Ritbhatmarathi

Search
Close this search box.

महेशचा आज फॅक्टरीत साहेबांच्या हस्ते सत्कार होणार होता.प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम केल्याबद्दल त्याला अवॉर्ड मिळणार होतं. त्याने मोबाईल ठेवायला ऑफिसची बॅग उघडली आणि त्याचा आईबाबांबरोबर गावच्या जत्रेत काढलेला हसरा फोटो दिसला.तो फोटो तो कायम जवळ ठेवत असे.ते हास्य नंतर कितीतरी वर्ष तिघांनाही दुरापास्त झालं होतं.त्याचे डोळे भरून आले.इथवर घडलेलं सगळं डोळ्यांपुढे आलं…..

  
      महेशने दप्तर उचललं आणि वर्गाच्या बाहेर पडू लागला.शेवटला तास संपला होता.शाळा सुटली होती.पायातल्या चपलेचा अंगठा तुटला होता त्यामुळे पाय ओढत चालावं लागत होतं.मागून त्याच्या खांद्यावर थाप पडली म्हणून त्याने वळून बघितलं. शिवा आणि बरोबर त्याचे मित्र होते.

  “ए महेश,मी शाळेत आज आलो नव्हतो हे घरी कळू द्यायचं नाही.काही सांगितलंस तर माझ्याशी गाठ आहे. आमच्या तुकड्यांवर वाढणारा तु,गप बसायचं.समजलं का?”शिवा मग्रुरीने बोलला.
महेशने मान डोलावली आणि तो झपाझप चालू लागला.चप्पल तुटल्यामुळे पाय वेडेवाकडे पडत होते पण त्याला लवकर घर गाठायचं होतं.

   घरात आल्यावर त्याने दप्तर ठेवलं,हातपाय धुतले आणि देवाला नमस्कार केला.
  “महेश,असा घाबरल्यासारखा का दिसतो आहेस?काय झालं?” सुमतीने विचारलं.
 
  “आई,शिवा माझा कुठला भाऊ लागतो ग?तो माझ्याशी कधीही नीट बोलत नाही.आमच्या तुकड्यांवर जगणारा,असं नेहमी बोलतो.”
आठ वर्षांच्या महेशला काय उत्तर द्यावं सुमतीला कळेना.

  “अरे,शिवाचे आजोबा नाना आणि बाबांची आई लांबचे बहीणभाऊ होते.बाबांचे आईवडील त्यांच्या लहान वयातच देवाघरी गेले,मग बाबांना नानाआजोबांनी वाड्यात आणलं आणि पोटच्या पोरासारखं सांभाळलं.आपण राहतोय ते घर देखील नानाआजोबांचेच आहे. माझ्या वडिलांचे आणि नानांचे जिव्हाळ्याचे संबंध म्हणून मला सून करून घेतली.शिवाचे वडील रणजीत मात्र बाबांशी कधीही नीट वागले नाहीत.कायम आश्रितासारखी वागणूक देतात.आणि आता हा शिवा तुझा रागराग करतोय.रणजीत नानांचा मुलगा पण त्यांना वडिलांचा मान देत नाही.”सुमतीने सुस्कारा सोडला.

   नानासाहेब ह्या भव्य वाड्याचे मालक.जमीनजुमला भरपूर होता.दहा एकर शेती पण होती.पण नानांचा मुलगा रणजीत वाया गेलेला होता.पैशांची उधळपट्टी करणे आणि मित्रांबरोबर उनाडक्या करणे ह्यात दिवस घालवायचा.बापाच्या पैशावर मजा करणारा एक बेफिकीर युवक.लग्नांनतर सुधारेल असं नानांना वाटलं म्हणून जवळच्याच गावातली सावकाराची मुलगी सून म्हणून घरात आणली.पण रणजीतमधे काडीचाही फरक पडला नाही.नानांचा दिवाकरवर फार विश्वास.आणि महेश हा दिवाकरचा मुलगा म्हणून तो देखील लाडका होता.शेतीची सगळी कामं, पेरणी,धान्यसाठा,विक्री सगळं दिवाकर बघत होता.महिन्यानंतर तो नानांना चोख हिशोब देत असे.

  एक दिवस अचानक नानांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले.दवाखान्यात दाखल करावं लागलं.वय झाल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा नीट होत नव्हता,असं निदान झालं.चार दिवस दवाखान्यात इलाज करून घरी आणले.

     नानांना कसल्यातरी काळजीने पोखरलं. आपला मुलगा उडाणटप्पू,इस्टेटीचा नीट सांभाळ करेल की फक्त उधळेल ही काळजी त्यांना वाटायला लागली.एक दिवस नानांनी दिवाकरला त्यांच्या खोलीत बोलावून घेतले.
  “दिवाकर,मी आता फार जगेन असं वाटत नाही
.मी रणजीतच्या नावावर इस्टेट केलीय पण मला त्यात बदल करायचा आहे.शेती तुझ्या नावावर करायची आहे.तु निगुतीने सांभाळशील, नाहीतर सगळंच हाताबाहेर जायचं.”

  “नाना,आधी तुम्ही पूर्ण बरे व्हा,मग आपण बोलू.”दिवाकर म्हणाला.

“नाही रे बाळा,माझ्याकडे आता वेळ नाही.उद्याच आपल्या वकिलांना बोलावून घे.मी मृत्युपत्र बदलतो.”नानांचा आवाज थरथरला.

  “बरं बरं, बघू, तुम्ही आता विश्रांती घ्या.”दिवाकरने त्यांच्या अंगावरचं पांघरूण सरळ केलं आणि तो खोलीच्या बाहेर आला.दारात त्याला रणजीत दिसला.त्याच्या नजरेत त्याला विखार स्पष्ट दिसला. रणजीतने आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना,अशी दिवाकरला शंका आली.तो काही न बोलता तिथून निघून गेला.

  दुसऱ्या दिवशी दिवाकर शेतात काम असताना अचानक चार पाच गावगुंडांना घेऊन जीपमधून रणजीत तिथे आला.जीपमधून उतरला आणि दिवाकरजवळ आला.चेहऱ्यावर मग्रुरी होती.श्वासाला दारूची दुर्गंधी येत होती.अडखळतच तो दिवाकरशी बोलायला लागला, “माझ्या बापाची,म्हाताऱ्याची बुद्धी फिरलीय.तुझ्या नावावर शेती करणार असं मी काल खोलीबाहेरून ऐकलं.गपगुमान आत्ताच्या आत्ता बायको,मुलासकट गाव सोडायचं, नाहीतर त्या म्हाताऱ्याचा मी गळा दाबून त्याला मारून टाकेन आणि तू इस्टेटीसाठी त्याला मारलं असं सांगेन.आमच्या तुकड्यांवर तुला पोसलं आणि आता तू मालकी दाखवणार व्हय.संध्याकाळच्या आत गाव सोडलं नाहीस तर माझ्यासारखा वाईट नाही.”

   रणजीतचं ते बोलणं ऐकून दिवाकर घाबरला.रणजीतचा खुनशी स्वभाव त्याला ठाऊक होता. तो काहीही करायला मागेपुढे बघणार नाही,हे त्याला कळून चुकलं.तो तसाच घराकडे निघाला.

   “सुमती,ताबडतोब आवश्यक ते सामान घे,आपल्याला गाव सोडून जायचं आहे.”दिवाकरने सामानाची बांधाबांध सुरू केली.

  “अहो,पण झालं तरी काय?असं अचानक कुठे जाणार आपण?आपलं नानांशिवाय दुसरं कोण आहे ?”सुमती घाबरली.

  “वाट फुटेल तिकडं जायचं.मला प्रश्न विचारू नकोस.आवर पटपट.महेशबाळा,तुझे कपडे ह्या पिशवीत ठेव.”

  “बाबा,काय झालं?आपण कुठे जायचं?”महेश रडकुंडीला आला.

  “माझ्याकडे ह्याक्षणी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं नाहीत.फक्त लवकरात लवकर इथून बाहेर पडायचं.”दिवाकरला छातीत दाटून आलं. त्याचा जीव नानांसाठी तुटत होता.

   आवश्यक ते कपडे,सामान आणि भांडी घेऊन तिन्हीसांजेच्या आत दिवाकर घराबाहेर पडला.रस्त्यात प्रत्येकजण कुठे चालला म्हणून चौकशी करत होता.दिवाकरने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि बसस्टॅण्डपाशी आला.मिळेल त्या बसमधे तो बसला.शेवटला स्टॉप सातारा होता.तिघेही त्या रात्री सातारा स्टॅण्ड वर झोपले.दुसऱ्या दिवशी दिवाकरने मुंबईची बस धरली.मुंबईत माणूस उपाशी राहत नाही हे त्याने ऐकलं होतं.

    मुंबईसारख्या महानगरीत दिवाकर आला खरा, पण पुढे काय ह्या विचाराने खचला.डोळ्यांपुढे सगळा अंधार होता.रोजच्या भाकरीची सोय कशी करायची हा प्रश्न आ वासून उभा होता.उपाशी तरी किती दिवस राहणार?महेशच्या काळजीने त्याचे डोळे भरून आले.सुमतीने हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याचे डोळे पुसून म्हणाली, “तुम्ही एकटे नाही.मी आहे तुमच्याबरोबर. महेशला आपण कमी पडू द्यायचं नाही.सुरवातीला थोडं जड जाईल पण देव पाठीराखा आहे.काहीतरी मार्ग निघेल.”

  चार दिवस तसेच स्टेशनवर काढले.आता हजार रुपये फक्त उरले होते.काही काम मिळतं का बघायला दिवाकर निघाला. “सुमती, इथून कुठेही हलू नका.मी काही काम मिळतं का बघून येतो.

  दिवाकर स्टेशनच्या बाहेर पडला.थोड्याच अंतरावर त्याला एक मालवाहू गाडी उभी दिसली.त्या गाडीच्या ड्रायव्हर जवळ जाऊन तो हात जोडून म्हणाला,
  “दादा,कुठे काम मिळेल का तुमच्या ओळखीने?”

    ड्रायव्हरने त्याच्याकडे बघितलं. त्याला दिवाकर खरंच गरजू आहे हे कळलं.
  “आमच्या मालकांना भेट.त्यांना गोडाऊनसाठी हमाल हवे आहेत.चल माझ्याबरोबर.तुझी भेट करून देतो.”

  दिवाकरला अत्यानंद झाला.अखेर देवाने हाक ऐकली होती.धान्याचं गोडाऊन सांभाळणाऱ्या मॅनेजरला तो भेटायला गेला.
  “साहेब,काही काम मिळालं तर बरं होईल.मला वाहन चालवता येतं. माझी सामान वाहण्याची पण तयारी आहे.”

  “इथे ड्रायव्हर कमी पडताहेत.आज तुम्ही ही गाडी घेऊन जा.आमचा माणूस तुमच्या बरोबर येईल.तुमचं काम बघून पुढचं ठरवू.” मॅनेजर म्हणाला.

  “धन्यवाद साहेब.”

   दिवसभर मालाची नेआण केली त्याचे दिवाकरला जेमतेम पाचशे रुपये मिळाले.संध्याकाळ होऊन गेली.स्टेशनवर सुमती,महेश वाटच बघत होते.दिवाकरला जे दिसलं त्याने तो घाबरून गेला.महेश तापाने फणफणला होता.सुमती त्याला मांडीवर घेऊन दिवाकरचीच वाट बघत होती.आठ दिवस जी तिघांची हेळसांड झाली होती,त्याचा परिणाम महेशच्या प्रकृतीवर झाला.सरकारी दवाखान्यात महेशला नेलं.श्रमाने त्याला ताप आला होता.मिळालेले पाचशे रुपये देखील संपले.
  
    गोडाऊनच्या रोजगारीमुळे खाण्याचा प्रश्न तर मिटला होता.आता राहायची सोय बघायला हवी होती.महेशच्या भवितव्यासाठी दिवाकर आणि सुमतीची कुठलेही कष्ट करायची तयारी होती.

  गोडाऊनच्या मॅनेजरला दिवाकरने विनंती केली,
  “साहेब,थोडे दिवस गोडाऊन मधे राहू द्या.जागा बघितली की बायको मुलाला घेऊन जाईन.”

  “मुंबईत जागा इतकी स्वस्त आहे का?आणि इथे कुठे राहणार?रात्री उंदीर,घुस सगळीकडे फिरत असतात.”

  “स्टेशनवर उघड्यावर झोपलो साहेब,इथे निदान डोक्यावर छप्पर तरी मिळेल.फक्त झोपण्यापुरती राहू द्या साहेब.वडा पाव खाऊन पोट भरू.”

  “ठीक आहे,आठवडाभर रहा.पण त्यापेक्षा जास्त मी परवानगी देऊ शकत नाही.”

  “खूप उपकार झालेत साहेब.”

  दिवाकरने नानांची सेवा केली,त्यांच्याशी प्रामाणिक राहिला त्याचं फळ म्हणून की काय,माणसं सगळी मदत करणारी भेटत होती.

  रोज दिवसभर काम करून झाल्यावर दिवाकर जागेसाठी वणवण फिरायचा.शेवटी गोडाऊनजवळच एका मोठ्या चाळीत महिना दोन हजारावर एक खोली मिळाली.अतिशय जुनी,अस्वच्छ चाळ होती पण दुसरा काही पर्यायच नव्हता.

    चाळीत बस्तान बसवल्यावर सुमतीने जवळपासची स्वयंपाकाची कामं घेतली.महेशला नगरपालिकेच्या शाळेत दाखल केलं.आता महेशचा शाळेचा खर्च आणि धान्य इतका तरी खर्च भरून निघत होता.दिवाकरच्या कामावर खुश होऊन फॅक्टरीच्या मालकांनी त्याला स्वतःच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून नेमले.

    “दिवाकर,तुझ्यासारखा सज्जन,प्रामाणिक माणूस विरळाच.तुझी हरकत नसेल तर एक विचारू का?”
  फॅक्टरीचे मालक पेठे म्हणाले.

  “साहेब,आज्ञा करा.तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत.माझं आयुष्य तुमच्यामुळे मार्गी लागलं.”

  “तुझी पत्नी आमच्या घरी दिवसभरासाठी काम करेल का?सकाळी आठ ते रात्री आठ.पडेल ते काम करावं लागेल.माझ्या ओळखीने तुला आमच्या घराजवळच मी भाड्याने वनरुम किचन बघून देतो.महेशचा शिक्षणाचा खर्च मी करेन सगळा.तू आणि तुझी पत्नी विचार करून मला निर्णय कळवा.”

  “साहेब,अहो विचार कसला करायचा?मागच्या जन्माचं पुण्य माझं,तुम्ही माझ्या आयुष्यात आला.सुमती करेल सगळं काम.खूप खूप उपकार झाले साहेब.” दिवाकरचे मन आनंदाने भरून आले.

      साहेबांच्या घराजवळच दिवाकरने एक खोली भाड्याने घेतली.सुमती आता दिवसभर मालकांकडली सगळी कामं करू लागली.रात्री दोघेही बरोबरच घरी येत.महेशची शाळेत उत्तम प्रगती होत होती.त्याची हुशारी बघून पेठे साहेबांनी त्याला चांगल्या शाळेत घातले.

   आपल्या आईवडिलांचे कष्ट महेश लहानपणापासून बघत होता.गाव कशासाठी सोडावं लागलं हे दिवाकरने, तो जरा मोठा झाल्यावर त्याला सांगितलं.त्यांचे कष्ट बघून तो अनेकदा एकटा असताना रडत असे.त्याने ठरवलं,खूप शिकायचं आणि पैसे मिळवून त्यांना सुखात ठेवायचं.

  महेश सी ए झाला आणि मालकांनी त्याला त्यांच्याच फॅक्टरीमधे नोकरी दिली.आईवडिलांचा आदर्श डोळ्यांसमोर होताच.महेशने प्रामाणिकपणे काम करून आपल्या पगारातून मालकांनी त्याच्या शिक्षणासाठी दिलेले पैसे देखील फेडले कारण स्वाभिमानी वृत्ती त्याने आईवडिलांची घेतली होती.दिवाकर,सुमतीही आता थकले होते.

   आणि आज फॅक्टरीत उत्तम काम केल्याबद्दल महेशचा सत्कार होता.

  फॅक्टरीचे सभागृह कर्मचाऱ्यांनी भरले होते.उत्तम कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा आज सत्कार होता. महेशने दिवाकर आणि सुमतीला देखील बरोबर आणले होते.
महेशला मालकांनी अवॉर्ड घ्यायला स्टेजवर बोलावले.
त्याच्या हातात ते अवॉर्ड आणि धनादेश देणार इतक्यात महेशने त्यांना थांबवले आणि माईक घेऊन बोलू लागला,
  “मी साहेबांचा शतशः ऋणी आहे.त्यांनी माझ्या शिक्षणाचा भार उचलला म्हणून मी आज इथवर आलोय.आज हे अवॉर्ड मी माझ्या आईवडिलांना देऊ इच्छितो. एका प्रसंगाने आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली पण खचून न जाता,माझ्या आईबाबांनी परिस्थितीला जे धैर्याने तोंड दिलं,ते मी सगळं बघितलं आहे.त्यांचे कष्ट बघवत नव्हते पण मी काहीच करू शकत नव्हतो.वटवृक्षाच्या सावलीत मी वाढलो.उनपाऊस कशाचीही तमा न बाळगता त्यांनी मला वाढवलं. दोघांनी सगळ्या हालअपेष्टा सहन केल्या पण मला झळ पोहोचू दिली नाही.माझं हे यश त्यांच्याच कष्टाचं फळ आहे.”
महेश स्टेजवरून खाली आला आणि त्याने दिवाकर आणि सुमतीला हात धरून स्टेजवर आणले.मालकांना ते अवॉर्ड दिवाकरच्या हातात द्यायला सांगितलं आणि धनादेश सुमतीला द्यायची विनंती केली.महेशने दोघांनाही वाकून नमस्कार केला.

       मुलाचं हे यश बघून दिवाकर आणि सुमतीचे डोळे भरून आले.आपल्या यशस्वी मुलाला बघून दोघांनाही कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं….

                         – -समाप्त–

    ©️®️सौ मधुर कुलकर्णी, पुणे

=====================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *