Ritbhatmarathi

Search
Close this search box.

“२५ वर्षे ह्या बँकेत नोकरी केली….तुम्हा सर्वांच्या सहभागात २५ वर्षे जणू २५ दिवसांसारखे वाटले. कुलकर्णी साहेबांचं मनापासून धन्यवाद….त्यांनी ह्या २५ वर्षांत मोलाची साथ दिली आणि सहकारी मित्रहो तुमचंही मनापासून आभार….मला अपेक्षित नव्हतं कि माझा निवृत्ती सोहळा एवढ्या नियोजन पद्धतीने साजरा होईल. “

रत्नाकर काका आपल्या निवृत्ती सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करत होते. आज त्यांचा निवृत्ती सोहळा होता. त्यामुळे रत्नाकर काकाबरोबरच त्यांची पत्नी सुलभा काकू, दोन्ही मुले, सुना नातवंड ह्या सर्वाना निवृत्ती सोहळ्यामध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. सर्वांची मनोगते झाल्यावर शेवटी बँकेचे मॅनेजर कुलकर्णी साहेबांनी सुलभा काकूंना स्टेज वर बोलावून आपलं मनोगत व्यक्त करायला सांगितलं. सुलभा काकू घाबरत घाबरतच जागेवरून उठल्या आणि स्टेज वर जाणार तेवढ्यात रत्नाकर काका म्हणाले “तिला एवढ्या वेळ स्टेजवर राहायला नाही जमणार..तिला गुढघेदुखीचा त्रास आहे आणि आम्हा सर्वाना उशीर होतोय त्यामुळे लगेच निघायला लागेल.” असं म्हणून रत्नाकर काकांनी वेळ मारून नेली आणि सुलभा काकूंना स्टेजवर जाण्यास रोखलं.

बँकेतील सहकारी मित्रांचा निरोप घेऊन जोशी कुटुंब घराच्या मार्गी लागलं. जोशी काकांचा लहान मुलगा अक्षय त्यांना नवलतेने विचारतो….

“बाबा आईला कुठे गुडघेदुखीचा त्रास आहे..तुम्ही तिला स्टेज वर जाऊ नाही दिलं..”

जोशी काका – “बाळा अक्षय….अरे तुझी आई स्टेज वर गेली असती आणि सगळ्यांचं हसू केलं असतं..तिथंच त..त..प..प.. करत बसली असती. माझा आज शेवटचा दिवस होता बॅंकेत…. २५ वर्षात कमावलेली इज्जत एका क्षणात गेली असती….काय सुलभे….” असं म्हणून जोशी काका आणि सगळे हसू लागले..सुलभा काकूंनीही ओठावर खोटं हसू आणलं जणू त्यांना ह्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना सवय आहे.

दुसऱ्या दिवशी जोशी काका सकाळी उठून आपला न्यूज पेपर चाळत बसले होते. निवृत्तीनंतरचा पहिलाच दिवस होता त्यांचा. बँकेत जायची घाई नव्हती त्यामुळे सगळं कसं आरामात चाललं होतं.

“सुलभे अगं चहा दे….किती वेळ झाला बरंड्यात येऊन बसलो आहे…बँकेत जायचं नाही ह्याचा अर्थ असा नाही कि माझ्या खाण्या पिण्याच्या वेळा पाळायच्या नाही. “

“आणते आणते….” सुलभा काकू चहा घेऊन येतात आणि सोबतच हरभऱ्याची भाजी निवडायला घेऊन येतात. सुलभा काकू जोशी काकांच्या शेजारी येऊन बसतात आणि जरा दबक्या आवाजातच जोशी काकांना म्हणतात.

“बरं एक विचारू का..तुम्ही फ्री झालात आता..कामाचं टेन्शन नाही….चारधाम करायला जाऊ या का….मला फार इच्छा आहे हो जायची….कित्येक वर्षे झाली आपण कुठे गेलोही नाही.  “

सुलभा काकूंचं बोलणं ऐकून चहाची सुर्की घेता घेताच जोशी काकांना ठसका लागतो….आणि ते सुलभा काकुंवर खेकसून बोलतात..

“काय!!!!अगं तुला काय वाटतं का..कालच मी निवृत्त झालो आणि आज तू लगेच माझ्याकडे चारीधामचं घेऊन आली….नोकरी नाही म्हणून आता काहीही करू का मी….आणि फ्री म्हणजे काय गं..तुला दिवसभर काम नसतं तू फ्री असते म्हणून सगळेच फ्री असतात का..जा जरा सुनांना मदत कर.”

जोशी काका बोलतच असतात तेवढ्यात लहान सुनबाई विशाखा आपल्या १ वर्षाच्या बाळाला घेऊन आली..

विशाखा – “अहो आई..भाजी निवडून झाली असेल तर..गुग्गुला भात वरण खाऊ घाला आणि अंघोळ घाला….मी जरा पार्लर मध्ये जाऊन येतेच थोड्यावेळात”

सुलभा काकूंना काही बोलण्याच्या आतच विशाखाने गुग्गु ला त्यांच्याकडे दिलं आणि तिथून निसटता पाय घेतला.

जोशी काका – “बघितलं तुलाच किती कामं आहेत….आणि हा सगळा ऱ्हाडा सोडून चारधाम ला जायचं म्हणतेय..जा माझ्यासाठी अंघोळीला पाणी गरम कर ..थंडीमुळे सोलर मध्ये पाणी नाही येतेय. “

गुग्गु ला अंघोळ घालून झोपी लावून  सुलभा काकू थोड्यावेळ बेड वर निवांत बसल्याच होत्या तसा मोठ्या सुनबाईंनी स्वामिनीने वरच्या खोलीतून आवाज दिला.

स्वामिनी – “आई….तेवढी हरभऱ्याची भाजी फोडणीला टाकून द्या आणि पीठ मळून ठेवा…हे येतीलच दुकानातून जेवायला..मी ऋग्वेद चा अभ्यास घेतेय. “

सुलभा काकूंनी भाजी केली आणि मोठा मुलगा प्रशांत घरी जेवायला आला सुद्धा होता तरी स्वामिनी तिच्या खोलीतून आली नव्हती. जोशी काकांची आणि प्रशांतची जेवायची वेळ झाली म्हणून सुलभा काकूंनीच चपात्या केल्या…. सगळं स्वयंपाक झाल्यावर दोन्ही सुना मस्त आरामात आल्या आणि आपली पान वाढून घेतली आणि जेवायला बसल्या. पण सुलभा काकूंना मात्र ना जोशी काकांनी, ना लेकाने ना सुनबाईंना जेवण्यासाठी विचारलं. सगळ्यांची जेवणं आटोपल्यानंतर सुलभा काकू जेवायला बसल्या..आत्तापर्यंत दोन्ही सुना आपापल्या खोलीत वामकुक्षीसाठी गेल्या होत्या…..जेवता जेवता मात्र प्रत्येक घासाबरोबर अश्रुधारा वाहत होत्या आणि थोड्याच वेळात अश्रूंचा बांध कोसळला होता त्यांचा. पण असं रडून चालणार नव्हतं कारण किचन सगळा अस्ताव्यस्त पडला होता. 

थोडक्यात सांगायचं झालं तर सुलभा काकूंचं कुणासमोर काही चालत नसायचं. जोशी काकांचा नेहमीच दबदबा असायचा. आणि मूळ म्हणजे जोशी काका स्वतःच सुलभा काकूंचा सर्वांसमोर अनादर करायचे त्यामुळे आपलंच नाणं खोटं असल्याने दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करावी. सुलभा काकूंना सारखं वाटायचं कि वेळेनुसार जोशी काका हि थंड होतील आणि समजून घेतील निदान रिटायरमेंट नंतर तरी जोशी काकूंना सुलभा काकूंच्या सोबतीची गरज भासेन नि जोशी काकांसोबतच त्यांचीही घरच्या जबाबदारीतून थोडी सुटका होईल आणि निवांत वेळ मिळेल.  पण इथं झालं नेमकं उलटंच. जोशी काका निवृत्त झाल्यापासून सुलभा काकू अजूनच घर संसारात अडकून गेल्या. दोन्ही सुनांनी वेळीच हाथ झटकले मग जोशी काकांचा दिवसभर सुलभा..सुलभा म्हणून जप चालायचा.

जोशी काका निवृत्त होऊन अशीच काही वर्षे झाली….सुलभा काकूंच्या मागेही बऱ्याच व्याधी लागल्या होत्या पण औषध पाणी करणार कोण….बऱ्याच दिवसांपासून सुलभा काकूंना योनीतुन रक्तस्त्राव होत होता….तरी सुलभा काकू मागील २ महिन्यांपासून जोशी काकांना आणि पोरांना सांगत होत्या पण कुणी मनावर घेतलं नाही आणि एक दिवस सुलभा काकूंच्या ओटी पोटात जोरात दुखायला लागलं. दवाखान्यात दाखवल्यावर डॉक्टरांनी काही चाचण्या करायला सांगितलं त्यात निदान झालं कि सुलभा काकूंचं गर्भाशय खराब झालं होतं. आणि अजून उशीर झाला असता तर कॅन्सरचा सुद्धा धोखा उद्भवला असता. वेळीच सुलभा काकूंचं गर्भाशय काढून टाकण्यात आलं. डॉक्टरांनी संपूर्ण महिना बेड रेस्ट करायला सांगितली. हे ऐकून दोन्ही सुना आणि जोशी काकांचा चेहरा उतरला होता.

ऑपेरेशन नंतर १५ दिवसांतच सगळ्यांनी सुलभा ताईंचा राग राग करायला सुरुवात केली होती. लेका सुनांनी आधीच हाथ झटकले होते. बायको जागेवर म्हटल्यावर तिचं सगळं आपल्यालाच करायला लागणार असा विचार सुद्धा जोशी काकांना करवत नव्हता म्हणून १५ दिवस जोवर सुलभा काकू जागेवर आहे तोवर जोशी काकांनी एका नर्स ला सुलभा काकूंच्या सेवेसाठी लावलं. घरातले सगळे घडाळ्यातल्या काट्याप्रमाणे महिना मोजत होते. एकदाचा एक महिना झाला…सुलभा काकूंना थोडा अशक्त पणा होताच पण त्याच काय पडलंय कुणाला…बरोबर एक महिना होत नाही कि दोन्ही सुनबाईंनी सुलभा काकूंना किचनमध्ये बोलावून घेतलं आणि जोशी काकांचाही सुलभ काकूंच्या नावाने जप चालू झाला होता.

ह्या वेळी मात्र सुलभा काकूंच्या डोक्यात सगळेजण पुरते गेले होते आणि त्यांचा संयम तुटला होता. लग्नाला ३० वर्षे झाली होती. ह्या ३० वर्षांमध्ये सुलभा काकूंनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. दोन्ही सुनांचे बाळंतपण केले….सव्वा महिना दोघीनाही बेडवरुन उतरू दिलं नाही…जोशी काकांचाच अट्टाहास होता कि सुनांची पहिले बाळंतपण सासरीच व्हावी….आणि सुलभा काकूही भक्कमच होत्या तश्या….पोरांना कधी उपाशी पोटी राहू दिलं नाही..रात्री १२ वाजता जरी म्हटलं कुणी कि मला हे बनवून दे तरी सुलभा काकू कानकून न करता किचन मध्ये उभ्या असायच्या. नातवंडांना जन्माला घालून सुना बाजूला झाल्या होत्या पण सुलभा काकूंना तेवढाच विरंगुळा होता म्हणून त्यांनी तिथेही त्यांची जबाबदारी चोख पार पाडली होती. जोशी काकांसाठी तर जे केलं ते अगणितंच होतं. घर संसारातून सुलभा काकूंची ईच्छा असूनही कधी सुटका झालीच नाही.  

पण आता त्यांनीही जास्तच तस वागायला सुरुवात केली. जोशी काकांच्या रागीट स्वभावाला न जुमानता काकू आता स्वतःमध्ये रमत चालल्या होत्या. रोज संध्याकाळ झाली कि जवळच्या देवळात हरिपाठसाठी जाऊ लागल्या. संध्याकाळी गेल्या कि थेट जेवायच्या वेळेलाच यायच्या. त्यामुळे आपसूकच सुनांना सगळा स्वयंपाक स्वतःला करायला लागायचा. सुनांनी जोशी काकांची कानभरणी करण्याचा प्रयत्न केला आणि जोशी काकांनीही सुरुवातीला सुलभा काकूंना नेहमीप्रमाणेच दम द्यायचा प्रयत्न केला पण सुलभा काकूंना त्याचा काहीही फरक पडत नव्हता. एवढंच काय तर जोशी काकांनी एकदा खणकुन सांगितलं कि मंदिरात गेली कि परत घरात येऊ देणार नाही….पण आधीच्या घाबरट सुलभा काकू तर राहिल्या नव्हत्या त्या …. सुलभा काकूंना चांगलंच कळून चुकलं होतं कि जोशी काकांचा राग आणि गरम डोकं फक्त वर वरचं आहे…धमक बाकी काही नाही…सुलभा काकूंशिवाय पान हालत नसायचं त्यांचं मग त्यांना घरातून काढून कसं चालेन….कुठल्याही धमकीला प्रत्युत्तर न देता सुलभा काकू “हरे रामा हरे कृष्णा ” म्हणत रोज घरात प्रवेश करत.

एक दिवस न्यूज पेपर मध्ये १५०००/- मध्ये १० दिवस चारधाम करण्याची जाहिरात एका ट्रॅव्हल कंपनीने टाकली होती. राहायची खायची सोय सगळे तेच करणार होते. सुलभा काकूंनी जोशी काकांचा फोन घेतला आणि जाहिरातीखाली दिलेला नंबर डायल केला. सगळ्या गोष्टींची पडताळणी करून स्वतःची जागा राखीव केली. जोशी काका सगळं बघतच होते.

जोशी काका – “वाह्ह मॅडम आता चारीधामला जाणार आणि त्यापण एकट्या….गेल्या ३० वर्षांत माहेरी सुद्धा कधी एकटी गेली नाही आणि आता चारधाम ला एकटी जाणार….आणि तुला काय करायचं ते कर पण मी एक पैसा नाही देणार. “

सुलभा काकू – “पैशांची गरज नाही मला… तुम्हाला काय वाटतं गेल्या ३० वर्षांत तुम्ही घर खर्चाला दिलेल्या पैशांतून एक पैसा नसेल वाचवला मी आणि ते पण तुमच्यासारखा नवरा असताना “

जोशी काका चवताळून  – “सुलभे जिभेला काही हाड आहे कि नाही. “

सुलभा काकू – “३० वर्षे माझ्या जिभेला हाड होतं पण आता नाहीये…बर पुढच्या महिन्यांत मी निघणार आहे. तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता….आयुष्यभर मर मर केलं सगळ्यांसाठी त्याची हि शिक्षा भोगतोय मी…गेले ३० वर्षांत तुम्ही कधी माझा विचार केला? स्वतः निवृत्त झाले आणि तुमचा निवृत्ती सोहळा साजरा करायचा आणि मला कामातून जरा ब्रेक हवा तर ती सगळ्यासाठी डोकेदुखी होते? कधी विचार केला तुम्ही तुमची निवृत्ती ह्यासाठी होते कि एवढी वर्षे तुम्ही राब राब  आणि आता  राज्यात फक्त आरामाची गरज आहे तुम्हाला पण बाईचं काय? तुमच्यासारखी तीही तिच्या पोटाला चिमटा हाताचे चटके सहन करत कुटुंबाचं पोट भरते….स्त्री आहे तर घर आहे….तुम्ही आयुष्यभर सुलभाच्या नावाचा जप केलात पण कधी मला प्रेमाने हाक मारली का? तुम्ही आयुष्यभर मला धाकात घेतलं….पण आता नाही…मी साठीला आले…वाटलं होतं तुम्ही तुमच्या निवृत्ती सोबतच माझीही निवृत्ती होईल आणि आता घर संसाराच्या ह्या राड्याला पूर्णविराम मला सुद्धा देता येईल….पण असं न होता तुम्ही मला अजूनच गुरफटून घेतलं… पण आता नाही….आता सुद्द्धा मी माझं आयुष्य नाही जगले तर कधीच नाही. मी आता स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे”

असं म्हणून सुलभा काकू आपल्या खोलीत निघून गेल्या….जोशी काका आणि सुना लेक अवाक होऊन बघतच बसले. चारधाम ला जायच्या एक आठवड्याआधीच सुलभा काकूंची तयारी चालू झाली. सुलभा काकू आपली बॅग भरत होत्या तेवढ्यात जोशी काकांनी ४-५ स्वेटर्स त्यांच्या पुढ्यात टाकले.

जोशी काका – “हे घे स्वेटर्स आणले आहेत…तिकडे केदारनाथला खूप थंडी असते म्हणे…. “

सुलभा काकू स्वेटर उघडून बघत होत्या…. स्वेटर बघून त्यांना आश्चर्य झालं.

जोशी काका – “बघतेय काय….त्यात माझे पण स्वेटर्स आहेत. तेही पॅक कर.”

जोशी काकांचं बोलणं ऐकून सुलभा काकूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जोशी काकांना कळून चुकलं होतं कि बायकोमध्येच सर्वस्व आहे. ती आहे तर घर आहे.

जोशी काकांनी सुलभा काकूंना घट्ट मिठी मारली आणि सुनांना जोरदार आवाज दिला….

“स्वामीनी….विशाखा….पुढच्या आठवड्यात निघायचं आहे आम्हाला….जरा खायचं प्यायचं बघा सोबत नेण्यासाठी….आणि हो सुलभाला सगळं विचारून झालं पाहिजे… ” सुलभा काकू जोशी काकांना सुखावल्या नजरेने बघतच राहिल्या.

समाप्त “