Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौम्या एका सुशिक्षित कुटुंबामधून आलेली मुलगी…घरकामाच्या बाबतीत एकदम काटेकोर
असलेली…घरकामात जसा उरक सौम्याचा तसाच खाण्या-पिण्याच्या बाबतीतही एकदम वेळच्या वेळी
असलेलं सौम्याला लागायचं…आपली आई निर्मला जशी घरातल्या सगळ्याच कामात तरबेज अगदी तशीच
तरबेज सौम्याही…लग्न होऊन आपल्या सासरी सौम्या गेली पण तिथली परिस्थिती लगेच सौम्याच्या
अंगवळणी पडेल असं नाही झालं…सौम्याचा नवरा सचिन एका मोठ्या आय टी कंपनीत मोठ्या पोस्ट वर
त्यामुळे सौम्याने नोकरी करावी अशी अपेक्षा सचिनची नव्हती…सौम्याने फक्त घरात चूल आणि मूल
पाहावं एवढीच सचिनची अपेक्षा…घरात सासू सासरे आणि दिर असं चार जणांचं कुटुंब त्यातल्या त्यात
नणंदबाई अगदी हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या…त्यामुळे घरात पाहुण्यांचा सतत राबता असे….सौम्या माहेरी
असतानाच स्वयंपाकात तरबेज असल्याने सासरी स्वयंपाकाच्या बाबतीत फारशी अडचण आली नाही
म्हणून लगेचच सासूबाईंनीही स्वयंपाकघरापासून रिटायरमेंट घेतली…सौम्याही आपल्या माहेरी लाडाकोडात
वाढलेली असल्याने स्वयंपाक करून खाणं एवढं नक्कीच करत नसे पण सर्व काही अवगत असल्याने

सासूबाईंचीही अगदी लाडकी सून असा नावलौकिक आधीच मिळवला…

एक दिवस दोघी सासू सुनेचं असा संवाद चालला होता…

सौम्या – आई…तुमचं गुडघेदुखीचं औषध आणायचं आहे ना आज यांना फोन करून सांगते नाहीतर एक
मेसेज टाकते…निदान वाचतील तरी…

सासूबाई – अगं ते जाऊ देत गं तू पहिलं जेवून घेतलंस कि नाही ते सांग…नाहीतर रांधून-वाढून द्यायचं
सर्वांना आणि स्वतः मात्र अर्धपोटी राहायचं….

सौम्या – आई…तुम्ही पण ना सर्वांना मनमोकळेपणानं जेवण करताना पहिलं ना कि आपोआपच पोट
भरतं बाईचं..

सासूबाई – बाई गं तुम्ही आजकालच्या मुलीही असा मानता म्हणजे नवलच आहे की…नाहीतर पहिला
स्वतःचा विचार करणाऱ्या असतात आजकालच्या मुली…!

असाच दुपारची थोडी विश्रांती मिळावी म्हणून सौम्या आपल्या बेडमध्ये वामकुक्षीसाठी गेली पण झोप
काही येईना…सासूबाईंचं वाक्य मनात कायम घोळत राहिलं…’ रांधून-वाढून द्यायचं सर्वांना आणि स्वतः
अर्धपोटी राहायचं…’ पडल्या पडल्या आपल्या आईचा म्हणजेच निर्मलाताईंचं फ्लॅशबॅक सौम्याला आठवू

लागला…त्या वेळी सणवार असले…काही असले म्हणजे सगळं गोतावळा गावी जमायचा आपली आई
सुगरण म्हणून गावी सगळ्या स्वयंपाकघराचा भार आईवरती….एकादशीचा दिवस म्हणून संपूर्ण दिवस
घरात सर्वांचा उपवास राबणारी फक्त आपली आई म्हणून आईने रात्रीच साबुदाणा वाडा करायचं
ठरवलं….पातेले भरून शाबूदाणे भिजत घातले दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून बटाटे उकडून…हिरवी
मिरची वाटून शाबुदानावड्याचं पीठ भिजवून तयार होत…तर दुसरीकडे शेंगदाण्याच्या चटणीचीही तयारी
झालीच होती म्हणून चटणीला फोडणी दिलीही गेली…आणि सौम्या आपल्या आईच्या मदतीसाठी उठून
बसली होती…अंघोळ आटोपून जो तो येई त्याला वड्याच ताट हातात मिळत असे…एक एक असे करून
ढीगभर वडे संपूनही गेले…सौम्याने आपल्या आईकडे पहिलं आणि आपल्या आईला म्हणाली-
सौम्या – आई…अगं आता तू काय खाणार…
निर्मलाताई – सौम्या…बाळा हे शेवटचे उरले आहेत ना ते तू खाऊन घे…मला ना आज खिचडी करते
शाबुदाण्याची काल थोडेसे वेगळे भिजत घातले होते मी शाबूदाणे…तू काळजी करू नकोस…सगळ्यांनी
मनमुरादपणे खाल्लं ना माझं पोट आपोआपच भरलं गं…
आपल्या आईच्या अशा आठवणी आठवून सौम्याच्या डोळ्यांमधून पाणी आलं…आजही सासूबाईंनीही
बाईनं कशी तडजोड करायला पाहिजे याची लक्ख जाणीव करून दिली…बाईनं खाण्यापिण्याच्या बाबतीत
तडजोड करणं खरंच चुकीचं आहे…या शतकात तरी…अजूनही आपल्या नवऱ्याच्या आवडी निवडी जपण्यात
बाईचं पूर्ण आयुष्य जातं आपल्याला अमुक आवडत…तमुक आवडत नाही अजूनही बायका सांगायला
संकोचतात…परिस्थिती नसेल तर नाईलाज पण सधन आणि सुस्थितीत असेल तरीही बाईच्या नशिबात
त्याग लिहिलेलेच असतो कारण आपल्या आवडी निवडी ठामपणे सांगणं हे आजही पुरुषी मानसिकतेचं
द्योतक मानलं जातं…कारण आपल्या नवऱ्याच्या आवडी निवडी च्या विरुद्ध जर त्याची बायको गेली तर
ती बाई उर्मट आणि असभ्य समजली जाते…तिला सासू कडून जाच सहन करावा लागतो…अशा विचारताच
सौम्याच्या डोळ्यातून पाणी येत होत…अचानक दारावरची बेल वाजली आपल्या डोळ्याच्या पाणावलेल्या
कडा पुसतच तिने दरवाजा उघडला दारात सचिनला पाहताच चेहऱ्यावर हसू आलं…सौम्याने आपल्या
नवऱ्याला विचारलं…
सौम्या – आज स्वारी लवकर कशी काय आली…
सचिन – नाही गं…विशेष काही नाही ..बरं खाली जा गाडीमध्ये भरपूर खायला आणलंय…
सौम्या – भरपूर म्हणजे काय…दुकान आणलं की काय सगळं…[ हसून ]

सचिन – नाही गं…म्हटलं…आज तुला थोडीशी सुट्टी द्यावी स्वयंपाकापासून….काही पार्सल
आणलंय…त्याचबरोबर स्टार्टर म्हणून पाणीपुरीही आणलीय…फक्त सर्व्ह करायची एवढंच त्याच्यासोबत
वडापाव,सामोसा,भेळ,कच्ची दाबेली असं सगळं आणलंय…
सौम्या – अरे वाह…या सगळ्या तर माझ्या आवडी-निवडी आहेत…
सचिन – आपल्या आवडी निवडी बाबत बोलली नाहीस तू कधी…म्हणून मीच स्वतःहून आणलंय सगळं…..
सौम्या आनंदाने जिने उतरून खाली गाडीपाशी गेली आणि सगळ्या पिशव्या आणताना
मनोमनी सुखावलीही…कारण खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्याला आपलं मन नाही मारता येणार…म्हणून
आनंदित झाली होती… खरंच आपल्या भारतीय संस्कृतीत अजूनही बायका आपलं मन मारून जगत
असताना आपल्याला दिसतात…भारतीय स्त्रीला आपलं मनमुराद बालपण फार कमी उपभोगायला
मिळतं…संस्कार,रूढी,रीती-रिवाज अशा बेड्या नकळत पायात बांधल्या जातात…अगदी मोकळेपणाने
बोलण्याच्या बाबतीतही…आपलं मन मारूनच राहावं लागत….सध्या वाढत्या शहरीकरणामुळे परिस्थिती
बदलली असली तरीही आजही बाईच्या नशिबात अवहेलना आहेच…कितीही भूक लागली तरीही आईने
स्वतःसाठी पहिलं ताट वाढून घेणं हे अजूनही पाहण्यात आलेलं नाहीय….ही पिढ्यान पिढ्याची मानसिकता
आहे…यात बदल जर करायचा असेल तर स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी… रांधण्यापासून ते किचन
ओटा आवरेपर्यंत सगळी काम एका कर्त्या बाईनेच करावी असं कुठेच लिहिलेलं नाहीय…त्यासाठी
स्वावलंबन ही गोष्ट प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे जेणेकरून एकट्या बाईला असं वाटायला नको
की ‘ रांधून वाढणारी उपाशीच ‘
या विचारताच सौम्या घरात येऊन पोहोचली….पार्सल स्वयंपाकघरात नेऊन ठेवलं आणि सर्वांनी
मिळून आणलेल्या पाणीपुरीवरती ताव मारला…सौम्या पटापट सर्व्ह करत होती आणि सगळीजण
मनसोक्तपणे खात होती सर्वांना वाढताना शेवटी स्वतःसाठी सर्व्ह करायला कुणीच नव्हतं म्हणून प्रत्यक्ष
सचिन आपल्या बायकोसाठी पाणीपुरी सर्व्ह करण्यासाठी पुढे झाला…आपला नवरा आपल्यासाठी पुढे होतोय
या एवढ्या कल्पनेनेही सौम्याला आकाश ठेंगणं वाटू लागलं….दिर नितीन यांचा स्वभाव बोलका असल्याने
लगेच पटकन बोलून गेले…
नितीन – वहिनी…पहा तुम्ही किती नशीबवान आहात…नवरा मस्त पाणीपुरी सर्व्ह करतोय तुम्हाला…वहिनी
नाव घेतलंच पाहिजे…
सौम्या – भाऊजी काहीतरीच…नाव घ्यायला घास थोडीच भरवत आहेत हे…
नितीन – तरीही नाव घेतलंच पाहिजे….

सौम्या – “सात जन्म संसार करेल असं मागितलं होत मागणं….

सचिनरावांच्या प्रेमापुढे मला वाटत आकाश ठेंगणं “


सौम्याच्या अशा उखाण्यामुळे आणखीनच घरात उत्साहित वातावरण झालं….आणि
सर्वांना चार घास जेवताना जास्त गेले….