Ritbhatmarathi

Search
Close this search box.

वंदनाने कूस बदलली आणि डोळे किलकिले करून पाहिले रात्रीचे सव्वाबारा वाजले होते. उठून शेजारी पाहिलं तर बेडवरची वरुणची जागा अजून रिकामीच होती म्हणजे आजही, अजूनही याचा पत्ताच नव्हता. तिला वाईट वाटले पण काय करणार? ती परत झोपून गेली, निदान तसं सोंग तरी केलं. घरात कुणी नसलं किंवा कुणी येणार असलं की झोप कुठची लागते? पण तिने वरुणला लॅचची किल्ली देऊन ठेवली होती. दिवसभराच्या दगदगीने चुकूनमाकून डोळा लागला तर उगाच झोपमोड नको व्हायला.

वरुणचं हे मित्रांना भेटणं, पार्ट्या करणं नेहमीचंच झालं होतं. तिने अनेक वेळा समजावून सांगूनही वरुणचं आपलं तेच! त्याला काय होतंय? तेवढ्यात लॅच उघडल्याचा आवाज आला आणि तिने झोपेचं सोंग घेतलं. वरुणनेही तिला आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन दबकत दबकत येऊन आपलं आपलं आवरलं आणि तो झोपण्यासाठी आला.
वंदनाकडे बघताना त्याला वाटलं. दमली असेल बिचारी. आजकाल तिच्याशी बोलणंच होत नाही. उद्या सकाळी काही झालं तरी लवकर उठायचं ती ऑफिसला जायच्या आधी. शेजारी टेबलावर त्याने काढायला घेतलेल्या सुंदर घराच्या चित्राची फ्रेम पण त्याला अर्धवट पडलेली दिसली. उद्याही फ्रेम नक्की पूर्ण करायला घ्यायची. त्याने मनाशी ठरवलं.
त्याच्या घोरण्याच्या आवाजाने आणि तसंही त्याच्या एकंदर वागण्याने वंदनाची मात्र झोप उडाली होती, ती बराच वेळ ताटकळत होती.

सकाळी पाचच्या ठोक्याला तिला उठावंच लागे. वरुणचा चहा, नाश्ता स्वयंपाक करून ठेवून ती स्वत:चा डबा घेऊन बाहेर पडत असे. बर्‍याच वेळा तिला नाश्ता करायलाही वेळ मिळत नसे. वरुणने निवृत्ती घेतली, खरंतर अजून दोन वर्षं होती त्याला निवृत्त व्हायला, पण आता कंटाळा आला तसेच सर्व जबाबदार्‍यांतून मुक्तही झालोय मग काय करायची नोकरी असा विचार त्याने केला होता. त्याने निवृत्ती घेतली तेव्हा वंदनालाही वाटलं, चला बरं झालं. निदान ऑफिसमधून थकून-भागून घरी आल्यावर घर तरी उघडं असेल, कधीतरी आयती गरम कॉफी तरी मिळेल, पण तिचे हे मनातले इमले मनातच विरून गेले. उलट ती घरी आल्यावर वरुणच चिडचिड करत असे. तुला काय तू दिवसभर ऑफिसमध्ये मजा मारतेस. मी इथे घरात एकटाच असतो. मलाच वाढून घ्यावे लागते, माझे मलाच सर्व करावे लागते. मी एकटा घरात बोअर होतो शिवाय घरात कुणी आलं गेलं तसंच कामाच्या माणसांमुळे अडकून पडतो. आयुष्यभर सरकारी नोकरी केली आता तुझी चाकरी! मुलं आपापल्या नोकरीत मग्न आहेत तेही बाहेर गावी. मीच एकटा पडलोय. मग वंदनाही तावातावाने बोलत असे. ऑफिसमधला सगळा ताण त्याच्यावर ओतत असे. वड्याचं तेल वांग्यावर निघत असे. यावर उतारा म्हणून तो तणतणतच घराबाहेर पडत असे. अशा रितीने दोघांच्यात संवाद तर होतच नसत पण वाद मात्र हमखास होत असे. वंदनाला बिचारीला कळतच नसे की आपलं काय चुकलं?

पहिले सहा महिने असेच गेले. तणतणत बाहेर गेलेला वरुण येताना कधीतरी एखादा गजरा किंवा वंदनाच्या आवडीची मिठाई घेऊन येत असे. मग तिने केलेल्या जेवणावर ताव मारत असे. एखादी सिरीअल किंवा पिक्चर दोघं मिळून बघत असत जरा गप्पा मारत असत आणि झोपत असत. दुसर्‍या दिवशी परत ये रे माझ्या मागल्या. कधीतरी तो एखादं पेंटींग करत असे. एक दिवस वंदना घरी आली तर दाराला कुलूप. तिने वरुणला फोन लावला तर त्याला त्याच्या एका जुन्या मित्राचा अचानक फोन आला होता म्हणून तो गडबडीत निघून गेला होता. रात्री यायला उशीर होईल तू जेवून घे आणि झोप. वरुणने तिला उत्तर दिले.

‘‘चला बरं झालं. निदान शांतता.’’ असं तिला वाटून गेलं. दुसर्‍या दिवशी वरुण उठला तो एकदम खूशच होता. त्याला त्याच्यासारख्याच 5-6 जणांचा ग्रूप मिळाला होता. आठवड्यातून दोनदा भेटायचं त्यांनी ठरवलं होतं. त्याचं रिकामपण जरा कमी होणार होतं. त्याच्या चांगल्या मूडचा फायदा घेऊन वंदनाने आठवण पण केली होती, ‘‘महाशय, आपण निवृत्ती आपले छंद जोपासायला घेतली होती. बागकाम, पोस्टर पेंटींग, सायकलींग… वगैरे वगैरे.. पण आतापर्यंतचे निम्मे दिवस तर माझ्यावर रागावण्यातच गेले.’’ तिने हात घुऊन घेतले.

वरुणने तिचं ते बोलणं एकदम हलक्यात घेतलं आणि म्हणाला, ‘‘आता दोन दिवस मित्रांबरोबर आणि बाकी वेळ छंद जोपासण्यात. ते अर्धवट केलेलं पेंटींग पण आता पूर्ण करणार’’ वरुण खुशीतच म्हणाला.
‘‘जोरदार पार्टी झालेली दिसते.’’ वंदनाने तरी विचारलंच.

‘‘नाही ग फार नाही, पण आता मित्र भेटले म्हटल्यावर…’’ असुदे नवरा खूश आहे ना म्हणून वंदनाने दुर्लक्ष केलं. पण हळूहळू हे प्रमाण वाढतच गेलं आणि आता तर हे रोजचंच झालं. आधी वंदनाने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, अशाने तब्येत बिघडेल, त्रास होईल, पण.. पालथ्या घड्यावर पाणी… विचार करता करता वंदनाला डोळा लागला.

सकाळी जरा उठायलाही उशीर झाला आणि रोजच्या अपूर्ण झोपेमुळे तिला पित्ताचा त्रास होऊन उलट्या सुरू झाल्या. ती तशीच पडून राहिली. वरुण नेहमीपेक्षा जरा लवकरच उठला. तर वंदना झोपलेली.

‘‘बरं नाही का तुला?’’ त्याने चौकशी केली.

‘‘हो.’’ ती तुटकच बोलली.

‘‘काय होतंय?’’ त्याने अंगाला हात लावून पाहिला.

‘‘ताप नाही, पण उलट्या होतायत, डोकं चढलंय.’’ ती परत झोपून गेली. वरुण उठला. त्याने वंदनासाठी लिंबाचं सरबत करून आणलं.

‘‘वंदना, उठ, सरबत घे.’’ त्याने प्रेमाने तिला हाक मारली. त्याची ती हाक ऐकून वंदनाच्या डोळ्यात पाणीच आलं. एकतर तब्येत बरी नसल्याने मन हळवं झालं होतं आणि इतके दिवसाचा राग, सहनशीलता डोळ्यातील पाण्यावाटे बाहेर पडली. वरुणने विचारलं, ‘‘अगं काय झालं? रडतेस काय अशी? अलीकडे तू बोलतही नाहीस फारशी.’’
‘‘काय राहिलंय आपल्यात बोलण्यासारखं?’’ तिने विचारलं.

वरुणही गप्प राहिला. त्याने वंदनाकडे पाहिलं. फार थकून गेल्यासारखी दिसत होती ती. कसलीतरी काळजी तिला पोखरत होती असं वाटलं त्याला. पहिल्यांदा पहिल्यांदा त्याचं मित्रांकडे जाण्यावरून, पार्ट्यांवरून भांडणासाठी तरी ती त्याच्याशी बोलत होती, पण अलीकडे.. आणि त्याला एकदम शॉकच बसला. अलीकडे 15 दिवसांत वंदना आपल्याशी काहीच बोलली नव्हती. तिने आपल्याला काहीच टोकलं नव्हतं. जवळजवळ अबोलाच धरला होता, आपणही खूश होतो. ही काहीच बोलत नाही म्हणून. त्याने परत तिच्या चेहर्‍याकडे पाहिलं. ती त्याच्यापासून खूप दूर दूर गेल्यासारखी वाटलं त्याला. त्याचं लक्ष शेजारच्या सुखी घरकुलाच्या अर्धवट फ्रेमकडे गेले. आता हिच्याशी बोललंच पाहिजे त्याने ठरवलं.
‘‘वंदना, काय झालंय? अशी का शांत बसलीयस तू? आणि बरेच दिवस झाले माझ्याशी बोलतही नाहीयेस.’’

‘‘हे आज लक्षात आलं तुझ्या वरुण? 15 दिवसानंतर? बघ तू माझ्यापासून, आपल्या घरापासून किती दूर गेलायस? मुलंही विचारतायत की आजकाल बाबांचा फोनसुद्धा येत नाही. कशात इतके बिझी आहेत. जाऊदे, तुला काही बोलायचं नाही असंच मी ठरवलं होतं. तरी पण..’’

वरुणने एकदम वंदनाचा हात धरला. तो शांत बसला. मागच्या महिन्या-दोन महिन्यातल्या सर्व घटना त्याच्या डोळ्यासमोर आल्या. आपण उशिरा आल्यावरही वंदनाचं न चिडणं, कामापुरतंच बोलणं म्हणजे जवळ जवळ अबोलाच. इतक्या दिवसांत मुलांशीही आपलं बोलणं झालं नाही? ही कसली धुंदी चढलीय आपल्यावर? किती एकटं वाटलं असेल वंदनाला? मुलं इथे नाहीत. माझं हे असं रोज पार्ट्यांना जाणं. तिला घरात काडीची मदत नाही. तो एकदम सटपटलाच. तेवढ्यात मुलीचा फोन आला, वरुणने अक्षरश: झडप घालून तो उचलला.

त्याचा आवाज ऐकताच मुलीचा स्वर कडवट झाला. ‘‘बाबा, चक्की तुम्ही फोन उचललात?, आईची तब्येत कशी आहे?’’

‘‘हा बरी आहे, पण तुला कसं कळलं? आजच तर..’’

‘‘तुम्हाला आज कळलं असेल, पण पंधरा-वीस दिवस बरं नाहीये तिला. बारीकसारीक तक्रारी सुरूच आहेत तिच्या. ते सांगण्यासाठी मी तुम्हाला फोनही केला, पण तुम्ही मित्रांबरोबर होतात, नंतर करतो म्हणालात आणि…’’

‘‘खरंच ग!’’

‘‘बाबा, खरंतर वाया जायचं वय आमचं, पण तुम्हीच..’’

‘‘मी तुला नंतर फोन करतो.’’ त्याने वंदनाकडे पाहिलं.

‘‘वंदना, माझं चुकलं ग, पण तू मला काही बोलली का नाहीस? तुझी तब्येत बरी नाही म्हटल्यावर तरी मी…’’

‘‘कधी सांगणार वरुण, मी घरातून बाहेर पडेपर्यंत तू झोपलेला असायचास. मी घरी आल्यावर तू घरात नसायचास. सुट्टीच्या दिवशी पण घरात थांबत नाहीस तू मग कधी सांगणार सांग ना? आणि बोलून बोलून मला कंटाळा आला होता, म्हणून मी ठरवलं अबोलाच धरायचा, पण त्याचंही तुला काही नाही.’’

‘‘काल खरंच मला असं वाटलं होतं की, आपलं किती दिवसांत बोलणं झालंच नाही, पण तू रागावून अबोला धरलास हे मनातही आलं नाही ग माझ्या.. चुकलो ग वंदना, वाहावत निघालो होतो. आता तुला वचन देतो उद्यापासून नो पार्टी, नो मित्र. माझं सुखी घरकुलाचं चित्रं मी उद्यापासून पूर्ण करणार.’’

‘‘अरे मित्र, मज्जा हवीच आयुष्यात पण इतकी की…’’

त्याने तिच्या तोंडावर हात ठेवत म्हटलं. ‘‘आता तू काही बोलू नकोस. शांत आराम कर. मी तुझ्यासाठी मस्त मऊभात टाकतो आणि कामाला लागतो. त्याच्या पाठमोर्‍या चेहर्‍याकडे वंदना आनंदी होऊन बघत बसली. तिचा आजार ती विसरून गेली. तसं तिला काहीच झालं नव्हतं पण मानसिक स्थैर्य हरवलं होतं त्यामुळे काही ना काही होत राहायचं जसं आज पित्तं. दिवसभर त्या दोघांनी गप्पा मारण्यात घालवता आणि संध्याकाळी पेंटींगसाठी सामान आणायला बाहेर गेली. काही दिवसांतच वरुणने सुंदर हसत्या-खेळत्या घरकुलाचेे चित्र पूर्ण केले ते पूर्ण होणार त्याच दिवशी मुलं सरप्राइज द्यायला हजर झाली. आणि ते चौकोनी घरकुल समाधानाने हसले.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

==================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *