Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

बापरे किती वाजले रेणू एकदम शुद्धीत आली समोर फोनवर 3-4 मिसकॉल येऊन गेले होते, तिने पाहिले तर फार काही महत्त्वाचे नव्हते. आज कुणाचाही फोन घेण्यात तिला इंटरेस्ट नव्हता, ती उठली, फ्रेश झाली, थर्मासमधली कॉफी दुसर्‍या कपात ओतून ती परत आपल्या भूतकाळात रमली.
मी आईला सांगितलं की,
‘‘मी आता आकाशला भेटणार नाही,’’ पण मी त्याला भेटतच होता, आकाशचं मात्र म्हणणं होतं की,
‘‘तू घरी सांग की मी तुला भेटतेय.’’ मी चांगलीच कात्रीत अडकले होते. इकडून आड तिकडे विहीर. असं सगळं सुरू होतं. खूप टेंशन यायचं कधीकधी.
त्यातच कॉलेज म्हणजे आणखीही त्रास होतेच. एक मुलगा सतत माझ्या मागे असायचा. एकदा या चिडक्या बिब्ब्याने त्याला माझ्या मागून फिरताना पाहिलं. त्याच्या नजरेतून ते सुटलं नाही त्याला बरोबर कळलं की तो माझा पाठलाग करतोय. पाठलाग करणारा मुलगा समोर असतानाच तो माझ्यासमोर गाडी घेऊन उभा राहिला आणि म्हणाला,
‘‘बस गाडीवर.’’ मी घाबरले, पण काही बोलायची सोय नव्हती, मी गाडीवर बसले. तेव्हा तो म्हणाला,
‘‘आता त्याला कळेल की तुझं माझ्यावर प्रेम आहे, तो कधीच तुला परत त्रास देणार नाही.’’ आणखीन एक-दोन मुलंही अशी माझ्या मागे होती त्यामुळे त्याला खूपच असुरक्षित वाटायचं त्याला काय वाटायचं हे मी आत्ता सांगू शकत नाही. पण त्यामुळे तो खूप चिडायचा आणि पर्यवसन भांडणात व्हायचं. मला खूप मनस्ताप व्हायचा. यावर त्याने पर्याय काढला की, तू कॉलेजात रीक्षाने जा, मी पैसे देतो. उगाचच्या उगाच पैसे खर्च करायला मला आवडायचे नाहीत, मी चालत दिसले तर त्याला राग यायचा.
तो खूपच सणकू होता. एकदा त्याने नवी गाडी घेतली आणि त्या गाडीवर माझं नाव लिहिलं- ‘रेणू’. आणि ती गाडी आमच्या घराजवळ आणून उभी केली आणि तो समोर त्याच्या आत्तेकडे गेला. झालं गाडीवर घातलेलं माझं नाव सर्वांनाच दिसलं आणि घरात रोजची भांडणं सुरू झाली. त्याच्या मनात येईल तसं वागण्याचा मला खूप त्रास होत असे. असं वाटत होतं ‘नको हे प्रेम, यातून जर कोणालाच सुख नाही तर प्रेम करण्यात काय अर्थ?’ पण म्हणतात ना पहिलं प्रेम, मी ते विसरूही शकत नव्हते. थोडे दिवस राग यायचा, पण परत तो विसरून मी परत त्याच्यावर प्रेम करत होते, कारण एकच त्याचंही माझ्यावर तेवढंच प्रेम होतं. पण आता माझ्यावर मात्रं बरीच बंधनं होती त्याला भेटायचं नाही म्हणजे नाही अशी घरातून सक्त ताकीद होती.
मध्यंतरीच्या काळात माझे बाबा आणि घरमालक यांची रोजच भांडणं सुरू होती. त्याचा परिणाम आईच्या तब्येतीवर होत होता. एकतर तिचा तो मोनोपॉज चा पिरीयड होता, त्याचाही तिला प्रचंड त्रास होत होता. यांची भांडणं सुरू झाली की तिचं ब्लड प्रेशर हाय होत असे कारण वडील चिडले तर काहीही करतील याची तिला सतत भीती असे. घरमालकांचा मुलगा आणि माझा भाऊ यांनी याबाबतीत काहीही बोलायचं नाही असं ठरलं असल्याने ते दोघं काही बोलू शकत नव्हते. एक दिवस ते भांडण पराकोटीला गेलं. आणि माझ्या मनात काय आलं माहीत नाही.
मी त्या दोघांच्या मध्ये गेले आणि त्यांना म्हटलं, ‘‘की आता बास करा हे भांडणं.’’ खरंतर मी लहान होते, पण तरीही मलाही ते असह्य होत होतं आधीच ही प्रेमाची भानगड, आईची तब्येत, आणि त्यात हे मला फार त्रास होत होता. मग मी दोघांचीही बाजू ऐकून घेतली. भांडण 50 हजारवरून होतं, त्या काळी ती खूपच मोठी रक्कम होती.
बाबा म्हणत होते, ‘‘तीन लाख देईन, तर घरमालक साडेतीन लाखांवर अडून होते.’’
मी म्हटलं, ‘‘दोघांनी पण एक पाऊल मागे सरका. बाबा, तुम्ही 25000 रुपये जास्त द्या. म्हणजे सव्वा तीन लाख होतील.’’
घरमालकांना सांगितलं, ‘‘तुम्ही 25000 कमी करा.’’ बाबांचा माझ्यावर आणि घरमालकांचाही माझ्यावर जीव होता त्यामुळे ते दोघं कसेबसे तयार झाले आणि फ्लॅटचा वाद संपुष्टात आला. आणि आम्ही नवीन घरात राहायला गेलो. आता निदान त्या बाजूने तरी सगळं शांत होतं आणि माझ्यामुळे हा वाद संपुष्टात आला म्हणून सर्वजण माझ्यावर खूश होते, त्यात हे प्रेमप्रकरण जरा बाजूला पडलं होतं. आता मीही त्याला भेटायला जात नाही असा आई-बाबांचा समज होता.
मी आता चौदावीत गेले होते, मी एका कॅम्पला गेले होते चौदा दिवसांसाठी जवळच्याच गावात. बारा दिवस खूप छान गेले आणि तेराव्या दिवशी हा सणकू मला तिथे भेटायला आला. झालं सगळीकडे चर्चा. तो दोनच मिनिटं तिथे थांबला, लगेच परत गेला. पण त्याने काय केलं की त्याच्या दुसर्‍या आत्तेला सांगितलं की, रेणूला भेटून आलो. झालं ती बातमी हळूहळू करत आमच्या घरी येऊन धडकली.
मी घरी जायच्या आधी ही बातमी आमच्या घरी हे सगळं कळलं होतं, झालं घरी गेल्या गेल्या माझ्यावर तोफखाना. वातावरण फारच गरम होतं, मला आता त्याचा फारच राग आला होता, तो असं का करतो हेच मला कळत नव्हतं. कदाचित त्याला कुठेतरी असं वाटत होतं की, मी त्याला सोडून दुसर्‍या कुणावर तरी प्रेम करेन म्हणून तो घरी सांगून आमचं प्रेम बळकट करायला बघत होता, पण ती पद्धत चुकीची होती हे त्याला समजतच नव्हतं. आता घरातून मला खूपच बंधनं होती, कॉलेजला एकटं पाठवलं जाणार नव्हतं.
मलाही आता त्याचा भयंकर राग आला होता, कारण गोष्टी अशा तर्‍हेने घरी कळल्यामुळे आई-वडिलांना होणारा त्रास, माझी घुसमट मला सगळंच असह्य होत होतं. मी ठरवलं की त्याला चिठ्ठी लिहायची आणि ती मैत्रिणीकडे द्यायची. मग मी गुपचूप चिठ्ठी लिहीली त्यात त्याला लिहिलं, ‘‘की तुझ्या अशा वागण्याचा मला खूप त्रास होत आहे, आता घरच्यांनी मला एकटं कॉलेजला जायला बंदी घातली आहे, आपण आता भेटू शकणार नाही, कृपया तू आता आणखी कोणता राडा करू नकोस.’’ ही चिठ्ठी मैत्रिणीकरवी त्याला दिली. आणि मी निश्‍चिंत झाले. म्हणजे मनात एक भीती होतीच की ही चिठ्ठी मिळताच तो काय करेल?
पण परत मला या सगळ्याचा विसर पडला कारण आईची तब्येत खूपच बिघडली. आईचं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं. पंधरा दिवस तिला दवाखान्यात ठेवलं. या पंधरा दिवसांत मी आईची खूप सेवा केली. म्हणजे हे प्रेम सोडलं तर घरच्यांना मला नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती, कारण मी घरच्यांची नेहमीच सेवा करायची, घरातली कामं करायची. घरात सगळ्यांशी प्रेमाने वागायची. पण… हा पणच मोठा घात करतो म्हणतात ना तसंच झालं होतं माझं. मी जर हे प्रेमच केलं नसतं तर किती सुखी आयुष्य असतं माझं?
असं मलाही वाटू लागलं. त्याची आठवणसुद्धा खूप यायची. मी जरी त्याला सांगितलं असलं की माझा विचार करू नको किंवा भेटायचा प्रयत्न करू नकोस तरी मलाच चैन पडत नव्हते, त्याच्या मनात काय आलं असेल असं सारखं वाटत होतं. रागावला असेलच तो आणि रागाच्या भरात त्याने आपलं नातं तोडून टाकलं तर अशीही भीती वाटत होती.
आता घरातलं सगळं रूटीन लागलं होतं, आईची तब्येतही बरी झाली होती मी आईची खूप सेवा केल्याने आईचं मन माझ्याबाबतीत परत हळवं झालं होतं आणि अशा इतक्या चांगल्या मुलीला आपण उगाच बंधनात टाकतोय असं तिला वाटलं.
तिने एकदा मला जवळ बोलावलं ती म्हणाली,
‘‘रेणू, तू खूप चांगली आहेस. माझं तुझ्यावर सर्वांत जास्त प्रेम आहे.’’
‘‘आई, हो ग मला माहीत आहे. मलाही तू हवी आहेस, तू तुझी काळजी घे.’’
‘‘फक्त एक कर तू प्रेमाबिमाच्या फंदात पडू नकोस.’’
‘‘हो.’’ मी खिन्नपणे म्हटलं.
‘‘आता आम्ही तुझ्यावर विश्‍वास ठेवतोय आणि तुझ्यावर बंधन घालत नाही.’’
‘‘खरंच?’’ मला खूप आनंद झाला.
‘‘हो आता तुझी तू कॉलेजला जा. फक्त त्याला भेटू नकोस. एवढी कृपा कर.’’
खरंतर मी तेव्हा आईला विचारायला हवं होतं, की आता घरमालकांचं आणि आपलं भांडण मिटलंय, मुलगा चांगला आहे, आपल्या जातीतलाच आहे, हुशार आहे, मग आता नकाराचं कारण काय? पण ते मलाही सुचलं नाही. आणि कदाचित पहिल्यापासून केलेला विरोध हा कायमच राहिला असावा. माझं कॉलेज सुरू होणार या आनंदात असेल किंवा मी लहान असेन म्हणून असेल मी काही हे प्रश्‍नच विचारले नाहीत. ‘कभी खुशी कभी गम’ पिक्चर बघते तेव्हा अमिताभचं एक वाक्यं आहे, ‘माझी काय चूक आहे?’ हे तू मला का विचारलंस नाहीस? तसंच वाटतं मला आता. पण आता काय उपायोग?
असो. मला खूप आनंद झाला. माझं कॉलेज रेग्युलर सुरू झालं. 8-15 दिवस मी त्याला भेटले नाही, पण एक दिवस त्याच्या खोलीवर गेले. त्याचा आनंद गगनात मावेना. मला आवडणारी चॉकलेटस् त्याने आणून ठेवली होती ती सगळी त्याने मला दिली. आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या.
आमची भांडणं पण मोठी असायची आणि प्रेम पण तितकंच असायचं. 13 वी आणि चौदावीचं वर्षं मात्र माझं खूप छान गेलं. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही भेटायचो, फिरायचो. कोल्ड्रींक हाऊसमध्ये जायचो. तो माझ्यासाठी खूप छान छान गुलाबाची फुलं आणायचा. खूप प्रेम करायचा माझ्यावर अतोनात प्रेम. इतकं प्रेम की कधीतरी त्या प्रेमामुळे आमचं भांडण व्हायचं. पण त्याने मला तितकंच सुख दिलं.
तोही खूप हुशार होता म्हणून तर आम्ही त्याला घासू म्हणायचोे. एकदा राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध लिहायची स्पर्धा होती. इंग्रजीतून तो लिहायचा होता. तर या घासूने तो लिहिला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्याचं सिलेक्शन झालं आणि त्याला सादर करायला बिहारला बोलावलं. तो कधीही इतका लाबं गेला नव्हता, पण त्यासाठी तो गेला आणि त्यात त्याचा दुसरा नंबर आला. इतका तो हुशार होता. त्यावेळी त्याने माझ्यासाठी दोन साड्या पण आणल्या होत्या. आयुष्यातली प्रेमाची ही पहिली गिफ्ट. इतक्या सुंदर साड्या होत्या ना त्या. की काही विचारू नका. अजूनही जशा मनात आहेत, तशाच कपाटातही खालच्या कप्प्यात नीट ठेवलेल्या आहेत.
तर सांगायचं असं की, जरी तो चिडकाबिब्बा होता आणि मी भित्रीभागूबाई तरी आमचं प्रेम आकार घेत होतं. खूप छान गुलाबी दिवस होते. तशी ती दोन वर्षं माझी खूपच मजेत गेली. आणि मी एक करत होते की माझ्या प्रेमाचा कुठेही अभ्यासावर परिणाम होऊ देत नव्हते त्यामुळे मला नेहमी चांगले मार्क मिळत होते, कारण याचवेळी काही मैत्रिणी प्रेमात पडल्याने कुणी पळून जाऊन लग्नं केलं होतं तर कुणाला एटीकेटी लागली होती. मी जर असं केलं तर ते त्यालाही पटणार नव्हतं किंवा घरच्यांनाही म्हणून मी जास्तीत जास्त अभ्यास करत होते, म्हणजे किंबहुना शाळेतही मी जितका अभ्यास केला नाही तितका अभ्यास कॉलेजला करत होते. मला दोन्ही वर्षी फर्स्ट क्लास मिळाला.
माझी चौदावीची परीक्षा झाली नी आई मला म्हणाली,
‘‘तू या सुट्टीत मुंबईला मावशीकडे जा.’’ मला आनंदच झाला. कारण आता घरात परत माझ्या प्रेमाची कुणकुण लागली होती त्यामुळे घरातलं वातावरण तणावपूर्ण असायचं. माझी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होती. कुणी स्पष्ट काही बोलायचं नाही, पण आडून आडून सगळे टाँन्टिंग करत असत. मी म्हटलं जाऊदे पंधरा दिवस मस्त मावशीकडे राहू. मी मुंबईत मावशीकडे गेले. खूप मजा केली. हिंडले, फिरले, पिक्चर पाहिले. मावशीने माझे खूप लाड केले.
पण माझं आयुष्य असंच झालं होतं जेव्हा मी खूप मजा करायची तेव्हा काहीतरी मोठं आव्हान माझ्यापुढे उभं असायचं. खरंच लहान वयात प्रेम करून मी खूप मोठी चूक केली होती हे आता जाणवतं. मी पंधरा दिवसांनी घरी सावंतवाडी आले. माझं यथायोग्य स्वागत झालं.
संध्याकाळी घरातली सगळी गप्पा मारत बसलो होतो तर बाबा पटकन मला म्हणाले,
‘‘रेणू, तुझं यावर्षी महत्त्वाचं वर्ष! फायनल इअर’’
‘‘हो बाबा, मी खूप अभ्यास करणार आहे. नक्की फस्टक्लास मिळवणार.’’
‘‘हो ते तू करशीलच, मला खात्री आहे.’’ आई पटकन म्हणाली.
‘‘पण यावर्षी तुला रत्नागिरीत शिक्षणासाठी पाठवायचं असं आम्ही दोघांनी ठरवलंय.’’ बाबा म्हणाले.
‘‘का?’’ मी रडवेली होऊन म्हणाले.
‘‘असंच काही कारण नाही.’’ आई म्हणाली.
मी मुंबईत गेले असता माझ्या आई-बाबांनी रत्नागिरीत राहणार्‍या माझ्या मावसभावाला फोन करून माझी अ‍ॅडमिशन तिकडे घ्यायला सांगितली. माझा भाऊ, वहिनी आणि दोन मुले असे तिकडे होते, तोही स्वभावाने खूप छान होता. तो लगेच तयार झाला. कदाचित आई-बाबांनी त्याला कल्पना दिली असेल नसेल.
मी काहीच बोलले नाही, हेच तर माझं होतं मी काहीच बोलत नसे घाबरून. मी विचार केला जाऊदे आई-बाबा म्हणतायत ना मग जायचं. माझंही ध्येयं होतं की आपण बीएस्सी. व्हायचं ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं. शिक्षण अर्ध्यावर सोडायचं नाही. मी पण विचार केला की, एक वर्षाचा तर प्रश्‍न आहे. असंच जाईल निघून. फक्त आता प्रश्‍न होता की, हे त्या चिडक्याबिब्ब्याला कसं सांगायचं? कारण हे सांगितलं की तो जाम चिडणार, आकांडतांडव करणार हे माहीत होतं.
आई-बाबांनी तर कोणालाही कळू दिलं नव्हतं की, मला रत्नागिरीला शिकायला ठेवणारेत. मलाही तशी तंबी होती की, कुणाला काही सांगायचं नाही. त्याच्या आत्या आमच्या जवळ राहायला होत्या, पण आईने त्यांनाही काही कळू दिलं नाही. त्या काळी आता सारखी फोनची साधनंही नव्हती. काय करायचं काय करायचं असं मला सारखं वाटतं होतं. शेवटी माझं नशीब बलवत्तर ठरलं. जायच्या आदल्यादिवशी मला त्याला भेटायची संधी मिळाली. मी त्याला सर्व सांगितलं, पण मला जसं वाटलं होतं तसा त्याने काहीही आकांडतांडव केला नाही. कारण त्यालाही शिक्षणाची आस होती. अजून पुढे खूप शिकायचं होतं त्याला, पण परिस्थितीमुळे शिकता येत नव्हतं, त्यामुळे ‘तू शिकतेयस हे चांगलंच आहे.’ असं तो समजूतदारपणे म्हणाला.
मग असं ठरलं की, मी त्याला पत्रं पाठवायचं, पण त्याने माझ्याशी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा फोन करायचा नाही. त्याकाळी मी ज्या माझ्या मावसभावाकडे जाणार होते त्याच्याकडे फोन होता, पण मी त्याला नंबर दिला नाही. मी रत्नागिरीला गेले.
माझा मावसभाऊ आणि त्याची बायको अतिशय छान होते. माझं कॉलेजही खूप छान होतं. तिथं मला उत्तम शिक्षण मिळत होतं. माझे खूप लाड होत होते. चांगल्या मैत्रिणी मिळाल्या, पण तरीही घराची ओढ असायचीच. माझं लपूनछपून पत्रं पाठवणंही सुरू होतं, पण बाकी कॉलेजात, अभ्यासात माझी प्रगती उत्तम होती, घरीही वागणं व्यवस्थित त्यामुळे कुणाला काही संशय नव्हता. मी गणपतीत सुट्टीत घरी आले आणि लगेचच परत रत्नागिरीला गेले. त्यावेळी त्याची नी माझी भेट होऊ शकली नाही, पण माझं पत्र मात्र मला जमेल तसं मी पाठवत होते.
दिवाळीच्या वेळी मात्र मी ठरवलं होतं की त्याला भेटायचंच. त्याप्रमाणे मी आधी पत्रातून त्याला तसं कळवलं होतं. मी घरी आले. घरी आल्यावर पण माझे खूप लाड व्हायचे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी मैत्रिणीकडे जाते असं सांगून त्याला भेटायला गेले.
आधी तो माझ्याशी खूप छान बोलला. त्याने मला त्यावेळी आशिकी पिक्चरमध्ये त्या हिरॉईनने लावली होती तशी रीबीन गिफ्ट दिली. तो पिक्चर तेव्हा खूप हिट झाला होता. मला खूप हसू आलं. कारण माझ्या दोन वेण्या. मी कुठे बांधणार ती रीबीन. तो थोडा खट्टू झाला, म्हणाला, ‘‘मला काही समजत नाही त्यातलं.’’ मी जाताना तो म्हणाला,
‘‘मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचंय.’’
‘‘काय आता?’’ मी विचारलं.
‘‘तू मला विसरून जा.’’ माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आत्ता तर छान गप्पा मारल्या आणि आता हा असं काय म्हणतोय?
‘‘का ऽ ऽ ऽ य?’’ मी जवळजवळ ओरडलेच.
‘‘हो रेणू तू मला विसरून जा. आपलं प्रेम संपलं. बास मला काही बोलायचं नाही यावर.’’
अपमान, राग, दु:ख सगळं सगळं एकत्र झालं माझ्या मनात. मी एवढी तारेवरची कसरत करून याला भेटायला आले आणि हा असा का सांगतो आहे काही कळेना. मी खाली मान घालून तशीच घरी गेले. धड रडताही येईना. काहीच कळेना.
रेणूने सोफ्यावर मान टाकली. किती दु:ख झेलली आपण, तेही लहान वयात. तिच्या मनात विचार आला. दोन क्षणच ती वास्तवात येत होती, पण आज मन काही थार्‍यावर नव्हतं. जणू ती मनोमन आपली कादंबरीच लिहून काढत होती. परत परत भूतकाळात रमत होती.
मी घरी आले. कसंबसं हसू आणत होते चेहर्‍यावर, पण मन मात्र दु:खी होतं. मला कधी एकदा मी परत रत्नागिरीत जातेय असं झालं होतं. मनात सतराशे साठ प्रश्‍न होते, ‘असं का केलं असेल त्याने?’ कदाचित माझ्या आई-बाबांनी त्याला तसं काही सांगितलं असेल का? किंवा मी नसताना त्याला दुसरी कोणी भेटली असेल का? काहीच कळायला मार्ग नव्हता.
मी रत्नागिरीला गेले, मी पूर्वीसारखी आनंदी दिसत नव्हते. एक-दोन वेळा वहिनीने मला विचारलंही,
‘‘रेणू काय झालं ग? बरं नाही का?’’ मला रडूच फुटलं. पण मी सांगितलं, ‘‘आईची आठवण येतेय.’’ तिलाही खूप वाईट वाटलं, मग मी ठरवलं आपण आपल्यामुळे या लोकांना दु:खी करतोय कारण त्यांनी मला खूप प्रेम दिलं होतं त्यांच्या मुलीप्रमाणेच माझा सांभाळ केला होता, मग आपण असं वागलं तर त्यांना दु:ख नको म्हणून मी माझं दु:ख मनाच्या तळाशी ढकललं नी परत आनंदी राहू लागले.
माझं कॉलेज घरापासून लांब होतं, गाव छोटं होतं त्यामुळे प्रोफेसरसुद्धा माझ्या भावाला ओळखत होते. मला तिथेही खूप मैत्रिणी होत्या. एक मैत्रीण आणि मी खूपच जीवलग झालो होतो, पण तिलाही मी हे प्रकरण काही सांगितलं नव्हतं. कधीतरी कॉलेजमधूनच मी पूर्वी त्याला पत्र लिहायचे पण आता सगळंच बंद होतं त्यामुळे जीवन अगदी संथगतीने चालले होतं, पण या संथगतीला कधीतरी वादळाचं रूप येईल असं मला वाटलंच नव्हतं.
एक दिवस मी रोजच्याप्रमाणे कॉलेजात गेले माझं प्रॅक्टिकल सुरू होतं. आणि आणि अचानक दारात तो उभा होता. मला आधी वाटलं मला भास होतोय का? मी परत दारात पाहिलं तर तोच! मी मला चिमटा काढून पाहिला. तेवढ्यात मॅडमचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्यांनी त्याला विचारलं,
‘‘हॅलो, कोण आपण?’’
‘‘मी… मी … ’’
‘‘कोणाला भेटायचे आहे.’’
‘‘मला रेणूला भेटायचे आहे.’’
मॅडमना बहुतेक ते अनपेक्षित असावे. मॅडमनी माझ्याकडे प्रश्‍नार्थक पाहिलं.
‘‘रेणू?’’
‘‘मॅडम, ते माझे नातेवाईक आहेत.’’ मी पटकन बोलले. नशीब सुचलं बोलायला.
‘‘ओके. जा बघून ये काय म्हणत आहेत.’’ कारण बाकीच्यांना उगाच डिस्टर्ब नको असा विचार त्यांनी केला असावा. आणि मी इथे भावाकडे राहाते ते त्यांना माहीत होतं त्यामुळे सावंतवाडीहून मला कोणीतरी भेटायला आलं असेल असा त्यांचा अंदाज होता.
मी बाहेर आले. कॉलेजच्या रूमपासून थोडं लांब आम्ही उभं राहिलो. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं. खूप दिवसांनी मला बघून बहुतेक त्याला भरून आलं होतं, माझीही अवस्था तशीच होती. अगदी फिल्मीस्टाईल. तरीही आपण कॉलेजमध्ये आहोत म्हणून मी लगेच भानावर आले. मी त्याला म्हटले,
‘‘तू आता इथे का आलास? कसा आलास? कसा सापडला वर्ग? मुळात मला विसर म्हणून सांगितलंस नी आलासच का?’’
‘‘सगळं एकदम कसं सांगू?’’ तो म्हणाला.
‘‘रेणू, खूप सॉरी, मी चुकलो.’’ त्याने परत मनापासून सांगितले त्याच्या डोळ्यात खूप पाणी जमा झाले होते.
‘‘हे बघ, माझा वर्ग सुरू आहे तो थोड्याच वेळात संपेल. तू जरा कॉलेजच्या बाहेर थांब मी कॉलेज संपलं की तुला भेटते आणि मी गर्रकन वळून परत वर्गात आले. मॅडमनी विचारलं,
‘‘कोण होतं?’’
मी सांगितलं, ‘‘आमचे नातेवाईक आले होते इथे कामानिमित्त, मला भेटायला आलेत.’’
‘‘बरं’’ म्हणून परत वर्ग सुरू झाला.
कधी एकदा ते लेक्चर संपतंय असं मला झालं. लेक्चर संपताच मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की, ‘‘तू पुढे हो, मी सर्वांना भेटून येते. आणखीही बरीच माणसं आहेत.’’
तिला काही संशय येण्यासारखं नव्हतं. मग आम्ही तिथून जवळच असणार्‍या एका पॉईंटवर गेलो तिथे भेटलो, त्याने माझी मनापासून माफी मागितली,
‘‘मी तुला विसरण्याचा प्रयत्न केला, कारण तुला त्रास नको म्हणून. पण मला वाटत नाही या जन्मात तरी ते शक्य आहे.’’ त्याने सांगितलं.
मी तरी काय बोलणार होते, मी तरी त्याला कुठे विसरले होते, परत असं वागू नको असं त्याला सांगितलं. माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, कारण मी घरी ठरलेल्या वेळेतच जात होते. 10-15 मिनिटे गप्पा मारल्यानंतर तो निघून गेला आणि परत आमचे पत्रव्यवहार सुरू झाले.
क्रमश:
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

======================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *