Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रोशनी तिची कामाची वेळ संपताच घरी लवकर निघून आली.

” पिल्लु आज लवकर कशी काय आली तू??” शोभा काकूंनी नी प्रश्न केला.

” आई …मला सुट्टी भेटली….” रोशनी अगदी आनंदित होऊन म्हणाली.

” अग बाई किती छान…..किती दिवसांची भेटली आहे..??” शोभा काकू समोरच्या घरात जाऊन सोफ्यावर बसत म्हणाल्या.

” आधी तिला फ्रेश तर होऊ दे शोभा…” विजय काका आपल्या हातातलं पुस्तक खाली ठेवत म्हणाले.

” हो …पिल्लु जाऊन फ्रेश हो मग जेवता जेवता बोलू.”

रोशनी आपल्या रूम मध्ये जाऊन तिने नेहमी प्रमाणे अंघोळ केली आणि काही मऊ कपडे अंगावर चढवून ती समोरच्या घरात आली. शोभा काकू समोरच्या घरात जेवण टेबलवर मांडत होत्या आणि विजय काका एक नवीन पुस्तक वाचण्यात मग्न होते.

” कोणते नवीन पुस्तक वाचत आहात बाबा तुम्ही???” रोशनी त्यांच्या बाजूला बसत म्हणाली.

” हे चौघिजणी ही कादंबरी आहे … शांता शेळके यांची अनुवादित आहे ….फारच सुंदर वर्णन केलं आहे यात. “

” तुमचं झालं की मला पण वाचायला द्या मग ….मला पण आवडेल …” रोशनी ला ही तिच्या बाबांसारखी वाचनाची आवड आहे.

” बरं काय म्हणत होती सुट्टीच ???” शोभा काकू त्यांना ताट वाढून देत होत्या.

” आई मला एका हप्त्याची सुट्टी भेटली आहे…” रोशनी चे डोळे आनंदाने चमकत होते.

” खरच …किती छान ना ….मग नक्की जाऊया आता आपण…” शोभा काकू मनापासून खुश होत्या. त्यांची ही इच्छा पूर्ण होणार होती. आपली दोन्ही लेकरं आणि ते दोघे अस त्याचं परिवार पुन्हा एकदा आपल्या आठवणींच्या कुशीत जाणार होते.

” अग पण पजू आणि त्याच्या बायकोला सुट्टी मिळणार आहे का???”

” तुम्ही शांत रहा हो ..विचारलं मी त्याला तो बोलला की होईल म्हणून सुट्टीच. ” शोभा काकू विजय काकांना शांत करत म्हणाल्या.

” ओके जेवण झालं की करू मग त्याला कॉल.” रोशनी ह्या छोट्या ट्रीप वर जाण्यासाठी फार उत्सुक होती.

काही वेळात त्यांचे जेवन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत झालं आणि ते समोरच्या सोफ्यावर आरामात बसले होते.
रोशनी ने तिच्या दादा ला कॉल केला आणि आता सगळ्यांची कान त्या मोबाइल वर टपुन होती.

” हॅलो दादा कुठे आहेस???”

” अग रोशनी मी घरी आहे ..तुझ काय चालू आहे ???” प्रज्वल ने विचारले.

” दादा माझ सगळ उत्तमरित्या चालू आहे…वहिनी आणि तुझ काय चालू ?? तब्येत कशी आहे तुमची??”

” मी आणि पल्लवी मस्त आहोत आणि ती किचन मध्ये आहे….”

” बरं दादा …तुला सुट्टीच होईल का काही….कारण मला भेटली आहे काही दिवसांची ….”

” अरे हा गावी जायचं प्लॅन आहे ना….मी आज विचारल तर भेटेल सुट्टी ….कधी निघायचं ठरवलं आहे मग??”

” अरे तुझ्या सुट्टीची वाट पाहत आहोत….मग निघू शकतो” शोभा काकूंना काही धीर धरवत नव्हता .

” बरं रोशनी तुम्ही काय करा उद्या दापोली साठी निघा आम्ही परवा निघतो …सगळ सुट्टीच वेगेरे करून…” प्रज्वल ने सर्वात सोपा पर्याय शोधून काढला.

” ओके मग आम्ही निघू इथून तू तसाच पुण्यातून ये मग तिकडे. ” विजय काका शांतेत म्हणाले.

” सावकाश ये हा बाळा.” शोभा काकूंना काळजी फार होती.

” हो ग आई येऊ आम्ही नीट …झालं तुमचं जेवण??”

” हो दादा आमचं कधीच झालं. आणि तुझ??”

” करू आता …थोड लेट जेवतो आम्ही …”

” का बर उशीर करता जेवायला….थोड तरी लक्ष द्या आरोग्याकडे….काय तुम्ही आजकालची मुलं…” शोभा काकू आपले भाषण सुरू करत होत्या …तोच रोशनी ने त्यांना थांबवले.

” बरं मी ठेवते आता उद्याची पॅकींग करायची आहे …”

” अरे देवा हो ….उद्याच निघायचं आहे ना आपल्याला …..देवा ….आता किती घाईगडबडीत ही सगळी पॅकींगक करावी लागेल….” शोभा काकूंनी आपल्या कपाळावर आठ्या पाडल्या.

” काही जास्त सामान घ्यायचे नाही … गरजेचं आहे तेच घ्या ” विजय काका आपल्या पुस्तकात डोकं खुपसत म्हणाले.

” हो काही जास्त सामान नाही घेणार आहोत….” शोभा काकू विजय काकांच्या टोमणयाला वैतागलेल्या होत्या.

” चल आई आपण पॅकींग करू …” रोशनी ते गरम झालेलं वातावरण थंड करत म्हणाली.

त्या रात्री त्यांना झोपलेला फार उशीर झाला होता. सगळ्या सामानाची बांधाबांध, काही राहून तर नाहीना गेलं, बस बुकिंग आणि अश्या अनेक गोष्टीत त्यांना वेळ कशी रेतिसारखी निघून गेली.

आपल्या आईबाबांना ” गूड नाईट…” म्हणून रोशनी तिच्या रूम मध्ये गेली. उद्या सकाळी जायचं आहे म्हणून आता लगेच झोपाव लागेल. ती आपल्या बेड वर लोळून तिच्या हातात असलेल्या ब्रेसलेट ला न्याहाळून पाहत होती. बघता बघता ती तिच्या आठवणींमध्ये साठवून ठेवलेल्या त्या क्षणाना आपल्या मनामध्ये पुन्हा तरोताजे करून जगत होती.

” आदी ….आता आपण नाही खेळू शकणार सोबत…” छोटी गोंडस रोशनी तिच्या जिवलग मित्राला म्हणाली.

” का नाही???” तिचा आदी थोडा गोंधळात पडला.

” आम्ही जाणार आहोत मुंबई ला….उद्या मग आपण कस खेळणार सोबत …” त्या निरागस चेहऱ्याच्या रोशनी ला तिची ही मैत्री तोडायची नव्हती.

” तू खरच जाणार आहे ??” आदी मात्र आता उदास झालं होता.

” आदी मी कुठे पण गेले तरी तूच माझा बेस्ट फ्रेंड राहशील.” रोशनी चे हे बोल ऐकून त्याला थोड बर वाटल.

” रोशनी…हे घे …हे तुझ्यासाठी…तू माझी सगळ्यात चांगली बेस्ट फ्रेंड आहे….” आदी आपल्या खिष्यातल एक रबरी ब्रेस्लेट काढून रोशनी समोर धरून म्हणाला.

” वाव किती सुंदर आहे….हे मी नेहमी घालेल हातात आणि मग आपण मोठे झालो की तू मला हे बघून ओळखशील….” रोशनी ते आपल्या हातात घालत म्हणाली.


ते बालपणाच्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर चित्रफिती प्रमाणे झळकत होते. कधी रोशनीला गाढ झोप लागून गेली हे तिला सुध्दा कळले नाही.

रोशनी तिच्या गोड झोपेत असताना तिच्या कानावर तिच्या आईचा आवाज येत होता…खूप अंधुक प्रकाश तिच्या डोळ्यांसमोर होता. ती आपले डोळे मिचकावत उठली.

” पिल्लु उठ … सात वाजले….जायचं आहे ना…” शोभा काकू म्हणाल्या. त्या त्यांची काम करून तयार झाल्या होत्या.

” हो आवरते …” रोशनी आळस देत म्हणाली. तिने तिच्या आईला रूमच्या बाहेर जाताना पाहिलं. आपला मोबाईल चार्जिंग ला लावून ती बाथरूम मध्ये गेली. आपल ब्रश आणि अंघोळ करून ती रूम मध्ये आली. आपली ओली केस टॉवेलने हळुवार पुसत ती आपल्या कपड्याच्या कपाटा समोर उभी राहिली. ” काय घालू मी आज …” अस स्वतःला म्हणत ती कमरेवर हात ठेवून उभी होती.

काही वेळात तिने एक काळया रंगाची जीन्स आणि पिवळ्या रंगाचा टॉप घातला. थोडा मेकप करून ती आपल्या रूम बाहेर गेली.

विजय काका त्यांचे थोडे सामान बॅग मध्ये भरत होते आणि शोभा काकू किचन मध्ये नाश्ता आणि सोबत काही खाण्यासाठी वस्तू आणि डबा करत होत्या. रोशनी ने त्यांना जाऊन थोडी मदत केली आणि त्यांनी आपला नाश्ता केला.

घरातील बाकी सगळी कामं आटोपून त्यांनी आपल्या बॅग्स घेऊन घराबाहेर पडले. रोशनी ने रात्री त्याचं दापोली पर्यंत बस बुक करून ठेवली होती.

योग्य त्या वेळेत ते बस स्टँड वर पोहचले आणि त्यांनी बस मध्ये जाऊन आपले सामान ठेवले आणि बुक केलेल्या सीट वर बसून घेतल.

” मला आता छान वाटत आहे….खूप दिवस झाले गावाकडची आठवण येत होती ….आणि आज आता जाणार आहोत…..” शोभा काकुच्या बोलण्यातून जाणवत होते की त्या किती आनंदित आहेत.

” हो ..पण तिकडे जाऊन लगेच काही आराम नाही भेटणार….साफसफाई करावी लागेल…” विजय काका आपले नवीन विषय छेडत होते.

” करू मग आपण सगळे जण त्यात काय ….” शोभा काकू तिकडे जाऊ याचं खुशीत होत्या.

रोशनी आपल्या मोाईलमध्ये हिंदी चित्रपट बघत होती, शोभा काकू आपल्या विचारात आणि त्यांच्या मोबाईलच्या जुन्या गाण्यात गुंतून गेल्या होत्या. विजय काका त्यांचे ते पुस्तक वाचण्यात मग्न होते. काही तास गेले आणि सरतेेशेवटी त्यांचा प्रवास संपला. दापोलीच्या बस स्टँडवर उतरताच शोभा काकूंना आपल्या अंगात उत्साह संचारला आहे अशी जाणीव होत होती. तोच एकीकडे रोशनी तिच्या जिवलग मित्राला भेटेल ह्या आशेने होती. विजय काका आपले जुने मित्र आणि नातेवाईक यांना भेटायला उत्सुक होते.