Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रक्षाबंधन सणाची थोडक्यात माहिती – रक्षाबंधन निबंध मराठी

रक्षाबंधन निबंध मराठी:

श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी त्यानंतर येणारा दुसरा सण म्हणजेच राखीपौर्णिमा. यास रक्षाबंधन असेही म्हणतात. याचदिवशी दर्याला नारळ अर्पण करून कोळीबांधव पावसात थांबवलेल्या बोटींना पुन्हा दर्यात सोडतात म्हणून यादिवसाला नारळीपौर्णिमा असेही म्हणतात.

हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण पौर्णिमेस , आणि इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये हा सण येतो. रक्षण करणाऱ्या आणि रक्षिल्या जाणाऱ्या व्यक्तींमधील सुंदर नाते जपणारा ‘रक्षाबंधन’ हा सण.

भाऊबहिणीच्या नात्यातील स्नेहाचे, जिव्हाळ्याचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन हा सण श्रावणी पौर्णिमेस साजरा करतात. देशभरात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात कजरी पौर्णिमा तर पश्चिम भारतात नारळीपौर्णिमा या नावांनी रक्षाबंधन साजरा करतात.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाबहिणीची वर्षातनं किमान एकदातरी भेट होते. बालपणीच्या मधुर स्म्रुतींना उजाळा दिला जातो. बालपणी वाटून खाल्लेला खाऊ, केलेली दंगामस्ती सारं काही आठवून आठवून बहीणभाऊ हसतात,आपल्या चिल्यापिल्यांना आपल्या द्रुढ नात्याविषयी सांगतात.

राखी म्हणजे रक्षासूत्र.
रक्षा करणे म्हणजे रक्षण करणे. जो रक्षितो तो रक्षक. यात कुणी लहानमोठा असा भेद केला जात नाही. भावाला रक्षक मानल्याने बहीण लहान होत नाही उलटपक्षी हल्ली बऱ्याच ठिकाणी बहिणी भावाच्या अडीअडचणीला धावून येतात.

बहिणीला आपला भाऊ मग तो तिच्याहून मोठा असो वा लहानगा, तिला आपल्या भावाचा सार्थ अभिमान असतो. आपल्यावर कोणतेही संकट , आपत्ती आली तर आपला भाऊ आपल्या हाकेला नक्कीच धावून येईन याची बहिणीला खात्री असते. याच खात्रीचे आणि विश्वासाचे प्रतिक म्हणजे रक्षासूत्र अर्थात राखी.

ज्या बहिणींना भाऊ नसतो त्या एकमेकींना राखी बांधतात, अर्थात एकमेकींचे आपण रक्षण करू असे परस्परांना वचन देतात किंवा आपल्या वडिलांना अगर मानलेल्या भावाला राखी बांधतात.

राखीपौर्णिमेआधी महिनाभरतरी बाजारात राखीची दुकाने सजतात. चांदीची राखी, चंदनाची राखी, कार्टुन्सच्या राख्या, नाजूक गोंड्याच्या राख्या पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. उल्हासनगरमधे तर नोटांच्या गोलाकार राख्याही पहावयास मिळतात. पाच रुपयापासून अगदी दोन हजाराच्या नोटापर्यंत गोलाकार पीनअप करून या राख्या बनवतात.

राखीपौर्णिमेच्या आदल्या दिवशी बहिणी तळहातावर मेंदी काढतात. सकाळी आन्हीकं आवरून भावासाठी त्याच्या आवडीची मिठाई बनवतात. भावाकडे जाण्यासाठी तयारी करतात. नवीन ड्रेस घालून, दागिने घालून मुलाबाळांना घेऊन भावाकडे जातात किंवा भाऊ बहिणीकडे येतो.

भावाला ओवाळण्यासाठी कुंकु, नारळ, अक्षदा, सुपारी, मिठाई, अंगठी असे आरतीचे ताट तयार करतात. पाटाभोवती रांगोळी रेखाटतात. भाऊही नवीन पोषाख घालून डोक्यावर टोपी घालून पाटावर बसतो.

बहीण भावाला कुंकू लावते, अक्षदा लावते व त्याला ओवाळते. मिठाई भरवते. भाऊही बहिणीस मिठाई खाऊ घालतो. बहीण भावाला नमस्कार करते. भाऊ लहान असल्यास तो बहिणीस नमस्कार करतो. भाऊ ओवाळणीच्या ताटात बहिणीच्या आवडीची वस्तू ठेवतो अगर पैशाचे पाकीट ठेवतो. या ओवाळणीवरूनही दोघांत थट्टामस्करी होते. आनंदाची देवाणघेवाण होते. यानिमित्ताने माहेरवाशिणीचं आईबाबाबांना भेटणं होतं, वहिनीशी गुजगोष्टी होतात.

ज्या बहीणभावंडांना काही कारणाने एकमेकांना भेटणे जमत नाही तेथे बहीण कुरियरद्वारे भावाला राखी पाठवते व भाऊही मनिऑर्डरने बहिणीस ओवाळणी पाठवतो किंवा एखादी भेटवस्तू कुरिअरद्वारे पाठवतो. हे भाऊबहीण मग फोनवर बोलून भेटण्याची तहान भागवतात.

हल्ली तर व्हिडीओ कॉल करूनही त्याद्वारे बहीण दूरदेशी स्थाईक असलेल्या भाऊरायास तिलक लावते,  औक्षण करते. राखी, बहिणीच्या वतीने भावाची लेक अगर पत्नी त्याच्या मनगटावर बांधते, ते पाहून बहिणीला कोण समाधान मिळते!

भारतमातेचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र सीमेवर उभ्या असणाऱ्या सैनिकांना काही स्वयंसेवी संस्थांतील भगिनी तिथे जाऊन राखी बांधतात, त्यांना तिलक लावतात, औक्षण करतात, मिठाई खाऊ घालतात. त्याप्रसंगी कुटुंबापासून कोसो दूर कर्तव्य पार पाडण्यासाठी रहाणाऱ्या सैनिकांचे डोळे पाणावतात.

रक्षाबंधन हा सण फार पुर्वीपासून प्रचलित आहे व त्यासंबंधी बऱ्याच रंजक आख्यायिकाही प्रचलित आहेत.

● एक कथा अशी आहे की एकदा, राजा इंद्र व राक्षसांचे तब्बल बारा वर्ष युद्ध सुरु होते. जेव्हा देवांचा पराभव अटळ असल्याची चिन्हे दिसू लागली तेव्हा देवांचा राजा इंद्र, गुरु बृहस्पतींकडे मदत मागण्यासाठी गेला. तेव्हा गुरु बृहस्पतींनी इंद्रास सांगितले की श्रावण पौर्णिमेच्या दिवशी जर एक अभिमंत्रित धागा इंद्राने हातावर धारण केला तर त्याला असुरांविरुद्ध युद्धामध्ये विजय निश्चितच मिळेल. त्याप्रमाणे इंद्राची पत्नी सचि हिने तपश्चर्या केली व तपोबलाने रक्षासूत्र तयार करून ते  इंद्राच्या हातावर बांधले, ज्यामुळे इंद्राचे व सर्व देवतागणांचे असुरांपासून रक्षण झाले. तेव्हापासून शदर श्रावणपौर्णिमेला रक्षाबंधनाची परंपरा सुरु झाल्याचे म्हणतात.

● रक्षाबंधनाची दुसरी अशी आख्यायिका आहे ती मेवाड प्रांताच्या राणी कर्णावती आणि बादशाह हुमायून यांची. मेवाडचे राजे राणा संग यांच्या मृत्यनंतर त्यांचे जेष्ठ पुत्र विक्रमजीत गादीवर आले. पण सारा राज्यकारभार राणी कर्णावती बघत असे. जेव्हा गुजरातच्या बहादुरशाहने मेवाड प्रांतावर दुसऱ्या वेळेला आक्रमण केले तेव्हा राणी कर्णावतीने मुघल सम्राट हुमायून यांच्याकडे मदतीचा संदेश पाठविला आणि राखी पाठवून आपल्याला मदत करण्याची कळकळीची विनंती केली. १५२७ मध्ये हुमायून चे पिता बाबर यांनी राणा संग यांचा पराभव केला होता. असे असतानाही राणी कर्णावतीने, हुमायून यांना राखी पाठवून मदतीची गळ घातली. हुमायूननेही राणी कर्णावतीच्या विनंतीचा मान
ठेवला आणि इतरत्र स्वारीवर गेलेले असतानाही, त्या स्वारीमधून ते राणी कर्णावतीच्या मदतीस धावून आले. पण हुमायून मदतीस पोचेपर्यंत उशीर झाला होता. राजपुतांच्या सैन्याचा चित्तोडमध्ये पराभव झाला होता आणि राणी कर्णावती यांनी “ जौहर” या रीतीचा अवलंब करून आपले प्राण दिले होते. 

हुमायूनला याचे फार वाईट वाटले आणि त्याने मेवाडचे राज्य परत मिळवून राणा विक्रमजीत यांना गादीवर बसवून राणी कर्णावतीस दिलेले मदतीचे वचन पूर्ण केले.

● महाभारतातली आख्यायिका सर्वश्रुत आहे ती अशी..शिशुपालाचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राचा उपयोग केला. सुदर्शन चक्राने शिशुपालाचे धड विलग केले व ते चक्र श्रीकृष्णाकडे परत आले पण त्याच्या गतीमुळे श्रीक्रुष्णाच्या बोटाला जखम झाली, रक्त वाहू लागले त्यावेळी  द्रौपदीने आपला भरजरी शालू फाडून त्याची चिंधी कृष्णाच्या बोटाला बांधली. त्यामुळे कृष्णाने प्रसन्न होऊन द्रौपदीला, जेव्हा तिला गरज भासेल तेव्हा मदतीस येण्याचे वचन दिले. ते वचन श्रीकृष्णाने द्रौपदीचे वस्त्रहरण होत असता पाळले. द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा करताच कृष्ण मदतीस धावून आले.

राखी बनविण्याच्या निमित्ताने अनेक स्त्रियांना रोजगार मिळतो. राखीचे साहित्य आणून ती बनवणे, त्याचे मार्केटिंग करणे यातून रोजगारनिर्मिती होते. दिव्यांग मुलांना शाळांतून राखी बनवायला शिकवतात व त्यांनी बनवलेल्या राख्या प्रदर्शनात मांडून त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला देतात.

असा हा राखीपौर्णिमेचा सण नात्यांतील प्रेम, विश्वास व्रुद्धिंगत करतो. एकमेकांच्या मदतीस येण्यास शिकवतो.

©® गीता गरुड.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *