Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

फक्त 21 वर्षांची होते मी. आकाशच्या आत्याने मला सांगितलं तू पोस्टाची एजन्सी घे. त्यांनी त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं. मी ते काम करत होते, त्यात मला यशही मिळत होते. मुख्य म्हणजे जे सगळे एजंट होते त्यांची मिटींग व्हायची त्यांच्या समितीचं अध्यक्षपद त्यांनी मला लगेचंच देऊ केलं. खरंतर मी नवीनच त्यांना जॉईन झाले होते, पण सगळ्यांनी एकमताने माझी निवड केली. माझ्या कामाचं, शिस्तबद्धतेचं कौतुक केलं. माझे वडील असं नेतृत्वाचं काम करीत असल्याने मला त्या कामाचा अनुभव नसला तरी लहानपणापासून मी ते बघत होते. त्यामुळे मी ते काम उत्तम केलं. मला थोडेफार पैसेही मिळू लागले. हळूहळू माहेरचं वातावरण पण निवळत होतं. आईने माझे सणवार केले. एक दिवस आई म्हणाली,
‘‘तुम्ही काही प्लॅनिंग वगैरे करत आहात का?’’
‘‘हो.’’
‘‘कशासाठी?’’
‘‘अगं अजून आमचंच बस्तान बसलेलं नाही. मग लगेच कशाला असा विचार करायचा?’’
‘‘तुम्ही तसं काही करू नका. आम्ही खंबीर आहोत.’’
आई-बाबा तसंच सगळ्या आत्यांनी, सासू-सासर्‍यांनी पण हेच सांगितलं म्हणून आम्ही ठरवलं की ‘‘आता याबाबतीत तरी त्यांच्या मनासारखं होऊदे.’’ मग आम्ही प्लॅनिंग बंद केलं. साधारण दोन महिन्यांनी माझ्या आयुष्यात तो सुखाचा क्षण आला. मी गरोदर राहिले. मी आई-बाबांना सांगितलं. या बाळामुळे मी माहेरच्या घराच्या जवळ आले. आई-बाबा आधी बोलत होते, पण गरजेपुरतं आता काळजी घेऊ लागले. मोठा भाऊ तर अजिबात बोलत नव्हता, तोही आता बोलू लागला. लहान भाऊ पहिल्यापासूनच बोलत होता. तो आता मोकळेपणाने बोलू लागला.
पण जणू सुख माझ्या नशिबातच नव्हते. मला चांगलं आठवतंय. आईनं माझ्यासाठी म्हणून संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा घाट घातला. गर्भारपणाचं तेज चेहर्‍यावर आलेलं होतं, त्यात अजूनही लग्नाला पण वर्ष व्हायचंच होतं म्हणजे तशी नवी नवरीच होते. त्यामुळे माझं सौंदर्य खुलून दिसत होते.
आता आईलाही खूप उत्साह आला होता. तिने मोठ्या प्रमाणात हळदीकुंकूचा घाट घातला तिला कदाचित वाटत असेल की या मुलीची काहीच हौस करता आली नाही. हळदीकुंकू छान झाले, आल्या-गेल्या पाहुण्यांना नमस्कार करता करता मी दमून गेले. पण दुसर्‍याच दिवशी कदाचित त्या दगदगीमुळे का काय माहीत नाही माझं अ‍ॅबॉर्शन झालं. बाळाच्या रूपानं येणारी सुखाची पावलं माझ्यापासून दूर पळून गेली, जणू नियती मला म्हणत होती, ‘बघ तू केलेल्या चुकीचं तुला प्रायश्‍चितं मिळतंय.’ मला खूप वाईट वाटलं. एका आईला आपलं मूल आपल्यापासून दूर होणं म्हणजे काय हे मला जाणवलं. खूप रडले, पण काही उपयोग नव्हता.
परत सगळ्यांनी समजावलं की, ‘हे असं होतंच, सोपं नसतं आई होणं. मुळात बाईपण निभावणंच फार कठीण असतं. बहिणाबाई म्हणतात त्याप्रमाणे, ‘आधी हाताला चटके तवा मिळते भाकर.’ सर्व सुखं जर तुझ्यापुढे हात जोडून उभी राहिली तर त्या परमेश्‍वराची तुला कशी आठवण येईल? आईनी, आत्यांनी समजूत घातली. मी जरा सावरले या दु:खातून. माझं पोस्टाचं काम सुरूच होतं. संसार खर्‍या अर्थाने सुरू झाला होता. आधी कधीही मला पैशाची चणचण भासली नव्हती म्हणजे कधी अशी वेळच माहीत नव्हती की, आपल्याकडे पैसे नाहीत. पण एक-दोन वेळा आमच्यावर अशीही वेळ आली की, आमच्याकडे फक्त 50 रुपये होते. खरंच फार खडतर होते ते दिवस.
त्यात आकाशचा आणि माझा स्वभाव म्हणजे परस्पर विरुद्ध. मी बडबडी, सगळ्यांच्यात मिसळून राहणारी, तर हा एकलकोंडा. दोन टोकाचे स्वभाव होते. लग्नाआधीचं प्रेम आणि लग्न झाल्यावरचं प्रेम या दोन्हीत खूप फरक पडतो हे मला समजलं. आमची आधीही भांडणं व्हायचीच, नंतरही होत होती. जरी प्रेम होतं तरी भांडणं पण तेवढीच व्हायची, परत गोडीगुलाबीने पण राहायचो. असा ऊनपावसाचा खेळ सुरू होता.
एकदा आमची मोठी पंचाईतच झाली. आकाशच्या बहिणीला फीसाठी 500 रुपये हवे होते ते ती मागायला आली. आमच्याकडे काहीच पैसे नव्हते, पण तिला कसं सांगणार? तेवढ्यात मला आठवलं की, मला प्रेझेंट स्वरूपात मिळालेली पाकिटं कपाटात आहेत. मी पटकन उठले कपाटातून सगळी पाकीटं शोधली पाचशे रुपये जमा केले आणि तिला दिले. ती फीचे पैसे घेऊन निघून गेली.
ती गेल्यावर आकाशने मला विचारलं, ‘‘इतके पैसे तू कुठून आणलेस?’’ मी सांगितल्यावर त्याला माझा खूप अभिमान वाटला.
‘‘तुला मिळालेले पैसे तू असे माझ्या बहिणीला दिलेस, खरंच तू ग्रेट आहेस.’’ आकाश म्हणाला.
‘‘अरे आता तुला-मला असं काही नाही जे आहे ते दोघांचं आहे, आपलं आहे.’’ मी म्हटलं.
असाच संसार चालू होता.
माझं पोस्टाचं काम जरी चांगलं चाललं होतं तरी कायमस्वरूपी हे काम करण्यापेक्षा मला शिकण्यात जास्त इंटरेस्ट होता. बी.एड. ला अ‍ॅडमिडशन घ्यावी असं मी ठरवलं, आकाशनेही मला प्रोत्साहनच दिलं, पण माझं नशीब इतकं वाईट होतं की, मला सत्तर टक्के असूनही तिकडे अ‍ॅडमिशन मिळाली नाही. फार फार मनस्ताप झाला. माझ्यापेक्षा कमी टक्केवाल्यांना अ‍ॅडमिशन मिळाली पण मला ओपन मुळे ती मिळाली नाही.
आता बी.एड नाही काही नाही तर परत चान्स तरी घ्या. म्हणून परत एकदा आम्ही चान्स घेतला. लगेचंच दिवस राहिले. आम्ही परत खूश झालो. यावेळी मी खूप काळजी घेतली होती, तरीपण 3 महिने झाले आणि त्याच तारखेला माझं अ‍ॅबॉर्शन झालं. आता मात्र मला खूप वाईट वाटलं, अरे असं काय होतंय? त्या अ‍ॅबॉर्शनमध्ये मात्र माझ्या तब्येतीची पूर्ण वाट लागली. आता आपल्याला मूल होणारच नाही अशी माझी समजूत झाली.
खूप खूप मनस्ताप झाला. जणू मनस्ताप माझ्या पाचवीलाच पुजला होता, काही ना काही कारणाने तो आपलं डोकं वर काढायचाच. मी सारखी रडत राहायचे त्यामुळे कधीतरी आमच्यात भांडणं, खटके उडत होते. एकंदर सगळ्या बाजूने माझ्यावर परमेश्‍वराची वक्रदृष्टी होती. त्यातल्या समाधानाची एक बाब म्हणजे माझी एजन्सी चालू असल्यामुळे पैसा मात्र हातात होता.
एव्हाना आमच्या लग्नाला दोन वर्षं झाली होती. थोडे दिवस दु:खात काढल्यावर मी मात्र ठरवलं की, आता आपण चान्स घ्यायचा नाही बी.एडच्या मागे लागायचं तेवढ्यातच एक आनंदाची गोष्ट घडली ती म्हणजे एक दिवस माझे वडील माझ्या घरी आले. त्यांच्याबरोबर आमच्या शाळेतले दुसरे सर होते. मला खूप आनंद झाला, वडील पहिल्यांदाच माझ्या घरी आले होते. तर त्या दुसर्‍या शिक्षकांनी माझ्यासाठी एक आनंदाची बातमी आणली होती. त्यांच्या गावात म्हणजे सावंतवाडीपासून जवळच्याच गावात आमच्याच शाळेची एक ब्रँच काढली होती त्यात तू मुलांना शिकवावंस अशी माझी इच्छा आहे असं ते म्हणाले. तेव्हा माझं बी.एड. झालेलं नव्हतं, पण माझं गणित चांगलं असल्याने आणि मला शिकवायची आवड असल्याने मी हो म्हटलं. पण माझं पोस्टाचं काम घेतलेलं होतं, त्यामुळे सकाळच्या वेळेत ते काम करून दुपारनंतर मला त्या शाळेत जावं लागणार होतं. शिवाय ती शाळा लांब असल्याने बसने जा-ये करावी लागणार होती, पण मी ते केलं त्याचा पुढे आयुष्यात मला खूप उपयोग झाला.
त्या शाळेने मला शिकवण्याचा अनुभव दिला. तिथले मुख्याध्यापक माझ्या वडिलांचे मित्रच होते त्यामुळे त्यांनी मला प्रत्येक कार्यक्रमात बोलायची संधी दिली आणि मीही त्यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत होते, जणू माझीच शाळा आहे याप्रमाणे तिथे कष्ट करत होते, अगदी शाळा सारवण्याचंही काम मी तिथे करत होते, मुलंही खूप छान होती त्या वर्षभराचा मला खूप फायदा झाला.
पुढच्यवर्षी मला बीएड. ला विनासायास अ‍ॅडमिशन मिळाली. जणू माझ्याबाबतीत सुखदु:खाच्या खेळाची लपाछपी चालू होती. ‘कधी आसू तर कधी हसू’ त्यामुळे शाळेत मी जाऊ शकणार नव्हते. बी.एड. पण मी मनापासून केलं. तिथली मी सगळ्यांची लाडकी विद्यार्थिनी होते. अगदी दोन मार्काने माझा पहिला नंबर हुकला. पण मला डिस्टिंक्शन मिळालं. त्यामुळे मी खूप खूश होते.
या दरम्यान मध्ये माझ्या मोठ्या भावाचं लग्नं झालं. त्याची बायको बँकेत नोकरी करणारी होती. घरातल्यांच्या दृष्टीने घरचं पहिलंच कार्य होतं. माझं लग्न असं झाल्यामुळे आता या लग्नात आईने सर्व हौस-मौज पूर्ण करून घ्यायची ठरवली होती. मे महिन्याचे दिवस असल्याने पाहुणे-रावणे भरपूर आले. होते. आईला लोकांना खायला घालायची आवड असल्याने खाण्या-पिण्यात हयगय नव्हती. या लग्नात मी आईच्या बरोबर होते, तरी पण मी थोडी अलिप्तच असायचे, कारण अजून म्हणावा तसा भावाचा माझ्यावरचा रोष कमी झाला नव्हता.
तरीही आईने कधीही हाक मारली तर मी हजर असे. आईनेही माझा आणि जावयाचा योग्य तो मान ठेवला. त्याला एक आंगठी, मला भारीतली साडी दिली. मीपण भावाला चांगला आहेर केला. भावाचं धामधुमीतलं लग्नं पाहूनसुद्धा मला कधी वाईट वाटलं नाही, मी हाच विचार केला, ज्याच्या जे नशिबात असतं ते होतं.
बी.एड. बरोबरच माझं पोस्टाचं कामही सुरू होतं. जरी मी कष्ट करत होते, पैसे मिळवत होते. तरी माझ्या पैशावर आकाशने कधीही हक्क दाखवला नाही, तू आणि तुझे पैसे त्यात तुला हवं असेल ते घे. संसारासाठी लागणारा पैसा तोच देत असे. मला फ्रीज हवा होता तो मात्र मी माझ्या खर्चाने घेतला. चांगला मोठा फ्रीज मी त्या काळी घेतला.
वहिनीला लग्नात आईने सगळ्या दागिन्यांनी मढवलं, पण मला कधीही वाईट वाटलं नाही, की आपल्याकडे काही नाही. एका मंगळसुत्राशिवाय काही दागिने नव्हते, पण मला कधीही वाईट वाटले नव्हते. आता माझ्याकडे सर्व दागिने आहेत. रेणूला उगाचंच हसू आलं. लेकीचंही अगदी सालंकृत कन्यादान केलं. पण हे कन्यारत्न मिळवण्यासाठी मात्र मला फार प्रयत्न करावे लागले. माझं आयुष्य हे नेहमी धारदार पात्यासारखं होतं.
माझं बीएड. झाल्यावर मला परत माझ्या पहिल्या शाळेत नोकरीसाठी बोलावलं गेलं. मी नोकरी करत होते. एव्हाना लग्नाला चार वर्षं होत आली होती. माझ्या सासूबाई महिन्यातून चार दिवस तरी माझ्याकडे राहायला यायच्या. पै-पाहुणे पण एवढीशी छोटी जागा असली तरी असायचे, सगळ्यांचं करायला मला खूप आनंद व्हायचा. पाहुणे पण खूश व्हायचे. माहेरचं कुणी तरी आलं की, माझ्या संसाराला आवश्यक वस्तू मला प्रेझेंट आणून द्यायचं. आईपण सणावाराला अशी गिफ्ट द्यायची की, जी मला उपयोगी होईल. बाकी सगळं छान होतं, पण अजून मूलबाळ नाही म्हणून लोकं कुजबुजत असत. घरचेही मागे लागले होते पण आम्ही मात्र मागच्या दोन अनुभवाने हादरलो होतो त्यामुळे प्लॅनिंग सुरू होतं.
पण एकदा सासूबाई आल्या आणि त्या म्हणाल्या,
‘‘आता बास करा प्लॅनिंग वगैरे. आम्ही नातवंडं कधी बघायचं?’’
लोकांच्या नजरांचा पण आम्हाला त्रास होऊ लागला. मग आम्ही असं ठरवलं की, आता जे काही करायचं ते डॉक्टरांच्या सल्ल्याने म्हणून आम्ही दोघांनी टेस्ट केल्या. या टेस्टसुद्धा फार महागड्या होत्या. तसंच त्याचा पुढे फार त्रासही व्हायचा. त्या टेस्टमुळे माझ्या तब्येतीवरही खूप वाईट परिणाम होत होते, पण पर्याय नव्हता. कारण आता सर्व काही ठीक होते, एक अपत्य झालं की, मी माझ्या संसारात सुखी, समाधानी होणार होते. जरी माझ्या मनाने लग्नं मी केलं होतं तरी ते तेवढ्याच समर्थपणे मी निभवत पण होते. म्हणजे आम्ही दोघंही निभवत होतो.
वरवर सगळं सुरळीत चाललं होतं, फक्त मनात खंत होती बाळ नसल्याची. त्यातूनच आणखी एक संकट माझ्यापुढं आलं. एके दिवशी मी ज्या शाळेत नोकरी करत होते, त्याच शाळेत आणखी एक शिक्षिका पण होती. आम्ही दोघी मिळून खूप मजा करायचो, मी जेव्हा बी.एड.साठी म्हणून शाळा सोडली त्याच वर्षी ती तिथे नोकरीला लागली होती. आमची शाळा विनाअनुदानीत होती, त्यामुळे पगार कमी होता. पण पुढेमागे त्याच शाळेच्या ब्रँचमध्ये म्हणजे मी जिथे शिकले त्या शाळेत माझी बदली होण्याचा संभव होता. अडचण अशी आली की, शाळेत दोन शिक्षिकांऐवजी एकच शिक्षिका ठेवणे बंधनकारक केले गेले. मुख्याध्यापकांना म्हणजे माझ्या वडिलांच्या मित्रांना फारच प्रश्‍न पडला की, आता काय करायचे? कारण आम्ही दोघीही शाळेत तेवढेच जीव ओतून शिकवत होतो. माझे वडील त्यांचे मित्र होते, तर त्या दुसर्‍या शिक्षिकेच्या सासूबाई पण आमच्या शाळेच्या निवृत्त शिक्षिका होत्या. आता काय करायचे?
आम्ही दोघींनी पण बाहेर मुलाखती द्यायला सुरुवात केली होती, नेहमीप्रमाणे माझं नशीब नाठाळ निघालं. मुख्याध्यापकांनी असं ठरवलं की, त्या दुसर्‍या शिक्षिकेला कायम करावं. कारण तिची घरची परिस्थिती माझ्यापेक्षा जरा हलाखीची होती, त्यांनी अगदी तसं पक्क ठरवलं. मीही वाईट वाटून घेतलं नाही. पण तेवढ्यात तिच्या सासूबाईंनी त्या सुनेला दुसर्‍या शहराच्या ठिकाणी घेऊन जाणार असल्याचे कळवले आणि तुम्ही रेणूलाच कायम करा असं मुख्याध्यापकांना सुचवलं. मी दुसर्‍या ठिकाणी मुलाखत दिली होती तिथही माझी निवड झाली होती. कारण माझं शिकवणं उत्तम होतं.
आता माझी परत द्विधा झाली, ‘‘काय करावं?’’ कारण माझी जी शाळा होती, तिथे पगार कमी होता, इथे मला चांगला पगार मिळणार होता, पण इथे शाश्‍वती नव्हती, पुढच्या वर्षी काढूनही टाकलं असतं, मग मी शेवटी माझी पहिली शाळाच निवडली आणि परत माझा जॉब सुरळीत चालू झाला. मी नोकरीत तरी कायम झाले. आज ना उद्या अनुदान सुरू होईल आणि मला चांगला पगार मिळेल. किंवा गावातल्या जवळच्या शाळेत माझी बदली होईल ही आशा निर्माण झाली.
राहता राहिला प्रश्‍न होता तो बाळाचा. आता आम्ही दोघंही घरात बोबड्या बोलांची, सोनपावलांची वाट पाहात होतो. समोरासमोर एकमेकांना तसं दाखवत नसलो तरी मनापासून ती इच्छा होती. एकदा माझ्या सासूबाई चार दिवस राहायला आल्या होत्या. त्या एका महाराजांकडे जात असत. त्या म्हणाल्या, ‘‘रेणू, तू त्या महाराजांकडे चल. तुला मूल होईल.’’
माझा आणि आकाशचाही या असल्या बुवाबाजीवर विश्‍वास नव्हता. त्यामुळे मी ठाम नकार दिला. त्या रागावल्या आणि म्हणाल्या, ‘‘जर तू माझ्याबरोबर आली नाहीस, तर तुला कधीच मूल होणार नाही.’’ मी जरा घाबरले, माझा देवावर विश्‍वास होता, पण असल्या महाराजांवर वगैरे माझा विश्‍वास नव्हता. कारण मी शास्त्र विषयाची शिक्षिका होते, आपणच जर असं काही केलं, तर मुलांना आपण शास्त्र काय शिकवणार? देवदेवता ही शक्ती आहे हे मला मान्य होतं आणि आजही आहे, पण बुवाबाजीला मात्र माझा विरोध होता.
त्यांनी मला शापच दिला की काय असं मला कधीतरी वाटायचं, तरीही मी काही झालं तरी त्या महाराजांकडे जायचंच नाही असं ठरवलं, त्याला आकाशचाही पाठिंबा होता. मी सासूबाईंची समजूत काढली, त्यांना सांगितलं, ‘‘माझा तुमच्यावर राग नाही, पण मी असा विश्‍वास नाही ठेऊ शकत.’’ त्यांना ते पटलं का नाही माहीत नाही, पण त्यांनी परत तसा आग्रह केला नाही.
आता नोकरीची तरी चिंता मिटली होती, तसंच पोस्टाचं कामही चालू होतं, चिंता होती ती फक्त बाळाची. एकदा रात्री झोपताना माझ्या मनात काय आलं काय माहीत मी सहज आकाशला म्हटलं, ‘‘मला वाटतं आपलं घर झाल्याशिवाय आपल्याला बाळ होणार नाही.’’ मी असं म्हंटलं नी झोपूनही गेले, पण आकाश मात्र मनात विचार करत राहिला.
खरंच रेणूने आजपर्यंत आपल्याकडे काही मागितले नाही, आपल्याशी लग्नं करून तिने सुखी आयुष्यातून दु:खी आयुष्यात उडीच मारलीय. जर तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी श्रीमंत स्थळ शोधलं असतं तर ती किती सुखात राहिली असती. तरीही आपल्यावरच्या प्रेमाखातर ती कधीही कुरकूर करत नाही, तिने कधी दाग-दागिन्यांचा हट्ट केला नाही, की कधी ती आरामात राहिली नाही, सतत काही ना काहीतरी उद्योग करून संसाराला हातभार लावत आहे, पण आज जी इच्छा तिने बोलून दाखवली ती काही झालं तरी पूर्ण करायचीच असं आकाशने ठरवले. कधीतरी आपण सहज एखादी गोष्टं बोलून जातो आणि त्याची लींक लागत जाते, तसंच झालं.
दुसर्‍याच दिवशी आकाश काहीतरी कामानिमित्त बाहेर गेला होता. तो सिव्हील इंजिनिअरच असल्याने एका काँट्रॅक्टरने त्याला एक प्लॅन दाखवला. नुकतान त्याने अपार्टमेंटसाठी एक प्लॅन आखला होता, त्यातला पहिलाच फ्लॅट आकाशला खूप आवडला. एका मंदिराच्या आवारात ती बिल्डींग होती. त्याने त्या बिल्डरला विचारलं, ‘‘हा फ्लॅट मला द्याल का?’’
त्या बिल्डरला पण आश्‍चर्यच वाटलं, तो म्हणाला, ‘‘अरे अजून मी कोणालाच हा प्लॅन दाखवला नाहीये, तुला हवा तर मी तो फ्लॅट देऊ शकतो.’’
तशी आकाश म्हणाला, ‘‘मी माझ्या बायकोला विचारतो आणि लगेच तुम्हाला सांगतो.’’ त्याने मला लगेच घरी येऊन हे सर्व बोलणं सांगितलं. मलाही ती जागा पसंत पडली, फक्त कष्ट करावे लागणार होते, कारण त्या काळी तीन-साडेतीन लाखाचा तो फ्लॅट होता, आमच्या दोघांचीही कष्टासाठी ना नव्हती. आम्ही तो फ्लॅट बुक केला. बांधकाम होण्यासाठी मात्र अवकाश होता.
आता आम्हाला जास्त काम करणे गरजेचे होते, दोघेही अतोनात कष्टं करत होतो, पण त्यातही आम्ही सुखी होतो कारण एकमेकांवरचं प्रेम दिवसेंदिवस वाढत होतं. मुरलेल्या मुरांब्याप्रमाणे आमच्या प्रेमाला सोनेरी किनार येत होती आणि त्याची गोडी दिवसेंदिवस वाढत होती. आम्ही सुखी होते, फक्त एक रुखरुख सोडली तर.
क्रमश:
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
**

====================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *