला आठवलं दागिने काढून कपाट कदाचित माझ्याकडून उघडच राहिलं असावं. म्हणून ती घरी जायला निघाली तिच्याकडे एक चावी असल्यामुळे ती दार उघडून आत गेली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
समीर आणि त्याची मैत्रीण प्रिया या दोघांना एकत्र पाहून ती प्रचंड संतापली. तप्त लाव्हा रस ओतावा असं तिचं अंग गरम झालं होतं. तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला, ती तिथून निघणार एवढ्यात समीरने तिला आडवलं आणि तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.पण राधा तोपर्यंत तिथून निघून गेली होती.
आई समोर दिसताच आईच्या गळ्यात पडून ती ओक्साबोक्शी रडली. थोडी शांत होताच आईने राधाला पाणी दिले.तिच्या आवडीचा आल्याचा चहा टाकला आणि म्हणाली राधा काय झालं बाळा,राधाने आईला सगळं काही सांगितलं.आईचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.आठ वर्षे सुखा समाधानाने चाललेला लेकीचा संसार असा एका मिनिटात मोडेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं.समीरसारखा देखणा, राजबिंडा,कर्तबगार जावई दोन गोंडस नातवंडं असा आपल्या लेकीचं चौकोनी सुखी कुटुंब. त्याला कुणाची नजर लागली असेल, आई विचारात पडली .
राधा फक्त रडत होती, तेवढ्यात तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. तिने डोळे पुसले आणि आईला म्हणाली आई मुले घरी यायची वेळ झाली मी माझ्या घरी जाते.माझी कसलीही काळजी करू नकोस. मी ठीक आहे.राधा घरी गेली. दारातील पायऱ्यांवरच ती बसून राहिली. पाच दहा मिनिटातच तिची दोन गोंडस लेकरं घरी आली त्यांना पाहताच तिच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला. त्याला तसाच आवर घालत ती उठली,दोन्ही मुलांना जवळ घेतले आणि घरात गेली. समीर काही बोलणार इतक्यात तिने त्याला आपण नंतर बोलुयात एवढंच सांगितलं. समीर खरंतर मनातून आनंदला होता राधाने कसलाही अकांडतांडव न करता ती पुन्हा शांतपणे घरी आली. मुलांना तिने खाऊ घातले आणि मुले खेळायला बाहेर पडली.तसा समीर पुन्हा राधाजवळ आला. राधा म्हणाली,समीर तू चुकलास पण माझं तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर मी तुझी ही चूक माफ करते आणि तुला अजून एक संधी देते. आता तू ठरव तू कसं वागायचं. आपल्याला दोन मुलं आहेत त्यांचा विचार कर. मला दोन्ही मुलांना आई आणि वडील दोघांचंही प्रेम मिळू द्यायचं आहे आणि म्हणूनच मी तडकाफडकी निर्णय न घेता घरी आले. आपण या विषयावर शांतपणे पुन्हा बोलू या. समीर हे सगळं खजील होऊन ऐकत होता. त्याने राधाची माफी मागितली मला एक संधी दे मी पुन्हा चुकणार नाही. यावर राधाने विश्वास ठेवला पण मनातून राधा पुरती खचली होती. तिचा समीरवरचा विश्वास पूर्ण उडाला होता.पण सध्या घर सोडनं तिला परवडणारं नव्हतं.पदरात दोन मुलं,भरपूर शिक्षण असूनही समीरचं नोकरी करू न देणं आणि यामुळे आत्मविश्वास गमावलेली राधा घराबाहेर पडू शकत नव्हती. तिने मनातून काहीतरी पक्कं ठरवून याच घरात राहायचं ठरवलं. तोंडदेखलं समीरशी गोड बोलून ती राहू लागली. तिचा आत्मविश्वास परत यावा यासाठी तिची मैत्रीण पूर्वा हिने राधाला खूप मदत केली.समीरने केलेल्या फसवणुकीचा राधाने पुरता बदला घ्यायचं ठरवलं. तिने कंपनीतल्या मॅनेजर आणि सीएला विश्वासात घेतले. त्यांच्याशी बोलून कंपनीची सगळी माहिती घेतली ,कुठे किती इन्व्हेस्टमेंट आहे याबद्दल तिने सगळे जाणून घेतले. तिने कंपनी जॉईन करायचा निर्णय घेतला.समीरच्या एका चुकीमुळे त्याला राधाला जास्त विरोध करता आला नाही.त्याने राधाला लगेच होकार दिला.राधाही ऑफिसमध्ये जाऊ लागली तिने हळूहळू कंपनीची सगळी माहिती गोळा केली.आता राधा कंपनीची अर्धी मालकीण होती. कंपनीत कोणताही निर्णय समीर एकटा घेऊ शकत नव्हता. हळूहळू राधा सगळ्या गोष्टी शिकली, सगळ्या कामगारांना आपल्या मनमिळाऊ स्वभावाने तिने आपलंसं करून घेतलं.
कंपनीत राधाशिवाय पानदेखील हालत नव्हते.एक दिवस समीरच्या सहीने होणारे सगळे व्यवहार राधाच्या सहीने व्हायला लागले.राधा कंपनीच्या कामात व्यस्त रहायला लागली.तसा समीर प्रियामध्ये जास्तच अडकत गेला.राधाला याआधीही कशाचीच कमी नव्हती मुबलक पैसा, घरात नोकर चाकर, फिरायला गाडी फक्त याबदल्यात तिला तिचा स्वाभिमान गहाण टाकायला लागला होता. सगळं होत, फक्त समीरचं प्रेम वाट्याला येत नव्हतं, पण तिला वाटायचं समीर कामात बिझी असतो म्हणून आपल्याला वेळ देता येत नाही. पण समीरचा वेळ भलतीकडेच जात होता. याची तिला आताशा कल्पना आली आणि तिने ठरवले. बास..आता स्वाभिमानाने जगायचे.
प्रियाच्या प्रेमाची नशा समीरला काही सुचू देत नव्हती. राधाने याचाच फायदा घेतला. राहतं घर आणि कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतली. समीरकडे येणारा पैसा आता कमी झाला.ज्या पैशावर प्रिया प्रेम करत होती तो पैसाच आता राहिला नाही. समीर कंपनीचा मालक न राहता एक सामान्य कामगार झाला. त्याला महिन्याला पगार मिळत होता. एव्हाना समीर आणि प्रियामध्ये खटके उडायला सुरुवात झाली. समीरला कळून चुकलं होतं की प्रिया आपल्यावर नाहीतर आपल्या पैशावर प्रेम करत होती. त्याला प्रियाचा तिरस्कार वाटू लागला.त्याला राधाची आठवण येत होती , किती निरपेक्ष प्रेम करायची राधा. पण आता वेळ निघून गेली होती.
राधा दोन्ही मुलांबरोबर खुष होती.राधाचं अजूनही समीरवर प्रेम होतं म्हणून ती वडाला गेली. तिने वडाला उलट्या फेऱ्या मारून समीरला आपल्या बंधनातून कायमचं मुक्त केलं आणि खऱ्या अर्थाने तिची वटपौर्णिमा साजरी झाली.राधाकडे आता समीर सोडून सगळं काही होत, घरदार, कंपनी,पैसा, दोन मुलं. समीर मात्र पुरता कंगाल झाला होता पैशाने आणि नात्यानेही…..

-सुरेखकन्या.
ॲड. अश्विनी सचिन जगताप.

==================

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *