Ritbhatmarathi

Search
Close this search box.

स्वामी चरित्र सारामृत अध्याय २ भावार्थसहित

॥ श्री गणेशाय नमः ॥ कामना धरोनी जे भजती । होय त्यांची मनोरथपूर्ति । तैसेचि निष्काम भक्ताप्रती । कैवल्यप्राप्ती होतसे ॥१॥ नृसिंहसरस्वती प्रगट झाले । अगणित पापी तारिले । कर्दळीवनी गुप्त जहाले । गुरुचरित्री ती कथा ॥२॥ पुढे लोकोद्धाराकारणे । भाग पडले प्रगट होणे । धुंडिली बहुत पट्टणे । तेचि स्वामी यतिवर्य ॥३॥ स्वामींची जन्मपत्रिका । एका भक्ते केली देखा । परी तिजविषयी शंका । मनामाजी येतसे ॥४॥ गुरुराज गुप्त झाले । स्वामीरूपे प्रगटले । त्यांचे शकप्रमाण न मिळे । म्हणोनि शंका पत्रिकेची ॥५॥ ते केवळ अनादिसिद्ध । खुंटला तेथे पत्रिकावाद । लोकोद्धारासाठी प्रसिद्ध । मानवरूपे जाहले ॥६॥ अक्कलकोटा-माझारी । राचप्पा मोदी याचे घरी । बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टित ॥७॥ साहेब कोणी कलकत्त्याचा । हेतू धरोनी दर्शनाचा । पातला त्याच दिवशी साचा । आदर तयाचा केला की ॥८॥ त्याजसवे एक पारसी । आला होता दर्शनासी । ते येण्यापूर्वी मंडळीसी । महाराजांनी सुचविले ॥९॥ तीन खुर्च्या आणोनी बाहेरी । मांडा म्हणती एके हारी । दोघांसी बैसवोनी दोहोवरी । तिसरीवरी बैसले आपण ॥१०॥ पाहोनी समर्थांचे तेज । उभयतांसी वाटले चोज । साहेबाने प्रश्न केला सहज । आपण आला कोठूनी ॥११॥ स्वामींनी हास्यमुख करोनी । उत्तर दिले तयालागोनी । आम्ही कर्दळीवनांतुनी । प्रथमारंभी निघालो ॥१२॥ मग पाहिले कलकत्ता शहर । दुसरी नगरे देखिली अपूर्व । बंगालदेश समग्र । आम्ही असे पाहिला ॥१३॥ घेतले कालीचे दर्शन । पाहिले गंगातटाक पावन । नाना तीर्थे हिंडोन । हरिद्वाराप्रती गेलो ॥१४॥ पुढे पाहिले केदारेश्वर । हिंडलो तीर्थे समग्र । ऐसी हजारो हजार । नगरे आम्ही देखिली ॥१५॥ मग तेथुनी सहज गती । पातलो गोदातटाकाप्रती । जियेची महाप्रख्याती । पुराणांतरी वर्णिली ॥१६॥ केले गोदावरीचे स्नान । स्थळे पाहिली परम पावन । काही दिवस फिरोन । हैदराबादेसी पातलो ॥१७॥ येउनिया मंगळवेढ्यास । बहुत दिवस केला वास । मग येउनिया पंढरपुरास । स्वेच्छेने तेथे राहिलो ॥१८॥ तदनंतर बेगमपूर । पाहिले आम्ही सुंदर । रमले आमुचे अंतर । काही दिवस राहिलो ॥१९॥ तेथोनि स्वेच्छेने केवळ । मग पाहिले मोहोळ । देश हिंडोनी सकळ । सोलापुरी पातलो ॥२०॥ तेथे आम्ही काही महिने । वास केला स्वेच्छेने । अक्कलकोटा-प्रती येणे । तेथोनिया जाहले ॥२१॥ तैपासूनि या नगरात । आनंदे आहो नांदत । ऐसे आमुचे सकल वृत्त । गेले उठोनी उभयता ॥२२॥ ऐकोनिया ऐशी वाणी । उभयता संतोषले मनी । मग स्वामी आज्ञा घेवोनी । गेले उठोनी उभयता ॥२३॥ द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती । राहिले स्वामीराज यती । परी त्या स्थळी प्रख्याती । विशेष त्यांची न जाहली ॥२४॥ सदा वास अरण्यात । बहुधा न येती गावात । जरी आलिया क्वचित । गलिच्छ जागी बैसती ॥२५॥ कोणी काही आमोनि देती । तेचि महाराज भक्षिती । क्षणैक राहूनि मागुती । अरण्यात जाती उठोनी ॥२६॥ वेडा बुवा तयांप्रती । गावातील लोक म्हणती । कोणीही अज्ञाने नेणती । परब्रह्मरुप हे ॥२७॥ त्या समयी नामे दिगंबर । वृत्तीने केवळ जे शंकर । तेव्हा तयांचा अवतार । सोलापुरी जाहला ॥२८॥ ते जाणोनी अंतरखूण । स्वामींसी मानिती ईश्वरासमान । परी दुसरे अज्ञ जन । वेडा म्हणोनी लेखिती ॥२९॥ दर्शना येता दिगंबर । लीलाविग्रही यतिवर्य । कंबरेवरी ठेवूनी कर । दर्शन देती तयासी ॥३०॥ अमृतासमान पुढे कथा । ऐकता पावन श्रोता वक्ता । स्वामी समर्थ वदविता । ज्यांची सत्ता सर्वत्र ॥३१॥ अहो हे स्वामी चरित्र । भरला असे क्षिरसागर । मुक्त करोनी श्रवणद्वार । प्राशन करा श्रोते हो ॥३२॥ तुम्हा नसावा येथे वीट । सर्वदा सेवावे आकंठ । भवभयाचे अरिष्ट । तेणे चुके विष्णू म्हणे ॥३३॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आनंदे भक्त परिसोत । द्वितीयोऽध्याय गोड हा ॥३४॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

                             श्री गणेशास स्मरून , मनात भाव शुद्ध असेल तरच देवाची भक्ती करावी त्याच भक्तांचे मनोरथ पूर्णत्वास जाते आणि त्या भक्तास मुक्तीही मिळते . नृसिंह सरस्वती प्रकट झाले आणि कर्दळीवनामध्ये गुप्त होऊन आपले अवतार कार्य समाप्त केले, नृसिंह सरस्वतींचे कार्य आणि अवतार समाप्ती हि गुरुचरित्रातील अध्यायामध्ये नमूद केलेली आहे . यापुढे लोकांच्या उद्धारासाठी त्यांना या दुस्तर अशा संसारामध्ये तारण्यासाठी स्वामी समर्थाना मानवरूपी अवतार धारण करावा लागला . नृसिंह सरस्वतीचा अवतार असणाऱ्या स्वामी समर्थ यांच्या जन्माविषयी एका भक्तास शंका आली म्हणून स्वामींच्या जन्मपत्रीकेविषयी विचारणा करण्यात आली त्यावेळी स्वामी स्वतः म्हणत गुरु नृसिंह सरस्वती हे कर्दळी वनामध्ये गुप्त होऊन आम्ही प्रकट झालो याठिकाणी कुठलाही ठोस प्रमाण नसल्याने येथे स्वामींच्या जन्माविषयीचा वाद कायमस्वरूपी खुंटला आणि त्याचबरोबर जन्मपत्रिकेचाही खुलासा करता येत नाहीय म्हणून पत्रीकेविषयीही बोलणाऱ्यांसाठीही हा वाद कायमस्वरूपी मिटला कारण स्वामी साक्षात अनादिसिद्ध आहेत , ज्यांचं अस्तिस्त्व म्हणजे साक्षात परब्रह्माचं अस्तित्व आहे . लोकांच्या उद्धारासाठी , जगाच्या कल्याणासाठी दत्त गुरूंनी मानव देह धारण केला आहे

स्वामी चरित्र सारामृत अध्याय १

स्वामी चरित्र सारामृत अध्याय ३

         पुढे अक्कलकोट या ठिकाणी स्वामी येतात आणि शिष्य रासप्पा मोदी यांच्या घरी विसावतात , त्याच वेळी भक्तांची रिघ रासप्पा मोदी यांच्या घरात असते , कोण भक्त कलकत्त्यावरून आलेले आहेत , तर कुणी एक पारशी फक्त दर्शनाच्या हेतूने राचप्पा मोदी यांच्या घरी येतात , तेथेही भक्तांचा आदर स्वामी आणि राचप्पा मोदी यथोचित करतात पण ते भक्त येण्यापूर्वीच स्वामींनी राचप्पा याना सुचवलेलं असत कि , बाहेरील अंगणात तीन खुर्च्या टाका सांगितल्याप्रमाणे तीन खुर्च्या टाकल्या दोन खुर्च्यांवरती दोन्ही भक्त आणि तिसऱ्या खुर्चीवरती स्वतः स्वामी विराजमान होतात , स्वामींच्या चेहऱ्यावरील अलौकिक असे तेज पाहून दोन्ही भक्तांना एक कौतुक वाटले आणि सहज प्रश्न केला कि , आपण आलात कोठून ? , यावर स्वामींनी हसतमुखाने उत्तर दिले , आम्ही कर्दळी वनामधून आलो आहोत , तेथून सर्वात पहिल्यांदा आमचा प्रवास सुरु झाला त्यानंतर मी कलकत्त्यास गेलो , बंगाल प्रांतास जाऊन तेथील समस्त चराचर पाहिले त्यानंतर माता कालीचे दर्शन घेतले , गंगातटास आम्ही जाऊन आलो , तेथील तीर्थाटन करत करत आम्ही हरिद्वारासही जाऊन आलो , केदारेश्वरास जाऊन भगवान शंकराचे आम्ही दर्शन घेतले त्यानंतर पुष्कळ असे तीर्थाटन आम्ही केले , तीर्थ करत असताना आम्ही विविध नगरे पाहिली , तिथून पुढे गोदावरीच्या तटावर आम्ही आलो गोदावरी नदीच्या येथे स्नान करून आम्ही तेथील ठिकाणे पाहिली आणि त्यापुढे हैद्राबाद या ठिकाणी गेलो , त्यानंतर मंगळवेढ्यास आम्ही आमचा मुक्काम हलवला , काही दिवस मंगळवेढ्यास राहिल्यानंतर आम्ही आमचा मुक्काम पंढरपुरास करावयाचे योजले, आमच्या इच्छेने , मनाच्या मर्जीने आम्ही पंढरपुरास तर राहिलो पण त्यानंतर बेगमपुरा या ठिकाणी मन रमू लागले , त्याठिकाणीही मनाची मर्जी चालवली त्यानंतर मोहोळ या ठिकाणी वास्तव्यास राहिलो , सगळा देश हिंडून झाल्यावर आम्ही सोलापुरात दाखल झालो . त्यांनंतरच सोलापूरातूनच अक्कलकोटास आमचे येणे झाले , तेव्हापासून आम्ही आनंदात याठिकाणी नांदतो आहो .

          स्वामींच्या मुखातील वाणी ऐकून दोन्हीही भक्त संतुष्ट झाले , स्वामींचा निरोप आणि आशीर्वाद घेऊन दोघेही तिथून निघाले , बारा वर्ष मंगळवेढ्यास राहून त्याठिकाणी त्यांची अशी विशेष ख्याती झाली नाही कारण स्वामींनी आपली लीला तेथे दाखवली नाही कारण स्वामींचा वावर हा सदा जंगलामध्ये असायचा गावात ते कधी जात नसे , जरी गावात स्वामी गेलेच तरी घाणेरड्या जागी ते विराजमान होत , गावातील लोकही गायी गुरांसाठी ठेवलेले आंबोण किंवा शिळ अन्न स्वामींना देत आणि स्वामींसुद्धा ते आंबोण ते अन्न न संकोचता खाऊन टाकत आणि थोडा वेळ बसून परत आपल्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच अरण्यात जात . त्यामुळेच तेथील ग्रामस्थ स्वामींना वेडा बुवा म्हणून संबोधत , त्या अज्ञान लोकांना स्वामींचे परब्रह्म स्वरूप थोडीच समजणार आहे . त्यावेळेला दिगंबर या नावाने स्वामींची ओळख असे कारण साक्षात त्यावेळी सोलापुरात शंकर या नावेही एक अवताराने जन्म घेतला होता त्याच्यावर स्वामींचा कृपाशिर्वाद सदैव असे . तेवढीच अनमोल अशी खूण मानून काही लोक स्वामींना ईश्वरासमान समजत आणि अजाण लोक वेड्यात काढत .      

           कुणी मनापासून भक्ती करणारा भक्त आलाच तर आपल्या लीला दाखवून स्वामी आपल्या कंबरेवर दोन्ही हात ठेउन दर्शन देत . समुद्रमंथनाच्यावेळी जे अमृत निघाले अगदी त्याच अमृताप्रमाणे हि कथा आहे स्वामी चरित्राचे मंथन करता करता क्षीरसागर म्हणजे याठिकाणी सारामृताचे कवी विष्णू थोरात अगदी भारावून जात आहे तर श्रोतेहो आपण सर्वांनी हे सारामृतरूपी अमृत आपले श्रवणेंद्रिय मुक्त करून ऐकावे . हे अमृत प्राशन करत असता आपल्याला याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कंटाळा येऊ नये . जर हे सारामृत आपण आकंठ प्राशन केल्यास भवभयापासून आपण मुक्त होउ असे कवी विष्णू याठिकाणी सांगू इच्छितात .

        द्वितीय अध्याय याठिकाणी गोड असावा.

===================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *