Ritbhatmarathi

Search
Close this search box.

वठलेलं झाड (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२

©️®️ मीनाक्षी वैद्य

अवनी एक सामान्य कुटुंबातील मुलगी होती. शिक्षण घेता घेता पुढे नोकरी करायची हे तिच्या मनावर ठसवलं तिच्या घरच्या परिस्थितीनं! या परिस्थितीनंच तिच्या जीवनात उत्तम शिक्षकाची भूमिका पार पाडली होती. 

“शिक्षक कसा असावा तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणारा. परिस्थितीसारखा” असे ती सहजगत्या म्हणून जायची. 

असं तिचं बोलणं तिच्या बरोबरीच्या मुलींना चमत्कारिक वाटायचं. कारण त्यांचं वय होतं आयुष्यातील फुलपंखी जीवन जगण्याचं. किती रम्य काळ असतो हा. कधीही न विसरता येण्यासारखा तिला मात्र या वातावरणात कधीही न मिसळण्याची सक्त ताकीद तिच्या शिक्षकानं तिला दिलेली होती. तीसुद्धा आलेल्या परिस्थितीला सहजपणे अंगावर झेलायची. म्हणूनच त्याची बोच तिला नसायची.

बघता-बघता अवनीचं कोवळं वय संपून तिच्या वयाचा बुंधा जरड होऊ लागला. म्हणूनच तिच्यासकट घरातल्या सगळ्यांनीच तिच्या लग्नाचं स्वप्न बघणं सोडून दिलं होतं. कसं कुणास ठाऊक पण तिच्या दारी लग्नाची चहाळ आलीच नाही. लहान बहिण भावंडांचे संसार सुरू होऊन मध्यावर आले होते. तिच्या अवतीभोवती “मावशी-आत्या” म्हणत तिला सळो की पळो करून सोडणारे तिचे भाचरे होते. पण तिची तहान त्यापेक्षा जास्त होती. तिला कळले होते आपली ही तहान या जन्मात भागणार नाही.

***

एक दिवस बँकेत ती नेहमीप्रमाणे कामात गर्क होती, एवढ्यात एक गृहस्थ नवीन खाते उघडण्यासाठी आले त्यासाठी त्याने सगळे नियम विचारले.बॅंकेत खातं उघडायला त्यांनी फाॅर्म भरला.

फाॅर्म भरताना त्याने तिला खूप प्रश्न विचारले.ते ऐकून तिला आश्चर्य वाटलं.

त्यांचे प्रश्न ऐकून  तिच्या मनात आलं की  हा माणूस दिसायला तर वयानी मोठा दिसतो आहे. नोकरी किंवा तत्सम काहीतरी करणारा असावा. आतापर्यंत त्याने बैंक खाते उघडले नसावे का? ती कामकाजाविषयी सर्वसाधारण माहिती नसेल का? हे प्रश्न तिला त्रास देऊ लागले पण तिने जाऊ दे असे म्हणून त्याला नियम सांगितले, त्याच्याकडून फॉर्म भरून घेतले.

” पासबूक चेकबुक परवा  मिळेल” असे तिने सांगताच तो उठला आणि निघून गेला. तो निघून गेल्यावर तिला उगीचच त्याची आठवण येऊ लागली. त्याने त्या अर्ध्यातासात आपल्याकडे किती वेळा बघितले हे ती आठवू लागली. त्याचा रंग,बोलण्याची लकब सगळे तिला जसच्या तसं आठवू लागलं.

 तिच्याडी नकळत वठलेल्या झाडाला कोवळी पाने फुटू लागली होती. त्या कोवळ्या पानांचा इतका घमघमाट होता की त्याने ती हुरळून गेली. विनाकारण त्याची वाट बघू लागली. असा‌ वेडा चाळा तिच्या मनाला आजपर्यंत लागला नव्हता.

एक दिवस अचानक तो बँकेत आला. तिला अपेक्षित नसताना रीतसर बैंकेत  येऊन पैसे काढून गेलासुद्धा ती कळत-नकळत त्याच्याकडे बघत होती. किती वेळ होता हा बँकेत? घड्याळ बघताच तिला कळले. अवघे बीस मिनिट पण आपल्याकडे जरा बघितलेही नाही. हसलासुद्धा नाही.

 छे… ही कसली त्याच्यावर जबरदस्ती त्याच्यासारखे कित्येकजण खाते उघडून घ्यायला येतात. ते कधी हसले नाहीत. त्यांच्याकडे आपण कधी बघितलेसुद्धा नाही. मग आता याच्याचकडून ही अपेक्षा का? मानेला एक झटका देत तिने सगळे विचार झटकून टाकले. ती कामाला तर लागली पण तिच्या मनात चाललेला गोंधळ ती झटकू शकली नाही. कोणाला सांगणार हा मनातला गोंधळ?

***

बघता बघता चार-सहा महिने उलटून गेले. एक दिवस बँकेचा कॅशियर सुट्टीवर होता म्हणून त्या दिवशी कॅश काऊंटर तिच्याकडे आले. एकेक चेक टोकननंबर घालून तिच्याकडे येत होते नि टोकन नं. फलकावर लावून त्याप्रमाणे चेकचे पैसे देत होती. एका चेकचे पैसे देण्याकरता तिने टोकननंबर लावला नि ती पैसे मोजून देणार तेवढ्यात, 

“अरे, तुमची बदली झाली वाटतं?” आवाज जरा ओळखीचा वाटला म्हणून तिने वर बघितले तर समोर तो उभा होता. ती मनातून इतकी आनंदली तिला जाणवले त्याला बघताच मनात एक वेगळेच संगीत सुरू झालं. शरीरभर रोमांचित करणारी एक तान उठली. 

“पैसे झालेत मोजून?” त्याने विचारलं. “हो ” खजील होतं तिनी उत्तर दिलं. तिने हातातले पैसे मोजून त्याला दिले. काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून ती बोलली.

 “अहो. आमचा कॅशिअर आज सुट्टीवर आहे म्हणून मी आज बसले”

“हो.. का..?” असं म्हणत पैसे मोजून तो गेलासुद्धा. तिला पुढच्या चेकचे पैसे धड  मोजता येत नव्हते. मधूनच तिला तो आठवायचा.त्याने विचारलेला प्रश्न आठवायचा.

“किती वेळ आपण त्याच्याकडे बघत होतो.” या विचाराने ती स्वतःशीच खजिल झाली, पण आज आपला कॅशियर रजेवर गेला किती छान झालं. असे सहजच तिच्या मनात आलं. ती त्या दिवशी घरी आली ती वाऱ्यावर तरंगतच.

तिचं असं वाऱ्यावर तरंगणं घरातल्या कुणाच्याच लक्षात आलं नाही. कारण वठलेल्या झाडाला उशिरा पालवी फुटेल असे कोणाच्या मनातही आलं नाही. 

ती रात्र तिच्यासाठी स्वप्नाळू वस्त्रे नेसून आली होती. स्वप्नात फक्त त्याच्याचसाठी ती होती. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्यांचं बघणं  तिच्यासाठी अमृतकण होते. ती इतक्या शिताफीने ते कण वेचीत होती की तिलाही आश्चर्य  वाटलं. तिच्यातली अभिसारिका तिच्या वयाचा बुंधा जरड झाला तरी कोवळीच होती. हे तिच्या लक्षात आलं आणि तिचं मन  आणखी रोमांचीत झालं.

सकाळच्या सोनेरी किरणांनी तिच्या पापण्यांवर हळूच टिचकी मारली. तिचे डोळे कितीतरी वेळ स्वप्नाळू वस्त्रे उतरवायलाच तयार नव्हती. हे स्वप्न असच गोड केशरी रंगात खुलून फुलत रहावं असं तिला वाटत होतं.

 “अगं आज किती वेळ झोपायचे ते..बँक नाही का?”

आईच्या रूक्ष आवाजाने ती जागी झाली. उठल्यावर तिला स्वप्न आठवलं. त्या नादातच ती खाली आली. पायऱ्या उतरता उतरता आपल्या नावाचा उल्लेख ऐकला म्हणून ती जिन्यातच थबकली.

 “अरे हा तर  दिनूमामांचा आवाज”,अवनी स्वतःशीच बोलली.

“अग माई काल मी त्या सरपोतदारांकडे गेलो होतो. त्यांनीच फोन करून बोलावले होते. “

“काय म्हणाले मग? पसंत आहे का मुलगी” आजीच्या आवाजातील अधीरपण लपले नाही. तिला मात्र नकार ऐकून मनातून बरेच वाटले.

“ते म्हणाले तुमची भाची इतकी गुणी मुलगी आहे की तिच्या गळ्यात एका मानसिक दुर्बल मुलाची गाठ का बांधावी?” 

“मानसिक दुर्बल त्यांचा मुलगा आहे ना! तो नाही ना! लग्न तर त्याला करायचे आहे. मुलाचा प्रश्न कुठे येतो?” आजी म्हणाली.

न पाहिलेल्या व्यक्तीने आपल्याला गुणी म्हटले म्हणून तिने त्याला पूर्णच गुण देऊन टाकले, आजीला मात्र शून्य गुण द्यावे असे तिला वाटू लागले. मी प्रौढ कुमारिका आहे म्हणून मानसिक दुर्बल मुलाची आई का होऊ? रागाने तिने मान झटकली.

“ते बँकेत दोन-तीनदा जाऊन तिला बघून आले.” दिनू मामा म्हणाला.

 “कधी?” आजींनी विचारलं.

“याच काही दिवसात म्हणजे साधारण ७/८ महिन्यापूर्वी त्यांनी मुद्दाम तेथे खातं उघडलं. “

“खातं उघडलं..” तिच्या अंगातून आनंदाची शिरशिरी आली. खरंच तोच असेल का??

“काय नाव म्हणालास दिनू त्यांचं? लक्षात राहत नाही बघ हल्ली.”. तिला आजीपेक्षाही घाई झाली होती त्याच नाव जाणून घ्यायची. दिनूमामाच्या तोंडून त्यांचे नाव ऐकण्याची.

 “अ… रघुनाथ नेवरेकर.” दिनू मामा म्हणाला.

‘रघुनाथ नेवरेकर.’ ..तिला स्वतःची अवस्था कशी झाली हेच समजेना. काहीतरी मनाशी ठरवून ती पुढे आली. तिला पाहताच आई चपापली. दिनूमामा

चहा पिऊ लागला. आजीही गोंधळली. 

“आई मी या लग्नाला तयार आहे.” 

आई, आजी, दिनमामा चमकले. दोघेही काहीच बोलेनात. मग अवधीत हळूवार आवाजात बोलली.

“आई त्यांना मी बघितलयं. पुष्कळदा बॅंकेत येऊन गेलेत. ते बोलले नाहीत कामाशिवाय. पण त्यांच्या नजरेतले वेगळे भाव आज मला कळले.” आईचा हात हातात घेत ती पुढे म्हणाली,

 “आई मी वठलेलं झाड आहे गं. या झाडाचा बुंधा प्रेमाविना कोरडा पडला होता. त्यांच्या तशा नजरेने या बुंध्यास संजीवनी मिळाली.  मला त्यांची नजर हवीहवीशी वाटली.आजपर्यंत इतकी माणसं बॅंकेत आली, येतात पण असं मला कधी वाटलं नाही.”

थोडं थांबून अवनी पुढे बोलली, 

“या वयात पहिला वर कसा मिळेल? मला देखणेपण नकोय. श्रीमंती नकोय मला त्यांचं सुंदर  मन हवय, अमृतमय नजर हवीय. मी जपेन त्यांच्या मुलाला सख्ख्या आईपेक्षाही जास्त.” 

पुढे काही न बोलू शकल्याने ती गप्प बसली. आई आणि दिनुमामाला जाणवले ते इतके दिवस मनात दडवलेले दुःख तिचे एकटीचे होते. पण आज ती दुसऱ्याचं दुःख आपलसं  करू पाहते आहे. दोघांनाही समजेना काय बोलावे तरी मामा म्हणाला, 

“मी पुन्हा पाहतो भेटून.”दिनू मामाच्या एवढ्या बोलण्यानेही अवनीला  खूप आनंद झाला.

***

या गोष्टीला सहज चार-पाच दिवस उलटले असतील. तिने दोनदा तरी आईला विचारलं, “दिनूमामा आला नाही ग! “

दिनूमामाची फक्त तीच वाट बघत होती, इतरांना कुठे त्यात रस होता. दिनूमामा तिचे संसाराचे स्वप्न पूर्ण करू शकणार होता.  तिच्या वठलेल्या झाडाला मोहोर फुटला होता तो दिनू मामानी आणलेल्या स्थळामुळेच. तिला आईने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा तिने मनाशी काहीतरी ठरवलं.

तिचे नशिब चांगलं की दुसऱ्याच दिवशी तो बँकेत आला. तिला दिसताच तिने आपल्या हातातील काम बाजूला ठेवले नि अवनी उठली. तिला त्याचे स्थळ हातून घालवायचे नव्हते. तो चेकवर मागे सही करण्यात गुंतला होता. 

“मिस्टर नेवरेकर…” अवनी नी हाक मारली.

“अं.. हो. हॅलो”चेकवर सही करता करता मागे वळून तो बोलला.

“जरा मला तुमच्याशी काम होतं.”

“एक मिनिट..” 

तो चेक त्याने काऊंटरवर दिला. तो बाहेर येईपर्यंत ती बँकेच्या बाहेर येऊन उभी राहिली.

“बोला…” तो बाहेर येत म्हणाला. 

“तुम्ही मला मी पसंत असून नकार का दिलात?”अवनीनी सरळ मुद्द्यालाच हात घातला.

तो तिची नजर टाळत म्हणाला  “हो. त्याचे काय…”

त्याला पुढे बोलू न देता अवनीच म्हणाली.

“मला माहीत आहे. तुमचा मुलगा मानसिक दुर्बल आहे.” मीस्टर नेवरेकर मी एक प्रौढ कुमारिका आहे. प्रौढ कुमारिका एक वठलेलं झाड असतं. आजपर्यंत या झाडाला कोवळी पालवी फुटावी असं घडलंच  नव्हतं. त्या दिवशी तुमची नजर बरचसं काम करून गेली. स्पष्ट शब्दात सांगायचं तर मला तुम्ही आवडलात. अत्यंत संयमाने एका वठलेल्या मनामध्ये तुम्ही संगीत निर्माण केलं. जे मी आता विसरले होते.

जर तुमच्या मुलामुळे तुम्हाला अवघडलेपण वाटत असेल तर तसं वाटू देऊ नका. तुम्ही मला संजीवनी दिलीत मी तुमच्या मुलाला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीन. सख्खी आई तर होऊ शकणार नाही पण प्रेमात सावत्रपणा येऊ देणार नाही.” 

बोलून झाल्यावर धाप लागल्याने उत्तेजित झाल्याने तिचं सगळं अंग गरम झालं होतं. ती मान खाली घालून उभी राहिली. तिला नकारच अपेक्षित होता.

तो मात्र तिच्याकडे कौतुकाने बघत होता. पहिल्या दिवशी त्याच्या मनाने तिच्याबद्दल जे आडाखे बांधले होते ते चुकले नव्हते. याचा त्याला मनापासून आनंद झाला होता तरी तो नकारार्थीच बोलला.

“तुमचं ऐकलं. तुमचा प्रत्येक शब्द तुम्ही मनापासून बोलला आहात हे मला माहीत आहे. मला तुम्ही पसंतही आहात तरी मी तुम्हाला नकार देईन. तुम्ही प्रौढ कुमारिका आहात म्हणून एका मानसिक दुर्बल मुलगा ज्याच्या पदरी आहे अशाशी तुमचे लग्न होणं हा तुमच्यावर अन्याय होईल.” रघूनाथ म्हणाला.

“मुळीच नाही. माझ्यासारखीला पहिला वर कुठे मिळेल? आयुष्य हे नेहमीच तडजोडीवर आधारलेले असतं. तुम्हालाही २०-२२ वर्षाची मुलगी कशी मिळेल? तिची स्वप्ने वेगळी असतील. माझी स्वप्नं सत्य गोष्टींना मान्य करतात कारण माझं कोवळं वय उलटून गेलय. तुमच्या दोन चार भेटीतच मला

तुमच्यातला सज्जनपणा कळलाय. प्रौढ कुमारिका म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी असल्यासारखे सगळे लोक वागतात तुमचं वागणं वेगळं होतं. 

यावरून मी अंदाज बांधला पुढेही तुम्ही मला साथ द्याल, नाही म्हणू नका. संसाराचा डाव मांडण्याची मला संधी मिळाली आहे. ती माझ्या हातून हिसकावू घेऊ नका. तुमच्या काही क्षणांच्या सहवासानी माझ्या मनात सुरेल संगीत सुरू झालं आहे. संसाराचा डाव मांडून शकू ही हिम्मत  निर्माण झाली. पुन्हा कोणास ठाऊक अशी संधी मिळेल की नाही?” 

बोलणे संपताच तिला रडू येऊ लागलं. त्याला तिची दया आली. आपण तिच्या बँकेत आलो आहोत याचे भान ठेवून तो म्हणाला, 

“मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला.तुमच्या घरी मी निरोप पाठवतो. निघू मी ” तिच्याकडे बघून गोड हसत रघूनाथ निघाला.

“थँक्यू.” त्याच्याकडे बघत ती म्हणाली. म्हणताना तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ती तडक आत गेली डोळे पुसत. तोही समाधानाने घरी गेला. 

आपल्या मुलाला समजावून सांगू लागला,

“तुला एक आई आणणार आहे. वात्सल्याचे अमृत देणारी.” 

मुलाला काहीसुद्धा कळले नव्हते. तो मात्र त्याला समजल्याच्या नादात होता. त्याच्याही आयुष्यातलं एकाकीपण आता संपणार होतं.कारण अवनी सारखी समंजस मुलगी त्याची सहचारिणी म्हणून येणार आहे. त्याच्या मानसिक दुर्बल मुलाची आई होऊन त्याच्यावर मायेचा वर्षाव करणारी आहे.

आपल्या ओंजळीत आता खूप सुखाचे क्षण येणार म्हणून तो आनंदला.

तिच्या घरी आनंदाच्या झिरमिळ्या लागल्या होत्या. आईला तिचा संसाराचा डाव मांडणे अवघड वाटत होते तोच नशिबाने एक संधी दिली. एका वठलेल्या झाडाला पूर्णपणे फुलण्याचे स्वातंत्र्य दिलं. ती फार आनंदात होती. यानंतर ती फुलणारच होती इतर स्त्रियांप्रमाणे. तिचे वठलेपण आता गळून पडलं होतं.

वठलेल्या झाडाची कहाणी  वठलेल्या झाडालाच कळते.आता तिचं आयुष्य वेगवेगळ्या नात्यांनी फुलणार होतं.बहरणार होतं.

————————————————————-

            ‌‌.            समाप्त

लेखिका – मीनाक्षी वैद्य

======================================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

=================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter