Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मोहिनी रात्रीची कामं आटोपून नुकतीच रूम मध्ये आली होती. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं कि दुधावर झाकण ठेवायचं राहून गेलं. गौरव पलंगावर पडून मोबाइल चाळत होता. तिने गौरवला आवाज देऊन सांगितलं….

“अहो ऐकलंत का !! तेवढं दुधावर झाकण ठेवायचं राहुल गेलं….प्लिज तेवढं ठेवता का ?”

गौरव – “आणि तू काय करतेस ? मी आताच कुठे पडलो आहे…. तुला काय माहित गं ऑफिस मध्ये केवढी कामं असतात आणि त्यात त्या बॉस ची कटकट….ठेवायचं तर ठेव नाहीतर राहू दे तसंच…. ऑफिस मध्ये बॉस ची कटकट आणि घरात आलं कि तुझी कटकट….तुमचं बरं आहे काही टेन्शन नाही कि कसली जबाबदारी नाही . “

मोहिनी – “अहो नुसतं दुधाचं झाकण ठेवायला सांगितलं होतं…. त्यात एवढं कसलं हो सुनावता?….जाऊ दे बाई त्या २ मिनिटाच्या कामासाठी ५ मिनिटांची बडबड नको गं बाई !!….मी ठेऊन येते..कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ह्यांना काम सांगितलं “

मोहिनी साधी, सरळ आणि मनमिळाऊ अशी ती ….गेले २० वर्षांपासून स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला सारत आपल्या संसाराचा गाडा ओढत होती. रोज सकाळी ५ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत तिची ड्युटी चालू होयची….मुलगी रुही ११ वीला होती..तिचे सकाळी प्रॅक्टिकल्स असतात त्यामुळे ती ७:३० ला घरातून निघते आणि मुलगा आरव ८ वीत शिकत होता आणि त्यात आजकालच्या शाळेमध्ये मिड मॉर्निंग स्नॅक्स पासून ते संध्याकाळच्या स्नॅक्स पर्यंत मुलांना सगळं पुरवावं लागतं. पण मोहिनीने कसलीच कसर सोडली नव्हती. सगळ्याच्या आवडीनिवडी जपायचा ती पूर्णपणे प्रयत्न करायची.

आजही मोहिनीचा दिवस ५ वाजताच चालू झाला. सकाळी उठल्या उठल्या ती फक्त एक ग्लास पाणी प्यायची. मोहिनीने एकीकडे कणिक मळून ठेवलं तर गॅस वर लगेच भाजी चढवली. दुसरीकडे सकाळच्या न्याहारीसाठी आज आरवच्या आवडीच्या सॅन्डविचचा बेत होता तर त्यासाठी हि तिने हवी ती तयारी करून ठेवली.
भाजी शिजत होती तोवर ती अंघोळ करून आली. आरव आणि रुहीला तिने आवाज दिला. ६-७ वेळा आवाज दिल्यावर दोघेही उठले. रुही आरवला आवाज देता देता मोहिनीने सकाळची पूजाही आटोपून घेतली होती.

मोहिनीने लगेच चपात्या आणि सँडविच करायला घेतले. सकाळचे ७ वाजले असतील, रुही आणि आरव दोघेही तयार होऊन डायनिंग टेबल वर बसले.

आरव – “आई लवकर दे नाष्टा… तुला माहित आहे ना ७:३० लाच माझी बस येते….तुला काय माहित गं बस निघून गेली आणि शाळेत पोहोचायला उशीर झाला कि टीचर कसे पिळून काढतात.”

मोहिनी – ” झालं रे राजा….अरे आज तुझ्या आवडीचे सँडविच बनवलेत ना..म्हटलं तुम्ही लोक तयार होऊन आले कि गरमागरम सर्व्ह करेन.हे बघ झालंच.”

रुही – “काय!! आज तू सँडविच बनवलेत? पण आई तुला माहित आहे नं. मला सँडविच नाही आवडत आणि त्यात मी डाएटिंग करतेय तर मी ब्रेड खाणं बंद केलं आहे. “

मोहिनी – ” अगं कालच तर तुझ्या आवडीचे मसाला ओट्स बनवले होते मी.आधी तर खायची आवडीने. आता काय तर म्हणे डाएटिंग करतेय.कुठून आलं काय माहित हे डाएटिंगचं भूत”

रुही – “आई तुला काय कळणार गं ह्या गोष्टी.वेळेत जर काळजी नाही घेतली ना मी तर होऊन जाईन मी पण तुझ्यासारखीच.”

तेवढ्यात गौरवही उठतो आणि ब्रश करून बाहेर येतो.

गौरव – “सकाळी सकाळी काय कटकट चालू आहे.थोडं निवांत झोपावं म्हटलं तर तेही झोपू देत नाही तुम्ही.”

रुही – “बाबा, बघा नं आज आईने सँडविच बनवले .जेव्हा कि तिला चांगलं माहित आहे कि मलाआवडत नाही. एक तर कॉलेज मध्ये एवढं टेन्शन, एवढा अभ्यास आणि त्यात आवडीचा नाष्टा नाही.”

गौरव – ” खरं बोलतेय रुही…मोहिनी तुला सकाळी अजून लवकर उठायला काय होतं ? उद्यापासून सकाळी लवकर उठत जा.तसंही आम्ही सगळे गेल्यावर तू मोकळीच असतेस. काय काम असतं दिवसभर तुला?  बरं चहा दे मला लवकर. कधीचा मी वाट बघतोय चहाची “

“काय काम असतं दिवसभर तुला?” हे एक साधं पण कठोर वाक्य मोहिनीला खूप लागलं. ८ वाजेपर्यंत सगळे निघून गेले घरातून . मोहिनी सोबत राहिला तो फक्त किचन मधला भांड्यांचा ढीग , थंड झालेला तिच्या वाटेचा तो चहा जो तिला गौरव सोबत निवांत प्यायचा होता, डायनिंग टेबलवर तशाच सोडलेल्या नाष्ट्याच्या उष्ट्या प्लेट्स, हॉल मधला पसारा, रूम मध्ये तसेच टाकलेले सगळ्यांचे कपडे आणि टॉवेल्स, बाहेर वाळत असलेले आद्ल्यादिवशीचे कपडे आणि अजून बरंच काही !!!!

आज दिवसभर सगळी कामं आवरता आवरता मोहिनी सतत विचारात गुंतली होती कि खरंच तिला दिवसभर काही कामच नाहीये का. दिवसभराची बिन पगाराची कामं कुणाला का दिसत नाही? नाही… जर खरंच कुणाला आपण काय करतो हे जर दिसत नसेल तर त्याची जाणीव करून दिलीच पाहिजे.

संध्याकाळी रोजच्या नियमानुसार मोहिनीने आपली सगळी कामं आटोपली होती. रात्री सर्वजण डिनर करत होती तेव्हा मोहिनीने विषय काढला.

मोहिनी – “दादाचा फोन आला होता आज….विचारपूस करत होता…. घरी आई, बाबा आणि वहिनीला फार आठवण येतेय माझी…. मीहि विचार केला कि बरीच वर्ष झाली. माहेरपणाला जाऊन येते म्हणून.”

मोहिनीचं सगळ्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं.

गौरव – ” बरं दादा म्हणतोच आहे तर ये जाऊन एका दिवसात. सकाळी मी इथून तुला बसवून देईन. दुपारी दादा येईन तुला स्टॅन्ड वर न्यायला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघ तिथून. शनिवारी करू या आपण प्लॅन. शनिवार रविवार जाऊन आली म्हणजे मला आणि पोरांना हि सुट्ट्या राहतात त्यामुळे आम्ही करू कसही अड्जस्ट “

मोहिनी – “मी दादाला परवाचं तिकीट बुक करायला सांगितलं आहे आणि हो एक दिवस नाही तर ह्या वेळेस मी कमीत कमी १५ दिवसांसाठी जातेय.”

सगळेजण हे ऐकून अवाकच झाले. असं वाटलं कि तोंडचा घास कुणीतरी हिसकावून घेतंय

गौरव – “अगं तू माहेरी जातेय .घरच्यांना तुझी आठवण येतेय सगळं ठीक आहे गं. पण नवऱ्याचं आणि पोरांचं काय?ह्याचा विचार केला का तू ?

मोहिनी – “हो म्हणूनच मी दादाला परवाचं तिकीट बुक करायला सांगितलं आहे. तुमच्याकडे उद्याचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या आपल्या वाटेची कामं शिकून घ्या आणि स्वतः करायला शिका. तसाही तुम्हा सर्वानुमते मी दिवसभर काहीच करत नाही ह्याचाच अर्थ असा कि तुम्हालाही माझ्याशिवाय काहीही जड जाणार नाही.”

रुही – “अंग आई असा कसं गं ? तुझ्याशिवाय आम्ही शाळा कॉलेज मध्ये कसा जाऊ ? सकाळी कोण नाष्टा आणि डब्बा बनवून देणार?”

मोहिनी – ” हे बघ रुही बाळा, तू आता मोठी झाली आहेस. किचनमधली कामं आता तुला हळू हळू शिकायला हवीत आणि हो तुझे मसाला ओट्स बनवायला तर ५ मिनिटे हि लागत नाही. त्यावर रेसिपी लिहिलेली आहे. तू आरामात बनवशील बघ आणि बाबा हि लवकर उठत जातील आणि तुला मदत करतील.”

सगळ्यांना समजून गेलं होतं कि आपण उठून सुटून मोहिनीवर चढतो हा त्याचाच परिणाम !!!!

गौरव – “मोहिनी सॉरी .. तुला जर वाईट वाटलं असेल तर. आम्हाला खरंच नाही कळालं. दिवसभराचा कामाचा व्याप आणि त्रास मग सगळी चिडचिड तुझ्यावरच काढतो मी. सॉरी अगेन!”

रुही – “हो मम्मी ..मी पण सॉरी!! परत नाही होणार असा कधी आणि तू जे देशील ते आम्ही खाऊ.”

मोहिनी – ” ठीक आहे तुम्ही जर सॉरी फील करत असाल तर मी नाही जाणार. मी माहेरच्यांनाच इकडे बोलावून घेते. पण ह्याचा अर्थ असा नाही कि तुमची कामापासून सुटका होईल. उद्यापासून सगळ्यांनी आपली आपली काम स्वतःच करायची. सगळ्यांनी स्वतःचे टॉवेल्स, वाळत असलेले कपडे घड्या करून ठेवणे. जेवण नाष्टा झाला कि प्लेट्स बेसिन मध्ये आणून ठेवायच्या आणि हो तुमच्यासाठी खास गोष्ट …रविवार ,मंगळवार आणि गुरुवारी तुम्ही चहा ठेवायचा. रोज माझा चहा थंड होतो कामाच्या गडबडीत “

गौरव – “जी मेमसाहेब !!!! अजून काही फर्माइश ?”

मोहिनी – “सध्या तर एवढंच आहे… बाकी मी त्या त्या वेळेला सांगेन.”

आरव…. रुही हसायला लागले आणि सगळ्यांनी एक सुटकेचा निःश्वास सोडला. मोहिनीच्या हि मनातलं घर करून बसलेला तो प्रश्न कि “तू दिवसभर करतेस काय?” आज शेवटी त्याचा सोक्षमोक्ष लागला होता आणि तिनेही एक लांब श्वास घेतला आणि निवांत झोपायला गेली कारण उद्यापासून एक नवीन सुरुवात करायची होती.

 

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories