Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® सौ. गीता गजानन गरुड.

अंधारुन आलं तरी अरुंधतीने घरात दिवे लावले नव्हते. हळूहळू अंधार गडद होत चालला होता. अरुंधतीला तो काळाकभिन्न अंधार डोक्यापासून पावलांपर्यंत ओढून घ्यावासा वाटत होता. अगदी नखसुद्धा कुणाला दिसू नयेसं वाटत होतं तिला.

कमालीची निराशेने ग्रासलेली अरुंधती. तिला खूप खूप रडावसं वाटत होतं. भेसूर आवाजातलं तिचं ते रडणं घराच्या चार भिंतीत मुरत होतं.

माहेरी चारचौघींसारखंच आयुष्य होतं, तिचं. वयात आली तसं आईवडिलांनी साजेसं स्थळ पाहून लग्न लावून दिलं. अरुंधतीने नवऱ्यासोबत टुकीने संसार केला. देवधर्म, कुळाचार, पाहुणेरावळे सगळं यथासांग करत होती. त्यांच्या संसारवेलीला दोन साजिरी फुलं फुलली. बघता बघता मुलं मोठी झाली. मोठा दिनकर जात्याच हुशार. उच्चशिक्षणासाठी तो परदेशी म्हणून गेला. बुद्धी व रुपाच्या जोरावर  तिथेच नोकरी नं छोकरी दोन्ही  पटकावली.

धाकटा दर्शन..चारचौघांसारखीच बुद्धी. दिसायलाही सामान्य. शिक्षणात मोठ्या भावाच्या दोन पावलं मागेच होता पण अरुंधतीने मुलांमध्ये कधी तुलना केली नाही. दर्शनचे पप्पा कधी त्याच्या अंगावर आले तर अरुंधती ढाल बनून त्याची पाठराखण करी.

दोन वर्षांपूर्वी अरुंधतीचे यजमान गेले, अगदी ध्यानीमनी नसताना अचानक. त्यांची मोटारसायकल एका ट्रकचा धक्का लागून लांबवर उडाली होती. ते झाडीत पडलेले आढळले पोलिसांना पण जागेवरच सगळं संपलं होतं.  नेमका त्याचदिवशी लग्नाचा वाढदिवस होता त्या दोघांच्या.

त्यांच्या ब्यागेत सापडलेली हिरव्या पानांत गुंडाळलेली ती सोनचाफ्याची फुलं..तिची आवड लक्षात ठेवून लग्नाच्या दर वाढदिवशी आणली जायची ती फुलं..त्यानंतर मात्र कधी तिने ती माळली नाहीत की हुंगलीही नाहीत. महिन्याभरात दु:खाची गोधडी बाजूला सारून उठली ती.

न उठून सांगते कुणाला! पदरात दोन मुलं..त्यांना वाढवायचं होतं. सगळे व्यवहार बघायचे होते. दु:ख साजरं करायचंही काही जणांच्या भाग्यात नसतं. जोडीदाराच्या आठवणी ह्रदयाच्या कप्प्यात बंदिस्त करुन रहाटगाडगं चालू ठेवलं तिने. पुर्वी नोकरीची गरज काय त्यापेक्षा मुलांना सांभाळू असा सहज विचार करणारी ती चार जणांकडे नोकरीसाठी शब्द टाकू लागली. एका पतपेढीत मिळालीही तिला नोकरी. मुलांना ट्युशनला घातलं. तिथून ती परस्पर शाळेत जायची. मुलं घरी येईस्तोवर ही आलेली असायची.

मुलंही फार लवकर शहाणीसुरती झाली. दिनकर पुस्तकातला किडाच होता पण दर्शनचं तसं नव्हतं. पोटापुरता अभ्यास झाला की खोली आवरुन घ्यायचा,  कुंडीतल्या झाडांना पाणी घालायचा, इतकंच काय दूध गरम करुन आई यायच्याआधी चहाही करुन ठेवायचा.

काळचक्र त्याच्या वेगाने सुरु होतं. जे हयात असतात त्यांना काळाच्या चाकासोबत घिरट्या घालाव्याच लागतात. अरुंधतीच्या मानसिक जखमेवरही काळाची खपली धरली होती. निवांत वेळ मिळाला, कधीकुठे सणासमारंभाला गेली की ती जखम आतल्याआत ठुसठुसे पण तेवढंच ते. नियतीने ओढलेला आसूड झेलून अरुंधती आता निबर झाली होती.

दिनकरला स्कॉलरशिप मिळाली. तो पुढील शिक्षणासाठी परदेशात गेला मग तिकडेच लग्न केलन..एक औपचारिकता म्हणून आईला कळवलंन. दर्शन मात्र अरुंधतीसोबत होता. त्याचं कॉलेज झालं. स्पर्धापरीक्षा देऊन नोकरी मिळाली. पगारही चांगला होता. पुढे प्रमोशनला स्कोप होता.

एकेदिवशी अरुंधतीचा धाकटा भाऊ त्याच्या मुलीला घेऊन अरुंधतीच्या घरी आला. आपल्या मुलीसाठी तो दर्शनचा हात मागत होता. अरुंधतीने दर्शनला विचारुन कळवते असं सांगितलं.

दर्शन दोन दिवसांसाठी फिरतीवर गेला होता. तो येताच अरुंधतीने त्याला मामा येऊन गेल्याचं व मामाच्या लेकीचं स्थळ त्याच्यासाठी आल्याचं सांगितलं. दर्शनला मामाची सोनम पसंत होतीच. त्याने होकार दिला. अरुंधतीने मग थोरल्याला कळवलं. दिनकरला यायला वेळ नव्हता, तो म्हणाला, “तुम्ही तयारीला लागा. आमच्या शुभेच्छा आहेत.”

या लग्नात मात्र अरुंधतीने सगळ्या नातेवाईकांना मनाजोगत्या भेटवस्तू दिल्या. यजमानांची उणीव पदोपदी जाणवतच होती. स्वत:चीच भाची सून म्हणून घरात येणार असल्याने तिला विशेष काही एडजस्ट करावं लागणार नाही असं तिचं मन म्हणत होतं. लग्नातला दर्शनचा हसरा,समाधानी चेहरा सारखा तिच्या डोळ्यासमोर येत होता.

नवीन जोडपं मधुचंद्राहून परतलं. अरुंधतीला त्या दोघांशी खूप खूप बोलायचं होतं खरं पण त्यांचे उतरलेले चेहरे पाहून तिचा धीरच झाला नाही. दोघांत काहीतरी बिनसलय एवढं मात्र तिला कळलं होतं, नव्हे तिची ठाम खात्री झाली होती पण या नवराबायकोच्या भांडणात आपण पडायचं नाही असं तिने स्वत:ला बजावलं. होतील एक..तिने तिच्या मनाची समजूत घातली .

अरुंधती भूतकाळात हरवायची. तिला तिचे नव्यानवलाईचे दिवस आठवायचे. ती व तिचे यजमान दिवसा कितीही भांडले तरी रात्री दोघं एकमेकांच्या मिठीत असायचे. भांडणाचे पडसाद आपल्या प्रेमजीवनावर पडू द्यायचे नाही असं त्यांनी लग्नाआधीच ठरवलं होतं. दोघंही समंजस होती.

थोरला दिनकर..बायकोला  आईच्या पाया पडायला एकदा घेऊन आला होता खरा पण त्या पंधराएक दिवसांतही त्यांचे फिरण्याचेच कार्यक्रम जास्त होते. दिनकराच्या डॉलीशी अरुंधतीची नाळ जुळलीच नाही. हाय, हेलोच्यापुढे गाडी सरकली नाही.

जे लाड थोरल्या सुनेचे करावयास जमलं नव्हतं ती कसर आता भरुन काढायची,  सोनमचे खूप लाड करायचे असं तिनं ठरवलं होतं. सोनमला खूष करण्याचा ती प्रयत्नही करत होती पण सोनम खुलतच नव्हती. सख्खी भाची असुनही हातचं राखून वागत होती.

अरुंधतीने सोनमला विचारायचा प्रयत्न केला की काही सलतय का तिच्या मनात. तू सुखी नाहीस का? म्हणून विचारलं होतं पण अरुंधतीच्या या प्रश्नावर सोनम निव्वळ हसली होती. तिच्या हसण्यातला विषाद अरुंधतीला जाणवला होता नं तिच्या छातीत चर्र झालं होतं.

काहीतरी हातून सुटत चाललं आहे, पुढे येणाऱ्या संकटाची ही नांदी तर नव्हे..या विचारांनी अरुंधतीच्या सर्वांगाला घाम फुटला. योग्य संधी मिळताच तिने दर्शनपाशी विषय काढला.

अरुंधती व दर्शन दोघे गच्चीवर फेऱ्या मारीत होते. सोनम माहेरी गेली होती. पंधरा दिवस झाले तरी परतायचं नाव नव्हतं तिचं.

“बरं चाललय ना तुमचं दोघांचं?” अरुंधतीने दर्शनला विचारलं.

“असं का विचारतेस आई?” दर्शन चाचरत म्हणाला व चांदण्या नसलेल्या काळ्याशार आकाशाकडे एकटक बघत राहिला.

“सोनम कधी येणार?  का तू जातोयस आणायला?” अरुंधतीने अगतिकतेने विचारलं. तिच्या प्रश्नावर तो काहीच बोलला नाही. तसाच आकाशाकडे बघत राहिला एकटक. अरुंधतीला अगदीच अगतिक वाटला तो. त्यानंतर मात्र तिने सोनमचा विषय काढायचं टाळलं.

शेजारपाजारची नव्या सुनेबद्दल चौकशी करु लागली तसं तिने काहीतरी बनवलेलं उत्तर दिलं पण असं खोटं बोलणं तिच्या मनाला मुळीच पटेना. तिने विचार केला..भावाला तरी फोन लावू आणि तिने केलाही भावाला फोन.

“हेलो भाई”

“हा बोल अरु. सुनबाईशिवाय करमत नाही वाटतं.”

“खरंच भाई. आठवण येतेय सोनमची. कधी येणार ती?”

“राहुदेत गं माहेरी तिला पोट भरेस्तोवर. मी तरी कसं विचारु कधी जातेस म्हणून!”

अरुंधतीला भावाचं म्हणणं पटलं. भावाने सोनमकडे फोन दिला तशी ती सोनमशीही बोलली पण तिला जाणवलं की सोनम तिच्याशी मनापासनं बोलत नाहीए तर फक्त औपचारिकता म्हणून बोलतेय.

असेच काही दिवस गेले.

दर्शन दिवसेंदिवस रोड होत चालला होता. त्याचं खाण्यावरचं लक्ष उडालं होतं. अरुंधतीला कळत होतं..लेक आतल्याआत कुढतोय.

गुळगुळीत दाढी, स्वच्छ, इस्त्रीचे कपडे घालणारा, स्वत:च्या पेहरावावर खास लक्ष देणारा दर्शन आता गबाळ्यासारखा राहू लागला. दाढीचे खुंट वाढले होते, जागरणाने डोळे खोल गेले होते व निस्तेज दिसत होते.

मधे थोरल्या लेकाचा फोन आला तेंव्हा अरुंधतीने त्याला दर्शनविषयी सांगितलं, काळजी व्यक्त केली पण दिनकरने तो विषय फारसा मनावर घेतला नाही. दिनकर व दिनकरच्या बायकोतही काहीतरी बेबनाव असावा अशी पुसटशी शंका तिला दिनकराच्या बोलण्यातून चाटून गेली.

अरुंधती दर्शनला हरतर्हेने खूष ठेवायचा प्रयत्न करत होती. त्याच्या आवडीचे पदार्थ करुन खाऊ घालत होती पण त्याची अन्नावरची वासनाच उडाली होती. तो नुसतंच अन्न चिवडल्यासारखं करायचा.

अशाच एका वैशाखातल्या दुपारी, अरुंधती घरातली आवराआवर करुन उन्हाला पहुडली होती. बाहेरच्या गुलमोहराला लाल फुलं उमलली होती नं ती हिरव्यागार पर्णपिसाऱ्यामध्ये अधिकच खुलून दिसत होती. खिडकीतून दिसणारं  तिच्या वाटेचं तुकडाभर आकाश, त्यात डोलणारे झाडांचे तुरे , मधेच उडणारा एखादा चुकार पक्षी पहायला तिला मनापासून आवडे. अशीच तिची निसर्गाशी तंद्री लागली होती नं दारावरची बेल वाजली.

कोण बरं आलं असेल एवढ्या दुपारी असा विचार करत ती उठली नं चार पावलं चालत जाऊन तिनं दार उघडलं. दारात सोनम उभी होती पण हातात काहीच सामान नव्हतं. अरुंधतीच्या मनात आलं..विचारावं पण तिने विषय टाळला. सोनमला थंड पाणी आणून दिलं. बसायला सांगितलं. जेवून आलीस का वाढू घाईघाईतच विचारलं पण सोनमने तोच ग्लास अरुंधतीच्या हाती देत तिलाच खुर्चीवर बसवलं.

“ऐक आत्या.”

“सोनम अगं तुझ्या आवडीचं टोमॅटोचं सार नं भात केलाय. कारल्याच्या चकत्याही केल्यात. ऊन ऊन जेऊन घे बघू आधी. मग निवांत बोलू.” अरुंधती खुर्चीतनं उठत म्हणाली.

“आत्या, ऐक शांतपणे. मी सोडून जातेय दर्शनला कायमची.”

“काssय,” अरुंधती अक्षरश: किंचाळली.

“आत्या, खरं सांगायचं तर हे लग्न माझ्या संमतीने झालंच  नव्हतं. मला पुढच्या शिक्षणासाठी पैसे हवे होते आणि पप्पांनी ते दर्शनशी लग्न केलस तरच देईन अशी अट घातली होती.”

“अगं पण सोनम, मिळाले असतील नं तुला पैसे. आणखी हवेत का? मी देते पण माझ्या दर्शनला सोडून जाऊ नकोस बाई. वेडा होईल तो. मी पाया पडते तुझ्या हवं तर.” अरुंधती रडू लागली. तिची अवस्था दयनीय झाली होती.  तिला त्या अवस्थेत बघून एखाद्या त्रयस्थाचंही काळीज विरघळलं असतं, पण सोनमच्या काळजाला पाझर फुटला नाही. ती म्हणाली,”आत्या, अगं मला दर्शनच काय कुणाशीही लग्न करुन संसार धाटायचा नाहीए. लग्न, कुटुंबव्यवस्थेवर माझा विश्वास नाही. मुलं, संसार यात जन्म वाया नाही घालवायचा मला. मला पुढेपुढे शिकून माझ्या करियरमध्ये टॉपपर्यंत पोहोचायचं आहे. ही लग्नाची बेडी नकोचंय मला.”

आता मात्र अरुंधतीने डोळे पुसले व रागात तिला विचारू लागली,”तुझा पप्पा, तुझी मम्मी त्यांना मान्य आहे हे सगळं!”

“मान्य करावं लागेल त्यांना आणि तुम्हालाही.” असं म्हणत उभ्यानेच अरुंधतीच्या पाया पडून ती निघून गेली, पुन्हा कधीही न येण्यासाठी.

सोनम गेल्यानंतर अरुंधती तिथेच मटकन खाली बसली. तिन्हीसांज होत आली, खोलीत अंधार पसरला तरी ती त्याच अवस्थेत होती.

बेल वाजली तशी अरुंधती भानावर आली. तिने तोंड पुसलं, दिवे लावले. बोटांनीच केस सारखे केले नि दार उघडलं. दारात दर्शन उभा होता..पराभुतासारखा..”आई ती गेली मला टाकून. तिला हे लग्न वगैरे नकोच होतं. तिने सौदा केला आणि त्यात माझा, तुझा सोंगट्यांसारखा वापर केला.” दर्शन अरुंधतीच्या मांडीत डोकं खुपसून मोकळं होत होता.

अरुंधती त्याला रडू देत होती, मोकळं होऊ देत होती. तिला आता पुन्हा उभं रहायचं होतं, जुनी कात टाकून उध्वस्त झालेल्या आपल्या लेकाचं जीवन पुन्हा मार्गावर आणण्यासाठी खंबीर बनायचं होतं तिला. नियतीने स्वतःवर मारलेला आसूड झेलला होताच तिने आता लेकावर मारलेला आसूड झेलण्यासाठी लेकाला बळं द्यायचं होतं तिला.

समाप्त

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *