Ritbhatmarathi

Search
Close this search box.

रामा एक गरीब होतकरू मुलगा.शहराच्या आडोशाला वसलेल्या एका छोट्याशा गावात तो, त्याचे आई-वडील आणि त्याची अपंग बहीण जिजा राहत होते. रामा, आई -आबा आणि जिजा एवढंच काय ते रामाचं जग. एकर, दीड एकर शेती आणि त्याच शेतात बांधलेलं झोपडी वजा घर. आई आबा शेतात कष्ट करायचे.रामाला शिकण्याची फार इच्छा होती पण घरात एक अपंग बहीण आणि अशातच शेतीत काम करत असताना वडिलांचा अधू झालेला हात यामुळे त्याला शिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं. घराला हातभार लावता यावा या कारणाने त्याने दहावी होताच,छोटी मोठी काम करत एक जुनी रिक्षा विकत घेतली. रिक्षा चालवायला शिकला आणि त्याने तोच व्यवसाय म्हणून स्वीकारला. आता तो जवळच्या शहरात बस स्टॉप वर रिक्षा लावायचा. घरून सकाळी लवकर निघून दुपारपर्यंत तो होतील तेवढे प्रवासी करायचा आणि दुपारी घरी जेवायला जायचा. दादा दुपारी घरी कधी येतोय, वाट पाहत जिजा दारातच बसलेली असायची. रामा रोज दुपारी तिला काहीतरी खायला घेऊन जायचा. कधी शेंगदाणे, कधी फुटाणे, कधी चॉकलेट,कधी एखादा पेरू तर कधी मिठाई असं काही ना काही.
‌ हसत -खेळत चौकोनी कुटुंब होतं रामाचं. फार काही अपेक्षा नव्हत्याच त्यांच्या आयुष्याकडून.आहे त्याच्यात ते समाधानी होते. जिजा दारातच बसून असायची,आल्या-गेलेल्यांशी हसून गप्पा मारायची. संध्याकाळी रामा घरी यायचा तेव्हा तिला फार आनंद व्हायचा.पायाने अधू होती तरी ती घाई घाई सरकत आत जायची आणि रामासाठी चहा करायची. बसून बसून घरातलं सगळं काम ती करायची. आईला तिचा खूप आधार वाटायचा.रामाला तिचं फार कौतुक वाटायचं. किती जीवापाड प्रेम करते जिजा आपल्यावर,तो स्वताला नशीबवान समजायचा.जिजा रामासाठी घासातला घास काढून ठेवायची.रामाही तिच्या सगळ्या मागण्या विना तक्रार पूर्ण करायचा.ती त्याची बहीण कमी आणि मुलगी जास्त वाटावी, इतकं त्यांच्यातलं नातं घट्ट होतं. बापाकडे एखादी गोष्ट मागावी आणि त्याने हसत हसत ती लेकीला द्यावी इतकं सहज सुंदर नातं. तिचा रोजचा लडिवाळ हट्ट पुरवताना रामा दिवसभराचा सारा शीण विसरून जायचा. त्या दोघांना असं समाधानी आणि आनंदात पाहून आई आबांनाही आनंद व्हायचा.पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.
एक दिवस अचानक जिजा खूप आजारी पडली कधीही बरी न होण्यासाठी.बरेच उपाय केले पण तिला बरं करण्यात रामाला आणि त्याच्या आई-आबांना काही यश आलं नाही. दसरा झाला आणि जिजाची तब्येत जास्तच बिघडली. आता तर ती फक्त पाण्यावरच होती.रामाचा जीव खालीवर व्हायचा. त्याने जमवलेली सगळी तुटपुंजी तिच्या उपचारावर खर्च केली, पण त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि एक दिवस जिजा भल्या पहाटे हे जग सोडून गेली. रामाला तर जगणंच असह्य झालं, आई-आबांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. म्हणतात ना कुणा एकाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही तसं आता सगळ्यांनाच पुन्हा उभं राहणं भाग होतं. आई-आबांचा एकमेव आधार म्हणून रामाने आता धिराने घ्यायचं ठरवलं. जिजाचं सगळं कार्य उरकलं. दहा-बारा दिवसानंतर जड पावलांनी रामा रिक्षाकडे वळला. रिक्षावरचं जिजाचं नाव पाहिलं आणि तो रिक्षाला कवटाळून पुन्हा रडू लागला. आई-आबांनी त्याची कशीतरी समजूत घातली आणि त्याला रिक्षावर जायला सांगितलं.आज रामा रिक्षा घेऊन गेला खरा,पण त्याचं रिक्षा चालवण्याकडे मुळीच लक्ष नव्हतं. शेवटी बस स्टॉप वर जाऊन त्याने रिक्षा एका बाजूला लावली आणि तो तसाच विचार करत बसला. रिक्षावाल्यांच्या लाईनला लागूनच एक पेरूवाली रोज पेरू विकायला बसायची. जिजासाठी रामा तिच्याकडूनच पेरू घ्यायचा. ती त्याला विचारायची दादा एकच पेरू का नेता तेव्हा तो म्हणायचा माझ्या बहिणीला पेरू खूप आवडतो म्हणून मी तिच्यासाठी रोज एक पेरू घेऊन जातो. गेले दहा-बारा दिवस रामा आणि त्याची रिक्षा तिला कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे ती पेरूवालीही जरा अस्वस्थ झाली होती. रामा दिसताच ती त्याच्याजवळ गेली. तिने त्याला आपुलकीने विचारलं दादा काय झालं, सगळं ठीक आहे ना? गेले दहा-बारा दिवस झाले तुम्ही दिसले नाहीत. तुमची रिक्षाही नव्हती आणि तुम्ही पेरू पण घ्यायला आला नाहीत. रामाला पुन्हा भरून आलं, “आता कुणासाठी पेरू नेता जिला पेरू आवडायचा तीच राहिली नाही मग पेरू नेऊन तरी काय करू”, असं म्हणून तो पुन्हा रडायला लागला. त्या पेरूवालीने त्याची समजूत घातली. रामाने डोळे पुसून घडला प्रकार त्या पेरूवालीला सांगितला. तिलाही रडू आलं पण डोळे पुसत ती म्हणाली,”दादा एक मिनिट माझ्यासोबत येता”? तो रिक्षातून उतरला आणि त्या पेरूवालीसोबत गेला. तिने पेरूच्या पाटीतला एक लाल पेरू उचलला. तो कापला, त्याच्यात तिखट मीठ भरलं आणि त्याच्या हातात दिला .आणि म्हणाली” दादा एक बहीण गेली म्हणून काय झालं मी आहे ना तुमची अजून एक बहीण”, हा पेरू मला द्या. रामाला पुन्हा एकदा रडू कोसळलं, रडता रडताच डोळे पुसत त्याने थरथरत्या हाताने त्या पेरूवालीच्या हातात पेरू दिला. आणि म्हणाला, “ताई यापुढे या पाटीतला एक पेरू तु स्वतः खायचा,मी तो तुला कापून तिखट मीठ भरून देणार” हे जर तुला मान्य असेल तरच मी तुझा भाऊ होईल.तिने पटकन एक पेरूची फोड तोंडात टाकली आणि म्हणाली, हे बघ खाल्ला मी पेरू यावर दोघेही मनापासून हसले. रामा आज कितीतरी दिवसांनी हसला होता. आज तो त्याच आनंदात घरी गेला आई आबांना त्याने पेरूवालीची गोष्ट सांगितली. आई आबांनाही आनंद झाला.
पेरूवालीबद्दल रामाला विशेष काही माहिती नव्हती. पण आता नातं जोडलंय म्हटल्यावर ते निभवायलाही हवं.त्याने तिच्याबद्दल सगळी माहिती काढली. ती जवळचं एका चाळीत राहते, नवरा बिगारी काम करतो.दोन छोटी मुलं आहेत,कृष्णा आणि ज्ञानेश्वरी.जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. रामाला तर लॉटरीच लागली बहीण तर बहीण मिळाली सोबत भाचेही. त्याला खूप आनंद झाला पेरूवालीही देवाचे मनोमन आभार मानत होती, कारण दोन वर्षांपूर्वीच कोरोनात तिने तिचा एकुलता एक भाऊ गमावला होता. तीही दोन वर्ष रक्षाबंधन,भाऊबीज यापासून वंचितच होती.रामाच्या रूपाने तिला पुन्हा एकदा भाऊ मिळाला. रामाला बहीण आणि भाचे.यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी याचमुळे तर खास होती. दिवाळीचे दिवस असल्यामुळे रामाला रिक्षाची भरपूर कमाई झाली. भाऊबीजे दिवशी सकाळीच त्याने दुकानात जाऊन पेरूवाल्या ताईसाठी एक छानशी साडी आणि भाच्यासाठी मिठाई घेतली. मेव्हण्यासाठीही त्याने साधंसच पण एक चांगलं शर्ट पीस आणि पॅन्ट पीस घेतलं.
रामा पेरूवालीच्या घरी गेला. दारात सडा रांगोळी केलेली.छोटसंच पण नीटनेटक घर पाहून त्याला जिजाची पुन्हा एकदा आठवण आली. तीही बसल्या जागी घर जेवढं टापटीप ठेवता येईल तेवढं ठेवायची.पण आज त्याचे डोळे पाणावले नाहीत तर त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं.तो आत गेला पेरूवालीची मुलं त्याला पाहून थोडीशी गोंधळली. तेवढ्यात पेरूवालीने ओळख करून दिली हा तुमचा मामा तशी पोरं पटकन जाऊन त्याला बिलगली. त्यांने पिशवीतून मिठाईचा बॉक्स काढून मुलांच्या हातात दिला आणि त्यांना जवळ घेतलं. पेरूवालीने त्याला औक्षण केलं.रामाने तिच्यासाठी आणलेली साडी तिच्या हातावर ठेवली आणि मेव्हण्यालाही शर्ट पीस,पॅन्टपीस दिलं. रामाचं कुटुंब पुन्हा एकदा पेरूवालीच्या रूपाने पूर्ण झालं.रामाच्या आणि पेरू वारीच्या आयुष्यात दिवाळी जसा आनंद घेऊन आली तशी तुम्हां आम्हां सर्वांच्या आयुष्यात येवो….

ॲड.अश्विनी सचिन जगताप.
-सुरेखाकन्या..

====================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *