Ritbhatmarathi

Search
Close this search box.

अभय हा मानेंचा एकुलता एक मुलगा. तो लहानपणापासूनच अगदी आदर्श मुलगा आणि आईबाबांचे देखील अभयवर जिवापाड प्रेम. लहानपणापासून अभयच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं बारीक लक्ष आणि मार्गदर्शन. अभयचे आईवडील खूप गरीब परिस्थितीतून आल्याने खूप काटकसरी. अगदी मोजूनमापून पाहुणचार करणारे, पै पै चा हिशोब ठेवणारे, अभयच्या शिक्षणासाठी थेंबे थेंबे तळे साचवणारे. अभय शाळेत असताना त्याला फ़ुटबाँलची गोडी लागली पण आईबाबांचे स्वप्नं होते की त्याने डॉक्टर व्हावे आणि सेटल व्हावे. अभय हुशार तर होताच, त्यामुळे त्याने आईबाबांचं स्वप्नं सहज पूर्ण केलं आणि फ़ुटबाँल ची आवड छंद म्हणूनच जोपासली. अभयने मुंबईला वैद्यकीय शिक्षण घेऊन तिथेच एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये प्रॅक्टिस चालू केली. एकटाच असल्याने लग्नानंतर आईवडील, अभय आणि अभयची बायको एकत्रच रहात. अभयची बायको माधवी हिदेखील उच्चशिक्षित – IIM मधून MBA केलेली. माधवीचे स्वप्नं होते स्वतःचा बिझिनेस सुरु करायचा म्हणूनच तिने मेहनतीने भारतातल्या सर्वोच्च बिझिनेस इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन मिळवली. थोडा अनुभव गाठीशी बांधून स्वतःचा बिझिनेस चालू करायचा असं ठरवून ती मुंबईत एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करत होती. दोघेही चांगले कमवत असल्याने पैशाची अजिबात काळजी नव्हती. माधवीला कंपनीत भरपूर पैसे मिळत असले तरी काम मात्र आवडत नव्हते. स्वतःचा बिसनेस सुरु करण्याच्या आयडिया घोळू लागल्या. तिला MBA चे बॅकग्राउंड तर होतेच आणि शिवाय तिचे IIM चे नेटवर्क देखील होते बिझनेस चालू करतांना मदत करायला. अभयला माधवीची बिझनेस आयडिया आवडली आणि आपल्या बायकोचा अभिमान वाटला. पण अभयच्या आईवडिलांना हे कळल्यावर त्यांनी मात्र ह्याला जोरदार विरोध केला. ‘सगळं चांगलं चाललं असतांना हे नवीन रिस्की उद्योग कशाला ‘ म्हणून त्यांनी नकारघंटा वाजवली. पै पै चा हिशोब ठेवणाऱ्या मध्यमवर्गीय विचारांना चांगला जॉब सोडून नवीन बिसनेस चालू करणे पटणारे नव्हतेच. आतापर्यंत बायकोचा अभिमान वाटणाऱ्या अभयचे विचार आईबाबांचे विचार ऐकून डगमगले. आईबाबा नेहमी बरोबरच असतात असे मानणारा आणि आतापर्यंत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा अभय आता मात्र गोंधळला. आपलं लॉजिक बाजूला ठेवून आपण ज्या व्यक्तींबद्दल आपल्याला आदर वाटतो त्या व्यक्तीच्या विचारांवर चालतो. इथेही असेच झाले.त्यानेदेखील माधवीला नकार दिला आणि माधवीचे स्वप्नं स्वप्नंच राहिले …
मोठ्यांनी सांगितलेल्या मार्गावरच लहानांनी नेहमी चालायचे का? का त्यांनी स्वतंत्र विचार करायला शिकायचे? आपल्या संस्कृतीत वयाने मोठ्या व्यक्तींना आपण नेहमी आदराचे स्थान देतो कारण त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात. पण म्हणून वैचारीक दृष्ट्या नेहमी त्यांच्यावर अवलंबून राहायचं का ? मुलांनी स्वतःच्या इच्छा, महत्त्वाकांशा, आवडीनिवडी जपण्यासाठी काही पाऊले उचलली की मोठे झाले ते आता, शिंगं फुटली असा निगेटिव्ह शेरा मारला जातो.
अभयच्या उदाहरणात, आईबाबांचे विचार ऐकल्यावर त्याने त्याचे विचार थांबवले आणि त्यांनी दाखविलेला मार्ग निवडला. अशाने त्याच्या निर्णयक्षमतेची, स्वतंत्र विचारक्षमतेची वाढ खुंटली. आईबाबांच्या अनुपस्थितीत तो कसे घेणार महत्वाचे निर्णय?! त्याचे आईबाबा त्यांच्या दृष्टीने बरोबर होते. कारण ते गरिबीत वाढले, पै पै चा हिशोब करून त्यांनी अभयला मोठे केले . आता एवढ्या वर्षांनी आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे तर ते सोडून का रिस्क घ्या? त्यांचे मत अभय आणि माधवीच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य असेलही पण ते त्यांच्यावर लादणे योग्य नाही. माधवीच्या दृष्टीने, तीने आतापर्यंत प्रचंड अभ्यास आणि मेहनत करून IIM सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून डिग्री मिळविली आणि आता तिला तिच्या शिक्षणाचा वापर करून स्वप्नं साकार करायचंय. तिच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करायचाय आणि ती भविष्यात कदाचित यशस्वी बिझिनेसवूमनदेखील होईल. जर माधवी आणि अभयने आईबाबांच्या विरोधाची कारणे समजून घेतली, त्यावर विचार करून निर्णय घेतला आणि आईबाबांनी माधवीच्या निर्णयाचा आदर करून तिला पाठिंबा आणि बरेवाईटाची जाणीव करून दिली तर काय वाईट आहे? माधवी ला आईबाबांच्या विचारांचा आणि अनुभवाचा फायद होणार.तिला तिचे स्पेस आणि स्वातंत्र्य मिळेल आणि स्वप्नं साकारण्याची संधी मिळेल.
इथे कोणीही चूक बरोबर नाही. प्रत्येकाची मते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहेत. पण मोठ्यांनी दाखवलेल्या वाटेवर तरुणांनी आंधळेपणाने चालणे मात्र नक्कीच चुकीचे आहे. ह्याचा अर्थ असा नक्कीच नाही की मोठ्यांची कुठलीच गोष्ट ऐकायची नाही. मोठ्यांनी दिलेल्या सल्ल्याचा आदर करावा, त्यावर विचार करावा आणि योग्य वाटल्यास आचरणात आणावा. मुले लहान असताना त्यांनी वडिलधाऱ्यांचे प्रत्येकवेळी ऐकावे. पण तरुणपणी मात्र स्वतंत्र विचार करता यायलाच पाहिजे. वडिलधाऱ्यांनी सुद्धा तरुणांच्या निर्णयांचा आदर केला पाहिजे, त्यांना स्वावलंबी होऊ दिले पाहिजे. मुलांच्या निर्णयाचा, इच्छेचा आदर करून सामंजस्याने चर्चा केली, मुलांना बरेंवाईटाची जाणीव करून दिली तर सर्वांगाने विचार करून जास्त योग्य निर्णय घेतले जातील. वडिलधार्यांनी सल्ला वेळोवेळी द्यावा पण जबरदस्ती नको. अशाने मोठ्यांच्या अनुभवाचा उपयोग लहानांना होईल, तरुणांची स्वतंत्र विचारशक्ती विकसित होईल आणि ते जबाबदार बनतील. स्वतः विचार न करता आंधळेपणाने दुसऱ्यांना फॉलो केल्याने आपल्या देशात घरगुती तंट्यांपासुन ते दंगलींपरेंत बरेच प्रॉब्लेम झाले आहेत.प्रत्येकाला शिंग फुटली असती तर कदाचित हे कमी प्रमाणात झालं असतं ….

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories