Ritbhatmarathi

Search
Close this search box.

जाणून घ्या श्रावणात सोमवारच्या दिवशी शंकराच्या पूजेला एवढं महत्व का आहे?

shravan somvar vrat :

हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना हा वर्षातील पाचवा महिना आहे. श्रवण नक्षत्रावरुन या महिन्याचे नाव श्रावण ठेवण्यात आले.

महादेव भोळा सांब आहे. त्याची पूजा कधीही करा तो प्रसन्न होतो तरीही श्रावण महिन्यात शंकर, पार्वतीची पुजा,आराधना, व्रत केल्यास जास्तीत जास्त फलप्राप्ती होते..यामागील कथा पाहू.

एक कथा अशी आहे की चंद्राला क्षयरोग झाला होता. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी चंद्राने श्रावण महिन्यातील दर सोमवारी शिवशंकराची आराधना केली व भोलेनाथ त्यावर प्रसन्न झाले. त्यांनी चंद्राला क्षयमुक्त केले. समस्या, दु:ख, कष्ट यांपासून भोलेनाथांनी आपणास दूर ठेवावे म्हणून श्रावणातल्या दर सोमवारी श्रावणी सोमवार हे व्रत भाविक करतात.

दुसरी कथा अशी आहे की शंकराची पत्नी सती हिने प्रण केला होता की प्रत्येक जन्मात शिवाचीच पत्नी होईन. सतीच्या दुसऱ्या जन्मात तिने हिमाचल राजा व मैनाराणीच्या पोटी जन्म घेतला. ही पुत्री म्हणजे पार्वती. पार्वती शंकरावर मोहित झाली. त्यांना प्राप्त करण्यासाठी तिने घोर तपश्चर्या केली. शेवटी शंकर पार्वतीवर प्रसन्न झाले व त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. कार्तिकेय व गणेश ही त्यांची दोन तेजस्वी मुले.

शंकर व पार्वतीस आदर्श जोडपे मानतात व श्रावणी सोमवारी विवाहोच्छुक मुली शंकरासारखा एकनिष्ठ पती मिळूदेत यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत धरतात. विवाहित स्त्रिया या आपल्या पतीस धन,ऐश्वर्य, उत्तम आरोग्य प्राप्त होवो म्हणून शंकराची पूजा,आराधना,उपवास दर श्रावणी सोमवारी करतात.

अगरबत्ती, धूप,कापूर, तुपाचा दिवा, पांढरी फुले, बेलफळ, पाणी, दूध, पंचाम्रुत, भस्म,चंदन,अत्तर, बिल्वपत्री, शिवामुठ,गुलाल,बुक्का, गणेशपुजनासाठी हळदीकुंकू,लाल फुल.

सकाळी स्नान करुन पांढरे वस्त्र परिधान करावे.

वर नमूद केलेले साहित्य घेऊन शिवालयात जावे. तिथे आसनावर बसून शिवशंकराची व पार्वती मातेची पूजा करावी किंवा घरात धातुची शिवपिंडी असल्यास तिची पूजा करावी.

 • प्रथम गणेशास जलाभिषेक करावा मग दूध, पंचाम्रुत व परत जलाभिषेक करावा. मुर्ती कोरड्या फडक्याने पुसावी.
 • चौरंगाभोवती रांगोळी रेखाटावी.
 • चौरंगावर पांढरे वस्त्र आच्छादावे.. त्यावर थोडे तांदूळ ठेवून तांदळावर श्रीगणेशाच्या मुर्तीची स्थापना करावी.
 • मुर्तीला हळदकुंकू वहावे, दुर्वा वहाव्या, फुले वहावी, धुप,दिपाने ओवाळावे.
 • शंकराच्या पिंडीसही प्रथम जलाभिषेक करावा नंतर गाईच्या कच्च्या दुधाचा नंतर पंचाम्रुताचा अभिषेक करावा. परत पाण्याने अभिषेक करून पिंडी कोरड्या फडक्याने पुसावी.
 • ताम्हणात बिल्वपत्र ठेवून त्यावर पिंडी ठेवावी.
 • पिंडीस पांढरी वस्त्रमाला वहावी. मोगरा,निशिगंधा,जाई,जुई,तगर अशी पांढरी सुगंधी फुले,नारळ वहावा, तीन/पाच/एकशे आठ अशी बिल्वपत्र ओम नम: शिवाय हा जप तोंडाने करत पिंडीवर वहावी. धोतऱ्याचे फळ, बेलफळ वहावे.
 • शिवामुठ वहावी.
 • पार्वतीच्या फोटोस हळदकुंकू, फुल वहावे.
 • शिवपार्वतीला अगरबत्ती, धुपादिपाने ओवाळावे.
 • खडीसाखरेचा अगर मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा.
 • आरती करावी, शिवलिलाम्रुत वाचावे.
 • संध्याकाळी गोड नैवेद्य करून देवास दाखवावा.
 • आरती करावी व उपवास सोडावा.

मंगळा गौरीची माहिती मराठीत

आषाढी एकादशीचे महत्व आणि माहिती

जेजुरीचे खंडेराया माहिती आणि इतिहास नक्की वाचा (jejuri khandoba)

 • पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळाची शिवामुठ वहावी. मुठीत मावतील इतके तांदूळ शिवपिंडीवर वहावे. असे केल्याने आर्थिक सुबत्ता येते.
 • दुसऱ्या सोमवारी पांढऱ्या तीळाची शिवामुठ शिवपिंडीवर अर्पण करावी. असे केल्याने दुर्धर रोगांपासून मुक्तता मिळते.
 • तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामुठ वहावी. त्यामुळे आपल्या जीवनातील समस्या दूर होतात.
 • चौथ्या श्रावणी सोमवारी मुठीत मावतील एवढे जवस शिवाच्या पिंडीवर वहावेत. याने घरात सुख,सम्रुद्धी येते.
 • पाचव्या सोमवारी सातूची शिवामुठ वहातात. याने घरात अन्न,धान्य व विद्या यांची तूट जाणवत नाही.
 • जर पाचवा सोमवार श्रावण महिन्यात येत नसेल तर जवाची व सातूची अशा दोन्ही मुठी चौथ्या सोमवारी शंकराच्या पिंडीवर वहाव्यात.

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला.
पहिला सोमवार आला. ही रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, “बाई बाई, कुठं जातां?” ” महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतों.” “यानं काय होतं?” “भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडतीं माणसं आवडतीं होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते.” मग त्यानीं हिला विचारलं, “तूं कोणाची कोण?” “मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते.”

 त्यांचेबरोबर देवळांत गेली. नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, “काय ग बायांनो वसा वसतां?”, “आम्ही शिवामुठीचा वसा वसतों.” “त्या वशाला काय करावं?” “मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाचीं पानं घ्यावीं. मनोभावं पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ  ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊं नये. दिवसा निजूं नये. उपास नाहीं निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळीं आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्‍यास तीळ, तिसर्‍यास मूग, चवथ्यास जव आणि पांचवा आला तर सातू शिवामूठीकरितां घेत जावे.”

पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं, आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला संगितलं. त्या दिवशीं हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानणंदांनीं उष्टंमाष्टं पान दिलं. तें तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली.

 पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरांतून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावें पूजा केली आणि “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळीं सासर्‍यानं विचारलं. “तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, “माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, कांटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे.”

पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊं लागली. घरचीं माणसं मागं चाललीं. “नावडते, तुझा देव दाखव,” म्हणून म्हणूं लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता. तिला कांहीं वाटलं नाहीं. ह्यांना कांटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे.

नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनीं देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करूं लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून शिवाला वाहिलें.

राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं. इकडे देऊळ अदृश्य झालं.

राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं देवळाकडे आणायला गेला. तों तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हां त्यांने सुनेला विचारलं, ” हें असं कसं झालं?” “माझा गरिबाचा हाच देव. मीं देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांला दर्शन दिलं.” सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखींत घालून घरीं आणलं. नावडती होती ती आवडती झाली.

जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी. पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

श्रावणी सोमवारी केलेल्या शिवपुजेचे, व्रताचे तत्काळ फळ मिळते. महादेवाची पूजा,उपासना,नामस्मरण करण्यासाठी हा सर्वोत्तम महिना मानतात.
शिवाचे माहात्म्य वर्णिलेले स्तोत्रपठण करावे,मंत्रजप करावे.

=========

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *