Ritbhatmarathi

Search
Close this search box.

स्वामी चरित्र सारामृत अध्याय ४ भावार्थसहित

॥ श्री गणेशाय नमः ॥ मुखे कीर्तन करावे । अथवा श्रवणी ऐकावे । षोडशोपचारे पूजावे । स्वामीचरण भक्तीने ॥१॥ न लगे करणे तीर्थाटन । योग्याभ्यास होमहवन । सांडोनिया अवघा शीण । नामस्मरण करावे ॥२॥ स्वामी नामाचा जप करिता । चारी पुरुषार्थ योती हाता । स्वामीचरित्र गात ऐकता । पुनरावृत्ति चुकेल ॥३॥ गताध्यायाचे अंती । अक्कलकोटी आले यति । नृपराया दर्शन देती । स्वेच्छेने राहती तया पुरी ॥४॥ चोळप्पाचा दृढ भाव । घरी राहिले स्वामीराव । हे तयाचे सुकृत पूर्व । नित्य सेवा घडे त्याते ॥५॥ जे केवळ वैकुंठवासी । अष्टसिद्धी ज्यांच्या दासी । नवविधी तत्पर सेवेसी । ते धरिती मानवरुप ॥६॥ चोळप्पा केवळ निर्धन । परी स्वामीकृपा होता पूर्ण । लक्ष्मी होऊनिया आपण । सहज आली तया घरी ॥७॥ कैसी आहे तयाची भक्ती । नित्य पाहती परीक्षा यति । नाना प्रकारे त्रास देती । परी तो कधी न कंटाळे ॥८॥ चोळप्पाची सद़्गुणी कांता । तीही केवळ पतिव्रता । सदोदित तिच्या चित्ता । आनंद स्वामीसेवेचा ॥९॥ स्वामी नाना खेळ खेळती । विचित्र लीला दाखविती । नगरवासी जनांची भक्ती । दिवसेंदिवस दृढ जडली ॥१०॥ स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । देशोदेशी झाली ख्याती । बहुत लोक दर्शना येती । कामना चित्ती धरोनी ॥११॥ कोणी संपत्तीकारणे । कोणी मागते संताने । व्हावी म्हणोनिया लग्ने येती दूर देशाहूनी ॥१२॥ शरीरभोगे कष्टले । संसारतापे तप्त झाले । मायामय पसाऱ्याते फसले । ऐसे आले किती एक ॥१३॥ सर्वांशी कल्पद्रुमासमान । होऊनी कामना करिती पूर्ण । भक्तकाजास्तव अवतीर्ण । मानवरूपे जाहले ॥१४॥ भक्त अंतरी जे जे इच्छिती । ते ते यतिराज पुरविती । दृढ चरणी जयांची भक्ति । त्यासी होती कल्पतरू ॥१५॥ जे का निंदक कुटिल । तया शास्ते केवळे । नास्तिकाप्रती तात्काळ । योग्य शासन करिताती ॥१६॥ महिमा वाढला विशेष । कित्येक करू लागले द्वेष । कोणा एका समयास । वर्तमान घडले पै ॥१७॥ कोणी दोन संन्यासी । आले अक्कलकोटासी । हासोनि म्हणती जनांसी । ढोंगियाच्या नादी लागला ॥१८॥ हा स्वामी नव्हे ढोंगी । जो नाना भोग भोगी । साधू लक्षणे याचे अंगी । कोणते ही वसतसे ॥१९॥ काय तुम्हा वेड लागले । वंदिता ढोंग्याची पाऊले । यात स्वार्थ ना परमार्थ मिळे । फसला तुम्ही अवघेही ॥२०॥ ऐसे तयांनी निंदिले । समर्थांनी अंतरी जाणिले । जेव्हा ते भेटीसी आले । तेव्हा केले नवल एक ॥२१॥ पहावया आले लक्षण । समर्थ समजले ती खूण । ज्या घरी बैसले तेथोन । उठोनिया चालिले ॥२२॥ एका भक्ताचिया घरी । पातली समर्थांची स्वारी । तेही दोघे अविचारी । होते बरोबरी संन्यासी ॥२३॥ तेथे या तिन्ही मूर्ती । बैसविल्या भक्ते पाटावरती । श्रीस्वामी आपुले चित्ती । चमत्कार म्हणती करू आता ॥२४॥ दर्शनेच्छू जन असंख्यात । पातले तेथे क्षणार्धात । समाज दाटला बहुत । एकच गर्दी जाहली ॥२५॥ दर्शन घेऊन चरणांचे । मंगल नांव गर्जतीवाचे । हेतू पुरवावे मनीचे । म्हणोनिया विनविती ॥२६॥ कोणी द्रव्य पुढे ठेविती । कोणी फळे समर्पिती । नाना वस्तू अर्पण करिती । नाही मिती तयांचे ॥२७॥ कोणी नवसाते करिती । कोणी आणोनिया देती । कोणी काही संकल्प करिती । चरण पूजिती आनंदे ॥२८॥ संन्यासी कौतुक पाहती । मनामाजी आश्चर्य करिती । क्षण एक तटस्थ होती । वैरभाव विसरोनी ॥२९॥ क्षण एक घडता सत्संगती । तत्काळ पालटे की कुमति । म्हणोनी कवि वर्णिताती । संतमहिमा विशेष ॥३०॥ स्वामीपुढे जे जे पदार्थ । पडले होते असंख्यात । ते निजहस्ते समर्थ । संन्याशांपुढे लोटिती ॥३१॥ पाणी सुटले त्यांच्या मुखासी । म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी । आजसारा दिवस उपवासी । जीव आमुचा कळवळला ॥३२॥ मोडली जनांची गर्दी । तो येवोनी सेवेकरी । संन्याशांपुढल्या नानापरी । वस्तू नेऊ लागले ॥३३॥ तेव्हा एक क्षणार्धात । द्रव्यादिक सारे नेत । संन्यासी मनी झुरत । व्याकुळ होत भुकेने ॥३४॥ समर्थांनी त्या दिवशी । स्पर्श न केला अन्नोदकासी । सूर्य जाता अस्ताचलासी । तेथोनिया उठले ॥३५॥ दोघे संन्यासी त्या दिवशी । राहिले केवळ उपवासी । रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे ॥३६॥ जे पातले करू छळणा । त्यांची जाहली विटंबना । दंडावया कुत्सित जना । अवतरले यतिवर्य ॥३७॥ त्यांच्या चरणी ज्यांची भक्ति । त्यांचे मनोरथ पुरविती । पसरली जगी ऐशी ख्याती । लीला ज्यांची विचित्र ॥३८॥ श्रीपादवल्लभ भक्ति । कलियुगी वाढेल निश्चिती । त्यांचा अवतार स्वामी यति । वर्णी कीर्ती विष्णुदास ॥३९॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त । चतुर्थोध्याय गोड हा ॥४०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

                             श्री गणेशास स्मरून , आपल्या शुद्ध वाणीने कीर्तन करावे , उत्तम असे निरूपण ऐकावे आणि षोडशोपचार पद्धतीने स्वामींच्या चरणाची पूजा करावी . या पद्धतीने स्वामींची पूजा करावी , स्वामींची पूजा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा होमहवन किंवा योगाभ्यास करायची गरज नाहीय , निर्मल आणि शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण करावे हीच भक्ती स्वामींच्या चरणापाशी पोहोचते . स्वामींचा जप करताचक्षणी चारही पुरुषार्थ म्हणजेच धर्म , अर्थ , काम आणि मोक्ष आपल्या हाती येतील शिवाय जन्म मृत्यू याच्या फेऱ्यांची पुनरावृत्ती होणार नाही या सर्वांमधून आपल्याला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही .    

स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3

स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5

            मागच्या अध्यायाच्या शेवटी आपण पहिले कि , राजाला आपल्या राजदरबारात स्वामींनी दर्शन दिले आणि त्याच नगरात स्वामींनी राहणे पसंत केले . स्वामींची यथोचित अशी सेवा आपल्या हातून घडावी हाच केवळ एकमेव पक्का मानस चोळप्पाचा होता  असे म्हणतात ना देव मुंगीचीही इच्छा पूर्ण करतो अगदी त्याच प्रमाणे स्वामींच्या पदस्पर्शाने चोळप्पाच्या घरी लक्ष्मी नांदू लागली कारण चोळप्पाची आर्थिक परिस्थिती यथातथा होती पण स्वामींची कृपादृष्टी चोळाप्पावर असल्याने परिस्थिती एकदम पालटून गेली . जे केवळ वैकुंठवासी आहेत त्यांच्या सेवेसाठी अष्टसिद्धी सदैव तत्पर असतात , परंतु चोळाप्पाकडे यापैकी कुठलीच सिद्धी प्राप्त नाही तरीही या सर्व सिद्धी आणण्याचे सामर्थ्य स्वामींनी आपल्या केवळ कृपादृष्टीमार्फत चोळप्पाच्या मनात निर्माण केले आणि चोळप्पा आपली सेवा किती तत्परतेने करतो आहे हे पारखण्यासाठी विविध प्रकारे चोळप्पाची परीक्षा घेतात , या सर्व कसोटींमधून चोळप्पा खरा उतरतो कारण कितीही स्वामींनी परीक्षा घेतली तरी अगदी न कंटाळता चोळप्पा स्वामी सेवा अखंडपणे सुरु ठेवतो  चोळप्पाच्या सेवेत जसा कुठलाच खंड पडत नाही त्याचप्रमाणे चोळप्पाची बायको सगुणा ही ज्याप्रमाणे पतिव्रता होती तशीच स्वामींची कसोशीने सेवा करणारी होती तीही मनोभावे स्वामींची सेवा करत , असे म्हणतात ना चमत्काराशिवाय नमस्कार नाही मग स्वामी हि आपल्या नाना लीला दाखवी , कितीही केलं तरी स्वामी ही एक ईश्वरमूर्तीच स्वामींच्या दर्शनासाठी संपूर्ण गावामधून नव्हे नव्हे देशोदेशी स्वामींची ख्याती पसरली , कुणी काही ना काही इच्छा मनात घेऊन येत , कुणी संपत्ती मिळावी या हेतूने , कुणी मुलं – बाळ जन्माला यावी या हेतूने तर कोणी संसारात तापलेले तर कुणी या समस्त मायाजालात अडकलेले स्वामींकडे येत आणि स्वामींसुद्धा एका कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत , ज्यांची भक्ती निस्सीम आहे त्यांच्यासाठी स्वामी राज कल्पतरू होत तर जे नास्तिक आहेत त्यांच्यासाठी मात्र स्वामी कठोर असे शासन करत

                   Jहळू हळू स्वामींची ख्याती सर्वदूर पसरली , स्वामींची महती जसजशी वाढू लागली तसतशी स्वामींविषयी द्वेष आणि तिरस्कार करणारी मंडळीही वाढत गेली . एके दिवशी दोन संन्यासी अक्कलकोटास आले त्या दोघांनीही स्वामींविषयी निंदानालस्ती करण्यास सुरुवात केली . गावातल्या लोकांस स्वामींविषयी म्हणत , ‘ हा मनुष्य एक ढोंगी भोंदू बाबा आहे , याच्या नादी लागू नका , यांच्यामध्ये साधूचे कुठलेच लक्षण नाहीय …’ समर्थ म्हणजे अंतर्यामी स्वामींनी हे मनोमनी जाणले . काही वेळातच दोघेही संन्यासी  आले , पण त्या वेळी स्वामी भक्ताच्या घरी असल्याने तेथून ते तात्काळ निघाले तेथून मग स्वामी परत एका भक्ताच्या घरी विसावले त्यावेळी ते दोघे सन्याशीही होते . त्या भक्ताने तिघांनाही पाटावरती बसवले , त्याचवेळी स्वामींनी चमत्कार करण्याचे मनोमनी ठरवले .

          स्वामी येताचक्षणी भक्तांची दर्शनासाठी तुडुंब गर्दी होऊ लागली , एकेक भक्त स्वामींची पूजा करून काही ना काही स्वामींना अर्पण करत . कुणी येऊन नवस करत , कुणी काही संकल्प करत आणि आनंदाने स्वामींची पूजा करत . हे सगळं कौतुक दोन्ही संन्यासी अवाक होऊन पाहत होते . त्या दोन्ही संन्याशांचा वैरभाव , मत्सर किंवा द्वेष आपोआपच गाळून पडला . एका क्षणातच दोन्ही संन्याशांचे मनातले कुविचार निघून गेले . म्हणूनच याठिकाणी कवी विष्णूजी संतमहिमा आवर्जून सांगू इच्छितात . स्वामींपुढ्यात जे जे पदार्थ पडले होते , ते ते सर्व पदार्थ एकेक करून त्या दोहोंपुढे मांडत होते . दोघांचंही तोंडाला पाणी सुटले कारण संपूर्ण दिवस दोघांचाही जीव भुकेने कासावीस झालेला होता त्यात एवढे पदार्थ पुढे मांडलेले पाहून ‘ इथे तरी अगदी मनमुरादपणे आपल्याला खायला मिळेल …’ . परंतु त्यांच्यासाठी हीसुद्धा एक केवळ आशाच होती कारण , दर्शनासाठी आलेल्या लोकांची गर्दी लवकरच शमली  त्यानंतर सेवेकर्यांनी एकेक करून सगळे पदार्थ आणि द्रव्य न्यायला सुरुवात केली आणि क्षणार्धात सर्व द्रव्य तिथून नेण्यात आले . संन्यासी मात्र मनातल्या मनात भुकेने झुरत राहिले . समर्थानी मात्र त्या संपूर्ण दिवशी अन्न पाण्यास स्पर्श केला नाही आणि सूर्यास्त होताच समर्थ त्याठिकाणाहून उठले . दोन्ही संन्यासी सुद्धा त्यादिवशी उपाशी राहिले मात्र सूर्यास्त झाल्यावर अन्न पाणी सन्याशास वर्ज्य असते म्हणून त्या रात्रीसुद्धा अन्नपाण्याशिवाय दोघांनाही राहावे लागले            ज्यांनी साक्षात सगुण स्वरूपाची निंदा नालस्ती केली , त्याची विटंबना समर्थानी केली अशा कुत्सित लोकांना शासन करण्यासाठीच स्वामींनी मानवरूपी देह धारण केला . स्वामींच्या पायाशी ज्यांची भक्ती आहे त्यांचे मनोरथ स्वामी अगदी कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करतील . अशीच ख्याती ज्यांची पसरली आहे असे स्वामी राज यांची लीला जणू एक अगाध आहे . अशाच सगुण स्वरूप स्वामी समर्थ म्हणजे साक्षात श्रीपादश्रीवल्लभ यांची भक्ती काळ कलियुगात विस्तार पावणार अशीच महती कवी विष्णुदास पुढील भागांमध्ये गाणार असा हा स्वामी चरित्रातील चौथा अध्याय गोड असावा .

===================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *