Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आज देशपांड्याच्या घरी धावपळ सुरू होती. सालाबादप्रमाणे निर्मलावहिनी आणि त्यांचे कुटुंब मुंबईहून आठ दिवसांसाठी गावी येणार होतं. घरात पुरणपोळ्यांचा बेत होता. कालिंदीने अगदी साग्रसंगीत बेत केला होता. पुरणपोळी, मसालेभात, काकडीची कोशिंबीर, नारळाच्या दुधाचा रस, कटाची आमटी. कटाच्या आमटीचा वास घरभर पसरला होता. वर आंबे, गरे हे कोकणातील पदार्थ होतेच.

निर्मला आणि कालिंदी सख्ख्या जावा. निर्मलाचा नवरा म्हणजे सुभाष मुंबईत चांगल्या नोकरीवर होता, तर कालिंदीचा नवरा सुहास चांगले शिक्षण घेऊनही घरची शेती आणि भिक्षुकी करत होता. त्याला शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करण्याची आवड होती. निर्मलाची परिस्थिती उत्तम होती, तर कालिंदीकडे खायला-प्यायला कमी नव्हती, पण त्यामनाने बेताची परिस्थिती, पण तरीही सासू-सासर्‍यांच्या माघारी तिने निर्मलावहिनींच्या पाहुणचारात काही कसूर केली नव्हती. निर्मला वहिनींना आपल्या शहरी जीवनाचा थोडासा टेंभा होता, कालिंदी त्याकडे दुर्लक्ष करीत असे.

झकास जेवणावर निर्मलावहिनी, सुभाषदादा आणि त्यांची दोन्ही मुलं अगदी तुटून पडली होती. पोटभर जेवण झाल्यावर निर्मलवहिनींनी आपली बॅग उघडली. त्या दरवर्षी मुलांना कपडेलत्ते घेऊन येत असत. कालिंदीला एक मुलगी आणि एक मुलगा होता. निर्मला वहिनींनी आकर्षक पॅकमधील त्या भेटवस्तू काढल्या. खरंतर वरचं पॅकच आकर्षक असे, बाकी आतल्या कपड्यांची क्वालिटी ठीकठाकच असे. कालिंदीला त्यांनी साडी दिली. कालिंदीने ते पुडकं तसंच ठेवलं. मुलांनी आनंदाने ते कपडे घेतले. काकूने आणले म्हणून त्यांना कौतुक असे. कालिंदीही काही बोलत नसे

‘‘अगं कालिंदी, उघडून बघ ना साडी’’ निर्मलावहिनी म्हणाल्या.

कालिंदीने उगाच त्यांना दुखवायला नको म्हणून साडीचं पुडकं उघडलं. अगदी यथातथाच साडी होती. कालिंदीला तो रंग अजिबात आवडला नव्हता तरी छान आहे साडी असं ती तोंडदेखलं म्हणाली, कोणाला दुखवायला तिला आवडत नसे. मग सर्वांच्या गप्पा, चहापाणी झालं.

दुसर्‍या दिवशी कामाला येणार्‍या बाईसोबत निर्मलावहिनींच्या गप्पा सुरू होत्या. ती बाई अगदी त्यांचं भरभरून कौतुक करत होती. कारण जाताना निर्मलावहिनी तिच्या हातावर50-100 रुपये टेकवत असत.

‘‘वहिनी तुम्ही खरंच छान हायसा बघा, दरवर्षी सगळ्यांसाठी काय ना कायतरी आणता.’’

‘‘हो करावं लागतं. आपल्याला कोणी देवो न देवो आपण देत राहायचं.’’ निर्मलावहिनी उगाचंच मोठेपणाचा आव आणून उसासा टाकून म्हणाल्या.

कालिंदीने जाता येता ते वाक्य ऐकलं आणि तिच्या मनाला ते खटकलं. खरंतर हा आठ दिसांचा पाहुणचार तिला भारीच होत असे. पण करते काय? करायला तर हवं ना? त्यात असे टोमणे. निर्मलावहिनींचं असं बोलणं आणि श्रीमंतींचा टेंभा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. मागच्यावर्षीही त्या असं काहीतरी लागट बोलल्याचं कालिंदीला आठवत होतं. कालिंदीला त्यांचं हे असं वागणं सहन होत नसे. बरं कालिंदीचं कधीही मुंबईला जाणं होत नव्हतं. एकदाच काहीतरी कामानिमित्त ती मुंबईला गेली असतानाचं निर्मलावहिनींचं वागणं तिला आठवलं. त्यांनी आधी आम्ही घरात नसतो तसंच मुंबईत पाहुणे परवडत नाहीत असा कांगावा केला होता. गेल्यावर सर्व काही काम कालिंदीलाच करायला लावलं होतं. तिचा हा अनुभव फारसा बरा नव्हताच. पण ‘अतिथी देवो भव’ या लहानपणापासूनच्या शिकवणीमुळे कालिंदी त्यांच्या पाहुणचारात काही कमी करत नसे.

बघता बघता आठ दिवस झाले. सर्व कोकणी पदार्थ करून झाले. गावातील ठरावीक देवस्थानांना भेट देण्यात आली. निर्मलावहिनींचा जाण्याचा दिवस जवळ आला तरी या वेळी कालिंदीची काहीच हालचाल दिसेना निर्मलावहिनींना जरा आश्‍चर्यच वाटलं.

दरवेळी कालिंदी, गावचे तांदूळ, गोडा मसाला, पापड, कुरडया, लोणची, भाजणी, ओले काजू, आंब्याचा आटवलेला रस, आंब्याच्या पेट्या, नारळ, सुपारी असं भरभरून देत असे. आधी दोन दिवस तिची तयारी चाले. घरचे म्हणून पोहे, तिखट, कांदा लसूण चटणी. कालिंदीला काही विकत आणावं लागत नसे.

निर्मलावहिनी निघाल्या तेव्हा कालिंदी म्हणाली, ‘‘वहिनी, तुम्ही दरवेळी काहीतरी घेऊन येता, आम्ही तुम्हाला काय देणार? आम्ही गरीब माणसं. खेड्यात राहणारी. तुम्ही आलात की तुमचा पाहुणचार चांगला कसा करता येईल याचाच आम्ही वर्षभर विचार करतो. तुम्हाला देण्यासारखं आमच्याकडे काहीच नाही.’’

निर्मलावहिनी पहिल्यांदा या वेळी रित्या हाताने गेल्या. गाडीत बसल्यापासून त्यांना वाईट वाटत होतं. आपण काहीतरी चुकीचं वागलो हे त्यांना जाणवत होतं. मग त्यांनी आठवून पाहिलं. आजपर्यंत त्यांनी दिलेली कोणतीही साडी कालिंदीच्या अंगावर कधीच दिसली नव्हती कारण तिला गावातील लोक खूप छान साड्या देत असत. तसंच तिच्या माहेरची परिस्थितीही बर्‍यापैकी होती किंवा सुहास भाओजी तिला चांगली साडी घेऊन देतील इतपत त्यांची ऐपत होती. आपण एरवी नेसतो त्या साड्या आणि कालिंदीसाठी आपण आणतो त्या साड्या यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तसेच आपल्या मुलांचे कपडे आणि आपण कालिंदीच्या मुलांसाठी घेतो ते कपडे यातही खूप फरक आहे. निर्मलावहिनींचं मन त्यांना खाऊ लागलं होतं.

गावावरून आल्यावर त्यांचं रुटीन सुरू झालं होतं. ज्या वस्तू त्यांनी कधीच विकत घेतल्या नव्हत्या त्या विकत घ्यायची त्यांची वेळ आल्यावर त्यांना त्या किमतीचं मोल कळलं होतं. आपण देत असलेल्या वस्तू आणि आपण तिथून ज्या घरच्या म्हणून आणतो त्या वस्तू याची काहीच बरोबरी होऊ शकत नाही याची त्यांना जाणीव झाली. इकडे कालिंदीलाही आपण उगाच असं वागलो असंंही वाटत होतं, पण काही वेळा आपली किंमत दाखवणंही गरजेचं असतं असंही तिला वाटत होतं.

आयुष्यात पहिल्यांदाच निर्मलावहिनी दिवाळीच्या आधी गावी आल्या. अचानक त्यांची मोटार दारात बघून कालिंदीला आश्‍चर्यच वाटलं. निर्मलावहिनी, सुभाष दादा आणि त्यांची मुलं गाडीतून खाली उतरली. मुलं नेहमीप्रमाणे एकमेकांशी खेळण्यात मग्न झाली. निर्मलावहिनी अचानक आल्याने कालिंदीचं एरवीचं जेवण आणि आपण आल्यावर केलेला पाहुणचार पाहून त्यांना आणखीनच अपराधी वाटलं.

‘‘वहिनी, आधी कळवायचंत ना. काहीतरी गोडधोड केलं असतं.’’

निर्मला वहिनी म्हणाल्या, ‘‘म्हणूनच अचानक आले.’’

मग निर्मलावहिनींनी आपल्या पर्समधून एक सोन्याचे कानातले काढले तसेच एक सुंदरशी साडी काढली आणि कालिंदीला भेट दिली. मुलांना उंची कपडे दिले. खाऊ म्हणून मिठाई आणली.

‘‘याची काहीच गरज नव्हती.’’ कालिंदी संकोचून म्हणाली.

‘‘खरंच याची काहीच गरज नसते कालिंदी, गरज असते एकमेकांना समजून घेण्याची. पण हे समजून घेण्यात मी कमी पडले आणि तू माझे डोळे उघडलेस. माझ्यातली उणीव तू मला न बोलता दाखवून दिलीस म्हणून माझ्याकडून तुला ही भेट.’’

निर्मलावहिनी आणि कालिंदी यांनी एकमेकांचा हात हातात घेतला आता शब्द मुके झाले होते दोघींच्या डोळ्यांतून झरझर अश्रू वाहात होते.

®️©️सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

===========

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *