Ritbhatmarathi

Search
Close this search box.

लग्नाची पहिलीच रात्र जी प्रत्येक मुलींसाठी काहीतरी खास घेऊन येत असते…पण मुग्धाच्या मनात मात्र वेगळंच होत…’ आपण खरंच योग्य आहोत का…? माधवने फक्त आईसाहेबांसाठी लग्न केलंय आपली या घरात खरंच किंमत असेल का ? ‘ असे विचार मुग्धाच्या मनात सारखे सारखे येत होते…मुग्धासाठी सगळी बेडरूम मस्त आणि आकर्षक फुलांनी सजवलेली असते पलंगावर मस्त मुलायम रेशमी अशी चादर अंथरलेली असते…तो बेड मस्त गुलाबाच्या पाकळ्यानी सुशोभित केलेला असतो…रूममध्ये मस्त अत्तराचा सुगंध दरवळत असतो…तरीही मुग्धाच्या मनात विचारांचं काहूर माजलेलंच असतं…तेवढ्यात दरवाजा ढकलून माधव रूममध्ये येतो…आणि माधव येताचक्षणी मुग्धा एकदम अवघडल्यासारखी होते…हे माधव ओळखतो…आणि म्हणतो…

माधव – एवढी अवघडून कशासाठी बसलीय…

मुग्धा – नाही ते असंच…मी इथं नवीन आहे ना…मग जास्त माणसांमध्ये राहायची सवय नाहीय…म्हणून थोडं ऑकवर्ड वाटतंय…

माधव – इथं कोण आहे अजून फक्त आपण दोघेच आहोत मग ऑकवर्ड वाटण्यासारखं काय आहे त्यात….

मुग्धा – एक विचारू…

माधव – हा विचार…लवकर विचार कारण मला उद्या लवकर उठायचं आहे…तुझ्यासारखं घरात नाही बसायचं मला…

मुग्धा – तुम्ही माझ्याशी लग्नाला कसे काय तयार झालात…?

माधव – उपकार केले तुझ्यावर आणि स्वतःवर…तेव्हा तयार झालोय लग्नाला…

मुग्धा – हे पहा…मीही काय माझ्या मर्जीने तयार झाले नाहीय लग्नाला…कुठून बुद्धी झाली आणि तुमच्याशी लग्न केलंय असं वाटायला लागलंय मला…मनात नव्हतं तर सांगायचं होत तसं…नसता देखावा कशासाठी केलात…

माधव – हे बघ सरळ आणि स्पष्ट सांगतो…मी आईसाहेबांच्या मर्जी विरोधात काही करत नाही…आणि दुसरी गोष्ट…गावातल्या कुठल्याही मुलीवर अन्याय मी होऊ देत नाही असं माझ्या वडिलांपासून मी ऐकत आलोय…आणि तीच प्रथा मला पुढे अखंडपणे न्यायची आहे…मग तुझं आणि माझं लग्न फक्त नवरा

बायकोचं असणार पण ते फक्त गावातल्या लोकांसाठी…आईसाहेबांसाठी आणि महत्वाचं तुझ्या घरच्यांसाठी…यातून तुला काय समजलं ते सांग मला…

मुग्धा – सगळं कळलं मला…माझं तुमच्याशी असलेलं नातं केवळ नावापुरतं आहे बाकी काही नाही…

माधव – गुड…मग आता तू कुठे झोपणार आहेस हे सांग…

मुग्धा – मला काय मखमली पलंग नकोय…तो तुम्हालाच लखलाभ…मी आपली जमिनीवरती झोपेल…मामाकडे असताना काय पलंगावरच झोपायचे का मी…माझी वळकटी शोधायला लागेल मला…आहेत का काही पांघरून इथं म्हणजे तेवढंच वळकटी तयार करून या बेडच्या ट्रॉलीमध्ये ठेऊन टाकते…कुणी आलं की आवरायला बरं नाही का…

माधव – ए बाई…इथं चिकार रजया आहेत गाद्या पण आहेत तूला जी हवी ती घे…आणि तुझं तोंड बंद करून झोपी जा बाई…

भरल्या डोळ्याने मुग्धा आपली वळकटी टाकून जमिनीवर निजते…मनाने कणखर मुग्धा आधीपासूनच असते म्हणून माधवच्या अशा बोलण्याचीही आपल्याला सवय करू घ्यावी लागेल असं मुग्धाने पहिल्या रात्रीच स्वतःला समजावलं आणि तेच मनाशी पक्क केलं… नंतर कधी मुग्धाचा डोळा लागला हे मुग्धाला कळलंही नाही…त्या दिवसापासून मुग्धाने आपल्या स्वप्नांना एक नवी उमेद देण्याचं ठरवलं…दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे उठून सडा संमार्जन करून नाश्ता ते जेवण बनवण्यापर्यंत मुग्धा सगळं कसं व्यवस्थित पाहत होती…आईसाहेबांना आधीपासूनच मुग्धाचा कामाविषयीचा काटेकोरपणा जाणून होत्या म्हणून अगदी निश्चिन्तपणे मुग्धावर सगळ्या घराची जबाबदारी आईसाहेबांच्या टाकली होती…घरात कोणी आलेला पै-पाहुणा मुग्धाचं अगदी तोंडभरून कौतुक करी…मुग्धाही मग तसं वागून दाखवत असे..कुणाच्याही आदरातिथ्यात मुग्धा कसर पडू देत नव्हती…असेच निंबाळकरांच्या घरचा पाहुणचार घेण्याची इच्छा रेखा मामी ने आपल्या नवरोबांकडे म्हणजेच रमेशरावांकडे व्यक्त केली…

रेखा मामी – चला तर आपण जाऊन येऊच की आपल्या लाडक्या भाचीकडे…बघुयात की सगळं वैभव…

रमेशराव – लाडकी आणि तुझी भाची…कधीपासून गं…नेहमी रेशमाचे लाड केलेत तू…आता अचानक लाडकी कशी काय गं झाली…? परीक्षा फी देऊ शकली नाही तू तिची कष्ट करावे लागले तिला त्याच घरात ज्या घरात आता ती मानाने गेलीय…आणि खबरदार परत तिथं जायचं म्हणटलीस तर…

रेखा मामी – आता…भेटायला नाही तर कशाला जायचंय मला…जाऊ देत खऱ्या आयुष्यात कधी बंगला पाहिला  नाही निदान प्रत्यक्ष तरी पाहूदेत की बंगला मला…

रमेशराव – मला नाही कळत का तू तिथं कशासाठी निघालीय…मुग्धाच्या तबेयतीची नाही विचारपूस करायचीय तुला…दोघं नवरा बायकोचं नातं चांगलं आहे की नाही हे तपासून पाहायचं हो ना…आणि पटत जर असेल ना दोघांचं तर त्यात काही तरी मोढता नक्की घालायचाय तुला हे चांगलंच समजतंय मला…आज नाही ओळखत मी तुला…

रेखा मामी – जाऊ देत ना तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीय…मला जावच लागेल…

रमेशराव – आता एकटी जाऊ नकोस…कुठे काय बोलशील सांगता येत नाही…एकतर तालेवार लोक आहेत ती…

रेखा मामी – आता बोलण्यात वेळ दवडणार आहात का तुम्ही…?

रमेशराव –  एवढी घाईवर येऊ नकोस…थांब चपला तर चढवू देत मला…आणि तिथं गेल्यावर तोंडावर ताबा ठेवा…

रेखा मामी – तोंडावर ताबा ठेवा म्हणजे…मी डायटिंग वर आहे कमीच खाते मी तुमच्यापेक्षा…

रमेशराव – खाण्याच्या बाबतीतही आणि बोलतानाही असं म्हणायचय मला…

मामा आणि मामी पहिल्यांदा मुग्धाला कळवतात कारण आपण न कळवता गेलो तर उगाच मुग्धाला सासुरवास नको…म्हणून रमेशमामा पहिलं कळवतात आणि मगच निंबाळकरांच्या घरात पाऊल ठेवतात…आपल्या मामा आणि मामीला पाहताच त्यांच्या पाया पडते…डोक्यावर पदर…अंगावर उंची साडी बोलणयातली ढब हे पाहून रमेशरावांना आपल्या भाचीच विशेष कौतुक वाटतं…आणि डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागतात…आपल्या मामाला असं रडताना पाहून मुग्धाला वाईट वाटतं…मुग्धा आपल्या मामाला म्हणते-

मुग्धा – मामा हे हो काय…तुम्ही रडताय आणि मलाही रडवताय…!

रेखा मामी – हे घे तुला खाऊ आणलाय….रिकाम्या हाती जाऊ नये…म्हणून मुद्दाम तुझ्यासाठी काल रात्री बेसनाचे लाडू आणि चिवडा करून ठेवला होता मी…

मुग्धा – अगं हे सगळं कशाला आणलंस…खरंच काय गरज होती या सगळ्याची…

रमेशराव – बाळा असू देत…तिकडे होतीस तेव्हा तू नाही का या दोघींना करून घालायचीस…आता त्यांना घेऊ देत की थोडे कष्ट…

रेखा मामी – बघ बाई …तुझ्या हातची सय येणार आहे का…खाऊन बघ…

मुग्धा – [ एक घास खाऊन पाहते ] मामी…खूपच गोड झालेत…एवढे गोड नको करत जाऊस…

रेखा मामी – बरोबर आहे…आता आमचा खाऊ तुम्हा तालेवार मंडळींना थोडीच आवडणार आहे…

रमेशराव – रेखा…काय चाललंय तुझं…सांगितलं होत ना…जिभेवर लगाम ठेव म्हणून… [ तेवढ्यात आईसाहेब येतात ]

आईसाहेब – बसा…बसा…असे उठलात का…? मुग्धा हे गं काय…सरबत…चहा नाही विचारलंस अजून…अगं पाहुण्यांचं करायचं असतं…अतिथी देवो भव….हा आपल्या घराचा पाहिला नियम आहे…विसरू नकोस…मनीषा अगं मनीषा…जा ड्रायफ्रूट्स…सरबत घेऊन ये पटकन…

आईसाहेबांची सूचना अमलात आणली जाते…टेबलवरती सरबत…वेगवेगळ्या प्रकारची फळं…बर्फ्या असं मांडलेलं असतं…हे सर्व पाहून रेखा मामींच्या जिभेला पाणी सुटतं… ..रेखा मामी स्वीटला हात लावणार एवढ्यात रमेशराव आपल्या बायकोकडे रागीट नजरेने पाहतात आणि म्हणतात…

रमेशराव – आमच्या हिला म्हणजे मुग्धाच्या मामीला डाएटिंग ची भारी हौस…पहा ना आता एवढं सगळं आणलंय तुम्ही पण एकही घास उचलून तोंडात टाकणार नाही…हो की नाही गं…

रेखा – हो ना…मी डायटिंग वर आहे…[ एक रागीट असा कटाक्ष रमेशरावांकडे टाकते ]

आईसाहेब – ते काही नाही आमच्या समाधानासाठी एक तरी घ्यावाच लागेल…

रमेशराव – नाही आईसाहेब….मुलीच्या घरचं पाणीही प्यायचं नसतं तिला जोवर मुलं होत नाही तोवर…

आईसाहेब – ते सगळं जुनं झालं हो…मी हे काहीच मानत नाही…

रेखा मामी – अहो…आता आईसाहेब एवढा आग्रह करतायत तर घेऊयात ना त्यांच्या समाधानासाठी….

आईसाहेब – घ्या हो घ्या…लाजू नका….मुग्धा…अगं ऐकलंत का…आज संध्याकाळी की नाही…माधवने एक पार्टी ठेवलीय त्याचे काही मित्र मंडळी येणार आहेत…तेव्हा सगळ्यांचं आदरातिथ्य कसं अगदी काटेकोरपणे झालं पाहिजे…त्याचबरोबर लक्षात असू देत तू माधवची बायको आहेस…तुही अगदी व्यवस्थितपणे त्याला साजेशी अशी तयार राहा म्हणजे झालं…

मुग्धा – होय आईसाहेब…मी गणपतीसाठी जशी अर्रेंजमेंट केली होती तशी करू का…?

आईसाहेब – केवढी साधी आहेस गं तू…आता हि कामं तू नाही करायची…समजलं…त्यासाठी दुसरी माणसं बोलावलीय मी…तू आपली व्यवस्थित नटून तयार राहा म्हणजे झालं…

मुग्धा – होय आईसाहेब…!

रमेशराव – चला तर मग आम्ही पण निघतो….संध्याकाळची तयारी करायची असेल मग मुग्धा तुला…

आईसाहेब – भाचीला आणि आम्हाला भेटायला असेच वरचेवर येत राहा…

असे म्हणून मुग्धा आणि आईसाहेब  आपल्या व्याह्यांचा निरोप घेतात…मुग्धा लगबगीने संध्याकाळच्या तयारीला लागते… आईसाहेबांशी गप्पा मारत असताना मुग्धाचं लक्ष सहज आकाराने लहान असलेल्या ग्लॅसांकडे जातं…मुग्धा सहज आईसाहेबांना विचारते…

मुग्धा – आईसाहेब…हे एवढेसे ग्लास कशासाठी इथे आणण सुरु आहे…

आईसाहेब – अगं…आज कॉकटेल पार्टी आहे माधव आणि त्याच्या मित्रांची…खूप दिवासामधून जमणार आहेत ना सगळे म्हणून तयारीत कुठलीच कसर नको आहे म्हणून आत्तापासूनच त्या ग्लासेसची हाताळणी व्यवस्थित चालू आहे…अगं पण तू का विचारतीय असं…

मुग्धा – नाही अगदी सहजच विचारलं…मी सिनेमा मध्ये पहिले होते असे ग्लासेस…आता प्रत्यक्ष पाहिले म्हणून थोडं नवल वाटलं…

आईसाहेब – ठीक आहे…बाकीची तयारी करून घे…तुझ्यासाठी एक मेकअप वाली बाई पाठवते…मग तर झालं…ती तुला तयार करेल…मग तर झालं…

मुग्धा – ठीक आहे आईसाहेब…

आईसाहेबांनी अगदी मायेने स्वतःच्या लेकीसारखा मुग्धाच्या डोक्यावरून हात फिरवला…कुणाचातरी मायेने ओथंबलेला हात आपल्या डोक्यावरून फिरतोय याच एका सुखद स्पर्शाने मुग्धा परत टवटवीत झाली आणि पुढच्या तयारीला निघून गेली…मुग्धा खरंच आपली छाप माधव समोर पाडू शकेल का…की नेहमीप्रमाणे माधव मुग्धाला इग्नोर करेल…पाहुयात पुढच्या भागात…….