Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मी सकाळची कामं पटापट आवरली आणि न्याहारी करून नुकतीच ऑफिसला जायला निघाले.घरात कुणी मोलकरीण नसल्याकारणाने सकाळी सकाळी मुलांचे शाळेचे डब्बे, मुलांना तयार करणे , त्यात माझा आणि रोहितचा ऑफिससाठी डब्बा , सगळ्यांचा नाश्तापाणी, घरातली साफ सफाई ह्या सगळ्यात माझाही ऑफिसला निघायचा टाइम कधी होयचा कळायचंच नाही. सकाळी सकाळी खूप धांदल उडत होती आणि त्यात रोज ऑफिसला पोहोचायला उशीर होयचा आणि रोज मग मी बॉस च्या नजरेत यायचे. कशीतरी बॉस ची नजर चुकवून आपल्या क्युबिकल मध्ये जाऊन बसायची आता हा रोजचाच नियम झाला होता. बॉस पण ह्याला “यूज्ड टु” झाला होता.

आम्हाला पुण्यात शिफ्ट होऊन २ वर्षे झाली होती, पण एकही मोलकरीण मिळाली नव्हती.मध्ये एक ताई यायच्या माझ्या मदतीला, पण नंतर त्या दुसरीकडे शिफ्ट झाल्या आणि मग परत वांदेच झाले. त्या खूप निष्ठावान आणि मेहनती होत्या. पण त्या सोडून गेल्या आणि परत त्यांच्या सारखी कुणी मिळालीच नाही. माझी रोजच चिडचिड होऊ लागली होती आता. आज पण मला घरातून निघायला उशीरच झाला होता.

मी रोज कारनेच जायचे ऑफिसला. माझ्या घरापासून ते ऑफिस पर्यंतचा रस्ता फार रहदारीचा होता. तसं घरापासून ऑफिस पर्यंतचं अंतर काही लांब नव्हतं पण एकतर रस्ता रहदारीचा आणि त्यात ५ सिग्नल्स लागायचे. आणि ज्या दिवशी घाई असते त्या दिवशी नेमकी सगळे सिग्नल्स लागतात आणि त्या सिग्नल्सच्या नादात ५-१० मिनिटे एक्सट्रा लागत. आजही नशीब खराबच होतं. आधीच घरात रोहित आणि माझ्यात थोडी वादावादी झाली होती. त्यात माझी चिडचिड आणि हे सिग्नल्स ह्या सगळ्यां विचारात पार डुबून गेले होते. तेवढ्यात मागच्या गाडीने जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली आणि मी तडतडून जागी झाले. सिग्नल ग्रीन झाला होता म्हणून मागचा हॉर्न वाजवत होता. तसेही आपल्याकडे हॉर्न वाजवायला काही कारण लागत नाही. काही लोकं तर अतिशयोक्तीच करतात आणि मग उगाचच नॉइज पोल्युशनला दुजोरा देतात.

मी पटकन गाडी चालू केली आणि पुढे जाणार तोच एक भिकारी बाई समोर आली. मी ताडकन गाडीचा ब्रेक लावला आणि माझ्या चिडचिडीमध्ये अजून एक भर पडली आणि मग काय मी माझा सगळा राग तिच्यावर काढायला सुरुवात केली. ती माफी मागून पटकन तिथून सरकली आणि सर्रकन निघून गेली. पण त्यात अजून भर म्हणजे ग्रीन झालेला सिग्नल परत रेड झाला आणि माझी २ मिनिटे पुन्हा वाया गेली. आज दिवसच खराब होता. ऑफिस मध्ये गेल्यावर काही वेगळं थोडीच होणार होतं. बॉसचा एक टोमणा ऐकला आणि निर्लज्यासारखी आपल्या क्युबिकल मध्ये जाऊन बसले.

दुसऱ्या दिवशी परत ऑफिस ला जायला निघाले. रस्त्यात परत सिग्नल वर ती बाई दिसली. काहीतरी विकत होती. आज तिच्या कडेवर एक गोंडस बाळ होतं. अंदाजे ७-८ महिन्याचं असेल. कुपोषित वाटत होतं बिचारं. काल जे घडलं त्या बाबत मला थोडा पश्चाताप होता. म्हणून मी तिला बोलावलं आणि तिला ५० रुपये दिले, पण तिने ते घेतले नाही

ती : “मले भीक नको तुमची. म्या भीक नाही घेत. हे तुम्ही विकत घेणार असलं तर घ्या”

मी : “कितीला आहे ते? दे मला एक”

ती : “३० रुपयाला हाय”

मी तिला ५० दिले आणि त्यातले तिने २० रुपये माघारी दिले. असे निष्ठवंत लोकं मिळतात कुठे आज काल.

मी : “अगं राहू दे. पोराला दूध दे आणि खायला घाल चांगलं काहीतरी”

ती : नको मले.. माझ्यासाठी एवढं पैकं लयं हाय. ह्यातले मालक २० रुपडे घेतील आण मला १० रुपडे भेटतील

मी काही बोलली नाही तेवढ्यात माझा सिग्नल सुटला आणि मी निघाले

आता ती रोज सिग्नल वर दिसायला लागली आणि मी तिच्या कडून रोज काही ना काही विकत घायची. असे बरेच दिवस गेले

एके दिवशी मी रोहित सोबत डिस्कशन केलं आणि ठरवलं कि तिला घरकामासाठी बोलवावं. असे सिग्नलवर भर उन्हात, पावसात दिवसभर बाळाला घेऊन उभी असते आणि त्यात तिला काही मिळत नाही. त्या पेक्षा घरात मला मदत म्हणून येईन आणि महिन्याचे १०००-१५०० रुपये तरी मिळतील तिला. असा विचार करून मी ऑफिस ला जायला निघाले. आज सिग्नल वर जाऊन तिला भेटणारच होते, पण आज ती कुठे दिसली नाही. असे १५ दिवस गेले. पण ती काही दिसली नाही माझा रोज हिरमोड होयचा.. एके दिवशी दुसरी बाई तिच्या बाळाला घेऊन सिग्नल वर उभी होती आणि भीक मागत होती मी तिला बोलावून पैसे दिले आणि तिने ते घेतले आणि तिला विचारले ,

“ह्या बाळाची आई कुठे आहे ?”

ती बाई : ” आवं तिला गाडीने ठोकर दिली आणि त्यात ती मेली. नशीब त्या दिवशी हे पोरं नव्हतं तिच्यासोबत “

मला हे ऐकून धस्स सं वाटलं आणि मी तिथून निघून गेली. रोज ते बाळ त्या बाईकडे दिसायचं मला. ती बाई त्याला रोज मारायची. ती रोज माझ्या कडे यायची तिला माहित होतं कि हि बाई रोज काही ना काही पैसे देते. खरंतर मला भीक मागण्याऱ्यांची फार चीड येते. भीक मागण्यापेक्षा स्वतः काम करून ४ पैसे का नाही कमावत हे लोकं?

पण काय कुणास ठाऊक त्या बाळा बद्दल मनात एक आपुलकी निर्माण झाली होती. बिचारं आईविना पोरकं झालं होतं. अन का कुणास ठाऊक तेही मला चांगलंच ओळखायला लागला होतं. माझ्या कडे येताच केवीलवाण्याने मला बघायचं जसं काही त्याला काही सांगायचं आहे मला.

एक दिवस ते बाळही दिसायचं बंद झालं. त्या बाईला विचारल्यावर कळालं की तेही गेलं होतं त्याच्या आई जवळ. ऐकून काळजाचे ठोके वाजत होते.

आणि स्वतःवरच चीड येत होती मला की, मी का नाही काही करू शकले त्याच्यासाठी. बिचारं माझ्याकडे ते रोज मदतीच्या अपेक्षेने बघायचं पण मी काहीच नाही करू शकले. ते बाळ गेलं आणि त्या बाईला भीक देणंही मी बंद केलं.

क्रमशः


बोध : कुणीही अडचणीत असेल तर त्याला त्वरित मदत केली पाहिजे आणि काही गोष्टी मनात नं ठेवता लगेच समोरच्याला सांगायला हव्यात.

काय माहित जर मी पहिल्याच दिवशी जेव्हा तिच्यासोबत संभाषण केलं होतं, तेव्हाच जर तिचा प्रामाणिकपणा बघून तिला घरकामासाठी बोलावलं असतं तर आज ती आणि तिचं बाळ जिवंत असतं.

==================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *