Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

माझी जाडी प्रचंड वाढली होती, त्यामुळे मला कधी सणक भरायची तर कधी काहीतरी प्रचंड पाठीत दुखायचं तसंही मी सगळं करत होते अशी छोटी-मोठी दुखणी सुरू होती, पण तरीही आता बर्‍यापैकी सगळं सुरूळीत होत होतं. रक्षाचा जन्म झाल्यापासून आमच्या आर्थिक आवक सुधारली होती. खरंच ती धनाची पेटी घेऊन जन्माला आली होती.
दोन-अडीच वर्षांपर्यंत बाळाला खूप त्रास झाला, कारण तिची साडेसाती सुरू होती. त्यामुळे तिच्या तब्येतीची तक्रार सुरू होती. तिचं वजन थोडं वाढलं की, नवीन काहीतरी त्रास व्हायचा. दोन वर्षांनंतर ती चालू लागली तोपर्यंत ही चालते का नाही असं आम्हाला वाटत होतं. पण ती अडीच वर्षांची झाली, बोलू लागली, चालू लागली. हसरी-खेळकर झाली. तिच्या त्या बाललीलात आम्ही मागचे सारे कष्ट विसरलो, जागून काढलेल्या रात्री विसरलो. तिला बाबाचा जास्त लळा होता, मी जरी तिला मांडीवर घेतलेलं असेल आणि आकाश आल्याची चाहूल तिला लगली तर ती माझ्या मांडीवरून उठून त्याच्याकडे जात असे. आता आमचा संसार खूप सुखी झाला होता. आम्ही नवीन घरात राहायला पण आलो होतो. आणि बाललीलात न्हाऊन निघत होतो.
माझ्या असंख्य अडचणी ऐकताना तुम्हाला खूप कंटाळा आला असेल माझ्याबद्दल सहानुभूती वाटली असेल, पण तरीही परमेश्‍वर माझी परीक्षा घेणं थांबवत नव्हता. सगळं काही छान चाललं होतं, मला माझ्या नवीन घरात पूर्णवेळ कामासाठी एक मुलगीही मिळाली होती, ती सगळी जबाबदारी समर्थपणे सांभाळत होती आणि रक्षाचा जन्म झाल्यापासून आमची आकाशला नवे नवे प्रोजेक्ट मिळत होते, शाळेतला माझा पगार पण वाढला होता. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे मला तिला कायम ठेवणे शक्यही झाले होते. सासरी-माहेरी ही माझं खूप चांगलं होतं. माझी शाळा पण व्यवस्थित सुरू झाली होती.
मध्येच आईचं हार्टचं दुखणं झालं, पण त्यातून ती सावरली. मी तिची सेवा केली. त्यातच आणखीन एक आनंदाची गोष्टं घडली ती म्हणजे आमच्या मुख्य शाखेत माझ्या शाळेतून बदली करायचं ठरलं आणि त्यात पहिलं नाव माझंच लागलं. मुख्य शाळा माझ्या घरापासून जवळ होती तिथे शास्त्र शिकवणारे शिक्षक निवृत्त झाले होते. त्यामुळे पहिलाच नंबर माझा लागला. त्यामुळे साहजिकच मला, घरच्यांना खूप आनंद झाला कारण आता माझा प्रवास वाचणार होता, मी जास्त वेळ घराला देऊ शकणार होते आणि ही शाळा अनुदानीत असल्याने आणखी जास्त पगार मिळणार होता. झालं आता अगदी छानच झालं सगळं. मुलगी पण शाळेत जाऊ लागली होती.
पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण मी आता जात होते त्या शाळेत एक ऑडिट झालं आणि त्या ऑडीटरने माझी बदली चुकीच्या पद्धतीने झाली आहे असा शिक्का माझ्या सेवा पुस्तिकेवर मारला. मला प्रचंड टेेंशन आलं. कारण यामुळे माझी नोकरी गेली नसती, पण पगार परत कमी झाला असता. त्या पगाराच्या जोरावर काही गोष्टी ठरवल्या होत्या किंवा इतके कष्ट करून नोकरी टिकवली होती, पण नशिबापुढे सगळं व्यर्थ म्हणतात तसं. मी त्यासाठी खूप लोकांना भेटले, पण कोणीही माझं काम करेना. या सगळ्यात माझी तब्येत परत ढासळली. कारण एकच टेंशन. शुगर, बीपी तसंच कोलेस्ट्रॉलही वाढलं.
साहजिकच घरातही वाद, भांडण होऊ लागली. रोज कुणाला ना कुणाला भेटायला जायचं असायचं, कलेक्टर किंवा कोणी पुढारी. एकदा तर मी त्या ऑडीटरनाही भेटले. पण काही उपयोग होत नव्हता. शेवटी केस करायची असं ठरलं.
त्यातच आईची तब्येतही ढासळत होती. तिला दोनदा अ‍ॅटॅक येऊन गेला. आमचे जुने घरमालक म्हणजे आकाशच्या आतेचं कुटुंब आणि माझं माहेरचं कुटुंब यांचं परत वाकडं झालं. कारण त्या घरमालकाच्या मुलानं पाण्याची सोयच बंद करून टाकली. त्यामुळे त्यांच्यात नी वडिलांच्यात परत वाद-विवाद सुरू झाले साहजिकच आईला त्याचं टेंशन. एकदा आईची तब्येत इतकी बिघडली की, डॉक्टरनी तिचा पाय काढावा लागणार असल्याचं सांगितलं. मग आम्ही तिला मुंबईला हलवलं. महिनाभर मी तिची सेवा केली आणि पायाचं बोटावर निभावलं. त्याच महिन्यात एक वेळ अशी आली की, आईचा श्‍वासोच्छवास बंद झाला. जणू सगळा खेळ संपला असं वाटत असताना मी तिला म्हंटलं, ‘‘आई, अजून माझा शाळेचा निकाल लागला नाहीये. तू काय म्हणाली होतीस, की तुझं सगळं सुरळीत झाल्याशिवाय मी तुला सोडून जाणार नाही.’’ माझी ही आर्त हाक बहुधा आईने ऐकली आणि ती परत शुद्धीत आली. याच आजारपणात खूप खर्च झाला. पण माझ्या नवर्‍याने वेळोवेळी लागेतील तसे पैसे पुरवले. नंतर बाबांनी ते पैसे फेडले, पण जेव्हा गरज असेल तेव्हा प्रत्येक वेळी तोच पैसे पुढे करत असे. तेव्हा आईला खूप वाईट वाटले की, ज्याला मी जावई म्हणून नाकारला त्यानेच आज माझा जीव वाचवला.
आज आमच्याकडे पुरेसा पैसा आहे, त्यामुळे आकाश त्याच्या अडल्या-नडल्या मित्रांना मनापासून मदत करतो. परत एकदा असा प्रसंग आला जेव्हा आम्ही सावंतवाडीतच होतो, आईची तब्येत एकदम ढासळली, पण परत ती पूर्ववत झाली.
अशी तिचं दुखणं सुरू होतं, आमचंही आयुष्य सुरळीत चालू होतं. एकदा आम्ही युरोप टूर केली, माझं राहिलेलं एम.एस्सी. ही मी पूर्ण केलं, कॉम्प्युटरचे कोर्स केले. आकाशलाही शिक्षणाची आवड होती, परिस्थितीमुळे त्याला शिकता आलं नव्हतं ते त्याने नंतर पूर्ण केलं. आज एका प्रतिथयश विद्यापीठाचा सल्लागार म्हणून तो काम करतो.
रक्षा दहावीत असताना मला युरीनचा खूप त्रास झाला. तेव्हाच एक दिवस वकिलांचा फोन आला की, तुम्ही केस जिंकलात. मला खूप आनंद झाला, पण तब्येत बरी नसल्याने मी आईकडे जाऊ शकले नाही. आईला फोन करून सांगितलं की, ‘‘केस मी जिंकले. मला बरं वाटलं की, मी येऊन जाईन.’’ आई घरातल्या घरात हिंडत-फिरत होती, माझ्यासाठी, रक्षासाठी काही ना काही करून पाठवायची. आईलाही खूप आनंद झाला.
दुसर्‍याच दिवशी तिची तब्येत बिघडली. बाबांना ती सांगत होती,
‘‘रेणूला बोलवा.’’
बाबा म्हणाले, ‘‘तिची तब्येत बरी नाही, नंतर बोलावू.’’
दुपारी सर्व आवरून आई म्हणाली, ‘‘मी झोपते मला कुणी हाक मारू नका.’’ बराच वेळ झाला तरी आई उठली नाही, म्हणून बाबा बघायला गेले तर आईने कायची चिरनिद्रा घेतलेली होती. जणू माझं भलं होण्याची वाट बघत ती आपलं आयुष्यं कंठीत होती.
आताही डोळे आईच्या आठवणीने भरून आले. आई म्हणजे आपल्या जीवनातलं एक असं स्थान की ज्याची उणीव कधीही भरून येणार नाही. माझं लग्न झालं तेवढे एक-दोन महिने तिने माझ्यावर राग धरला, पण परत अविरत माया केली.

रेणू आता उठली होती. तिने बाहेर डोकावले, संधीप्रकाश पसरला होता, सुंदर सोनेरी प्रकाश, हवं हवं वाटणार वातावरण. ती बाहेर बघत बसली, परत भानावर आली आता आकाश आला तर आपली काही खैर नाही. झालं आता आपल्या गतआयुष्यावर पडदा टाकायचा जणू आपण आपली ही कादंबरी मनातल्या मनात लिहूनच काढली आहे, आता परत तो विचार करायचा नाही, त्रास करून घ्यायचा नाही असं तिने अगदी पक्कं ठरवलं. आता आपल्या आयुष्याची संध्याकाळ आपण खूप आनंदात घालवायची असं तिने ठरवलं. आकाशला फिरायची आवड नाही, पण मला कुठेही जायला त्याचं बंधन नाही, त्यामुळे जितकं मिळेल तितकं फिरून घ्यायचं आणि उरलेल्या वेळ आकाशबरोबर काढायचा, अर्थात तो त्याच्या कामाच्या रगाड्यातून बाहेर आला तर ती हलकेच हसली.
गरम गरम कांदाबटाट्याचा रस्सा आणि पोळ्या, भात असा आकाशच्या आवडीचा फक्कड बेत करू तिने ठरवलं. आणि ती देवाजवळ दिवा लावायला उठली.
दिवा लावतानाही तिच्या मनात विचार आलाच. जसा आईने आपल्यावर जीव लावला तसाच रक्षावरही आपण असाच जीव लावला फक्त आईची एक सुधारली की तिचे तिच्या पसंतीच्या मुलाशी काहीही खळखळ न करता लग्न लावून दिलं. देव माझ्या रक्षाला सुखी ठेवो तिच्या वाटची सगळी दु:ख मी भोगली आहेत, आता तिला कोणतेही दु:ख मिळू दे नको. अशी रेणूने मनोमन प्रार्थना केली.
बाहेरून येणार्‍या झोबणार्‍या वार्‍याने दिवा विझू नये म्हणून तिने खिडकीची दारं बंद करून घेतली.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

===================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *