Ritbhatmarathi

Search
Close this search box.

संघर्ष (1990 सालाची प्रेम कहाणी) भाग – १

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

‘‘आज लेकीचं लग्नं होऊन महिना होऊन गेला. लग्नांतर पूजा, गोंधळ सगळे सोपस्कार अगदी छान पार पडले नाही का?’’ रेणूने आकाशला विचारलं.
‘‘हो गं सगळं छान झालं.’’ आकाशने फोन मध्ये बघतच उत्तर दिलं.
‘‘सारखं काय आहे त्या फोनमध्ये?’’ रेणू वैतागून म्हणाली.
‘‘आता झालं ना लग्न सोहळा, कामाला लागायला नको का? किती दिवस कामं बंद आहेत. चल मला आवरायचं आहे.’’
‘‘तुम्हा पुरुषांना कसल्या भावनाच नसतात.’’
‘‘अगं त्यात भावनांचं काय? कालपासून तू नुसती रक्षाची आठवण काढत आहेस. सारखा तोच विचार करत राहिलीस तर त्यातच गुंतशील. आता तूही तुझं रुटीन सुरू कर.’’
‘‘हो रे हे सांगायला खूप सोपं आहे. मला तुझं आश्‍चर्य वाटतं. लेक जवळ असताना तिच्याशिवाय तुझं पानही हलत नव्हतं. माझ्यापेक्षा तुझं नी तिचं चांगलं जमत होतं. माझ्याशी तर ती मोकळेपणाने बोलतही नव्हती. आणि आता तुझ्यापेक्षा मीच जास्त मिस करतेय तिला.’’
‘‘अगं मी पण मिस करतोय, पण किती रडत राहणार?’’ असं म्हणताना त्याचा आवाजही भरून आला. पण त्याने आपले अश्रू लपवले.
‘‘आकाश, मला माहितेय, तू दाखवत नाहीस, पण खूप मिस करतोयस ना रक्षाला?’’
‘‘हा काय प्रश्‍न झाला का गं?’’
‘‘आकाश, मला राहून राहून असं वाटतंय, आपण रक्षाचं लग्नं करून दिलं, तिनंही आपल्या पसंतीचा मुलगा निवडला. आपण त्याची सर्व माहिती काढून तिचं लग्नं करून दिलं, पण आपल्याबाबतीत…’’
‘‘जाऊदे ना आता तो विषय!’’
‘‘ते तर आहेच रे, पण फार वाईट वाटतं कधीतरी आणि कळतंच नाही, आपलं चुकलं की आपल्या पालकांचं?’’
‘‘रेणू, आपणही चुकलो नाही, आणि आपले पालकही चूक होती ती परिस्थितीची आणि पालक-मुलं यांच्यातील संबंधांची, मोकळेपणाची. आत्ताची मुलं आई-वडिलांशी मैत्रीच्या नात्याने वागतात आपल्यावेळी तसं नव्हतं.’’
‘‘हो तेही आहेच.’’
‘‘चल आता आवर लवकर मला जेवायला वाढ केलंयस का काही?’’
‘‘नाही रे मी आज काही केलं नाही.’’
‘‘कठीण आहेस तू.’’
‘‘ओके मी बाहेरच खातो काहीतरी. तुला काही पार्सल पाठवू का?’’÷
‘‘नको, मी आज लंघन करते, लीक्वीड डाएट तू कॉफी घेतोस का?’’
‘‘नको मी पळतो, मला उशीर होतोय.’’
आकाश पळाला म्हणजे पळण्याचं वय नाही पण बाहेर पडून गेला. रेणूने मस्त दोन मोठे कप गरमागरम कॉफी केली एक मोठा कप भरून घेतला आणि दुसरा थर्मासमध्ये भरून ठेवला.’’
कॉफीचा कप घेऊन ती झोपाळ्यावर बसली असं बसून भूतकाळात रमायला तिला फार आवडत असे. आता कोणीही डिस्टर्ब करायला येणार नव्हतं. तिने फोनही सायलेंटवर ठेवून टाकला आणि ती झोपाळ्याच्या हेलकाव्याबरोबर भूतकाळाच्या हेलकाव्यात अगदी बालपणात पोचली.
गरम गरम कॉफी आणि सोबत बालपणीतल्या आठवणी काही रम्य काही मनाला वेदना देणार्‍या. आपल्या जीवनावर एक कादंबरीच होईल असं तिला वाटलं आणि तिचं तिलाच हसू आलं.
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

===========================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *