Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सासूबाई मी तुमच्या घरात रहाते!

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

निरजा ऑफीसला जॉइंट होऊन नुकतच वर्ष झालं होतं. लहान बाळाला सासूबाईंच्या हाती सोपवून रोज सकाळी ऑफीसला जायची. बाळाला असं सोडून जाताना जीव तुटायचा तिचा. सहा महिन्याचं बाळ. ही जायला निघाली की मोठमोठ्याने रडून आकांत करायचं.

सासूबाई कशातरी गप्प करायच्या त्याला. जीवापाड सांभाळायच्या. पण आताशा त्यांनाही बाळाचं आवरणं झेपत नव्हतं. मग त्यांचा राग निरजावर निघायचा. कधी टोमणे मारुन तर कधी उघडउघड.

नीरजा घरी आली की बाळ तिची पाठ सोडायचा नाही. नुसतं उचलून घे म्हणायचा. त्याला घेऊन तिला स्वैंपाक करता येत नसे. पुन्हा सासूची चिडचिड व्हायची. निरजा विचार करायची,नोकरी सोडायची का? पण मैत्रिणी म्हणायच्या,”अगं,वेडी आहेस का तू निरे. ही बीएमसीतली नोकरी कुणाला सहजासहजी मिळत नाही. थोड्या परीक्षा दिल्यास की बढती मिळेल तुला. बाळाचं काय घेऊन बसलीस. होईल मोठा थोड्या दिवसांत.”

त्यादिवशी जरा जास्तच वाजलं तिचं नी सासूबाईचं. तिला घरी जायला अकरा वाजले होते. बाळाने रडूनरडून हैदोस घातला होता. त्याला आईच्या दुधाची तलफ आली होती. शेजारच्या बायांनी येऊन आगीत तेल घातलं,”काय बाई सून तुमची,एवढ्याशा लेकराला सोडून जाते. जाते ती जाते. वेळेत येतपण नाही. आई म्हणून काही कर्तव्य आहे की नाही?” निरजाच्या सासूबाईंनी त्यांची बोळवण केली खरी पण त्यांच्या रागाचा पारा चढत गेला .

निरजा ट्रेनच्या तुडुंब गर्दीतून कशीतरी येत होती. दुध आल्याने स्तन ठणकत होते. त्यात ट्रेनमधून उतरल्यावर रिक्षा स्टँडवर नेमकी रिक्षा गायब. तशीच थेट धावत निघाली बिचारी. डब्बाही खाल्ला नव्हता तिने, कामाच्या धावपळीत. नवऱ्याची फिरतीची नोकरी त्यामुळे त्याचा बाळाच्या संगोपनात  हातभार लागत  नव्हता.
घरी पोहोचली तेंव्हा बाळ रडूनरडून निजला होता. सासूबाईंनी दार
उघडलं.

‘ही वेळ का गं येण्याची? पदरी लहान बाळ आहे. त्याचीही आठव येत नाही का तुला? इतकी कशी कठोर ग तू?’

‘अहो,आई अर्जंट काम आलं. तरी मी साहेबांना सांगत होते पण ऐकले नाहीत.’

‘बाजूच्या राण्यांची सून बघ एमटीएनएलमध्ये आहे. वेळेवर घरी येते. राणीन मग भजनाला जाते. सून सगळा स्वैंपाक आवरते. रात्रीची भांडी,ओटा सगळं.नाहीतर तू. माझं मेलं नशीबच फुटकं.’

निरजात भांडायचं त्राण नव्हतं. सासरेबुवांनी तिला नजरेनेच शांत रहाण्यास सांगितलं. एक जमेची बाजू निरजाकडे होती ती म्हणजे तिचे सासरेबुवा. ते समजून घ्यायचे तिला. तिचं काही चुकत असेल तर समजावून सांगायचे तिला.

सासूबाई प्रेमळ होत्या पण हे असं शांत वागणं जमत नव्हतं त्यांना. दिवसभराच्या दगदगीने आंबून जायच्या बिचाऱ्या. त्यात शुगर डिटेक्ट झालेली त्यांना. त्यामुळे बाळाच्या मागे करावी लागणारी धावपळ झेपत नव्हती त्यांना. सासऱ्यांना संधिवाताचा त्रास,त्यामुळे त्यांनाही बाळापाठून फिरणं जमत नव्हतं.

निरजाला जेवायचीही इच्छा नव्हती पण भांडतभांडत का होईना सासूबाईंनी तिचं पान वाढलं. त्याही जेवायच्या थांबल्या होत्या. डायनिंग टेबलवर दोघींची पान पाहून निरजाला सासूबाईंचं हसू आलं. मनात म्हणाली,”किती प्रेम करतात या माझ्यावर. पण त्यांना बोलून दाखवता येत नाही. प्रेमापोटीच रागावतात.”

निरजाचे मन सासऱ्यांनी बरोबर ओळखले. त्यांनीही हसून तिला प्रतिसाद दिला. जेवणात साधी खिचडी होती पण ती तिला अमृताहून गोड लागली. चार घास खाल्ले तितक्यात बाळाने रडायला सुरुवात केली. निरजाचं जेवण होईस्तोवर सासऱ्यांनी त्याला थारवलं. निरजा भांडी घासायला जाणार तोच सासूबाई म्हणाल्या,”मी घासते ग भांडी. तू आधी त्याला जवळ घे.”

निरजाने मग हात पुसले व बाळाला कुशीला घेतले. अर्धमिटल्या डोळ्यांनी बाळ अम्रृतधारा पिऊ लागला तसं सासूबाई अनिमिष नेत्रांनी ती मायलेकरांची भेट पाहू लागल्या.

“आज जरा जास्तच त्रास दिला ग गुलामाने. त्यात त्या राणेवहिनी माझे कान फुंकून गेल्या. म्हणून जरा तापले ग तुझ्यावर. घरासाठीच नोकरी करतेस. कळतंय मला. सहा महिने झाले माहेरी ही गेली नाहीस. अधिकउणं बोलले तर मनावर नको घेऊ हं. आम्हाला तरी कोण आहे तुमच्याशिवाय?”

“नाही ओ आई, तुमच्यावर कशी रागावेन मी. आणि रागावले तरी ते आपलंतुपलं लुटूपुटूचं. पण परत मला उशीर झाला तर जेवून घेत जा. औषध घ्यायची असतात नं तुम्हाला.”

“अगं त्या पोंक्षेंच्या सुनेने सासूसासऱ्यांची रवानगी गावच्या घरी केली अन् बाळाला पाळणाघरात ठेवलाय. मी अधुनमधून काव्वते तुझ्यावर म्हणून तू नाही नं करणार त्या पोंक्षेंच्या सुनेसारखं? मी नाही ग राहू शकत तुझ्या छकुल्याशिवाय. गुलाम माझ्याजवळपण दुधू शोधतो हल्ली. दे दे म्हणतो.”

“नाही ओ आई, मी कोण तुम्हाला गावी पाठवणार आणि ओरड्याचं म्हणाल तर मांजरीचे दात लागतात का पिल्लांना? तुमचंच घर आहे. मी तुमच्या घरात रहाते.  तुम्ही नाही रहात माझ्या घरात. लोन माझ्या नावावर घेतलंय पण घराला घरपण हे घरातल्या माणसांनी येतं. तुम्ही दोघं प्राण आहात या घराचा. सुधीर हा असा नेहमीचा फिरतीवर. तुमचा किती आधार आहे मला! मलाही कळतंय जास्त धावपळ झेपत नाहीत तुम्हाला. मी एखादी बाई बघते वरकामाला व बाळाजवळ लक्ष ठेवायला पण पुन्हा असं काही मनातसुद्धा आणू नका आणि भांडूया आपण पोटभर त्याशिवाय मज्जा नाही ओ येत.तांब्याला कल्हई केल्यावर कसं चकाकतं तसंच भांडून झालं आणिनव्याने एकत्र आलो की आपलं नातं चकाकतं.”

सासऱ्यांनी प्रेमाने निरजेच्या डोक्यावर हात ठेवला.

_©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

=====================================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *