Ritbhatmarathi

Search
Close this search box.

पिंकीच्या मम्मीचा गाऊन

सौ.गीता गजानन गरुड.

माझी सासरवाडी आम्ही रहात असलेल्या शहरात असल्याकारणाने माझी सौ.व मुलं तिथे दोन चार तासासाठी जाऊन यायची पण वस्तीला कधी राहिली नव्हती. रात्री झोपायला घरीच यायची. माझे सासुसासरे यंदाच्या सप्टेंबरमध्ये गावी रहायला गेले व हे गणित विस्कटले.

मुलांना सुट्टी लागली तसं त्यांनी आजीआजोबांकडे जायचं असा घोषा लावला. मीही बऱ्याच दिवसांपासून स्वातंत्र्यासाठी आसुसलो होतो.

माझी सौ. व आमची दोन मुलं,वेदिका व वेद यांना मी गाडीत बसवले व खाली उतरुन खिडकीजवळ थांबलो तसा सौ.ने ओढणीचा पदर तोंडाला लावला व भारंभार सूचना देऊ लागली.
सकाळी पाच वाजता केराचं टोपलं बाहेर ठेवा.
सॉक्स इथेतिथे टाकू नका व नियमित धुवा.
दूध तापत ठेवलं की त्याच्या अवतीभवती थांबा.
विळी वापरुन झाली की स्वच्छ धुवून ठेवा.
ओटा स्वच्छ ठेवा.
केर काढताना वरती कोळिष्टके दिसल्यास साफ करा.
लादी दोन पाण्याने पुसा.
सोसायटीतल्या बायकांशी जास्त बोलू नका.
तळलेले पदार्थ जास्त खाऊ नका……
गाडीचा हॉर्न वाजला तसा मी तिच्या तावडीतून सुटलो. मला पंख फुटल्यासारखं वाटलं.  ते गाणं आहे नं..
पंछी बनू उडती फिरु मस्त गगन में
आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में..
अगदी तसा माहौल. 

मी तसा गोssड माणूस असल्यामुळे सौ.ने माझं बाहेरचं खाणं बंद केलंय. पण आत्ता मला विचारणारं कोणी नव्हतं म्हणून मी वडापावच्या गाडीजवळ गेलो. नाम्या गरमागरम वडे तळत होता.  भल्या मोठ्या कढईत वडे तळताना पहाणं म्हणजे नेत्रपर्वणीच.  मी दोन वडापाव हाणले.  बाजुच्या हॉटेलमधून देशी चिकनचा रस्सा व चिकन बिरयानी घेतली.  दोन थंड्याच्या बाटल्या घेतल्या व घरी आलो.

आल्याबरोबर मस्त शॉवर घेतला. सौ. मला थंड पाण्याचा शॉवर घेऊ देत नाही. बाधतं म्हणते अंगाला. पार कुक्कुलं बाळ समजते मला.  कढईत पाहिलं ,शेपूची भाजी होती. बाजूच्या डब्यात नाचणीची भाकऱ्या होत्या. मी दिवाबत्ती केली.

चिकनच्या रस्स्यासोबत नाचणीच्या भाकऱ्या घेऊन बसलो. तितक्यात बाजूची चार वर्षाची इरसाल कार्टी(पिंकी) आली.  काका तुला कंपनी देते म्हणू लागली व इकडेतिकडे शोधू लागली. मी आणलेल्या पार्सलची पिशवी दिसताच तिने ती प्रामाणिकपणे माझ्या हातात दिली व उघड म्हणू लागली.  मी पार्सल उघडताच आतले चिकनचे पीस पाहून बाऊ बाऊ करुन नाचू लागली.  कार्टीने बिरयानीतले सगळे पीस गट्टम केले व फक्त भात माझ्यासाठी ठेवला. काका उद्यापण आण हं असं सांगून निघून गेली. 

मी मग कसातरी तो भात घशाखाली ढकलला व टिव्ही लावून सोफ्यावर पसरलो. तितक्यात सौ.चा फोन..
“भाजीभाकरी खाल्लात का?
सिंकमध्ये उष्टं ठेवू नका.
सिलेंडरचं नॉब बंद करा,इत्यादी.

काही अडचण आली तर मला लगेच फोन करा. नाहीतर जाल पिंकीच्या आईला विचारायला. पक्की बोलघेवडी बया आहे ती.”

रात्री मस्तपैकी इंग्लिश मुव्ही बघितली. कळत काही नाही पण बघायला बरं वाटतं. बघता बघता डोळे मिटले. सकाळी वॉचमन थपाथपा दार वाजवू लागला तेंव्हा जाग आली.

“साहब,तुम्हारे टंकी का नल खुला है म्हणू लागला.”

संध्याकाळी पाणी गेलेलं. सकाळी सोडलं तेंव्हा टाकी ओव्हरफ्लो होऊन भिंतीवरून पाण्याचे लोट वहात पेसेज, बेडरुम,किचन,हॉल..सगळीकडे तळं झालं होतं. हॉलमध्ये त्यामानाने कमी पाणी साचलं होतं.

वॉचमन पाठोपाठ बिल्डींगमधले सगळे अहितचिंतक शेजारी दाराजवळ जमा झाले व पाण्याच्या एकेका थेंबाची महती माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकत परस्परांना सांगू लागले. खरंतर हे माझ्या वेंधळेपणाने झालं होतं. मी मुद्दाम केलं नव्हतं पण गाढवासमोर वाचली गीता तसा कारभार.

मी कशीतरी लुंगी गुडघ्यापर्यंत गुंडाळून घेतली. (जास्त वर नाही कारण समस्त महिलावर्गही माझं रुपडं बघत उभा होता). घरात असलेल्या वायपरने फटाफटा पाणी काढू लागलो. सौ.चे लेदरचे शूज,माझे शूज  पाण्याने चिंब भिजले होते.

शेवटी वॉचमनला माझी दया आली. तो माझ्या मदतीला आला. बाजुची कार्टी घरात घुसलीच.  दोनदा पाण्यात साष्टांग नमस्कार घालून भॉ करत निघून गेली. तिचा बाबा माझ्याकडे खाऊ का गिळू या नजरेने बघू लागला.

थोड्या वेळाने पिंकीची मम्मी घेवड्याची भाजीचपाती घेऊन आली. पिंकीचा बाबा ऑफिसला गेलेला. मला शनिवारची सुट्टी होती.

मी पोळीभाजी खाईपर्यंत पिंकीच्या आईने मला स्वैंपाक येतो का विचारलं. मी थोडाथोडा म्हणताच ती लाडीक हसली व काही अडलं तर विचारा, मी शिकवेन म्हणत घरातलं रेसिपीबुक आणून तिने माझ्या हाती सोपवलं.

पिंकी व तिची आई निघून गेल्यावर मी बऱ्याच रेसिपी वाचल्या व घावण करायचं ठरवलं. त्यासाठी तांदूळ भिजत घातले. बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे उकडत ठेवले. साधारण चारच्या मानाने तांदूळ मिक्सरला लावले,मीठ पाणी घातलं. एकीकडे आलं,लसूण,मिरची ठेचून बटाट्याची भाजी फोडणीला घातली. भिडं तापत ठेवलं व ते पांढरं पाणी भिड्यावर ओतलं. पाच सात मिनटं झाली तरी घावण परतायचं नाव घेईना. उलथण्याने जाम ढोंघसलं त्याला पण छे!

तितक्यात  साहिलची मम्मी कुठे जात होती ती चावी द्यायला आली. माझ्या निळ्या टिशर्टवर पडलेले पीठाचे शिंतोडे पाहून खदाखदा हसू लागली. मग तिनेच भिडं साफ करुन घावणे काढून दिले. घावण व जरा अतिखारट झालेली भाजी गिळून झाल्यावर सिंकजवळ आलो.

तो ओटा व भांड्यांनी भरलेलं सिंक मला एखाद्या राक्षसासारखं भासू लागलं. कसातरी ओटा घासूनपुसून लख्ख करताना चुकून बाजूला ठेवलेली तेलाची चिमणी कलंडली. माझे तिकडे लक्षच नव्हते. मी हेडफोन लावून गाणी ऐकत भांडी स्वच्छ करत होतो.

दादा कोंडकेचं  ढगाला लागली कळं..गाणं गुणगुणत डुलत होतो तितक्यात त्या सांडलेल्या तेलावरून माझा पाय निसटला. तरी बरं थोडक्यात निभावलं,फक्त पार्श्वभागच शेकला गेला. परत साबणाचं पाणी करुन फरशी पुसून काढली. अगदी सावकाश करत होतो तरी पाय व्ही आकारात फाकले गेले व धाडकन जमिनीवर बसलो. काय वेदना झाल्या त्या माझ्या मीच जाणे.

सगळं आवरल्यावर घारपुऱ्यांकडे डबा लावायचा व अजिबात किचनकडे फिरकायचं नाही असा निश्चय केला. घारपुरे काका सकाळसंध्याकाळ वेळेवर डबा आणून देत होते. 

एकदा पिंकीची मम्मी गाऊन घेऊन आली. जरा शिलाई मारु का विचारु लागली. मी म्हंटले,”अहो विचारायचं काय! खुशाल मारा.” ती शिलाई मारत बसली. पिंकीची वळवळ चालूच होती. तिच्या मम्मीची शिलाई मारुन झाली. तेवढ्यात त्या पिंकी नामक टारगट मुलीने खण उघडून तिथला स्क्रू गिळला व दुसरा स्क्रू हातात घेऊन आईला सांगू लागली,”मम्मी,मी हे खाल्लं!” हे ऐकताच पिंकीची मम्मी घाबरीघुबरी झाली. मी पिंकीच्या तोंडात विजेरीचा झोत मारला पण स्क्रू कधीच खाली गेला होता.

शेवटी मी पिंकीच्या मम्मीला व पिंकीला माझ्या गाडीवर बसवून डॉक्टरकडे न्हेले. डॉक्टरांनी तिला अर्धा डझन केळी भरवण्यास सांगितले. मी क्लिनिकमध्येच पिंकीला केळी आणून दिली. तिला केळी अजिबात आवडत नाही त्यामुळे केळी खाताना त्या टारगट मुलीने प्रचंड राडा केला.

तिथे उपस्थित असलेल्या इतर मुलांच्या आयांना मीच पिंकीचा बाबा आहे असं वाटलं व पिंकीला योग्य संस्कार देण्यात आम्ही अपयशी ठरलोय या नजरेने त्या माझ्याकडे व पिंकीच्या मम्मीकडे पाहू लागल्या.
तासाभराने मी त्या दोघींना घरी आणून सोडले. डॉक्टरची फीही मीच दिली. फुकटचा भुर्दंड बसला.

आज रात्री माझ्या सौ.चा फोन आला नाही.  मला जरा चुकल्याचुकल्यासारखं वाटलं. मीही मग मस्त पसरुन थंडा पीत भुताची मुव्ही बघत बसलो. मुव्हीतली भुते फारच डेंजर होती. मला जाम घाम सुटला.  मुव्ही बंद करुन रामनामाचा जप करत डोळे मिटून राहिलो.

पहाटे चार वाजता डोळा लागला तो सात वाजता जाग आली. कोणीतरी डोअरबेलवर बोट धरुनच होतं. अरे काय बापाचा माल वाटला का काय असं बोलायचं ठरवून रागारागाने मी दार उघडलं तर दारात साक्षात सौ.,दोन्ही मुलं व जोडीला सासूबाई. मी उसणं हसू आणून दार उघडलं.

“अगं रहायला गेली होतीस नं! रहायचं होतसं पोटभर” असं म्हणालो.. इतक्यात सौ.ची गर्जना ऐकू आली. “कशाला,तुम्हाला त्या पिंकीच्या मम्मीला व पिंकीला घेऊन गावभर उंदडायला!”

मी गरीब बिचारा ओलेता उंदीर झालो. “अगं,शांत हो. जरा माझं ऐकून घे. त्या पिंकीने स्क्रू गिळला..” हे माझं वाक्य पुर्ण व्हायच्या आत आमच्या वेदिकाने मशीनवरचा गाऊन घेतला व मम्मीकडे देत म्हणाली,”मम्मी,पप्पांवर उगाच रागावतेस. पप्पांनी तुझ्यासाठी पिंक कलरचा नवीन गाऊन आणला बघ. तुझा फेवरेटय नं पिंक कलर!”

सौ.ने तो गाऊन अंगाला लावला. मग सासूबाई म्हणाली,”उगीच नावं ठेवतेस माझ्या जावयाला.  बघ तुझी आवड कशी जपतात ते आणि तू सुतावरून स्वर्ग गाठतेस.”

सौ. लाडात येऊन म्हणाली,”चुकलं गडे,पण खरंच छान पायघोळ आहे गाऊन. मम्मीसाठीपण आणा. कुठून आणलात?”

मीही मग फेकलं,”अगं फार लांब आहे ते दुकान वेस्टला. तिथून घेऊन आलो. तुझ्या मम्मीसाठीही आणूया नी ते पिंकीने स्क्रू गिळलेला म्हणून तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो.”

सौ. म्हणाली,”सॉरी नं गडे, मी उगीच संशय घेतला तुमच्यावर. मला त्या दुसऱ्या मजल्यावरच्या आगलावे वहिनींनी फोन करुन सांगितल.”

“ठिकाय पण तुझा विश्वास नको तुझ्या नवऱ्यावर?”

“अहो,चुकलं म्हंटलं ना. चहा आणते तुम्हाला व तुमच्या आवडीचा मँगो शिरा करते.” मी आत्ता फॉर्मात आलो. किचनमधून रवा तुपात भाजल्याचा,वेलचीचा,आलं घातलेल्या चहाचा सुगंध दरवळू लागला. मी ऐटीत टिव्ही बघत बसलो,इतक्यात सौ.ने मँगो शिऱ्याची प्लेट व चहा आणून टिपॉयवर ठेवला. शिऱ्यावर काजूगर रचून फुल काढले होते. मी चमच्याने शिरा खाणार इतक्यात बेल वाजली.

दारात पिंकी उभी..”काका,माझ्या मम्मीचा गाऊन काल तुमच्याकडे राहिलाय. दे तो. “

सौ. माझ्याकडे खाऊ की गिळू या नजरेने बघू लागली.

(समाप्त)

—–सौ.गीता गजानन गरुड.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *