Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® सौ. गीता गजानन गरुड

समीरची आई देवाघरी गेली तेंव्हा तो अकरावीत होता. चारपाच दिवस ताप काय आला नी होत्याचं नव्हतं झालं.

समीरला कोणीतरी कॉलेजमधून घरी घेऊन आलं. घराजवळ त्याला बरीच गर्दी दिसली. जरा पुढे सरला तर हिरवी साडी नेसलेली,कपाळभर कुंकवाचा मळवट भरलेली,वेणी माळलेली त्याची आई त्याला खुर्चीत बसलेली दिसली. त्याचे वडील त्याला जवळ घेऊन रडू लागले. आई आत्ता कधीच भेटणार नाही,दिसणार नाही या विचारांनी त्याचं काळीज हललं. त्याने जोरात हबंरडा फोडला.

समीरची ती ‘आई’ अशी आर्त किंचाळी थेट आकाशाला भेदून गेली. आकाशातून वीजा चमकू लागल्या. तिरडी उचलता क्षणी समीर वेडापिसा झाला. कोणालाच ऐकेनासा झाला. माझ्या आईला नका घेऊन जाऊ म्हणून ओरडू लागला. आजुबाजूला जमा झालेले शेजारीपाजारी समीरच्या आर्त रुदनाने विव्हल झाले.

थोड्याच दिवसांत नातेवाईक आपापल्या घरी गेले. समीरची आत्या तेवढी थोडे महिने थांबली समीरसोबत. समीरच्या वडलांच पुन्हा लग्न करायचं असं वडिलधाऱ्या मंडळींनी ठरवलं.

थोड्याच दिवसांत एक स्थळ आलं. समीरच्या आत्तेची चुलत नणंद,मेघा..तिच्या पतीला दोन वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली होती. दोन महिन्यातच मेघाचं व समीरच्या वडिलांच वैदिक पद्धतीने लग्न झालं. समीरला वडिलांचा खूप राग आला होता. त्याच्या आईच्या जागी दुसरी कोणी येणं याची तो कल्पनाच करु शकत नव्हता.

समीरच्या वडिलांच लग्न झालं तसं समीरची आत्या महिनाभरासाठी समीरला तिच्या सासरी घेऊन गेली. समीर आत्याच्या मुलांत चांगलाच रंगला. थोडे दिवस का होईना दु:खातून बाहेर आला. हसूखेळू लागला. भावंडांसोबत नदीत पोहू लागला. रात्री मोकळ्या रानात आभाळाकडे टक लावून बघे व आईला शोधत राही.

आत्त्याला कुणकुण लागताच ती समीरला कुशीत घेई व त्याचे डोळे पुसे.
समीर आत्त्याला म्हणे,”आत्त्या,नको ना गं मला बाबांकडे पाठवू, तुझ्याकडेच ठेवनं प्लीज. पहिले तर मी यायचो नाही म्हणून रागवायचीस मग आत्ता मी इथेच रहातो म्हणतोय तर घे ना गं ठेवून मला. आत्त्या,आईपण नाहीय गं तिथे. मला कसं करमणार! मी तिथे गेलो की प्रत्येक वस्तुत मला आई दिसणार मग मी सारखी आठवण काढून रडत बसेल. चालेल तुला मी रडलेलं?”

आत्त्याने घशाजवळ आलेला आवंढा गिळला व समीरला म्हणाली,”समीर बाळा,तू अशी सारखी आईची आठवण काढत राहिलास तर तिला लवकर लवकर देवाकडे जाता येणार नाही. तू रडलास की तिला त्रास होणार. तेंव्हा असं मुळीच रडायचं नाही आणि नवीन आईसोबत बोलायचं,तिच्याशी मैत्री करायची. करशील ना एवढं तुझ्या आत्त्यासाठी.”

समीरची सुट्टी संपली. तो घरी गेला. महिन्याभरात समीरचे बाबा व मेघा चांगलेच रुळले होते.
आपल्या आईला कधीही स्वैंपाकात मदत न करणारे बाबा मेधाला स्वैंपाकात,इतर घरकामात स्वतःहून मदत करताहेत हे पाहून समीरला आश्चर्य वाटे, रागही येई. बऱ्याचदा मेधा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करे पण समीर तिला दाद देत नव्हता. काही महिन्यानंतर तो जातो,येतो,जेवण दे असं मोघम बोलू लागला तिच्याशी.

मेघाची मुलगी,माया हॉस्टेलमध्ये ठेवली होती. समीरचे बाबा व मेधा तिला घेऊन आले. मायाला पुण्यातल्या शाळेत प्रवेश घेतला. माया सहावीत होती. ती समीरला दादा म्हणू लागली. त्याच्याकडून गणित़ शिकून घेऊ लागली.

हॉस्टेलला राहिल्याने मायाचा स्वभाव बोलका होता. समीरही तिच्यामुळे हळूहळू मोकळा होऊ लागला. दोन तुटलेली कुटुंब जुळत होती. आयुष्य असंच तर असतं. जोडीतला एक आधी जातो दुसरा नंतर. जोडीदार लवकर गेल्यास त्या स्त्रीने वा पुरुषाने नवीन साथ शोधणं हे उत्तम. एकाकी आयुष्य अशक्य नसतं पण भयाण असतं. माणूस सोबतीसाठी आसुसलेला असतो. कितीही म्हंटलं तरी एकलकोंडा नसतो. मायाची व समीरची दोस्ती पाहून समीरच्या बाबांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

समीरची बारावीची परीक्षा जवळ आली तेंव्हा मेधा रात्री जागी राहू लागली. तो अभ्यास करत असताना कधी त्याला कॉफी बनवून देई तर कधी त्याच्या आवडीचं चीज सँडवीच देई. पेपर संपल्यावर समीर मायाला घेऊन त्याच्या आत्त्याकडे गेला.

तिथेही गोबऱ्या गालांच्या बडबड्या मायाने सगळ्यांना आपलसं केलं.

बारावीचा रिझल्ट लागला. समीर उत्तम गुणांनी पास झाला. सीईटीच्या गुणांनुसार त्याला नामवंत कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळाला. मेधा माया व समीर दोघांचीही नीट काळजी घेत होती तरी समीरला त्याच्या आईची आठवण येई मग दोनदोन दिवस तो अबोल होई . त्याच्याच कोषात गुरफटून जाई. आईचा फोटो पुस्तकात ठेवून एकटक बघत बसे.

मेधाला खूप वाटायचं समीरनेही तिला आई म्हणून साद घालावी पण होत नव्हतं तसं. अशावेळी समीरचे बाबा तिला धीर द्यायचे. हळूहळू होईल सर्व सुरळीत म्हणायचे.

ते पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर बदाबदा पाऊस कोसळत होता. मेधा बाजारात गेली होती. नेमका तिच्या छत्रीचा दांडा मोडला. भर पावसात ती भिजत आली. घरी येताच तिने कपडे बदलले. गरम पाण्याने न्हाली. मग देवपूजा करुन स्वैंपाकाला लागली. सगळं आवरुन झोपायला गेली.

समीर व माया भुताचा पिक्चर बघत बसले होते तर समीरचे बाबा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. मेधाने तिघांच अंथरूण हॉलमध्ये घातलं. अंथरूणावर पडताच तिचा डोळा लागला.

मध्यरात्री समीरला कण्हण्याचा आवाज आला. तो उठला. त्याने लाईट लावली. पाहिलं तर मेधा कण्हत होती. समीरने तिला उठवण्यासाठी म्हणून हात लावला तर त्याचा हात जवळजवळ भाजला,एवढं कढत अंग होतं मेधाचं. मेधाला सपाटून ताप भरला होता. त्याने मीठाच्या पाण्याच्या घड्या करुन मेधाच्या कपाळावर ठेवल्या. वारंवार तो पट्टी पाण्यात बुडवून पिळून परत तिच्या कपाळावर ठेवत होता.

पहाट होताच समीरने फेमिली डॉक्टरांना फोन लावला. डॉक्टरांनी गोळ्या,औषधं लिहून दिली. ताप येतजात होता. मायाचा चेहराही आईचा आजार पाहून बावला. ती समीरला जमेल तशी मदत करत होती. समीरची कॉलेजलाही दांडी होत होती. ऑफिसच्या कामामुळे समीरच्या बाबांना लवकर येणं शक्य नव्हतं तरी ते फोनवरून समीरला सूचना देत होते.

सहा दिवस झाले तरी ताप येत जात होता ते पाहून डॉक्टरांनी मेधाला इस्पितळात नेण्यास सांगितलं. समीरची आत्तेही धावत आली. मेधाला एडमिट केलं. सतत तिला सलाईन चढवणं चालू होतं. अधनंमधनं इंजेक्शन देत होते. अतितापाने मेघाला ग्लानी येत होती.

समीरचा धीर सुटत चालला होता. त्याच्याही नकळत तो मेधाच्या गळ्यात पडून रडू लागला,”आई,मला सोडून नको नं जाऊस,नको नं जाऊस मला सोडून.” त्याची आई ही साद कानावर येताच मेधाने आपसूक डोळे उघडले व हलकेच समीरच्या हातावर हात ठेवला.
चारेक दिवसात मेघा तापातून बरी झाली. आत्ता तिला आई म्हणून साद घालणारी तिची दोन लेकरं होती.

–प्रारंभ नवीन नात्याचा.

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *