Ritbhatmarathi

Search
Close this search box.

माधवीने आज खास पावभाजीचा बेत आखला होता….मस्त संपूर्ण स्वयंपाकघरात घमघमाट सुटला होता…पुष्पकाकू बडबड करतच घरात आल्या…सुनबाईंचा बेत पाहून पुष्पाताईंना कौतुक वाटलंच नाही…उलट आठवला तो आपला स्वतःचा भूतकाळ आणि आपल्या सुनेला म्हणजे माधवीला म्हणाल्या….

पुष्पाताई – बाई गं बाई….तुमचं बरं आहे हा…चार भाज्या उकडल्या ना…त्याला फोडणी दिली कि झालं..आमच्या वेळी असं नव्हतं…पाटा वरवंट्यावर वाटून-घाटून भाजी करावी लागायची…काय गं माधवी…पाणी भरलं आहे का आज ?

माधवी    – हा…ते भरून ठेवलंय केव्हाच…!

पुष्पाताई – तुमचं बरं आहे हा…हांडे आणि कळशा घेऊन नाही जावं लागत…विशेष म्हणजे विहिरी कुठायत आत्ता…रहाटाने पाणी काढायला…आमची तर कंबर्डी मोडलीत हा…पाणी शेंदता-शेंदता…हम्म…थोडंसं साजूक तूप घाल पावभाजी वरून…चव लागते त्याची…आमच्या वेळी तर तूपही काढायला मोठा डेरा होता आणि त्याला रवी बांधलेलं असायचं…त्याला दोरी असायची आणि घुसळावे लागायचे खूप…हात दुखून यायचे हो…

माधवी कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर न करता गप्प राहून ऐकून घेत होती…कारण लग्नाला जवळ-जवळ ५ वर्ष झाली होती…तरी पुष्पाताई बोलण्याची एकही संधी सोडत नव्हत्या…पदरी नातवंडेही झालेली तरीही त्या माधवीला बोलत असे..छोटी केतकी एक दिवस आपल्या आजीला म्हणाली…

केतकी   – आजू…मम्माला…का तू एवढं बोलतेस…मम्मा टीचर आहे माहिती आहे ना तुला…

पुष्पाताई – बाई…बाई…काय गं कार्टे…आईला बोललेलं नाही सहन होत…आम्हीही नातवंडे होतो कुणाचीतरी..पण हा असा अगोचरपणा नाही हो केला कधी…बरोबर आहे आईनेच शिकवलं असणार…उलट कसं बोलायचं ते…

माधवी    – आई…मी का शिकवू तिला…एक तर सगळं आवरता-आवरता त्रेधातिरपिट होते माझी…पण मी एका शब्दाने तुम्हाला काम करण्यावरून बोलत नाही…

पुष्पाताई  –  मुलांना शिकवण हा तुझा पेशा आहे म्हणून म्हटलं…माझं लेकरू मर-मर करतंय त्याचं नाही काही एवढं…जरासं बोललं कि कशा मिरच्या झोंबतात नाकाला….आम्ही असा अगोचरपणा केला असता तर धाडून दिल असत माझ्या नवऱ्याने…तुझा तोरा खूप सहन केलाय आम्ही…आता नाही सहन होत…असशील शिक्षिका तर शाळेत…इथं नको तुझं ज्ञान पाजळु…इथं आम्ही नाही ऐकून घेणार तुझं…हे सगळं ऐकायच्या आधी देवाने उचललं का नाही मला….दारात कोहळा लावून काहीच फायदा नाही…नजरच लागलीय माझ्या पोराच्या संसाराला…

माधवी     – आई…कुठला विषय कुठे नेताय तुम्ही…माझंच चुकलं …जाऊ देत अमोघ येतोय आता ऑफिस मधून..चहा ठेवायचं त्यांच्यासाठी…

पुष्पाताई  – हम्म…घ्या नाव घ्या आता नवऱ्याचं…आमची तर हिम्मत होत नव्हती नवऱ्याचं नाव घ्यायची…

माधवी आपलं काम करायला निघून जाते…परिस्थिती हाताळण्याच कसब कसं बायकांना चांगलंच अवगत असत म्हणून माधवी संध्यकाळचा दिवा लावायला म्हणून देवघरात जाते आपला रोजचा दिनक्रम म्हणजे रामरक्षा आटोपून हळदी-कुंकू तुळशीला लावायला जाते आणि आपल्या सासूबाईंच्या पाया पडते…पुष्पाताईही आपली जपमाळ ओढत सोफ्यावर बसतात…अमोघ जिना चढून येतंच असतो….दारात आल्या-आल्या अमोघच्या अंगावर दारावर लटकलेल्या कोहाळ्याचा रस पडतो तशी अमोघची चीड-चीड होते…घरात पाय नि दारात पाय अमोघची बडबड सुरु होते…

अमोघ   – काय हे….माधवी…हे दारात लटकवून ठेऊ नकोस म्हणून कितीदा बजावलं तुला…सगळा ऑफिसचा शर्ट खराब झाला माझा…

माधवी   – अमोघ…अहो…कोहळा मीच लटकवलंय तेही आईंच्या सांगण्यावरून…

अमोघ   – आई…काय हे…थोतांड असतात ही सगळी…कुणाच्या सांगण्यावरून काहीही नको लटकावत जाऊस घरात…आता उद्या कुठला शर्ट घालू मी…

माधवी   – अमोघ चिडू नकोस…मी दुसरा शर्ट प्रेस करून ठेवलाय…आधी आत तर येशील शांत हो…

अमोघ ची चीड-चीड कमी झाली…घरात येऊन फ्रेश होऊन अमोघ येतो…चहाचा कप माधवी आणून देते…पुष्पाताई अमोघकडे रोखून पाहतात आणि म्हणतात…

पुष्पाताई – अमोघ…मी आपली तुमचा संसार सुरळीत चालावा म्हणून सुचवते हो…चांगलं पांग फेडलंस…  बायकोसमोर बोललास…काय किंमत ठेवेल आता ती माझी…

अमोघ   – प्रश्न…कोहळा लटकावलास त्याचा आहे…माझ्या आजीला म्हणजे तुझ्या सासूबाईंनाही मी पाहिलंय …त्यांनीच तर मला सांभाळलंय त्याना हे असं काही लटकावताना मी कधीच पाहिलं नाहीय…निदान तिची ही गोष्ट तरी तू शिकायला हवी होतीस…पण तू तर नेहमी आजीला घालून पाडून बोलायचीस…आपलं म्हणणं खरं करायचीस…

पुष्पाताई  – जरा…हळू बोल ऐकेल ती आतून…

अमोघ    – ती म्हणजे कोण…अगं नाव आहे तिला…माधवीचं ना…?

पुष्पाताई  – हो..तीच ती..

अमोघ    – आई माधवीला मी चांगलंच ओळखतो…ती तुला प्रत्युत्तर नक्कीच करत नसेल आणि बोलली तरी लगेच विसरून जात असेल तरीही …तिलाही तू वाट्टेल ते बोलतेस…

पुष्पाताई – नक्कीच तिनेच चहाडी केली असणार माझी…

अमोघ   – मला सगळं…केतकीने फोन करून सांगितलंय…माधवीने नाही…

माधवी ने सगळं ऐकलं होत…अमोघने आपली बाजू घेतली म्हणून मनोमनी सुखावली होती माधवी…सगळेजण थोड्यावेळाने जेवायला बसले…माधवीने सगळ्यांना ताटं वाढली…अमोघ आपल्या आईला म्हणाला…

अमोघ   – आई….जरा तू तुझे मागचे काही दिवस आठव…आजी तुला खूप समजावून सांगायची…बाहेर एखादं काम बघ…बाहेर काम नाही जमलं म्हणून तुला घरात तुझ्या आवडीचं काम करायला प्रोत्साहन द्यायची…आई तुला  आठवतंय…ते तुझ्या हातच कांद्याचं लोणचं फार आवडायचं आजीला…त्याचा व्यवसाय कर म्हणून तुला सुचवलं तिनं पण तू तुझं सगळं आयुष्य माझ्या संगोपनात घालवलं…आजीच्या मताला सहमती नाही दर्शवली..

पुष्पाताई – अमोघ…तुला काही कमी पडू दिल का मी…तुझे सारे लाड-कोड पुरवले मी…तरी तू मलाच बोल…

अमोघ    – अगं… आई त्याचा आदरच करतो मी…तू तुझी तुलना माधवीशी करू नकोस…तुमचा काळ वेगळा होता…आत्ताचा काळ वेगळा आहे तिच्यासमोर नवी आव्हान आहेत…घरातलं सगळं ती एकटी करते…तरीही तू तिरसटसारखं बोलतेस तिच्याशी…ती एकही शब्द उलटून बोलत नाही…आता इथे तुझी आणि आजीची गोष्ट सांगावीशी वाटते….तू तर आजीचं कधीच ऐकलं नाहीस..तिला घरकाम करणारी सून नको होती…घरकामाबरोबर काहीतरी आपली ओळख निर्माण करणारी धडाडीची पाहिजे होती…पण तू ऐकलं नाही तीच…तू तर नशीबवान  म्हणायला हवीस…नोकरी करून घरकाम पेलणारी जिद्दी सून तुला मिळाली…

पुष्पाताई मात्र शांतपणे ऐकत होत्या…कालपर्यंत आपली नात केतकी सांगत होती पण आता आपलाच मुलगा सांगतोय म्हणून मनातून खजील झाल्या होत्या…मात्र इकडे माधवी खूपच खुश होती…सासूबाईंना आपला नवरा ओरडला म्हणून नाही तर आपली बाजू सांभाळून घेतली म्हणून.. 

इतक्या वर्षांत असं पहिल्यांदा झालं असेल पण माधवीने कधी सासूबाईंचं बोलणं मनावर नाही घेतलं आणि नाही कधी अमोघाकडे तगादा किंवा तक्रार केली होती. सगळ्यांची जेवण उरकल्यावर माधवी आपला सगळा पसारा आवरून झोपायला जाते…कधी नव्हे ती शांत झोप माधवीला लागली कारण इतक्या दिवसांनी….अमोघने आपल्या बायकोची बाजू सांभाळली… 

पुष्पताईही हळू हळू शांतच होऊ लागल्या. कारण अमोघनेही तसं बजावून सांगितलं होतं कि “आमच्या वेळेला असं नव्हतं आणि तसं नव्हतं….ह्याचा पाढा आता बंद करायचा….घरातल्या केर  कचऱ्यापासून ते स्वयंपाकापर्यंत सून सगळं करते ना….मग कामं करायच्या पद्धती पण तिच्या सोयीने होयला पाहिजे….आणि जर तुला नसेल पटत तिच्या हातचं तर तू तुझ्या पद्धतीने करत जा….माधवी कधी नाही म्हणाली आहे का तुला? आणि जर ती तुला तुझ्या पद्धतीने स्वयंपाक करायला नको म्हणत असेल तर सांग मला तसं मी चांगला जाब विचारतो तिला….पण आता आई नको ती रोज रोजची कटकट…घरात पाय नाही कि रोज सुरु होतात ह्या कटकटी….एक दिवस मीही जाईल बाबांसारखाच हार्ट अटॅक येऊन…. “ 

पुष्पाताई – “अमोघ अरे नको रे असं भलतं सलत बोलू….अरे माधवीलाही आपल्या पद्धती माहित व्हायला पाहिजे म्हणून मी बोलत असते ”  

अमोघ – “आई तिला सगळं माहित आहे….सगळे सणवार ती एकटी चोख आपल्या पद्धतीने करते…पण स्वयंपाक म्हणा किंवा कुठलं काम हे जो तो त्याच्या सोयीने करतो….त्यामुळे त्यात कुणी नाक खुपसलेलं मला तरी नाही आवडत…मला सुद्धा ऑफिसमध्ये माझ्या कामात कुणीही नाक खुपसलेलं आवडत नाही..खूप चिडचिड होते….तू विचार कर उठून सुटहून तू माधवीला ह्या एका गोष्टीवरून बोलत असते तिला किती नको नको वाटत असेन” 

घरात पोरापासून एवुल्या नातीपर्यंत सगळेच विरोध करतात म्हंटल्यावर पुष्पाताईनी ही स्वतःला वेळ दिला आणि माधवीच्या मागे लागणं बंद केलं. 

सकाळी लवकर उठून स्वयंपाक, अमोघचा डबा, केतकीचा डबा करून देवघरात पूजा असा माधवीचा रोजचा नित्यक्रम ठरलेला असायचा. एक दिवस देवघरात माधवी तालासुरात संत तुकारामांचा अभंग म्हणत असते…” 

बोले तैसा चाले I  त्याची वंदीन पाऊले II

अंगे झाडीन अंगण I त्याचे दास्यत्त्व करीन II 

त्याचा होईन किंकर I उभा ठाकेन जोडोनि कर II

तुका म्हणे देव I त्याचे चरणी माझा भाव II            

कधी नव्हे पुष्पाताई आणि माधवी दोघी देवघरात एकत्र बसल्या होत्या…

पुष्पाताई – “आमच्या वेळी…. “ 

तेढ्यात अमोघ मागून आईचं बोलणं मधेच तोडतो, “आमच्या वेळी काय आई??” 

पुष्पाताई – “अरे तू बोलून देशील तर बोलेन ना….मी बोलत होते कि, ‘आमच्या वेळी अगदी असंच होयचं हो..’ “ 

आईंचं बोलणं ऐकून माधवी आणि अमोघ दोघेही एकमेकांकडे पाहून डोळे मिचकावतात आणि मिश्कीलपणे हसतात. पुष्पाताई मात्र तुकारामांच्या अभंगामध्ये पुरत्या गुंग असतात.

=====================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories