Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©प्रतिभा सोनवणे

सकाळची वेळ होती…सरलाताई विहंग वर नेहमीप्रमाणे ओरडत होत्या…अरे कार्ट्या उठ ना लवकर…प्रॅक्टिकल आहे ना आज…की जायचं नाही आहे, तो प्रथमेश येऊन बसेल खूप वेळ…त्याच्यासमोर ओरडायला लावणारेस का आता…? ” इतक्यात विहंग अंथरुणात आळोखेपिळोखे देत बसतो…व आपल्या आईला म्हणजे सरलाताईंना म्हणतो…आई…अगं उठतच होतो ना..रात्री जागरण झालंय मला..केवढा लोड असतो ग अभ्यासाचा..सरलाताई ओरडून म्हणतात…हो …हो …माहिती आहे काय शोध लावतायत…त्या बंद खोलीत..इतक्यात दारावरची बेल वाजते…सरलाताई दार उघडून परत विहंगवर ओरडतात…विहंग…आवरलं की नाही..बघ लोकांची पोरं सकाळी लवकर उठून तयार होतात..नाहीतर विहंग तू…काही ताळतंत्रच नाही राहिलं तुला…जरा आपल्या मित्राकडून शिका काहीतरी…प्रथमेश हसत-हसत म्हणतो..काकू अहो…आम्ही दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करतोय…माहितीय..एक असं गॅजेट बनवतोय…जाऊ देत ना तुम्हाला सर्प्राईस देऊ आम्ही ..! सरलाताई वैतागून म्हणतात…कसलं सर्प्राईस काय माहिती…चांगलं नोकरी पाण्याला लागा शिकून…आमचं नाव काढा एवढंच..बाकी सगळी देवालाच काळजी बाबा..चल हे थालीपीठ खाशील का देऊ थोडंसं…! प्रथमेश म्हणतो…नको…नको काकू…नाश्ता करूनच आलोय..मी आपला इथेच हॉल मध्ये बसतो चालेल का..? ” सरलाताई गडबडीत म्हणाल्या…बरं..बरं…बस कधी आवरतोय काय माहिती हा…”  सरलाताईंना स्वतःच्या हाताने समोरच्याला खाऊ घालायला खूप आवडत असे म्हणून त्या कुणीही आलं ना की त्याला काहीतरी करून खाऊ घालत असे….प्रथमेश हॉलमध्ये पुस्तक वाचत बसला होता…काही वेळातच विहंग अंघोळ करून येतो आणि स्वयंपाकघरात असलेल्या डायनिंग टेबल वर येऊन थांबतो…सरलाताई चहा आणि डबा विहंगला देतात…विहंगही घाईघाईत खाऊन घेतो आणि आपल्या आईचा निरोप घेऊन घर सोडतो.

विहंग घर सोडून जवळ-जवळ अर्धा तास होतो तसं घरात सरलाताईंच्या सोबतीला फक्त घरातलं काम आणि रेडिओ एवढंच असत…घरी फक्त दोघेच माय-लेक असल्याने विरंगुळा म्हणून सरलाताईंना कुणीच नसतं…विहंगच्या वडिलांचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने…सरलाताई आपल्या मुलाबरोबर फक्त दोघेच राहत असे…आपल्या मुलाला म्हणजेच विहंगला शिक्षणाच्या बाबतीत काहीही कमी पडू देत नसत…म्हणून सरलाताई घरच्या घरी खानावळ चालवत असत…विहंगही आपल्या स्कॉलरशिपच्या जोरावर अभ्यासासाठी लागणारा खर्च भागवत असे…कॉलनीत राहत असलेल्या शेजाऱ्यांशीही सरलाताईंचं एक चांगल्या प्रकारचं असं नातं असतं…त्याचबरोबर दुसरीकडे राहण्यासाठी गेलेल्यांशीही खूप चांगलं नातं टिकवून ठेवलेलं असत…अशीच सागर नावाचा मुलगा तिथे शेजारीच बॅचलर म्हणून राहत होता….त्याला

परदेशात कामाची संधी मिळाली म्हणून ज्यादिवशी फ्लाईट होती अगदी त्याच दिवशी सरलाकाकूंना भेटण्यासाठी आला…सागर एक चांगला चारटेड अकाउंटंट असल्याने अमेरिकेतील शिकागो या शहरात त्याला संधी चालून आली होती…म्हणून काकूंचे आशीर्वाद घ्यायला सागर आला होता…आशीर्वादाचा भुकेला सागर पोटानेही भुकेला होता…आई-वडील गावी असल्याने पोटभर खाऊ घालणार कुणीच नव्हतं…सरलाताईंच्या घरातून मस्त गरम-गरम भाकरी आणि पिठल्याचा वास येत असतो…वास घेऊनच सागर आपलं मन भरत असतो…सागर दाराची कडी वाजवून पाहतो…दराचा टक टक आवाज येताच दारावर कोण आहे हे पाहण्यासाठी सरलाताई भाकरीने बरबटलेला हात घेऊन बाहेर येतात आणि म्हणतात…

सरलाताई – कोण…अरे बाप रे सागर…आज कशी आठवण झाली काकूची ?

सागर  – काकू…चांगल्या माणसांची आठवण येण्यासाठी पहिली चांगली माणसं विसरावी लागतात…तुम्हाला मी कसं काय विसरेल काकू…तुमच्या हातची चवही कधी विसरता येणारी आहे का…

सरलाताई – [पाणी घेऊन येतात] घे…पाणी घे…दमला असशील..माठातलं आहे बाबा पाणी…मिनरल वॉटर तर नाही ना घेत आमच्या विहंगसारखं…

सागर  – काकू आता मिनरल वॉटरची सवय करावी लागेल मला…इथं भारतात आहे तोपर्यंत…

सरलाताई – म्हणजे…भारतात आहे तोपर्यंत…?

सागर  – काकू…अहो माझं पोस्टिंग झालंय अमेरिकेत…चारटेड अकाउंटंट म्हणून…पॅकेज पण मस्त आहे…

सरलाताई – अरे वाह…अभिनंदन तुझं..[इतक्यात सागर काकूंच्या पाया पडतो] भरपूर आशीर्वाद तुला माझ्याकडून…देव तुझं लवकर सगळं सुरळीत करो आणि मनासारखी मुलगी मिळो..

सागर – काकू…अहो इतक्यात नको बाबा लग्न वैगेरे…सेटल तर होऊ दे आधी मला…

सरलाताई – बरं…तू कधी निघतोस मग…

सागर – काकू अहो…आजच फ्लाईट आहे रात्री…म्हटलं तुम्हाला भेटून जावं…

सरलाताई – बरं केलं हो..आलास ते…बरं खाल्लंस का काही…?

सागर – नाही पण…खानावळ लावली आहे ना तिकडे जेवेल मी…

सरलाताई – खुळा आहेस की काय..? पैसे देऊन काय जेवतोस इकडेच जेव आज …माझ्या हातच खाऊन बघ एकदा…मस्त पिठलं आणि भाकरी केल्यात खाऊनच जा…

सागर – काकू…तुम्हालाही पैसे द्यावेच लागतील ना ?

सरलाताई – मोठा…आलाय पैश्यावाला…अरे प्रेमाने देतेय मी जसा माझा विहंग तसाच तू बाळा…आठवण ठेव माझी म्हणजे झालं…

पोटात भूक तर अफाट आहे…काकूही आग्रह करत आहे…मग कसं काय बरं मन मोडायचं…म्हणून सागरही पटकन व तितक्याच हक्काने जेवायला बसला…सरलाताईंनी मस्त…लिंबाचं लोणचं,उडदाचा पापड आणि तिळाची चटणी असं ताटात मांडून ठेवलं अगदी मन तृप्त होईल इतकं सागर जेवला आणि समाधानाने ढेकर दिला…त्याला समाधानाने जेवताना पाहून सरलाताईंनाही बरं वाटलं…लगबगीनं जेवण करून सागर उठला…

सरलाताई – झालं का एवढ्यात..? अजून का नाही घेतलंस..

सागर – नाही काकू…नको..पहिल्यांदाच पोटभर जेवलोय…

सरलाताई – तुझा मोबाईल नंबर देऊन ठेव…तुझी आठवण आली की पटकन फोन करत जाईल…आठवण आली तर तुही फोन करत जा..

सागर – हो मी ना विहंगला दिलाय नंबर..फेसबुक वर मित्र म्हणून ऍड आहे तो मला…चला काकू येतो मी..माझी खुशाली कळवत जाईल मी…

सरलाताई – हो ये बाबा…नाहीतर उशीर होईल तुला…

सरलाताईंचा निरोप घेऊन सागर तिथून निघतो…संध्याकाळ होत आली होती विहंग घरी आला आणि आपल्या आईला सांगू लागला..

विहंग – आई….आई…आज ना लॅब मध्ये काय मजा आली म्हणून सांगतो तुला…प्रथमेशच्या अंगावर हायड्रोक्लोरिक ऍसिड सांडलं आणि खूप घाबरला होता तो…

सरलाताई – अरे बाप रे…मग यात काय मजा वाटली तुला…हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे भयानक की…हात खराब झाला असेल कि त्याचा.

विहंग – आई…कसली इमोशनल आहेस ग तू…ते डायल्युट होत म्हणून काही झालं नाही…कॉन्सन्ट्रेटेड असत तर इजा झाली असती त्याला…

सरलाताई – ओह्ह्ह…डायल्युट होत होय…नशीब…ते जाऊदेत…जेवण करून घे…यंदा शेवटचं वर्ष ना तुझं इंजिनीरिंगचं चांगला मन लावून अभ्यास कर…फक्त भारतात नको नाव कमाऊस…तर परदेशातही नाव कमव…चल हात-पाय स्वछ धुवून घे ताट वाढते…

सरलाताई ताट वाढून टेबलवर ठेवतात…आपल्या लेकापाशी गप्पा मारत बसतात आणि त्याचबरोबर त्याला काय हवं नको तेही पाहतात…

सरलाताई – बाळा अरे कसा झालाय आजचा बेत…मस्त ना..

विहंग – हो आई…तू नेहमीच मस्त करतेस स्वयंपाक..!

सरलाताई – अरे आज ना तो सागर आला होता…अमेरिकेतल्या शिकागो मध्ये पोस्टिंग झालंय त्याच…खरंच एकट्याने मस्त नाव काढलं आई बापाचं…

विहंग – मी हि असाच एक दिवस परदेशात जाणार नाव कमवायला… …माझं प्रोजेक्ट सबमिट होऊ देत एकदा युनिव्हर्सिटीला मग बघ मीही जाईल एक दिवस…

सरलाताई – असं ही असत का…होऊ देत तुझ्या मनासारखं…तुला काय पाहिजे ते सांगत जा मला…

विहंग – आई…अगं ते पैसे घरखर्चासाठी राहू देत…मला स्कॉलरशिप मिळते की…तू नको एवढा लोड घेऊस…एवढं करतेस की माझ्यासाठी…बघू उद्या माझं प्रोजेक्ट सबमिशन आहे…

सरलाताई – आत्ता जेवण कर…उद्याची बात उद्या…

इतक्यात विहंगच्या ताटातलं पिठलं संपत…सरलाताई कढईमधे पिठलं आहे कि नाही ते पाहायला लागतात तर कढईमध्येही पिठलं नसतं…विहंगलाही पिठलं संपलं आहे याची जाणीव होते…म्हणून पिठलं नको वाढू ”  असं विहंग आपल्या आईला सांगतो…तसं उरलेली भाकरी दुधात कुस्करून खाऊन टाकतो…सरलाताई आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत विहंगची नजर चोरून उठतात..

विहंगही आपलं जेवण करतो मग उद्याच्या दिवसाची तो आतुरतेने वाट पाहत बसतो…कारण त्या एका सबमिशनवर विहंगच स्वप्न साकार होणार असत…दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून सरलाताई सडा-संमर्जन करून देवपूजा करून खाणावळीसाठीचे सामान एकत्र करून सारी काम आवरून ठेवतात…विशेष म्हणजे विहंगही लवकर उठलेला असतो…आपलं भरभर सगळं आवरून सबमिशनसाठी जातो…विद्यापीठाला प्रोजेक्ट खूप आवडत…म्हणून ते ठेवून घेतात…परीक्षाही महिन्याभराने असते…तोपर्यंत प्रोजेक्टचा निकालही लागणार असतो…म्हणून परीक्षा व्हयच्या आत आपलं स्वप्न साकार होणार याचा आनंद विहंगला स्वस्थ बसून देत नसतो…

महिन्याभराने विहंगच्या परीक्षा होतात तोपर्यंत प्रोजेक्टचाही निकाल लागतो…संपूर्ण युनिव्हर्सिटीमधून पहिल्या तीन नंबरमध्ये विहंगचं प्रोजेक्ट असत म्हणून विहंगला खूप आनंद होतो…घरी जेव्हा विहंग येतो तेव्हा सगळं घर आनंदानं डोक्यावर घेतो…आपल्या आईला आनंदाने सांगत सुटतो…आई…अगं माझं प्रोजेक्ट पहिल्या तीन नंबरमध्ये आलंय…फक्त या परीक्षेचा निकाल येऊ देत मग माझं नक्की परदेशात नोकरी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल बघ…सरलाताई म्हणतात..तुझी मेहनत फळाला आली बाबा…मी फक्त निमित्त..असे म्हणून सरलाताई आपल्या लेकाला आनंदाने जवळ घेतात… असे म्हणून सरलाताई आपल्या लेकाला आनंदाने जवळ घेतात…याच आनंदात अभ्यासही विहंग जोमाने करत असतो फायनल एक्सामिनेशनही होऊन जाते…व्हेकेशन येतात मग त्या सुट्ट्यांमध्ये प्रथमेश कडून विहंगला कळते की कॉलेज मधील कॅम्पस थ्रू कंपन्या खास नोकरी देण्यासाठी येत आहेत..त्यात जपान,अमेरिका अशा मोठ्या मोठ्या देशांची नाव होती…विहंगनेही टेस्ट देण्यासाठी अर्ज दिला…पहिल्याच राऊंडला विहंगच सिलेक्शन झालं…फक्त लेखी चाचणीत विहंग पास झाला म्हणून पुढच्या राउंडची जोरात तयारी करू लागला…पाहता पाहता सगळे राउंड पास झाला म्हणून मोठ्या आनंदाने आपल्या घरी जाऊन आईला सांगतो…आईच्या आनंदाला पारावार उरत नाही….आपल्या मुलाचं कौतुक सगळ्यांनाच सांगत असते 

सरलाताई – कारंडे काकू…माझ्या विहंगच आता लवकरच पोस्टिंग होतंय हो…परीक्षा व्हायच्या आधीच ते पण…

कारंडेताई – हो का…मग काय आहे तुमची परदेशवारी नाही का ?

विहंग – अहो काकू…काही नक्की नाही अजून मी आपला प्रयत्न करून पहिला…बाकी सगळं नशीबच पाहून घेईल

कारंडेताई – होईल हो पोस्टिंग लवकरच…आहेस तू हुशार…!

असेच चार-पाच महिने होऊन जातात…विहंग घरात नसताना एक लिफाफा सरलाताईला एक कुरिअरवाला देतो…विहंग काही वेळाने घरी येतो…आपल्या मुलाशी बोलत सरलाताई बसलेल्या असतात….

विहंग – आई…काळजीत दिसतीयस…काय झालं ?

सरलाताई – काही नाही रे बाळा…तुझीच काळजी आहे रे बाबा..कास होईल तुझं…

विहंग – एवढी काळजी करू नका…आईसाहेब…काळजी करण्याचे दिवस संपलेत आपले…

सरलाताई – आज हे असते तर किती मिरवले असते सगळीकडे…तुझंही कौतुक आणि अभिमान खूप होता यांना..

विहंग – अजूनही आहे की बाबाना माझा अभिमान..

सरलाताई – ते कसं..?

विहंग – अगं तुझ्यात दिसतात मला माझे बाबा…

सरलाताई – तू अगदी बोलघेवडा आहेस बाबा तुझ्या बाबांसारखा..अग्गो बाई…विसरलीस की…!

विहंग – का ? काय झालं ?

सरलाताई – एक लिफाफा आलाय तुझ्या नावाने…हे घे

विहंग – दाखव इकडे…आई…हा तर कॉल आलाय मला…जपानवरून…बाकी सगळे डिटेल्स मेल वर आहेत असं सांगत आहेत की…मी पटकन पाहतो काय आहे मेलबॉक्स मध्ये…

विहंग मेलबॉक्स चेक करतो आणि आनंदाने उड्या मारू लागतो…सरलाताई मोठ्या कौतुकाने म्हणतात-

सरलाताई – विहंग अरे…असाच नाचत बसणार आहेस की काही सांगणार आहेस..

विहंग – आई…मला जपानला बोलावलंय…जॉबसाठी…तुला माहिती आहे प्रथमेश आणि मी मागे कॅम्पस थ्रू मुलाखतीसाठी गेलो होतो…माझी मेहनत फळली गं…

सरलाताई – काय सांगतोस विहंग…मस्तच की…आज श्रीखंडाचा बेत आहे आपल्या खानावळीत…पाटीच लावते दाराबाहेर मेनू कार्डची..बरं…जपान मध्ये कुठल्या शहरात आहे तुझं पोस्टिंग…

विहंग – अगं…मच्चीदा नावाचं शहर आहे तिथं आहे पोस्टिंग…का गं ?

सरलाताई – असं…एक काम कर मला लगेच फेसबुक डाउनलोड करून दे…

विहंग – ठीक आहे हे घे …कसं वापरायचं माहित आहे ना तुला ?

सरलाताई – अरे…तू शिकव की मला…मग तुझ्याशी मी असंच बोलेन ऑनलाईन…

सरलाताई पटकन सगळं शिकून घेतात…जपान आणि मच्चीदा हे शब्द ऐकल्यावर सरलाताईंना सागर ची आठवण होते कारण सागरचेही पोस्टिंग त्याच ठिकाणी झालेलं असतं…लगेचच सागरला एक फ्रेंड रिक्वेस्ट  करतात…सागर काही वेळ फेसबुक वर बोलतो त्यानंतर लगेच कॉल करतो…कॉल वरून सरलाताई आपल्या मुलाचं पोस्टिंगही त्याच ठिकाणी झाली आहे असं सांगतात…हे कळताच सागर आधीपासूनच विहंगसाठी घर निवडण्यापासून ते जेवणापर्यंत सगळी सोय पाहून घेतो…

कारण काही दिवसातच विहंगलाही तिथून लवकरच निघायचे असल्याने आधीपासून गैरसोय होऊ नये याची खबरदारी सागर घेत असतो…विहंग आपल्या आईचा लाडका आणि एकुलता एक असल्याने आपल्या लेकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशीच आशा सरलाताईंना वाटत होती…

एक दिवस विहंग जपानला जाण्यासाठी तयार होतो…फ्लाईट रात्री असल्याने दिवसभर सगळं आटोपून प्रवासाची तयारी तो करतो…सरलाताईही मस्त पैकी खाण्या-पिण्याची तयारी करून देतात…एअरपोर्ट वर सोडायला जाताना…डबडबत्या डोळ्याने आपल्या लेकाला निरोपही त्या देतात…घरी आल्यानंतर…पहिला फोन सागर ला करतात–

सरलाताई – सागर…आज माझ्या काळजाचा तुकडा येतोय रे बाबा तिकडं…नीट काळजी घ्या रे दोघे…

सागर – काकू…तुम्ही मला माझ्या आईसारख्या आहात…पाहिलं रडणं थांबवा…

सरलाताई – बाबा…कोण कुठला रे तू…पण योगायोग बघ ना कसा जुळवून आणला देवाने…माझ्या विहंगचंही पोस्टिंग तिथंच व्ह्याच होतं…

सागर – हो…काकू देवानेच जुळवून आणलं बघा सगळं…

सरलाताई – काय गं बाई…तुम्ही आजकालची पोरं योगायोग…देव या सगळ्यांवर विश्वास ठेवायला लागले..

सागर – हो काकू …देवानेच संधी दिलीय मला…तुमच्यासाठी काहीतरी करायची…

सरलाताई – अरे पण मी असं काय दिलंय तुला…?

सागर – पाहिलंत…आत्ताही सगळं क्रेडिट घेत नाहीय तुम्ही !

सरलाताई – क्रेडिट कसलं रे…मी असं काहीच मोठं काम केलं नाहीय…

सागर – काकू…मी तुमचे आशीर्वाद घ्यायला त्यादिवशी आलो होतो…तुम्हाला माहितीय मी आशीर्वादाचा तर भुकेला होतो…आणि पोटही माझं भुकेलं होतं…तुम्ही किती आग्रहाने,प्रेमाने त्याच मायेन  मला पोटभर जेवू घातलं…याचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत…असं समजा…मला ते ऋण फेडायची संधी दिलीय देवाने…म्हणून तुम्ही अगदी निश्चिन्त राहा…विहंगच्या रूपानं मला भाऊच मिळाला आहे की असं समजेल मी…

सरलाताई – [खूप गहिवरून आलं ] सागर…तू माझ्या पोटी का नाही जन्म घेतलास…मला एक नाही तर दोन मुलं आहेत दोन…

असे म्हणून सरलाताईंना खूपच दाटून आलं…फोनवर बोलताही येत नव्हतं…म्हणून त्यांनी फोन लगेच बंद केला…आणि सागरशी फेसबुकवरून संवाद साधू लागतात.

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories