Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आपलाच रंग

©सोनाली ताम्हणे

“सांग ना रे बाळा, आवडली तुला खीर?”

” हो आई, खूप आवडली”

” पण नेहमी सारखा जेवला नाहीस तू”

” दमलोय ग जरा..”

” मग पड तू जरा.. मी येते बाबांना गोळी देऊन..”

“नको ग आई बस ना जरा, किती महिन्यांनी भेटतोय आपण”

” हो, रे , तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. फोन वर कधी तुझा मेसेज वाजतो असं वाटायचं. आल्यावरही तुझ्या भोवती पडलेला तो कौतुकाचा गराडा, सत्कार, हार , तुरे, गाड्यांची वर्दळ, मुलाखती… कधी एकदा तुला भेटते असं झालं होतं”

“मलाही तुमची सर्वांची आठवण यायची ग..पण पूर्ण लक्ष खेळावर केंद्रित करणं भाग होतं. दिवसरात्र फक्त एकच विचार असायचा डोक्यात ,मला जिंकायचं आहे, माझ्या साठी, आपल्या साठी आणि देशासाठी”

” आणि तू ते करून दाखवलस..”

” …………..”

” बाळा , एक विचारू?”

“बोल ना आई”

“आल्या पासून बघतेय, इतिहास लिहिल्या जावा इतका मोठा विजय तू मिळवलास, ..पण म्हणावा तसा आनंद दिसत नाहीये तुझ्या चेहऱ्यावर… सारखा कसलातरी विचार करत असतोस… कुणी मुलगी बिलगी आवडली असेल तर सांगून टाक ..”

“असं काही नाहीये ग आई… आणि असलं तर तुलाच सांगेन आधी”

” मग काय झालंय.. काहीतरी सलतंय तुझ्या मनात… मगाशी पण पाहिलं मी तुला..हातातला फोन सोफ्यावर आपटलास तू..”

“आई सोशल मीडिया पाहिलंस? एकीकडे कौतुकाचा वर्षाव तर दुसरीकडे हीन पातळीचं राजकारण..”

“नको इतकं मनाला लावून घेऊ रे…तुझ्या डोळ्यातलं पाणी नाही बघू शकत मी बाळा!”

” आई असं वाटतं एकीकडे अमृत तर त्याच पेल्यात विष पितोय आपण…..तुला आठवतंय? या खेळात उतरायचं ठरवल्यावर पैशाचा प्रश्न आला, तेव्हा मी आणि बाबांनी किती लोकांचे उंबरठे झिजवले?…जवळपास सगळ्या पक्षांच्या नेत्यांकडे जाऊन आलो, प्रत्येकाने हात वर केले… कुणीही विश्वास दाखवला नाही माझ्यावर..”

” शांत हो..आधी शांत हो बघू… बरोबर आहे तुझं म्हणणं , पण तू स्वतः ला सिद्ध केलंस ना? मग झालं तर , आता कशाला त्याचा विचार करतोस? “

” तुला माहितेय? कुणीतरी म्हणालं हा आमच्या जातीचा.. आपण नात्यात, समाज मंडळात किती मदतीचा टाहो फोडला.. कुणीही पुढे आलं नाही…”

” आठवतं ना, चांगलंच आठवतंय… मदत तर दूरच पण खेळाचं खूळ डोक्यातून काढा आणि पोराला नोकरी धंद्याला लावा, चार पैसे कमवेल असे सल्लेही मिळाले..”

” तो तिरंगा फडकवताना अंगावर किती रोमांच उठले, कसं सांगू! वाटलं सार्थक झालं ..याचसाठी जगात होतो आपण.. वाटलं संपले आता परिश्रम, हे सुवर्णपदक माझ्या देशाला दिलेला सर्वात सुंदर नजराणा असेल माझ्याकडून… पण आता असं वाटतं , उगाच वाचल्या सोशल मीडिया वरच्या कंमेंट्स… खेळ राहिला बाजूला अन राजकारण सुरू झालं फक्त… कोणत्याही घटनेला राजकीय रंग चढवायचा हे एकमेव काम शिल्लक राहिलंय आता “

” खरंय तुझं…राजकारण मर्यादेतच ठीक असतं… एकदा ते सगळीकडे शिरलं की खेळ असो वा नातेसंबंध, सगळीकडे आपलाच रंग दाखवू लागतं….”

©सोनाली ताम्हणे