Ritbhatmarathi

Search
Close this search box.

माईसाहेब भोसले म्हणजे अहमदनगर मधील एक धारदास्त व्यक्तिमत्व. जेवढा त्यांचा तोरा तेवढ्याच त्या कडक स्वभावाच्या होत्या. त्यांच्यासमोर बोलायची कुणाची हिम्मत नाही होयची. २ मुले आणि हे दोघे असं चौकोनी कुटुंब. दोन्ही मुलं जेमतेम ग्राज्वेट झालेली होती. घरात कपड्यांचा कारखाना असल्याने माईसाहेबांनीही मुलांना बाहेर शिक्षणासाठी कधी पाठवलं नाही. माईसाहेबांचं ठाम मत होतं कि घरातच एवढा मोठा राहडा असताना मुलांना बाहेर जाऊन नोकरी करण्याची काही गरज नाही. मुलं शिकायला हुशार होती पण माईसाहेबापुढे कुणाचं चालतंय का?

बस्स मग पदवी नंतर दोन्ही मुलांनी कपड्यांचा बिसिनेस मध्ये हातभार लावायला सुरुवात केली. मोठा मुलगा सुमित लग्नाला आला होता त्यामुळे माईसाहेबांनी त्याच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. मुलांच्या लग्नाबाबतही माईसाहेबांची अपेक्षा एवढीच होती कि मुली श्रीमंत घरच्या नसतील तरी चालेल पण घरंदाज व संस्कारी पाहिजे. कुठंतरी त्यांच्या मनात भीती होती कि श्रीमंत घरातल्या मुली आणल्या कि फार उडतील. गरीब घरची पोर त्यांच्यापुढे कधी जाणार नाही आणि त्यांना दाबून ठेवता येईल. थोडक्यात म्हणजे माईसाहेबांचा दबदबा पोरांच्या लग्नानंतरही तसाच राहिला पाहिजे.

माईसाहेबांनी सुमित साठी १५-२० पोरी पहिल्या पण त्यांच्या मनात कुठली मुलगी भरली नाही. शेवटी जवळच भाळवणीतल्या झावरे कुटुंबातल्या तेजस्वीचं स्थळ माईसाहेबांच्या ओळखीतल्या कुणीतरी सुचवले. ठरल्याप्रमाणे माईसाहेब मुलीला पाहायला गेल्या.

तेजस्वी नावाप्रमाणेच होती. चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज….उजळता गोरा रंग….चवळीच्या शेंगेप्रमाणे सडपातळ….शेंड्यासारखे सरळ नाक….पाणीदार मोठे डोळे.. जोवर माईसाहेब होत्या तोवर तेजस्वीने डोक्यावरचा पदर खाली पडू नव्हता दिला आणि एकदाही वर नजर फिरली असेल तर सांगा. माईसाहेबांना पूर्णपणे विश्वास पटल्यानंतर कि हि मुलगी कधीही आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही , लगेच लग्नाला होकार दिला. सुमीत म्हणा किंवा भोसले काका माईसाहेबांच्या शब्दाबाहेर नसल्याने त्यांनीही लग्नाला होकार दिला. लग्न जमल्यावर यंदाच्या दिवाळीनंतर लगेच तेजस्वी सुमितच्या लग्नाचा बार उडवून दिला.

ग्नानंतर तेजस्वीही खुश होती. रोज सकाळी पहाटे उठून सडा रांगोळी करणं, रोजची देवपूजा, संध्याकाळची आरती… दिवा बत्ती….एकंदर धार्मिक घरातली असल्याने तिला देवाचं करायला आवडायचं. देव देव करण्यासोबतच घराचाही कारभार तेजस्वीने अगदी जबाबदारीने उचलला होता. सगळ्यांना काय हवं नको पाहणं….माईसाहेबांना गुढगेदुखीचा त्रास असल्याने माईसाहेबांचे पाय चोळून देणं….भोसले काकांच्या औषधांच्या वेळा सांभाळणं….दिराची काळजी असं सगळं तेजस्वी कुठलीही कुणकूण न करता अगदी जबाबदारीने बघायची.  माईसाहेबांनाही हेच हवं होतं कि सुनेने कुठलाही जबाब न देता मुकाट्याने सगळ्यांचं करायला हवं. माईसाहेब तेजस्वी समोर कधी तिची तारीफ जरी नसतील करत तरी भोसले काकांना नेहमी म्हणत कि १५-२० पोरी बघितल्यावर हा हिरा सापडला. बस्स  अमितलाही अशीच मुलगी मिळू दे म्हणजे घर गोकुळासारखं भरेल. असंच वर्ष निघून गेलं. एक वर्ष कुणी बाळाचा विषय काढला नाही. पण जसं सुमित तेजस्वीच्या लग्नाला १ वर्ष झालं तसं सगळ्यांचा बाळासाठी रपाटा सुरु झाला.

लग्नाला एक वर्ष होता होताच सुमित तेजस्वीला कळलं कि तेजस्वी आई होणार आहे. घरात बाळाच्या चाहुलीने सगळेच खुश होते. पण तो आनंद जास्त दिवस टिकला नाही….डॉक्टरांनी चाचणी केल्यास तेजस्वीची एक्टोपिक प्रेग्नेंसी असल्याचं समजलं. त्यामुळे प्रेग्नन्सी टर्मिनेट करावी लागली. पाहिलंच बाळ होतं त्यामुळे असं झाल्याने सगळ्यांना फार दुःख झालं होत. माईसाहेब कडक जरी असल्या तरी आतून मृदू होत्या त्यामुळे त्यांनी तेजस्वीला समजावून सांगितलं आणि तिची काही दिवस तशी काळजीही घेतली.

काही महिन्यांनी तेजस्वीला पुन्हा दिवस गेले. पण ह्यावेळेसही डॉक्टरांनी एक्टोपिक प्रेग्नेंसी असल्याचं सांगितलं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार एखाद्या स्त्रीला जर आधी एक्टोपिक प्रेग्नेंसी होऊन गेली असेल तर तिला पुन्हा ह्याला सामना करावा लागतोलागू शकतो. दुसऱ्यांदा एक्टोपिक प्रेग्नेंसी राहण्याचे १०% चान्सेस असतात आणि दुर्देवाने तेजस्वी त्या १०% स्त्रियांमध्ये मोडत होती. दुर्देवाने एक्टोपिक प्रेग्नेंसीला टर्मिनेट करावंच लागत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निदान ६ महिने सुमित तेजस्वीने वाट बघावी आणि मग पुढचा चान्स घ्यावा असं ठरलं. माईसाहेबांनी ह्यावेळी देखील तेजस्विनी काळजी घेतली. तेजस्वी सुद्धा मन रमावं म्हणून देव देव करायची. उपास तापास करायची. पुढच्या ८ महिन्यातच पुन्हा एकदा तेजस्विनी पुन्हा एकदा गोड बातमी आली.. ह्या वेळी नॉर्मल प्रेग्नेंसी होती तिची…..त्यामुळे घरात सगळेच आनंदी होते….

हिले ३ महिने व्यवस्थित गेले पण चौथा महिना सुरु होताच एक दिवस अचानक तेजस्वीला रक्तस्राव होऊ लागला. म्हणून सुमित तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेला. पण दुर्देवाने ह्या वेळी सुद्धा तेजस्वीचं गर्भपात झाला होता. ह्यावेळी तर तेजस्वीचा बांध कोसळला होता. तिला दुःख अनावर झालं होतं. आणि ह्यात भर म्हणजे माईसाहेब सुद्धा तेजस्वीचा राग राग करू लागल्या होत्या. एक दिवस रात्री तेजस्वी आपल्या खोलीत आराम करत होती तर सुमित, माईसाहेब आणि भोसले काका बाहेर दिवाणखान्यात गप्पा मारत होते.

माईसाहेब चिडूनच बोलल्या – “सुमितचं दुसरं लग्न लावून देऊ या आपण “

माईसाहेबांचं बोलणं ऐकून सुमित आणि भोसले काका शॉक झाले….

भोसले काका – “काय!!!!! आता हे काय नवं खूळ बसलंय तुमच्या डोक्यात “

माईसाहेब – “हो जे बोलतेय ते खरंच बोलतेय आणि घराच्या भल्यासाठीच बोलतेय….तेजस्वीला एक बाळ पोटात वाढवता येत नाहीये….लग्नाला ३ वर्षे झाली..आणि मागच्या २ वर्षांत ३ वेळा गर्भपात झाला….बाहेरची लोकं शेण घालायला लागली आता….”

सुमित – “आई ह्यात तिची काय गं चूक….ती काय मुद्दाम करतेय का….तिलाही बाळ हवंय….तिची अवस्था बघ.. ३ वेळा गर्भपात झाल्यामुळे खंगून गेली आहे”

भोसले काका – “हो मग काय….बिचारी पोर ह्या घरासाठी दिवसरात्र राबते आहे आणि तू सुमितच्या दुसऱ्या लग्नाचा विषय तरी कसा करू शकते….”

माईसाहेब – “बस्स….खूप बोललात तुम्ही दोघेही….माझा निर्णय अंतिम निर्णय असतो माहित आहे ना तुम्हाला….आणि सुमित ह्या आधी माझ्यासमोर तोंड वासून बोलायची हिम्मत नाही होयची तुझी आणि तू आता आपल्या बायकोची बाजू घेऊन बोलतोय….  ६ महिने आहेत तेजस्वीकडे…. ६ महिन्यात गोड बातमी दिली तर ठीक नाहीतर मी दुसरं लग्न लावून देणार….”

माईसाहेबांपुढं कोण काय बोलणार..जे ते आपल्या खोलीत गेले…पण खोलीतून तेजस्वीने सगळं ऐकलं होतं..माईसाहेबांचा निर्णय ऐकून तेजस्वीला धक्काच बसला…आणि तिच्या अश्रूंचा बांध कोसळला..

सुमितने खोलीत येऊन पाहिलं तर तेजस्वी उशीत डोकं घालून ढसा ढसा रडत होती.

सुमित – “काय झालं तेजस्वी”

तेजस्वी – “तुम्ही दुसरं लग्न करणार? मला पण आई होयचं आहे पण माझे गर्भपात होतायेत त्यात माझी काय हो चुकी..उद्या तुम्ही दुसरं लग्न केल्यावर मी गरिबा घरची लेक कुठे जायचं हो मी….आणि माझ्या घरी किती गरीब परिस्थिती आहे हो तुम्हाला माहित आहे न….मला ह्या अवस्थेत बघून माझे गरीब आई बाप जिवंतपणीच मरतील”

सुमित – “अगं शांत हो..आईने ६ महिने दिले आहेत ना…करू काहीतरी”

तेजस्वी – “म्हणजे ६ महिन्यात मी पुन्हा गरोदर नाही राहिले तर तुम्ही दुसरं लग्न करणार?????”

सुमित गप्प बसला आणि त्यानेही विषय टाळला

सुमित – “बरं तेजस्वी झोप आता..उशीर झाला आहे खूप”

असं म्हणून सुमितने खोलीतली लाईट बंद केली सुमितने खोलीत अंधार केला पण तेजस्वीला झोप काही लागेना…तिच्या डोळ्यासमोर तिला तिचं भविष्य अंधारात दिसत होतं.

तेजस्वी मनातल्या मनातच देवाकडे साकडं घालत होती आणि रडत होती… “देवा एवढं केलं मी तुझ्यासाठीही आणि घरच्यांसाठीही….कधीही कुणाला उलटं बोलली नाही..सगळं हसतमुखाने केलं पण तू कुठल्या पापाची शिक्षा देतोय”

त्यारात्री तेजस्वीला झोप काही लागली नाही…आणि ती रात्रभर ढसा ढसा रडत होती….झोप तर काही लागेना म्हणून तिने मोबाईल चालू केला आणि मनाला शांती मिळावी म्हणून तिने देवाची गाणी ऐकावी म्हणून युट्युब चालू केलं…. तर त्यात एका व्हिडिओचं नोटिफिकेशन तिने पाहिलं….”स्वामी समर्थ ११ गुरुवार अनुष्ठान कसं करावं”

सहजच म्हणून तिने तो विडिओ चालू केला आणि त्यात दिलेली माहिती ऐकून तिला एक वेगळंच समाधान मिळालं. मनातल्या मनात ती सुखावली होती आणि कुठेतरी एक नवीन उमेद तिला मिळाली.

दुसऱ्याच दिवशी ती सगळी कामं आटोपून जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये नारळ आणि खडीसाखर घेऊन गेली….

तेजस्वी केंद्रात स्वामी समर्थांच्या फोटोपुढे माथा टेकवत – “श्री स्वामी समर्थ….हे नारळ आणि खडीसाखर तुमच्या चरणी घालून तुम्हाला साकडं घालतेय कि माझ्या आयुष्यातली फार मोठी समस्या मी ह्या नारळ खडीसाखराप्रमाणेच तुमच्या चरणी सोपवत आहे..कृपया मला ह्या समस्येतून तुम्हीच बाहेर काढा…. “

त्या दिवसापासून तेजस्वीच्या मनात एक वेगळीच उत्स्फूर्तता होती जणू स्वामी समर्थ तिची शेवटची आस होते आणि तिला ते ह्यातून नक्की बाहेर काढतील. लगेच येणाऱ्या गुरुवार पासून तेजस्वीने ११ गुरुवार करायला सुरुवात केली. प्रत्येक गुरुवारी तिला स्वामींची जेवढी सेवा करता येईल तेवढी ती करायची….स्वामींच्या नावाचे ११ माळी जप..स्वामी चरित्र सारामृत वाचन…. ११ वेळा तारक मंत्र..  १ माळ गायत्री मंत्र जप…अशी प्रत्येक गुरुवारी ती स्वामींची मनोभावे सेवा करायची.

११ गुरुवार झाल्यावर तिला अक्कलकोटला जायची ईच्छा होती. त्यासाठी तिने सुमितला तसं सांगितलं..त्यावर सुमितने साफ मना केलं….

सुमित – “ते शक्य नाही तेजस्वी…माईसाहेब पाठवणारच नाही…त्यांना असं वाटेल कि एवढं टेन्शन असताना सुद्धा स्वामी समर्थांच्या नावाखाली फिरायला जातायेत..तरी तुझ्यासाठी मी एकदा त्यांच्याशी बोलून बघतो. “

सुमितने दुसऱ्याच दिवशी माईसाहेबांजवळ अक्कलकोटला जायचा विषय काढला….पण माईसाहेब कुठे ऐकणार होत्या..त्यांनी एक काही ऐकलं नाही..

उलट सुमीतलाच लक्षात आणून दिलं कि तेजस्वीजवळ ३ महिनेच राहिले आहेत….

त्याच आठवड्यात माईसाहेबांना एका शुभचिंतकाकडून कळलं कि सांगोळ्याला खूप प्रसिद्ध डॉक्टर आहे..त्याच्याकडे गर्भपाताचे…दिवस राहण्यासाठी उपचार होतात आणि म्हणे त्याचा गुण येतोच येतो आणि लांबून लोकं येतात.

तिसऱ्याच दिवशी माईसाहेबांनी गाडी काढली आणि सुमित तेजस्वीला घेऊन सांगोळ्याला निघाल्या…दुपारची जेवणं आटोपून त्यांनी प्रवास सुरु केला….अहमदनगर ते सांगोळा साधारण ७ तास लागतात….पण येळेगाव जवळ आल्यावर अचानक तेजस्वीची तब्येत बिघडायला सुरुवात झाली….सारख्या उलट्या होत होत्या…तेजस्वीला उलट्यांमुळे फार अशक्तपणा आला होता आणि तिला पुढे जाणं शक्य नव्हतं….

गाडीचा ड्राइव्हर – “माईसाहेब येळेगाव जवळ तासाभराने अक्कलकोट येतं..येळेगावात कुठला डॉक्टर भेटेल माहित नाही..ताईसाहेबाना आपण अक्कलकोटला नेऊ या….मग तिथे डॉक्टरला दाखवल्यावर पुढं सांगोळ्याला जाऊ. “

पण अक्कलकोट आल्यावर तेजस्वीच्या उलट्या थांबल्या होत्या….त्यामुळे डॉक्टरांना न दाखवता पुढे सांगोळ्याला जायचं ठरलं….पण अक्कलकोटला गेल्यावर तिथे एक विलक्षण वातावरण होतं…चहूबाजूला स्वामी नामांचा जप चालू होता….तिथे गेल्यावर तेजस्वीने काही म्हणण्याच्या आतच माईसाहेब गाडीतून उतरून स्वामींच्या मंदिरात गेल्या…. तेजस्वीची अक्कलकोटला यायची ईच्छा हि स्वतः स्वामींनी पूर्ण करून घेतली होती….त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला….आणि तिची स्वामींवरची निस्सीम श्रद्धा अजूनच वाढली होती….दर्शन झाल्यावर माईसाहेबाच्या चेहऱ्यावरही एक वेगळंच समाधान झळकत होतं. 

स्वामींचे दर्शन घेतल्यावर सगळेजण पुढे सांगोळ्याला निघाले….पण सांगोल्याच्या जाता जाता रात्र झाली होती त्यामुळे डॉक्टर काही सापडले नाही. त्यामुळे सगळ्यांनी त्या दिवशी रात्री सांगोळ्यालाच मुक्काम करायचं ठरवलं….

दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळेजण डॉक्टरांकडे गेले…. डॉक्टर तेजस्वीला तपासल्यावर म्हणाले….

अभिनंदन….गुड न्यूज आहे…. “

डॉक्टरांचं बोलणं ऐकून सगळ्यांचा विश्वासच बसेना….

डॉक्टर म्हणाले – “अहो तिथेच चेक करून यायचं होतं ना…एवढ्या लांबून तुमची उगाच चक्कर झाली बघा…. “

माईसाहेब – “खरंय डॉक्टर तुमचं..आमची कुठे एवढी डोकी चालणार…हिला वाटेत फार उलट्यांचा त्रास झाला..आम्हाला वाटलं अपचन झालं असेल… पण डॉक्टर तेजस्वी चा ह्या आधी ३ दा गर्भपात झाला आहे…. ह्या वेळी तर असं काही होणार नाही ना….फार भीती बसली आहे मनात…. “

डॉक्टर – “तुम्ही एवढ्या लांबून आलात इथे….आणि ह्या वेळी सगळं नॉर्मल आहे….आणि स्वामींच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होईल तुम्ही काही काळजी करू नका.. “

डॉक्टरांनीही स्वामींचं नाव घेतल्यावर माईसाहेबांचा स्वामींवरचा विश्वास वाढला होता..डोक्टरांचा निरोप घेऊन सगळी मंडळी घराच्या वाटेनं निघाली.

स्वामींच्या कृपेने तेजस्वीला ९ महिने झाले होते…आणि डिलिव्हरीचा दिवस उजाडला…. थोड्याच वेळात मुलगी झाल्याची बातमी आली.

मुलगी झाली ऐकल्यावर माईसाहेबांचा चेहराच उतरला होता….

माईसाहेब सुमितला – “एवढे उपास तापास केले…तरी मुलगीच झाली का….एवढं जीवाचं रान करून काय मिळालं”

माईसाहेबांचं बोलणं ऐकून आता मात्र सुमितचा संताप अनावर झाला होता.

सुमित – “आई फार बोललीस हा तू…आग एवढ्या कठोर परीक्षेनंतर बाळ आलं आहे ह्या जगात…. तेही स्वामी समर्थांनी अवतार घेतलेल्या अन्नपूर्णेच्याच रूपात असंच समज….तुला आमच्या बाळाला स्वीकारायचं नसेल तर मी आताच वेगळा संसार थाटतो..खूप ऐकून घेतलं आई पण आज नाही….काय नाही केलं तेजस्वीने ह्या घरासाठी…घरातून तू तिला बाहेर काढणार आहेस हे माहित असून तिने तुझ्या व बाबांच्या सेवेत तिळमात्र कमी पडू दिली नाही..आणि तू तिला एवढी मोठी शिक्षा देतेस…. “

भोसले काका – “हो बरोबर म्हणतोय सुमित..आणि सुमितसोबत मीही इथून निघून जाणार….मग कुणाला धाकात घेशील गं”

सुमितचा असा रुद्रावतार पहिल्यांदाच माईसाहेबानी पहिला होता . त्यांनाही सुमितचं म्हणणं पटलं आणि दुसऱ्याच क्षणी आपल्या नातीला भेटायला हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तेजस्वीची मुलगीही तिच्या सारखीच तेजस्वी होती….जिचं नाव स्वामीनी ठेवण्यात आलं.

पुढे जाऊन घराच्या शेजारीच असलेली जागा विकत घेऊन माईसाहेबांनी स्वामी समर्थ भक्तांसाठी सेवा केंद्र उभं केलं जिथे दिवसभर “श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ” मंत्राचा जप चालू असतो.

समाप्त.

‘श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. “स्वाः” म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे. “मी” म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, व ईर्ष्या! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. “समर्थ”- समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा.