Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©® सौ. गीता गजानन गरुड.

दादासाहेबांच्या घरापासनं दहाएक मिनटावर शाळेतल्या शिपायाचं,विष्णु घणसोलेचं घर होतं तिथेच नवर्याकडचं वर्हाड उतरवलं होतं.

निषाद व दादासाहेबांनी पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवली होती.

रात्री सीमांतपूजन झालं. सिमांतपुजनावेळी मालती व प्रभाकर जोड्याने बसले. मालतीला डोळ्यासमोर फक्त लेकाचं लग्न दिसत होतं.. त्यासाठी जणू ती या परपुरुषाच्या जोडीने बसली होती. त्या दोघांत बांधलेली उपरणं व शेल्याची गाठ निरर्थक  होती.  मालती आता कदापि प्रभाकरची होणार नव्हती.

घाणे भरताना काक्यामाम्या गाऊ लागल्या..
आराडी भराडी आराडी भराडी
खांद्यार कुर्हाडी खांद्यार कुर्हाडी
खय चालले वर्हाडी काय चंदन तोडूक
खय चालले वर्हाडी काय चंदन तोडूक
पाटला तॉड पाठी सोडा
पुढला तॉड फुढे सोडा
मधला तॉड घाण्या जोडा
बोलवा बोलवा काय व्हाइन खोदूक
व्हाईन खोदिला घाणो जो भरिलो
खांडियो गव्हाचो खांडियो गव्हाचो
माटव देवाचो काय दणको मोठो
माटव देवाचो काय दणको मोठो

जमलेल्या पाहुण्या रात्री निजा म्हंटलं तरी निजेनात. बाहेर खळ्यात ताडपत्रीवर गाद्या पसरुन म्हातारीकोतारी लवंडली होती.

काही उत्साही जुनी खोडं जुन्या काळच्या लग्नात जिलबीलाडू खाण्याच्या लावलेल्या शर्यती अगदी रसभरीत वर्णन करुन सांगत होती. सोबतीला पानाचं ताट होतंच.

काही गटाने पत्ते खेळत बसली होती. तरुणाई सारंगला चिडवण्यात दंग झाली होती. कुणी लग्नाची पार्टी मागत होतं. कुणी सिनेमासाठी पैसे दे म्हणत होती.

प्रभाकर या सगळ्यांत असुनही एकटा पडला होता. त्याआला तिथे कोण फारसं विचारत नव्हतं. विधींपुरता लेकाचा बाप होता.

बाकी गावकरी धनंजयलाच मान देत होते. भावाच्या मुलांचं पालनपोषण केल्याबद्दल चुलता असावा तर असा म्हणत आपापसात त्याचं कौतुक करत होते.

मालतीने काढलेल्या काबाडकष्टांबाबत तिचंही बायामाणसांत कौतुक होत होतं.

बहिणीबहिणी जशा रहातात जावाजावा..एक दुसरीला सांगत होती, दुसरी आणिक दोघींना. एरवी हे घरातल्या माणसांच कौतुक ऐकून प्रभाकर रागे भरला असता, खवळला असता पण त्याने टाकलेले फासे उलटे पडले होते.

त्याच्या पापकर्मांची फळं त्याला याचजन्मी भोगावी लागत होती. दात काढलेल्या नागासारखी त्याची अवस्था झाली होती नि तो निपचित पडून राहिला होता. चांदणी तर त्याच्या रागाला घाबरुन इथे आल्यापासनं त्याच्या समोरच जात नव्हती.

आत बायामाणसांचं खुदुक खुदुक चाललं होतं. किती गं वाळलीस! हिचं पोट कशानं गं सुटलं होडीसारखं! कुणी उद्गारत होतं तर नव्याने लग्न झालेल्यांना लग्न मानवलेलं दिसतय बरं का! म्हणून कोणी डोळे गोलगोल फिरवून दाखवत होतं.

पोरंटोरंवालींच्या पोरांचा कल्ला चालू होता.

एकदोघी लेकरांना पदराआड घेऊन बसल्या होत्या तर कुणी कुशीला होऊन निजल्या जागीच लेकराला अंगाशी घेत होती.

एकीचं लेकरु दिवसभर अरबटचरबट खाऊन सारखं परसाकडला पळत होतं. ती आपली कोदू घालून येत होती नि कुठे बाहेर गेलं तरी कटकट बाई म्हणत पोरावर वैतागत होती.

जुन्याजाणत्यांनी तीनेक वाजताच पाणचुलीत आग घातली नि एकेकाला उठवायला सुरुवात केली. कुणी कढत पाण्याने आंघोळ करीत होतं तर कुणी माडाखाली फडतरीवर थंड पाण्यानेच न्हात होतं

तिथेच अंगावरली कापडं विसळून जास्वंदीच्या डहाळ्यांवर वाळत टाकत होते. बायामाणसांना धुणी धुवायला कुठे फुरसत मिळायची लग्नाच्या बोवाळात!

तांबडं फुटायच्या अगोदर सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या. विष्णुच्या बायकोनं चहाला आधण ठेवलं.  मुठींनी साखर,पावडर टाकली.

वायलावर दुधाचा टोप तापत ठेवला. वाफाळत्या चहाचे पेले ताटात घेऊन विष्णु, दिलीप न् शिल्पा आतबाहेर करत होती, जोडीला शेवचिवडा होताच.

कढत चहाचं पाणी पोटात गेल्यावर वराडाच्या डोळ्यांतली उरलीसुरली झोप उडाली.

सारंगचं व प्रल्हादचं वर्हाड दादासाहेबांच्या अंगणात पोहोचलं. लाऊडस्पीकरवर गाणी दणदणत होती.
केळवणं झाली. सारंगच्या दोस्तमंडळींनी वरचेवर लाडू,करंज्या फस्त केल्या.

एकेक मंगलविधी सुरु झाले. सनईच्या सुरात लग्न लागली. सगळे विधी यथासांग पार पडले. भागिरथी काकू व साऊच्या वडिलांनी  साऊचं कन्यादान केलं तर दादासाहेब व सुमनने आरोही मालुच्या पदरात घातली.

आत्या,काकू,माम्या,मावश्या,आज्ज्या सगळ्या  झक्क साड्या नेसून, आंबाड्यांवर,वेणींवर अबोलीचे वळेसर,शेवंतीची पाती, मालीचे हिरवे सुवासिक तुरे लेवून बोवळत होत्या.

निरोपाची वेळ आली. आज्जीच्या लक्षात आलं, सून कुठे दिसत नाही. तिने माजघरात, ओसरीवर,इथेतिथे पाहिलं. आता विचारायचं तरी कुणाला! उगा बभ्रा..सावळा गोंधळ उडायचा. काय तिच्या मनात आले ते परसदारी गेली.

तिथे  अबोलीच्या बेटाजवळ,जुईच्या मांडवाच्या बांबूला धरुन सुमन मुसमुसत होती. तिचं ते हळवेपण पाहून आज्जीलाही गहिवरुन आलं. गळ्याशी आलेला हुंदका तिने महत्प्रयासाने दाबला. सुमन असं म्हणत तिने सुमनच्या पाठीवरनं आपला सुरकतलेला हात फिरवला. “आई,” असं आक्रंदत सुमन सासूला बिलगली.

आज्जीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. कितीतरी वेळ सुमनचं सर्वांग गदगदत होतं. सासू तिला सावरत होती.

आज घरातली लाडाची लेक जी सासरी चालली होती! इथेच या परसदारी बागडणारी, फुलं वेचणारी, गजरे गुंफणारी, आई तुझ्यासाठी दवणा घालू का गं गजऱ्यात..लगेच सांग म्हणून विचारणारी, कधी रुसून बसणारी तर कधी हास्याचे मळे फुलवणारी..त्यांची लाडकी आरोही..काळजाचा तुकडा..परक्याघरी जाणार होती.

क्षणात पाहुणी होणार होती,हक्काची लेक. तिला बोलावण्यासाठी आता परवानगी मागावी लागणार होती..दोघा सासूसुनांत शाब्दिक संवादाची गरजच नव्हती. त्यांची अळूमाळू मनं बोलत होती एकमेकांशी.

बाहेरुन साद ऐकू आली तशी आज्जीने धीर गोळा केला नं म्हणाली,”सुमे, सावर स्वतःला. यातून प्रत्येकाला जावं लागतं. तू नाही का आलीस माझ्याकडे..कशी रुळलीस बघ इथे तशीच आपली आरु सासरी रुळेल बघ..नि सासू तरी कोण माझीच लेक..कधी त्रास दिलान माझ्या नातीस तर कान उपटीन हो तिचे.

तूच अशी अळवासारखी झालीस तर दादासाहेबाला कोण सांभाळणार! चल पुस बघू डोळे. शेवटी आज्जीने तिच्या पदराने सुनेचे डोळे पुसले नि दोघी खळ्यात आल्या. खळ्यात नवीन जोडपी वडिलधाऱ्यांच्या पाया पडत होती.

साऊला भागिरथी काकूचा व वडिलांचा निरोप घेताना विशेष दु:ख झालं नाही. भागिरथी काकूला तर फुकटात लग्न करुन मिळालं म्हणून आतल्या आत आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण लोकांना दाखवण्यासाठी तिने दणक्यात हंबरडा फोडला,”साऊ गं माझी. मी काही बोलले असेन तर मनात ठेवू नको हो. मांजरीचे दात पिलांना लागतात होय! येत जा हो माहेराला.” म्हणून पदराने डोळे पुसू लागली.

साऊचे वडील मात्र सदगदित झाले. जावयाचे हात त्यांनी गच्च धरले. त्यांवर त्यांच्या डोळ्यातली ऊन टिपं गळली. प्रल्हादने त्यांचे हात दाबत त्यांना धीर दिला.

इकडे दादासाहेबांच्या गळ्यात आरोही पडली तेंव्हा त्यांचं अगदी छोटं बाळ झालं. शेवटी आरोहीच त्यांची आई बनली नि त्यांचे डोळे पुसले.

गावातील प्रत्येक आळीतून वरात फिरत होती. बायाबाप्ये नाचत होते. कुणी हौशी कलाकार लाठीकाठी खेळत होतं.

साऊची वरात तात्पुरत्या भाड्याने घेतलेल्या घरात गेली. तिथेही गावकऱ्यांनी नवीन जोडप्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.

दादासाहेब व गावकऱ्यांनी मिळून  साऊप्रल्हादला आहेरात कपाट, पलंग, भांडीकुंडी..असा संसारच थाटून दिला होता.

आरोही व सारंगची वरात सारंगच्या घरी आली. सारंगची बहीण शिल्पा वाट अडवून उभी होती. तिला आपली होणारी मुलगी सून म्हणून देईन असं आरोहीने कबूल करताच शिल्पा हसतहसत दाराची बाजू झाली. “आली मोठी शाणी, लग्न नै झालं नि माझी मुलगी मागते सून म्हणून. पोरगं कुठंय तुझं!” असं सारंग म्हणताच शिल्पा चिडून मालतीकडे गेली,”आई,.बघना हा दाद्या कसा करतो!” सगळं वर्हाड त्यांची ही गोड भांडणं पाहून हसू लागलं.

दिवसभर ताटात अंगठी लपवून शोधणे,विडा तोडणे वगैरे खेळ सुरु होते. येणारीजाणारी नव्या सुनेला नाव घ्यायला लावत होती. सारंगची नजर काही बायकोवरनं हटत नव्हती.

दुसऱ्या दिवशी दोन्ही जोडप्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती.

मांडवपरतणी, देवदर्शन झालं.

आरोही सासरी गेली नं दादासाहेबांचं घर सुनं सुनं झालं.

पाहुणेरावळेही हळूहळू निघाले. कुणीतरी म्हणाली,”घर शांत शांत वाटतय. पुन्हा हसतंखेळतं व्हायला हवं.  निषादसाठी स्थळ पहायला घ्या. यावर बयो मावशीने तिच्या चुलत पुतणीच्या दिराच्या बहिणीचं स्थळ सुचवलं. ”मुलगी परिचारीकेचा अभ्यासक्रम करत आहे. मुलीला वळण आहे. अश्शी खोल खळी पडते. दोन करवंद सहज मावतील तीत. जिवणी तर इतकी नाजूक..अटकर बांधा आहे.”

निषाद, आरुताई सासरी गेल्याचं दु:ख क्षणभर का होईना विसरुन बयोमावशीचं बोलणं कान टवकारुन ऐकू लागला. परिचारिकेतल्या वेशातली ती देखणी ललना त्याच्या नयनचक्षुंसमोर उभी राहिली.

इतक्यात एक काकू सर्वांसाठी कोकमीचं सरबत घेऊनं आली. निषादसमोर ताट केलं. निषादचं लक्षच नव्हतं.

सगळ्या परत खुदुक खुदुक करु लागल्या. “गैला गेला स्वप्नांच्या राज्यात. कसं होणार याचं तो हरी जाणे!” आज्जी त्याच्या पाठीवर धपाटा घालत म्हणाली तसा तो भानावर आला..सगळी आपल्याला बघून का हसताहेत हे त्याच्या लक्षात आलं नि  चक्क लाजला.. तशी बयोमावशी म्हणाली,”अश्शीच अगदी अश्शीच निषादच्या गालावर दिसतेय नं तश्शी खळी पडते योगिताच्या गालावर नं डोळेही सारखेच बाई दोघांचे.

मिशीबाबत काय म्हणणं तुझं? असं आज्जीने विचारताच बयो मावशीने मुरका मारला नि पुन्हा एकदा दणदणीत हशा पिकला.

साऊ सासूसासऱ्यांचं सारं पहात होती. प्रल्हादलाही वेळेवर न्याहारी, जेवण देत होती. सासूही डोळस माणसाला लाजवेल अशी घरकाम करत होती. सासऱ्यांचा डावा पाय ओढावा लागे तरी ते स्वतः बाजारात जाऊन भाजीफळं घेऊन येत.

लवकरच त्यांचं स्वत:चं घर बांधून पुर्ण होणार होतं.  जरा बाहेर जाऊन येतो म्हणून प्रल्हाद बाहेर पडला, तो अगदी गुळगुळीत गोटा करुन आला.

साऊला रडूच आलं. त्याने साऊला जवळ घेतलं नं समजावलं”साऊ, मला तुला विकेशावस्थेत राहिल्यावर काय वेदना होत असाव्यात हे जाणून घ्यायचंय जेणेकरुन मी कधीही तुला केसांवरुन बोलणार नाही.”

क्रमश:

==================

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-part1/

प्रपंच भाग २ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/

प्रपंच भाग ३ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-2/

प्रपंच भाग ३ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-part3/

प्रपंच भाग ४ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag4/

प्रपंच भाग ५ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-5/

प्रपंच भाग ६ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-6/

प्रपंच भाग ७ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-7/

प्रपंच भाग ८ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-part-8/

प्रपंच भाग 9 :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-9/

प्रपंच भाग १० :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-10/

प्रपंच भाग १२ :

http://www.ritbhatmarathi.com/prapanch-bhag-12/

====================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *