Ritbhatmarathi

Search
Close this search box.

© सौ.गीता गजानन गरुड.

आशना कॉलेजला जायला निघाली. कुरळ्या केसांची वलयं तिच्या पाठीवर मिरवत होती. काही बटा विकसित वक्षस्थलांवर रुळत होत्या. व्हॉयलेट टीशर्ट अन् व्हाइट जीन्स मधे ती खरंच गोड दिसत होती. माफक मेकअप तिने केला होता.

आई येते गं! ती दार ढकलून घेत म्हणाली तशी आसावरी किचनमधून बाहेर आली.

“नीट जपून जा गं. डाव्याउजव्या बाजूला पाहून रस्ता ओलांड हो. कुणा तिर्हाइताशी बोलू नको..एक ना दोन..”आशनाची आजी म्हणजे आसावरीची आई नातीला काळजीयुक्त सूचना देत होती. तेवढ्याशा बोलण्यानेही आजीला धाप लागली पण आजी काही बोलणं संपवीत नव्हती.

आसावरीने आईला पाणी आणून दिलं. “सावकाश बोलावं. किती सूचना करतेस! लहान का आहे आशू आता.कळतं तिला सगळं. बघ बरं तुलाच त्रास झाला नं.”आसावरी काळजीच्या सुरात गुरगुरली.

“काही त्रास होत नाही मला. चांगली ठणठणीत आहे. आणि काही झालंच तर बरंच होईल. सुटेन या देहाच्या तुरुंगातून एकदाची.”

“का गं आई असं बोलतेस सारखं सारखं!”

“बोलणंच तर आहे माझ्या हातात. खूप खूप भीती वाटते बघ मला. तुझा भाऊ आनंद असाच तर कॉलेजला जायला बाहेर पडला होता आणि परतलं त्याचं कलेवर..ओळखताही नाही आलं असा अपघातात छिन्नविच्छिन्न झालेला चेहरा..तो चेहरा अजुनही डोळ्यासमोरुन जात नाही माझ्या. जीवंतपणी मरणयातना भोगल्यात मी. त्याच धक्क्यानं तुझ्या वडलांनी अंथरुण धरलं नि आनंदाच्या पाठोपाठ तेही.”आजीने डोळ्याला पदर लावला.

“बघ लागलीस भूतकाळाची मुळं पोखरायला.” आसावरी फर्निचरवरील धूळ साफ करता करता म्हणाली.

“तेवढंच तर उरलय आता हातात. आसा, अगं आठवणी आठवणी आणि आठवणी फक्त. माझा आनंदा आता पन्नाशीचा झाला असता ना गं. त्याची बायकोमुलं..छान संसार असता.”

“हो गं आई..मलाही येते आठवण आनंदभाईची. आनंदभाई किती लाड करायचा माझे! तुला काळा नवरा मिळेल म्हणायचा. नुसता खोड्या काढायचा. माझं काही चुकलं तर मात्र मला पाठीशी घालायचा न् माझ्या वाटेची शिक्षा स्वतः भोगायचा. ए आई,आनंदभाईला मुलगा असता तर आशनाला भाऊ मिळाला असता नं. आशनानंतर माझी कूस उजवलीच नाही.”

“कशी उजवणार कूस? त्यासाठी तुमच्यात एकी नको! तुझा तो नवरा तिरसिंगराव नुसता भांडत. नुसती अरेरावी.”

“तुला काही बोलतात का ते!”

“मला कशाला बोलेल तो आणि मी बरी ऐकून घेईन? घर घेताना पैसे दिलेत मीही. शिवाय वाती,लाडू विकून संसाराला हातभार लावते तुमच्या.”

“आई गं,तुझ्या मिळकतीत त्यांच्या चैनीही भागायच्या नाहीत.”

“कोण सांगतय करायला चैनी! कपाळावरचे केस गेले..एवढसं पुज्य होतं..त्याचा पौर्णिमेचा चांदोबा झाला वरती तरी सिगारेटी,ड्रिंक्स,पार्ट्यासार्ट्या..”

” राहू दे ना आई.”

“राहू दे तर राहू दे. मला मेलीला काय पडलंय. माझी काय चार हाडं उरलैत ती उद्यापरवा जातील मसणात पण तुम्हा दोघींसाठी जीव तुटतो हो. तुझा नवरा दोन दिवस घरात तर चार दिवस बाहेर..टुरवर म्हणे. बायकोला कधी घेऊन गेला नाही तो टुरवर!”

“अगं आई,बिझनेस टूर असते ती. मला कशी घेऊन जातील आणि मी जाऊन घराकडे कोण बघणार!”

“घे त्या तिरसिंग्याची बाजू..तुच लाडावून ठेवलायस त्याला. घरी असला की हातात पाण्याचा ग्लास काय डाळींब सोलून त्यातले दाणे काढून देणं काय. नशीब भरवत नाहीस.”

“आई थट्टा पुरे हा आत्ता.”

“थट्टा..मी एवढी तळमळीने बोलतेय तर म्हणे थट्टा. करा काय हवं ते करा. कापूस आणून ठेव इकडे. जरा वाती वळत बसते. हाताला काम नि मुखी विठुरायाचं नाव..हेच बरं. कानांत बोती,डोळ्यांना झापडं लावून रहायचं.म्हातारी हाडं नि कोनात पडलेलं पोतेरं सारखंच.”

“धर आई,हा शिरा घे. अगदी तुला हवा तसा केलाय बघ.” आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आसावरी म्हणाली.

“विषय बदलण्यासाठी बऱ्या क्ल्रुप्त्या शोधून काढतेस आसा तू.”आजी ऊन ऊन शिरा तोंडात टाकत म्हणाली.

दुपारची जेवणं आवरुन आजी वामकुक्षी घेण्यासाठी लवंडणार तोच दाराची बेल वाजली. आसावरी भिसीसाठी मैत्रिणीच्या घरी गेल्याने आजीलाच दार उघडावं लागलं.

एक साधारण पंचवीशीतला तरुण दारात उभा होता.

कोण आपण?

आजीने चष्म्यातून त्याला न्याहाळण्याचा प्रयत्न केला.

आसावरी नेफाडे कुठेयत?

“ती गेलेय भिसी गटाकडे. आता काही दोन तास यायची नाही. गप्पाटप्पा,खाणंपिणं.. नुसती चंगळ असते. एकेक ह्या अशा सुटल्यात. सगळ्या कामांना यंत्र..अगदी कणिक तिंबायला,भांडी घासायलासुद्धा. आणि खाणी कसली ती पिझ्झा,बर्गर,मॉकटेल न् फॉकटेल.

बरं,तू कोण? आसावरीच्या सासरचा कुणी? हे असं होतं बघ माझं. जे विचारायचं असतं ते सोडून दुसरंच बोलत बसते. जायचं असतं एका गावाला नि दहा एसट्यांची तोंडं बघणं तसं किंवा एखादं ब्लाऊजपीस घ्यायला म्हणून बाजारात जावं नि दहाबारा साड्या आलट्यापालट्या करुन यावं तसं.” असं म्हणत आजी खुदकन हसली तशी तिची नुकतीच लावलेली कवळी मोत्यांसारखी चकाकली.

“मी विद्याधर वैशंपायन. निवारा व्रुद्धाश्रमाचा सहसंचालक. तुम्ही मालती केणी बरोबर नं.”

“हो मीच मालती केणी पण माझ्याकडे तुझं काय काम?मला काही व्रुद्धाश्रमात वगैरे रहाण्याची गरज नाही. अरे पण तू उभा का? ये जरा बैस पाणी आणते थांब तुझ्यासाठी का मठ्ठा घेणार तू? घेऊन तर बघ..हाताला भारी चव हो माझ्या.

आताशा होत नाही माझ्याने तरी नातीसाठी करत असते काहीबाही. आमच्या आशनाला माझ्या हातचे पदार्थ फार आवडतात. लेकीचा तर प्रश्नच नाही पण तिरसिंगरावांनाही माझ्याच हातचं बेसनाचं पीठलं आवडतं. रावणपीठलं तर अगदी आवडीचं..त्याचा स्वभावही तसाच तिखट तिखट पण आतून मवाळ आहे हो. धर मठ्ठा घे.”

“छानच झालाय आजी मठ्ठा. या उन्हाचं असं काही प्यायला मिळणं म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. बरं ते तिरसिंगराव म्हणालात ते कोण ओ?”

आजी खुदकन हसली.”अरे ते मी माझ्या जावईबापूंना म्हणते लाडाने. निकनेम म्हण हवं तर.”

“अच्छा”

“असं कोणतरी आलं दारात तर किती बोलू न् किती नको होतं बघ मला. हळव्या मनाला माणसांची गरज असते रे विद्याधरा. खूप काही बोलावसं वाटतं पण बोलणार कुणाशी? ऐकणारा कान मिळतो का रे रेडिमेड या यंत्रयुगात?

बरं, माझं जाऊदे. माझं चालायचंच. तू सांग, या वाटेकडे म्हणजे व्रुद्धाश्रमस्थापनेकडे वगैरे कसा काय बरं वळलास? नाही म्हणजे पोरीसोरींसोबत हिंडण्याफिरण्याचं वय रे तुझं. नवी स्वप्न,नवी जिद्द..सगळं कसं नवं नवं अगदी नवी पालवी फुटते तशी तारुण्यावस्था..अगदी उमदा तरुण तू. रस्त्याने चालायला लागलास की झकत चारदोन पोरी मान वळवून बघत असतील तुझ्याकडे. नोकरी नाही का रे तुला?”

“अहो,आजी तुम्ही समजता तसा मी वैरागी वगैरे बिलकुल नाही. मी तरुण आहे..माझीही काही स्वप्न आहेत इतर तरुणांसारखीच. माझे वडील माझ्या लहानपणीच गेले. आई कोणा एकासोबत निघून गेली,तेंव्हापासून आजीआजोबांनी सांभाळलं मला.

माझे आजोबा जिल्हाधिकारी होते.आजोबांची नेरळला जमीन होती. तिथेच हा आश्रम उभा केला. माझ्या आजीआजोबांसारखे इतरही आजीआजोबा गुण्यागोविंदाने रहातात तिथे. मी नोकरी करुन आश्रमाच्या कामावरही लक्ष ठेवतो. बाकी सगळं माझे आजोबा पहातात.

चारेक मदतनीसही आहेत. ग्रंथालय,दूरदर्शन संच,बाग,शेती,सोलार हिटर सारं काही आहे आमच्या आश्रमात. आठवड्यातून एकदा पावभाजी,मिसळपाव,दाबेली असं चटपटीत खाणंही मिळतं.”

“तो तुझा आश्रम कितीही चांगला..अगदी राजाच्या राजवाड्यासारखा शोभिवंत असला तरी मला नको हो. उगा का मी माझी दहा बाय बाराची खोली विकून जावयाच्या घरासाठी पैशाची मदत केली! पण मुलीच्या किंवा जावयाच्या तोंडाने कधी मदत केली असं निघत नाही हो. असो,आपलेच दात न् आपलेच ओठ.” आजीने पदर डोळ्यांना लावला.

“आजी,मी म्हणजे कसं सांगू तुम्हाला.”

“अरे,अडखळतोस कशाला. देणगी हवी का तुला व्रुद्धाश्रमासाठी. यजमान प्रायव्हेट नोकरी करत होते माझे त्यामुळे पेंशन नाही मला पण या वाती वळून देवळात विकायला ठेवते..शिवाय किर्तन करते. यजमानांची थोडीबहुत शिल्लक आहे माझ्याकडे. थांब तुला चांगली हजार रुपये देणगी देते व्रुद्धाश्रमासाठी.”

“आजी..आजी थांबा. देणगी नकोय मला. मला तुम्ही हव्या आहात.”

“म्हणजे रे?”

“म्हणजे..तुमच्या मुलीनं नि जावयानं तुम्हाला आमच्या व्रुद्धाश्रमात ठेवायचं ठरवलंय.”

“अरे काय बोलतोयस काय तू? मला काहीच बोलली नाहीत ती दोघं याबद्दल. पोटची पोर आश्रमात ठेवायला निघाली तर जावयाला तरी काय दोष देणार म्हणा. चुकलंच माझं. माझी माणसं माझी माणसं करत माझी जागा विकून यांना घर घ्यायला मदत केली आणि आता या प्रशस्त घरात मला एका चौकोनाचीही जागा नाही. कुणीच नाही रे माझं. रक्ताला रक्ताची ओढ राहिली नाही तर काय बोलणार. अहो,ऐकताय नं, लेक व्रुद्धाश्रमात धाडतेय मला.”

“आजी तुम्ही शांत व्हा. मी फक्त आश्रमाच्या नियमानुसार तुमची भेट घ्यायला आलो होतो. दिवाळी झाली की आणून सोडतील ते तुम्हाला. चला,निघतो मी. मठ्ठा खरंच भारी होता. आता मला आश्रमात खायला मिळेलच तुमच्या हातचं.”

“सावकाश जा रे बाळा.”

विद्याधर गेल्यानंतर मालती आजीने दार लावून घेतलं. तिला खूप खूप रडू आलं. घरात कोणीच नव्हतं. ती मनसोक्त रडली..स्वतः शीच बोलत होती..’हे न मुलगा गेल्यापासनं सासरच्यांनी मला वाळीतच टाकलं होतं. माहेरी वहिनी फक्त मागणाऱ्याच्या भूमिकेत असायची.”

आसावरीच्या पसंतीच्या मुलासोबत तिचं लग्न करुन दिलं. तिची दु:ख आपली मानली. तिच्या बाळंतपणात तिची देखभाल केली. पुढे ती नोकरी करत असताना आताआतापर्यंत तिच्या लेकीला सांभाळलं..आता नात मोठी झाली..आसावरीने स्वेच्छानिवृत्ती घेतली तर हिंडाफिरायला जायचं म्हंटलं की माझी अडचण होऊ लागली .

गेल्या महिन्यात नणंदेकडे रहायला जायचं माझ्यामुळे रखडलं कितींदा बोलून दाखवलंन..माझ्या जीवावर घर टाकून जायची भीती वाटते त्यांना. तरी बरं हातपाय धडधाकट आहेत माझे. आजच माझ्या खोलीचे चार लाख मागून घेते. कुठेही चाळीत खोली घेईन..वाती वळीन,मंदिरात स्वैंपाकीचं काम करीन. किर्तन करेन..पण ही ओढूनताणून गळ्यात घेतलेली नात्यांची जोखडं नको आता.”
तितक्यात आसावरीचा पती, अमर आला. सिगारेट हातात होतीच.

“जावईबापू,थोडं बोलायचं होतं तुमच्याशी.”

“बोला की.”

“व्रुद्धाश्रमात धाडताय मला! मला विचारलंत?”

“त्यात काय विचारायचं? तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचा मक्ता नाही घेतला आम्ही. तुमच्या लेकीशी चर्चा करुनच हा निर्णय घेतलाय आम्ही. तुमच्या सेविंग्समधून तुमची फी भरत जाऊ तिथली. निवांत रहा तिथे. समवयस्कांत मन रमेल तुमचं.”

अमर सिगारेटचं थोटूक एशट्रेमधे टाकून वॉश घ्यायला गेला.

इतक्यात आसावरी आली. आसावरीशी या विषयावर बोलावसं वाटूनही आजीची जीभ रेटेना. खोलीचे पैसे परत कर म्हणवेना. ती कोपऱ्यात जाऊन गाथा वाचत बसली.. वाचते कसली..अक्षरं सगळी डोळ्यातल्या पाण्यामुळे धुसर दिसत होती.

आशना आली. सगळं कसं आलबेल चाललं होतं. त्यांचं त्यांचं असं जग होतं ते. आजी, त्या जगापासून फार दूर होती. त्या तिघा़चंच नाटक होतं. आजी त्या तिघांत उपरी होती.

मोहमाया सोडायला संतमाहात्मे सांगतात पण आपणच ती धरुन बसतो. सगळं सोडता आलं पाहिजे. हा देहच जर आपला नाही तर इतर माणसं तरी आपली कशी! आजी स्वत:शीच हसली. त्या तिघांनी पिझ्झा आणून खाल्ला.

आजीसाठी आमटीभात वाढून दिला. आजी दिवस ढकलीत होती. व्रुद्धाश्रमात जायला आता केवळ आठवडा राहिला होता. लेकीने तिला दोन साड्या आणून दिल्या. ब्लाऊज तर ती रंगीत सळ्यांचे घालत होती. म्याचिंग ब्लाऊजचा प्रश्नच नव्हता.

आशना तिच्या अभ्यासात,मित्रमंडळींत गुंग होती. तिचं तिचं विश्व होतं. तिच्या या नवीन विश्वात तिच्या आजीला जागा नव्हती. आजीला सारखी ढास लागायची. आशनाला तिच्या खोकल्याने इरिटेट व्हायचं.

महिनाभरात व्रुद्धाश्रमातली जागा खाली झाली की आजीची रवानगी तिथे होणार होती. जाणं अपरिहार्य होतं. माझं माझं म्हंटलं तरी माझं असं काहीच नसतं. उगाचच कोणाला मायेच्या पाशाने जवळ घेण्याचा प्रयत्न करु नये हे मालती आजीला आताशा उमगलं होतं.

ती विरक्तीच्या मार्गावर जात होती. मनाची समजूत घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. आताशी ती एकभुक्त झाली होती. सकाळीच दोन पोळ्या नि वरण खाऊन घ्यायची,तेही आपल्या हाताने बनवून. दिवाळीतला फराळही तिने चाखला नाही. दर दिवाळीला स्वतःच्या हाताने बेसन हाटून तुकतुकीत लाडू वळायची आजी. या दिवाळीत तिने स्वैंपाकघराकडे पाठच फिरवली.

आसावरीला आईतला बदल जाणवत होता..तिला वाईटही वाटायचं. आपण हिला व्रुद्धाश्रमात नेऊन सोडणार म्हणून ही असं परक्यासारखं वागतेय आपल्याशी.

आशनाला आल्यावर काय केलंस म्हणून विचारत नाही,उशीर का झाला म्हणून धारेवर धरत नाही,जंकफुड खाण्यावरुन ओरडत नाही. अमरला सिगारेटी,पानं,ड्रिंक्सवरुन दुषणं देत नाही.  एवढ्या चकल्या खाणारी पण चकलीचा एक तुकडा तोंडात घेतला नाही. अनारस्याच्या पिठाला लहान बाळासारखं जपणारी आई..मी केलेला अनारसा उष्टावलासुद्धा नाही.

आसावरीचा गळा दाटून आला. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले.

वडिलांच्या फोटोजवळ उभी रहात ती म्हणाली, “दादा,अहो हौस का आलेय मला माझ्या आईला आश्रमात सोडायची. मलाही मन आहे हो. दगड नाही मी. माझ्या शरीरातला कर्करोग आता फैलावत चाललाय. आईने फार सोसलय. त्यात आणि माझं दुखणं नको. तिला नाही पेलवायचं. मी म्हणजे जीव आहे तिचा. म्हणूनच तिची रवानगी व्रुद्धाश्रमात करतेय. मनावर दगड ठेवून तिच्याशी तुटक वागतेय. तिथल्या वातावरणाची,माणसांची इत्थंभूत चौकशी करुन आलेय मी. माझं तीळातीळाने कोमेजत जाणं,मिटत जाणं ..तिला नाही सहन होणार.

अमर,आशना दोघंही तिला कळू नये म्हणून तिच्यासमोर सगळं काही क्षेम असल्याचं नाटक करताहेत.” दादांच्या फोटोपाशी कितीतरी वेळ आसावरी बोलत होती, रडत होती.. परत बोलत होती,रडत होती. आई गाढ झोपलेली पाहुनच ती कितीतरी दिवसांनी तिच्या भावना व्यक्त करत होती. पाठीवर आईचा, सायीचा हात कधी फिरु लागला,तिचं तिला कळलंच नाही. थरथरत्या हातांनी मालती आजी लेकीला सावरत होती.

“आसा,लेकी माफ कर मला. कसले कसले भ्रम निर्माण झाले होते माझ्या मनात. मी कुठ्ठे जाणार नाही. माझ्या लेकीची सेवाशुश्रुषा करेन आणि परत तिला होती तशी ठणठणीत करेन. जावयांच्या वाढलेल्या व्यसनांचं कारण मी समजून घेऊ शकले नाही. दु:खाला विसरण्यासाठी व्यसनांना जवळ करणं हा उचित मार्ग नव्हे.”

आसावरी, आईच्या पायावर डोकं ठेवून रडू लागली,तशी आशनाही तिच्या कुशीत बसून रडू लागली. अमरच्या अश्रुंचाही बांध सुटला.

मालती आजी प्रत्येकाला धीर देत होती. लेक,नात न् जावयाच्या पाठीवरुन आपले सायीचे हात फिरवत होती. मायेचे पाश पुन्हा जवळ ओढून घेत होती.

या मायेच्या जोरावर,तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर ती लेकीच्या जीवावर उठलेल्या असाध्य रोगाशी सामना करायला सज्ज झाली होती.

समाप्त

–सौ.गीता गजानन गरुड.