Ritbhatmarathi

Search
Close this search box.

निकिता लहानपणापासूनच आईवडिलांची अत्यंत लाडकी म्हणून घरकामापासून दहा पावलं मागे असलेली अशी निकिताची ओळख पण तरीही स्वयंपाक सोडला तर बाकीच्या कामात रस दाखवणारी निकिता अशीही निकिताची ओळख…आपली आई ज्योती स्वयंपाक शिक असा तगादा लावणारी त्यात निकिताचे वडील दीपकराव निकिताची बाजू घेणारे म्हणून  ‘ पपा की परी ‘ असा शिक्का निकितावर लागलेला…निकिता एक कत्थक नृत्यांगना त्याचप्रमाणे MA झालेली अशी तिची ओळख…डबल ग्रॅज्युएट म्हणून खूप चांगली स्थळं निकितासाठी चालून येत होती तरीही स्वयंपाक कर असं म्हणताच निकिता नाक मुरडत असे…एक दिवस असंच आई आणि निकिता स्वयंपाकावरून वाद घालत होत्या…

ज्योती – निकिता…किती हट्ट करशील स्वयंपाकाच्या बाबतीत…तुला अगदी पंचवीस माणसांचा स्वयंपाक करायला नाही सांगत आहे…आपल्याचपुरता करायचाय स्वयंपाक….अगदी चार माणसांचा…तरीही तू नाक मुरडतीय…!

निकिता – मॉम…खूप वैताग देतेस गं तू…मला नाही आवडत स्वयंपाक…

ज्योती – नाही आवडत म्हणून काय करायचाच नाही का स्वयंपाक…सासरी गेली ना की कळेल…तेव्हा माझी आठवण होईल…

दिपकराव – अगं ज्योती…तू सारखी मागं लागू नकोस स्वयंपाकावरून…

ज्योती – तुम्ही सारखी तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नका….

दीपकराव – अगं…पाण्यात पडलं की पोहता येतं…

ज्योती – अहो पण पाण्यात पडायचंच नाही असं ठरवलं की पोहता कास येईल…आणि पोहता यायला आधी हात-पाय हलवायला नको का…?

दीपकराव – तू उगाच काळजी करतीय… …आणि तुला तरी लग्नानंतर काय जमत होत गं…?

ज्योती – तुम्ही आणि तुमची मुलगी काय करायचं ते करून घ्या….

अशाच पद्धतीने ज्योती आणि निकिताचे स्वयंपाकावरून खटके उडायचे….अशातच निकितासाठी एक स्थळं चालून आलं…दिनेश पवार असं त्या पाह्यला येणाऱ्या मुलाच नाव…दिनेश एक

प्रोजेक्ट इंजिनिअर होता…आणि चांगल्या हुद्द्यावर कामही करत होता म्हणून दिपकरावानी आपला जावई म्हणून दिनेशची निवड केली…निकितालाही दिनेश एकूण पसंत होता म्हणून फार वेळ न लावता दिपकराव यांनी साखरपुडा उरकून घेतला…साखरपुडा झाल्यानंतर दोघांची बोलणीही चालली होती…त्या संभाषणामधून निकिताला असं समजलं की आपला नवरा म्हणजे दिनेश एक चांगला खवय्या आहे…आपली होणारी बायको फार काही नाही पण सुगरण असायला हवी हीच अपेक्षा माझी आहे असं निकिताला समजलं तेव्हा निकिता एका कात्रीत पकडली गेली…कारण आपला स्वयंपाकात जराही पुढाकार नसतो हे सांगायला निकिताला जमलं नाही…कारण लग्न ठरल्यानंतरचे सोनेरी दिवस निकिता अनुभवत होती तशीच अवस्था दिनेशचीही झाली म्हणून दिनेशही आपल्या खाण्याच्या आवडी आधीपासूनच निकितावर लादू नये असं दिनेशला वाटायचं…म्हणून सुरुवातीचे सोनेरी दिवस एकमेकांना समजून घेण्यात गेले…काही महिन्यांनी दिपकराव यांनी आपल्या लेकीचं रीतसर कन्यादान करून लग्न लावून दिले…लग्नानंतर दिनेशच्या आई म्हणजेच उषा ताई अतिशय समजूतदार अशा पद्धतीने आपल्या सुनेला म्हणजेच निकिताला पाकशास्त्राचे ट्रेनिंग देत होत्या.. ..स्वयंपाक शिकवताना उषाताईंना लगेच कळले की स्वयंपाक शिकवायचा म्हणजे एक मोठे दिव्यच आहे कारण एखादा पदार्थ चुकला की निकिता अगदी न संकोचता सांगत असे,  ‘ आई मी कधी स्वयंपाकघरात गेलेच नाही असं लग्न झाल्यानंतर नव्याची नवलाई काही दिवसांची असते असं म्हणतात याचा प्रत्यय निकिताला चांगलाच आला…

एक दिवस असंच निकिता पोळ्या करत होती आणि उषाताई शेजारी उभ्या राहून पाहत होत्या…पोळी काही केल्या फुगत नव्हती म्हणून निकिता हताश होत होती तर उषाताईंनी समजावून सांगितले…

उषाताई – निकिता….अगं दिनेश मेहनत करून येतो तू जर अशा पोळ्या त्याच्या समोर जेवायला ठेवल्या तर कसं होईल ग…गॅसची आच सुरुवातीलाच मोठी करत जा नं मग तोपर्यंत तवा चांगला तापला जातो…आणि तोपर्यंत पोळपाटावर पोळी लाटूनही झालेली असते मग टाकायची तव्यावरती पोळी…

निकिता – आई काय करू…गॅसची आच कमी कधी करावी हेच मला नीट समजत नाही…

उषाताई – बापरे…आता इथून सुरुवात म्हणायची…तरी तुला अजून इतर जबाबदाऱ्या दिल्या नाहीत मी..जस की भाजी आनण, किराणा दुकानदार अशा कुठल्याच जबाबदाऱ्या मी सोपवल्या नाहीत अजून तुझ्यावर…तुला निदान घरातला चार जणांचा स्वयंपाक तरी जमायला हवा…मी आहे म्हणून बरं आहे…

निकिता – आई…तुम्ही सांगा मला मी नीट ऐकून करेल व्यवस्थित…

उषाताईंनी स्वतः पोळी कशी लाटायची हे निकिताला प्रत्यक्ष कृतीमधून सांगितले…त्यानंतर निकिता पोळी लाटायला म्हणून परत उभी राहिली पण तरीही जैसे थे काही केल्या पोळी व्यवस्थित भाजायलाही निकिताला जमलं नाही म्हणून कशीबशी निकिताने पोळी लाटली आणि तव्यावर पोळी चारही बाजूनी डागली गेली…एकूण देशाचा नकाशा पोळीवर दिसत होता….उषाताई हसून म्हणाल्या…

उषाताई – काय गं हा नेमका कुठल्या देशाचा नकाशा म्हणायचा….!

निकिता – आई…मला लाटायलाच नाही जमत…

उषाताई – आता मघाशी तर म्हणटलीस गॅसची आच नेमकी कशी ठेवावी हे समजत नाही म्हणून…

निकिता हिरमुसली होऊंन आपल्या बेडमध्ये जाऊन बसली…दिनेश काही वेळातच आल्याने उषाताई आणि निकिता ताट वाट्या घेऊन जेवण करायला म्हणून बसल्या…दिनेश फ्रेश होऊन जेवायला बसला…तर उषाताईंनी नेमकी डागलेली पोळी दिनेशच्या ताटात वाढली …दिनेश डागलेली पोळी पाहून निकिताला म्हणाला…

दिनेश – निकिता…कधी जमणार आहे तुला पोळ्या…मी खूप दिवसांपासून म्हणतोय पोळ्या सगळ्या कडक असतात…ऑफिसमधले काही लोक माझ्या डब्यातली पोळी हाताने तोडतात तर त्यांना तुटतंही नाही….मला भूक लागलेली असते म्हणून मी आपला कसाबसा पोटात ढकलतो ती कडक पोळी…

निकिता – मी प्रयत्न करतीय पण मला काही जमत नाही…

उषाताई – मनावर घ्यायला हवं सगळं…तेव्हा जमेल…

दिनेश – ते काही नाही…आई…उद्यापासून तूच मला डबा करून देशील…

उषाताई – अरे पण ऐक तर…मी शिकवतिय निकिताला चांगलं…आणि तीही शिकतेय अगदी आवडीने….

दिनेश – तुम्हा दोघीना काय करायचं ते करा…पण मला ऑफिसचा टिफिन तरी व्यवस्थित पाहिजे…

असं म्हणून दिनेश ताटाचा अपमान होऊ नये म्हणून कसाबसा जेवला आणि सकाळी ऑफिस असल्याने पटकन झोपीही गेला…निकिता मात्र आपल्या नवऱ्याचा चिडलेला चेहरा आठवत होती आणि मनातल्या मनात रडत होती आणि पहाटे झोप लागली तरीही निकिताने सकाळी लवकर उठून कणिक भिजवून सगळी तयारी करून ठेवली होती उषाताईंनी देवपूजा उरकून लगेच भाजी फोडणीसाठी घालायला पुढे झाल्या आणि नेहमीप्रमाणे निकिता पोळ्या करण्यासाठी उभी राहिली…तेवढ्यात उषाताई म्हणाल्या-

उषाताई – निकिता…तू राहू देत मी लाटेल पोळ्या…तुला जोपर्यंत जमत नाहीयेत तोपर्यंत तू काही करू नकोस दिनेशची चिडचिड होते खूप व्यवस्थित जेवण नसेल तर…तू फक्त टिफिन पॅक करून दे त्याचा आणि त्याला नाश्ता नेऊन दे…

निकिता – ठीक आहे आई…

निकिताने त्या दिवशी पोळ्या केल्या नाहीत पण त्यानंतरही उषाताईंनी पोळ्या लाटण्याचा काम निकितावर सोपवलं नाही…जवळ जवळ ५-६ महिने निकिताला उषाताईंनी पोळ्या लाटण्याचं काम करू दिल नाही…एक दिवस निकिताने वैतागून आपल्या आईला फोन लावला…फोन वर निकिताने पोळ्या लाटण्याविषयी सगळं काही सांगितलं…

निकिता – आई…मी काय गं करू…दिनेशच्या आई मला पोळ्या लाटायला देतंच नाहीत…जर मला काम जमत नाही म्हणून दिल गेलच नाही तर प्रॉपरली शिकणार कसं…पाण्यात पोहायला शिकायचंय पण पाण्यात उडी मारायलाच जर कुणी अडवत असेल तर कसं गं जमेल पाण्यात पोहायला…

ज्योती – तेच तर….मी लग्नाआधीच खूपदा सांगितलं तुला….इथेच तर तुला पोहण्यात रुची वाटायला हवी होती पण तू तर ठरवलंच होत मला आवडत नाही म्हणून इग्नोर करत होतीस…

निकिता – आता काय करू….?

ज्योती –   आता काय आम्ही आमचे देव पाण्यात ठेवतो जोवर तुला पोळ्या येत नाही तोवर…

निकिता – मॉम….मी सिरिअसली बोलतेय…लग्न आधी वेगळं होत सगळं…आता वेगळं आहे…माझी स्वप्न वेगळी होती आता संसारचक्रात पडल्यावरती आधीच विसरून कसं चालेन…

ज्योती – काही दिवस…सासूबाई पोळ्या कशा लाटतात ते पहा…मग तू त्यांच्याआधी किचन प्लॅटफॉर्म च्या इथे उभी राहत जा….येईलच हळू हळू…अगं पाण्यात पोहायला शिकायचंय मग त्यात उडी मारायला तर जमलं पाहिजे नं…

सुरुवातीचे काही दिवस निकिता रोज आपल्या सासूबाईंना पोळ्या करताना लक्षपूर्वक पाहायची…नंतर स्वतःहून न घाबरता पोळ्या करण्यासाठी उभी राहिली…आणि व्यवस्थित अशा पोळ्या निकिताला जमायला लागल्या….काही दिवसातच आपल्या बायकोच आपल्यावर खरंच प्रेम आहे याची प्रचिती दिनेशला येऊ लागली कारण पुरुषांच्या मनात राज्य करायचं असेल तर त्यासाठी पोटात शिरावं लागत…आवडी निवडी माहिती करून घेऊन खाऊन घालावं लागत हे परत निकिताला नव्याने समजलं…

म्हणूनच पाण्यात पडलं की आपोआपच पोहता येत असं आपल्यातली समजूतदार माणसं सहज बोलून जातात…पण हे साफ खोटं आहे कारण पाण्यात पोहण्याआधी…पाण्यात उडी मारण्याची धमक असावी लागते…पाण्यात पडण्याआधीच जर आपण डगमगत असू…कुणी मागे खेचत असेल तर त्या पाण्यात पोहण्याची क्षमताच नाहीय असं समजायचं नाही…हे लक्षात ठेवायचं आहे…आपल्याला पाण्यात पोहायचंय…पाण्यात उडीही आपल्यालाच मारायचीय…हात-पायही आपल्यालाच हलवायचे आहेत…