Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पडघे गाव. गावात दिडेकशे घरं. घरं तरी कशी? देखणी..लाल मातीची, कुणाची नळ्यांची तर कुणाची मंगलोर कौलांची. घरांतून वर उठणारा धूर, हेलकावे खात,नागमोडी वळणं घेत नभांतरी विरळ विरळ होत लुप्त होत जाणारा.

घरासमोर सारवण केलेलं तुकतुकीत खळं..खळ्यात मिरवणारी तुळशी व्रुंदावनं.. व्रुंदावनात बहरलेल्या,पोसवलेल्या भरगच्च तुळशी..पानं तरी कशी इवलाली..काळसर हिरवी.. जांभळसर लांबडे मंजिरीचे तुरे नं प्रदक्षिणा घालणारी प्रत्येक घरातली धनीण..तिची संथ चाल..तुळशीत लावलेल्या अगरबत्तीची वलयं..तो मंद सुगंध..प्रत्येकाच्या परसवात भाज्यांच्या अळी. चोहोबाजुंना माड,पोफळी,काजी,जांभळी,आवळी नि दिमाखात मिरवणारी घनगर्द आमराई.

निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली रंगांची उधळण. प्रत्येक ऋतुत स्रुष्टीचं न्यारं रुप,न्यारं वस्त्रलेणं. उन्हाळ्यात उन्हाच्या झळा मारत असल्या तरी सारवणावर बैसलं की कसं गार वाटे. नळ्यांतून फक्त नं फक्त थंडावा घरात पाझरे नं घरातल्या माणसांना बाहेरचा उष्मा सहन करण्याचं बळ मिळे. कुणी आलं की त्याला काही घेणार का म्हणून न विचारता गुळपाणी दिलं जाई. जेवल्याशिवाय अतिथी जाणे अशक्य होतं. अगदी भाकरी नं पीठलं..तेही नं जमल्यास पोटभर पेज नं ओल्या नारळाची शिरवणी खाऊन अतिथी ढेकर देऊनच निरोप घेई. अतिथी देवो भव हे खऱ्या अर्थाने मानणारी लोकं होती गावातली.

पळस नि पांगारे फुलू लागले की पाऊस येणार असल्याची वर्दी मिळे. मिरगाचा(म्रुग नक्षत्राचा) बाजार केला जाई. मिरच्या वाळवून,भाजून नाना प्रकारचे खडे मसाले घालून मिरगासाठी मसाला दळला जाई. गाईगुरांच्या वैरणीची सोय करुन ठेवत. लाकडं,गोवऱ्या मांगरात रचून ठेवल्या जात.

पाऊस बेफाम कोसळायचा..भगव्या रंगाचे खळाळ दिसू लागत. पाण्याने न्हालेले माडापोफळींचे हिरवेकंच शेंडे,भुईतून उमलणारे असंख्य कोंब..शेतीकामाला लागलेले शेतकरी..काळ्या आईच्या सेवेत दंग झालेली, चिखलामातीची घाणघुण नंं बाळगणारी ती भुईची लेकरं..निसर्गाची लेकरं..रंगाने फार देखणी नव्हेतच. भात खाऊनही पोटं खपाटीला गेलेली, हाडं वर आलेली लेकरं पण कोणतही संकट येवो त्याला धीरानं तोंड देणारी ही मोत्यासारखी माणसं,माणुसकी जपणारी माणसं. धान्यात खडे असावेत तशी दोनचार विक्रुतही होती अशांत.

याच गावातली ती दोन घरं..एक पुंडलिक उर्फ दादासाहेब गावडेचं नं दुसरं प्रभाकर पडाळकरचं. दादासाहेबांचं घर मध्यमवर्गीयाचं असतं तसं..खळा, पडवी, आत गेलं की वळई, स्वैंपाकघर नि डाव्याउजव्या अंगास देवघर,कोठीघर,बाळंतिणीची खोली, पाहुण्यारावळ्यासाठी खोली अशा इवलाल्या होवऱ्या.

पाठीमागे म्हाताऱ्याकोताऱ्यांना,घरातल्या बायामाणसांना बसाउठायला लांबलचक पडवी. तिथेच डाव्या अंगाला न्हाळी, बायांसाठी न्हाणीघर..त्याचं पाणी चरावाटे आजुबाजूच्या माडापोफळींना जाई.

पहाटे उठून पहावं तर साक्षात नंदनवनात असल्याचा भास व्हावा असं धुकं पांघरलेलं स्रुष्टीचं निरामय रुप..आड्याच्या जास्वंदींच्या अंगाखांद्यावर नुकतीच उमलत असणारी घंटारुपी लालबुंद फुले, प्रभुनाम घेत फडतरीवर उभ्याने स्नान करणारी पुरुषमंडळी..दादासाहेबही यांतलेच एक..अत्यंत पापभिरु माणूस..सौभाग्यवतीही अगदी त्यांच्या स्वभावाशी तंतोतंत मेळ खाणारी..सगळ्यांना आपलसं वाटणारं हे जोडपं. दादासाहेब गावच्या शाळेत शिक्षक होते. मुलांना मराठी शिकवायचे.

सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे ||धृ.||

सदा तुझ्या पुढे उभी असे निशा
सदैव काजळी दिसायच्या दिशा
मधून मेघ हे नभास ग्रासती
मध्येच या विजा भयाण हासती
दहा दिशातुनी तुफान व्हायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे ||१||

प्रलोभने तुला न लोभ दाविती
न मोहबंधने पदास बांधती
विरोध क्रोध वा तुला न थांबवी
न मोह भासतो गजान्त वैभवी
न दैन्य हे तुझे कधी सरायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे ||२||

वसंत वा शरद् तुला न ती क्षिती
नभात सुर्य वा असो निशापती
विदीर्ण वस्त्र हो मलिन पावले
तरी न पाय हे कधी विसावले
न लोचनां तुवां सुखें मिटायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे ||३||

नभात सैनिका प्रभात येऊ दे
खगांसवे जगा सुखात गाउ दे
फुलाफुलावरी सुवर्ण शोभु दे
जगास शांतता सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी तुझे ठरायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे ||३||
ही कवी वसंत बापटांची कविता त्यांनी विद्यार्थ्यांकडून केवळ मुखोद्गतच करुन घेतली नव्हती तर त्यातला भावार्थ त्यांनी विद्यार्ध्यांच्या मनात रुजवला होता. अशा कितीक सुंदर कवितांद्वारे मुलांच्या मनांत दादांनी संस्कारांची बीजं रोवली होती.

घरात मात्र दादासाहेब थोडे ताठ वागत. मुलांनी उगाचच खिदळणे वगैरे त्यांना पसंत नसे. दादासाहेबांची भार्या, सुमन ग्रुहक्रुत्यदक्ष होती त्यामुळे त्यांना घराकडे जास्त लक्ष द्यावं लागत नसे.

सुमनच्या जोडीला दादासाहेबांची सत्तरी ओलांडलेली आई होतीच. सासूसुनांचं अगदी लिंबलोणचं होतं. फार क्वचित रुसवेफुगवे होत त्यांच्यात.

मुळात सुमनला कोणाशी अबोला धरणं जमतच नसे त्यात  लोण्यासारख्या मऊसूत सासूवर तर अशक्यच. म्हणूनच गावकरी दादासाहेबांच्या घराला,घरातल्या माणसांना नावाजायचे. आपल्या घरातल्या पोरासोरांना दादासाहेबांच्या मुलांची उदाहरणं द्यायचे.

” ए आई हळू ना ग किती जोरात ओढतेस,केस दुखतात ना ” सुमनताईंच्या लेकीचं आरोहीच हे नेहमीचंच.

स्वतः केस विंचरायचा कंटाळा नं आई गुंता सोडवायला लागली की केसांची मुळं दुखून यायची तरी सुमनताई अलगदपणे तेल-पाणी लावून अगदी हलक्या हाताने तिचे केस विंचरायच्या.

” झालंच गं आरू…थोडं सुद्धा सहन होत नाही तुला. आता काही महिन्यातच लग्न होईल तुझं..तिथं सासरी…” असं म्हणताना सुमन ताईंचा गळा दाटून आला.”

“हूं नीट बस गं सुमे इथे मी तुझी सासू मुडवर का असेना अवसेपुनवेला केसांची वेणी बांधते नं तुझी, तशीच आरूची सासूही केस विंचरेल हो तिचे. बाकी आरूचे केस अगदी तुझ्या केसांसारखेच आहेत. उलगडलेला रेशमाचा गुंडाच जणू…किती मऊ मुलायम काळेभोर.”

“आई, माझ्या केसांची तुम्ही निगा राखत आलात म्हणून अगदी पन्नाशीतही वाढत सुटलेत हो नदीसारखे…!’’ 

‘’आणि आजीच्या इवल्याश्या सुतरफेणीची मी निगा राखतो ना म्हणून चापूनचोपून वेणी येते आजीची इवलीशी…’’ आपल्या आजीच्या केसांवर कंगवा फिरवत निषाद म्हणाला.

“ सुमन, आपली आरोही यंदा पंचविशीची होईल ना आता पुढच्या महिन्यात…लवकर लग्न आटोपलं तर बरं. मग सगळं कसं पुढचं सुरळीत पार पडतं.”

‘’ अगं पण आज्जी, एवढं पण काय माझं वय झालं नाहीय बरं.’’
            सुमनने आरोहीच्या पाठीवर हलकेच थाप मारत म्हंटलं,‘’ आरु, अगं तुझ्या वयाची मी असताना तू पोटात होतीस माझ्या. वेळेत सगळं झालेलं बरं असतं सोना.  कशाला नन्नाचा पाढा लावतेस! ’’

‘’ हो आई, याच वर्षी तायडेचं ताडधूम ताडधूम उरकून टाकुयात. मग जाईल नवऱ्याला पिडायला. माझ्या मागची पीडा जाईल.’’

‘’ निश्या, तुझी तर ना , थांब बघतेच तुला! ‘’

‘’ अरे…अरे , जरा हळू पळा. आजीच्या भोवती नका फिरू. पाडाल तिला ‘’

निषाद आरोहीला चकवत मागील दारी धावला. तिथे तो पेरूच्या झाडावर चढला.

‘’ निषड्या…खाली उतर, सांगतेय  बघ नैतर…! ‘’

‘’ नैतर..नैतर काय करशील? ‘’ निषाद वेडावत म्हणाला.

‘’ दगडी मारीन तुझ्यावर. माझा नेम ठावूकै नं तुला…’’

‘’ ए बाई…माफ कर. थांब खाली उतरतो.’’

‘’ आता कसा आलास लाइनीवर.’’ 

‘’ सांगू का तुला कोण लाईन देतं ते.’’

‘’ निशू…’’

‘’ मांजर डोळे झाकून दूध पितं. त्याला वाटतं कुणी आपल्याला पाहतच नाहीय.’’

‘’ ए गप रे. तो सारंगच बोलायला बघतो माझ्याशी. मी कुठे भाव देते त्याला!’’

‘’ भाव नको देऊस. एकच भाव हाय तुला तोही अस्मादिक.. मायसेल्फ?’ निषाद पुंडलिक पुरंदरे ‘!’’ 

‘’ फालतू पीजे मारू नकोस……आधीच सांगून ठेवतेय तुला. कामधंदे नैत का तुला!

‘’ ए तायडे, उद्या तुला बघायला नलूमावशीच्या सासरची मंडळी येणार आहेत! ‘’

‘’ तुला रे बऱ्या खबऱ्या.’’

‘’ एकच तर तायडी हाय आपली. तिच्या बऱ्यावाईटाची जिम्मेदारीय आपल्यावर.’’

‘’ थांब मी आईलाच विचारते. मग खरं नसलं ना तर तुला असा धुईन ना…”

  आरोही धावतच आईजवळ गेली.
‘’ ए आई, हा निषु बघ ना काय वेड्यासारखा बरळतोय. उद्या मला बघायला नलूमावशीकडची मंडळी येणारैत म्हणे.’’

‘’ मंडळी म्हणजे अगं नलूमावशीचे दिर आणि भावजय यायचेत. तो मुलगा रहातो मुंबईला. कॉलेजात प्रोफेसर आहे. मुलगा नलुमावशीच्या पहाण्यातला आहे.”

‘’ आई! ’’ आरोही पाय आपटत म्हणाली.

‘’ आई नको नं बाई नको. सांगितलेलं काम मुकाट्याने कर. उद्यासाठी आई साडी देईल काढून ती नेसवून घ्यायची, तिच्याकडून. ब्लाउज साडीवरचा तूच शिवलायेसं ना , मग तो काढून ठेव बाहेर.’’ आज्जीने आरोहीला दटावलं.

‘’ शी बाबा. हे काय? किती सुंदर होत माझं आयुष्य. मला नाही जायचंय हे घर सोडून. तुम्ही सगळे ऑक्सिजन अहात माझा ऑक्सिजन. ‘’

‘’ अरेच्चा, मला तर तू कार्बन मोनॉक्साईड वाटतेस. ’’ आरोहीची फिरकी घेत निषाद म्हणाला तसं आरोहीच्या डोळयात टचकन पाणी आलं.

‘’ ए वेडाबाई, त्या खुळ्याचं काय मनावर घेतेस. बाईचा जन्मच असा बघ. सासरी जावच लागतं तिला. नदीचं ठाऊकै ना तुला. खळाळत..वळणंवळणं घेत दऱ्याखोऱ्यातवून वाहत जाते..समुद्राला भेटायला. समुद्र तिला आपल्यात सामावून घेतो मग सागराच्या मिलनाने नदी कृतकृत्य होते.’’

 इथे काही आपली डाळ शिजत नाहीय, हे जाणून आरोही आपल्या खोलीत गेली. तिथे खाटेवर उशाशी पुस्तक होतं. सारंगच्या बहिणीने शिल्पाने दिलेलं. वाच म्हणाली होती. आरोहीने पुस्तक वाचायला घेतलं तर तिच्या वक्षस्थळावर एक वाळलेलं  लालं गुलाब पडलं. त्या सोबत एक चिट्ठी होती.

आरोही,
       मी..मी सारंग. किती दिवस झाले बोलायचा प्रयत्न करतोय तुझ्याशी. तू मला चकवून पुढे निघून जातेस. बसस्टॉपवर रोज बघतो तुला शिल्पासोबत. किती खळाळून हसता गं! शिल्पाची वहिनी व्हायला आवडेल तुला? वाट बघतोय तुझ्या उत्तराची.

तुझाच….फक्त तुझाच                                                                                                                                                                                                                                              
                                                                                                                                              
सारंग
                
आरोहीने त्या शुष्क गुलाबाचा सुगंध घेतला आणि मनाशीच संवाद साधू लागली. ” काय करायचं? द्यायचं का सारंगच्या पत्राचं उत्तर?”

          सारंगचे वडील प्रभाकर व आरोहीचे वडील पुंडलिक(दादासाहेब) एकेकाळचे जानीदोस्त. आरोहीची आत्या मालती, सारंगच्या वडिलांसोबत पळून गेल्यापासनं दोन्ही घरांचे संबंध बिघडले. प्रेमविवाह तोही त्या काळात. आजोबानी त्यानंतर मालूआत्याला माहेरचा उंबरा चढून दिला नव्हता.

आरोहीच्या वडिलांनीही पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकून बहिणीपासून कायमचं अंतर राखलं होतं. सारंग, शिल्पा,आरोही आणि निषाद मात्र शाळेत येता जाता भेटायचे.

घरच्यांनी मना केलं तरी या मुलांत एकीचं,मैत्रीचं वातावरण होतं. सारंग तर निषादचा सख़्खा दोस्त होता.

निषादच्या आईला,सुमनलाही त्यांची दोस्ती मान्य होती. तिलाही वाटायचं नणंदेने माहेरपणासाठी यावं,लाडकोड करून घ्यावे,रुसवे फुगवे धरावे. आज्जीच्या हृदयातला लेकीचा कप्पा जन्मभरासाठी हळवा झाला होता.

आरोही हातात फुल अन् पत्र समोर घेऊन पहुडली असतानाच निषाद खिडकीत डोकावला.

‘’ वाचलं का ? ‘’

‘’ काय?  ‘’

‘’ हे बरंय…वेड घेऊन पेडगावला जाणं! ‘’

‘’ निश्या, तुला ना म्हणींचा भस्म्या झालाय?’’

‘’ असेल… तसंही असेल…असावं तसंच पण ते वाळलेलं फुल नं प्रेमपत्र..’’

‘’ निषाद…’’

‘’ ओरडू नकोस तायडे, दादा ओसरीवर बसलेत. सुपारी कातरताहेत. त्यांनी ऐकलं तर आपल्यालाच कातरतील बरं सुपारीऐवजी. ए तायडे, ते पत्र सारंगाचं ना! ‘’

‘’ ए निषु तुला रे कसं ठाऊक? ‘’

निषाद हसत म्हणाला ,‘’ त्याला कुठे येतंय पत्र लिहायला. मलाच सांगत होता. मी म्हटलं चुकलं तरी चालेल पण प्रेमाच्या मामल्यात अफरातफर नको…आधीच तू रडूबाई.’’

‘’ निषाद…हे पत्रं दादांच्या हाती मिळालं ना तर…’’

‘’ तर…तर काय करतील…कशाला घाबरतेस एवढी.’’

‘’ अरे, मला उभी चिरतील नि अंगणात वाळत घालतील आमसुलांसोबत…’’

‘’ अगो, तू कोकरू न त्यांचं! ‘’

‘’ ते लाडबीड सगळं मी त्यांचं ऐकेपर्यंत. त्यांच्याविरुद्ध जर काही केलं ना मी तर मग काही खैर नाही.’’

‘’ मान्य केलंस ना की आपला बाप हिटलर आहे हे.’’

‘’ निश्या…’’

(क्रमश:)

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.

वाचकहो नमस्कार.
तुमच्या लक्षात आलंच असेल. मालती, दादासाहेबांची बहीण..हिने प्रभाकरसोबत पळून जाऊन लग्न केलय..पण तिचा निर्णय चुकीचा ठरला..बघू काय होतं पुढे मालतीचं,प्रभाकरचं..दुरावलेलं माहेरपण मिळतं का तिला? कोकणातल्या पाऊलवाटांवरुन कथा पुढे सरकत जाते. वाचत रहा.

==================

https://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/

==================

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा

https://www.facebook.com/ritbhatmarati/

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *