Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️सौ.गीता गजानन गरुड.

“नानी..अगं नानी..अगं बोल ना काहीतरी..आता आपण दोघंही म्हातारे झालो तरी तुझे रुसवेफुगवे चालूच. तुला हवं तसं स्पेशल दूध घेऊन आलो. गरमागरम जिलबी आणि कचोरी आणली तरी फुगलैस माझ्यावर..गाल बघ कसे कचोरीसारखेच गोलमटोल झालेत. ही बघ तुला आवडते तश्शी स्ट्रॉग कॉफी करुन आणलेय. घे बघू..फ्रेश होशील..” वसंतराव नानीच्या पुढ्यात कॉफीचा मग करत म्हणाले.

कॉफीचा सिप घेतल्यावर नानीच्या कपाळावरील आठ्या जरा सैलावल्या.

“नानी का रुसलैस एवढी?”

“तुमच्यावर नाही ओ..आपल्या सुनबाईचा फोन आला होता.”

“कोण राधिका..तिच्याशी तर अगदी गुळपीठ आहे तुझं. अर्थात राधिकाचा स्वभावही साऱ्यांशी जुळवून घेणारा आहे म्हणा.”

“म्हणजे मी खडूस?”

“हे बघ..स्वत:च स्वतःला काहीबाही म्हणवून घेतेस नि उलटं माझ्याच अंगावर टाकतेस, झालं.”

“मी कुणाच्याही अंगावर काहीही टाकत नाही. ऋतुराजचं लग्न ठरवलय. कळलं नं तुम्हाला?”

“हो. कळलं म्हणजे रात्री फोन आलेला ऋतूचा.”

“रजिस्टर करणार आहे म्हणे लग्न.”

“हो. तेही ऐकलं मी.”

“अहो, पण ऋतुचं लव्हमँरेज..दोन्ही कुटुंबाची पसंती आहे लग्नास. पळून का जाऊन करायचय लग्न! मग चांगलं देवाब्राह्मणाच्या साक्षीने, सग्यासोयऱ्यांना निमंत्रित करुन लग्न केलं तर बिघडलं कुठे! एकच तर नातू माझा. मलाही वाटतं नातवाच्या लग्नात हौसमौज करावी..छान नववारी नेसावी. नथबुगडी, ठुशी,मोहनमाळ घालावी,मोगऱ्याचा गजरा माळावा, मंगल कार्यालयात नातवाची आज्जी म्हणून पुढल्या रांगेत बसून भाव खावा. याने सगळ्यावर पाणी ओतलन. जळलं मेलं लक्षण ते. कुठून आलं हे फ्याड याच्या डोसक्यात. बरं याच्या आईनं तरी समजवावं याला. ती तरी कशी तयार झाली! चार अक्षता कपाळावर पडल्या नाहीत,सप्तपदी,होमहवन झालं नाही तर  ते लग्न कसलं!”

“अगं पण ती मुलगी..काय बरं..तिचं नाव ते ..प्राजक्ता..तिला म्हणे या रिच्यूअल्सवर विश्वास नाही. मुळात तिचा देवावरच विश्वास नाही.”

“जळलं मेलं लक्षण ते. नाव सोनुबाई नि हाती कथलाचा वाळा तसंच की हे..नाव प्राजक्ता..इंद्राच्या नंदनवनातला पारिजातक..सत्यभामेने हट्टाने मागवून अंगणात लावून घेतलेला..प्राजक्ताची फुलं कशी..टवटवीत पिवळसर पांढरी..केशरी दांड्याची..देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठीच जणू अंगणात टपटप पडतात भल्या पहाटे..नं ही पोरगी..नाव प्राजक्ता आणि म्हणे देव मानत नाही.. नसेना का मानत आपल्याला काय देणंघेणं पण आपल्या घरची नातसून होणार म्हणजे..सगळे सणसमारंभ,पुजाअर्चा करायलाच हवी तिने.

गणेशपूजन..चांगला अकरा दिवस गणपती बसतो आपल्याकडे. सूनबाई एवढी मुख्याध्यापिका पण पदर खोचून दर दिवशी नवा नैवेद्य दाखवते बाप्पाला..येणाऱ्यांसाठी मुखवास काय नं अनारसे,चिवडा काय..पहिलं थोडं सांगावं लागलं पण आता जमतं हो तिला सगळं, तरी मला विचारुन विचारुन करते..मान देते त्या विचारण्यातून मला.

मुलगी एकवेळ अरे ला का रे करेल पण सूनबाई नाही ओ करायची कधी, पण आता हे वेगळच धेंड गळ्यात पडणार माझ्या सूनबाईच्या..देव मानत नाही म्हणे..पोरीच्या जातीला हे असं मानण्या नं मानण्याची मुभा असते का! माहेरचे रितीरिवाज माहेरी पाळायचे. माझ्या माहेरी नाही मी दत्ताचं करायचे!..इकडे आल्यावर सासूबाईंचं आराध्यदैवत श्रीराम त्याचं करु रागले..इथून तिथून सारे देव एकच..ते संस्कृत सुभाषित आहे नं..
आकाशात् पतितम तोयम यथा गच्छति सागरम्।
सर्वदेवनमस्कार: केशवं प्रतिगच्छति।।

पण ही प्राजक्ता..हे आधुनिक मॉडेल म्हणे देवापुढे हात जोडत नाही. संताप संताप होतोय माझा. कसं सांगू! अंगाचा तीळपापड होतोय नुसता.”

नानी अशीच हिरमुसून राहिली. ऋतुराजचाही फोन घेतला नाही तिने. तिला पुढचं दिसत होतं..सुनेनंतर तिच्या देवांची उठबस करणार कोण? ही भावी नातसून अशी तिरपागडी..कधीकधी वाटायचं जावं तिच्या आईवडिलांकडे नं विचारावं..हेच संस्कार केलेत का लेकीवर! पण मग ऋतु दुखावेल..

ऋतु म्हणजे अगदी दुधावरची साय जशी..तिचा एकुलता एक छोटा मित्र..आता मोठा झाला असला तरी मैत्री अबाधित होती पण ऋतुने केलेल्या या वेड्याबागड्या निवडीमुळे नानीस ऋतुचा कधी नव्हे तो राग आला होता. केळवणही घातलं नाही तिने नातवाला.

रिसेप्शन ठेवलं होतं..मोठ्या लॉनवर..सगळे पदार्थ ठेवले होते. कितीक आचारी नि कितीक प्रांतातले पदार्थ..मांडे काय गुळपोळी काय,सरसों का साग नं  मक्के की रोटी काय नं हैदराबादी बिरयानी काय..

नानीस आग्रह करुनही नानी एकटी राहिली घरात. अधमुऱ्या दह्यात भात कालवून जेवली. देवांना म्हणाली..”माझी सून असेपर्यंत ..नंतर तुम्ही तुमची सोय बघा बॉ.” असं बोलतानाही तिला गहिवर आला. दुधपाण्याने न्हाऊ घालायची ती देवांना. फुलं बाजारातल्या पुडीतली नको म्हणून बाग जोपासली होती अंगणात. निळी कोरांटी, जांभळी कृष्णकमळं, सुगंधी अनंता, डबल तगर, पारिजातक..परडीभरुन फुलं..त्यांचे हार मुर्त्यांना किती शोभून दिसायचे!

वसंतराव मात्र गेले होते नातवाच्या लग्नाला. मधुचंद्राला जायच्या आधी नातसून व्हिडिओ कॉलवर बोललीदेखील. कुरळ्या केसांची,केतकी वर्णाची..जणू टपोरं फुल..नानीने दोघांनाही तोंड भरुन आशीर्वाद दिले. वसंतरावांची काही महत्त्वाची कामं असल्याकारणाने ते महिनाभर लेकाकडेच थांबणार होते. रात्री फोन करुन नानीची खुशाली घेत असत.

नानीची गुडघेदुखी चाळवली म्हणून जरा दांडेकर म्याडमकडे गेली. नंबर येईस्तोवर एकदोन मासिकं चाळत बसली.

दांडेकर म्याडम त्यांच्या फ्यामिली डॉक्टर..अगदी लग्न झाल्यापासनं नानी यांच्याकडेच यायची. म्याडमचंही आता वय झालं होतं पण लोकाग्रहास्तव दिवसातनं सकाळी दोन व संध्याकाळी दोन तास दवाखान्यात येऊन बसायच्या.

मधाळ बोलणं नि हाताला गुण, मोठेपणाचा कोणताही अभिनिवेश त्यांच्या चेहरापट्टीवर नसायचा. गेलं की अगदी घरातल्या होऊ घातलेल्यापासून ते अंथरुणाला टेकलेल्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करायच्या. त्यांच्या बोलण्यानेच अर्धाअधिक रोग गुल व्हायचा.

नानीला त्यांनी बसायला सांगितलं..तपासलं..काही गोळ्या लिहून दिल्या, तिच्याच्याने होऊ शकतील असे व्यायाम दाखवले..

नानीने विचारलं,”वाटेल नं बरं? एकटी असते न सध्या. हे गेलेत नातवाच्या लग्नाला.”

“अरे हो की. बोलले होते वसंतराव मला..ऋतुच्या लग्नाबद्दल..प्राजक्ता नं..काय निवड आहे ऋतुची अत्युत्तम.”

“कसली डोंबलाची निवड! अहो, म्याडम..तुम्ही एवढ्या डॉक्टर तरी देवाचा देव्हारा आहे की नाही क्लिनिकमधे! मानता नं तुम्ही. रोज दिवाबत्ती करता, हात जोडता.. इथे तसं काही नाही म्हणे..नास्तिक कं काय आहे पोरगी. कर्मकांड पसंत नाहीत. रजिस्टर केलंन. पार बाटवलन ओ ऋतुला आमच्या.”

“नानी, तुमच्या हाती परीस आलाय हो. ओळखायला चुकताय तुम्ही, एवढंच. ह्या  व्हिडीओ क्लीप्स पहा. ही बॉबकटवाली, मुलांसोबत फिरतेय नं ही प्राजक्ता तुमची. एका सामाजिक संस्थेत काम करते. आतासुद्धा हनिमुनला जायचं टाकून..कोकणात नदीला पूर आला..त्या पुरग्रस्तांना मदत करायला चोवीस तास राबतेय तिच्या टिम मेंबर्ससोबत.

मुर्तीतलं देवत्व मानत नसेल प्राजू पण माणसातल्या देवाची पूजा करतेय. हिची आई, माझी बालमैत्रीण म्हणून ओळखते मी आणि आता तर दोनचार दिवस टिव्हीवर,पेपरांत झळकतेय पोट्टी.

एका वाहून जाणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीला स्वत:चे प्राण धोक्यात घालून वाचवलय हिने. तिथल्या पुरग्रस्तांना शिधावाटप करताहेत ही मुलं..लोकांना मदतीचं आवाहन करताहेत. निवाऱ्याची तात्पुरती सोय करुन देताहेत..मेडीकल कँप्स उभारताहेत तिथे..पाणी,वीज..अशा मुलभूत सेवा पुरवण्यासाठी सरकारी यंत्रणेची मदत घेताहेत. खरंच गुणी आहे हो तुमची नातसून..पहाटे ओघळणाऱ्या प्राजक्त फुलासारखी..निगर्वी,निष्पाप.”

“हे सगळं खरं ओ पण माझ्या देवांचं काय? सूनबाईनंतर कोण करणार पूजाअर्चा?”

“अहो नानी, ऋतु करेल की पूजाअर्चा..आणि कोणी केली नाही म्हणून रुसायला देव म्हणजे माणसं थोडीच आहेत! प्राजक्ता, सध्या देव मानत नाही पण हाच तिचा विचार पुढेही तसाच राहिल कशावरनं! कदाचित बदलेल ती..कदाचित नाही पण व्यक्तीस्वातंत्र्य हवं नं तिला..तिची तिची मतं मांडायची मोकळीक हवी नं तिला.

आपण बघतोच कित्येक भ्रष्टाचारी लोकं आपली पापं धुण्यासाठी गंगेत डुबकी मारतात,तिर्थाटन करतात, देवाला सोन्यानाण्याने मढवतात..यापरीस ही कोवळी पोर माणुसकीचं कार्य करतेय. माणुसकी हीच जात,हाच देव,हाच धर्म मानतेय ती..काय चुकतंय तिचं!”

नानी विचारात पडली.

“कुठे हरवलात नानी?”

“चांगलंच बौद्धिक घेतलात की माझं. माझ्या हातून होणारी मोठी चूक जाणवून दिलीत मला. तुमचे आभार मानण्यास शब्द नाहीत माझ्याकडे.”

“अहो, आभार कसले मानताय. परवा येतेय ती परत..जा तिचं स्वागत करायला. मिठीत घ्या तिला.”

“खरंच की.” नानी टेबलावरनं टुणकन उडी मारुन खाली उतरली.

“नानी, हळू..अहो गुडघे दुखताएत नं तुमचे.”

“झाले बरे. मानसिक दुखणं होतं ते..योग्य औषध दिलंत बघा.” नानी दवाखान्यातनं तुरुतुरु बाहेर पडली.

प्राजक्ताकडे जायचं म्हणून दिवसभर श्रमून चंपाकळी बनवली..नि रात्रीच्या गाडीत बसली. सकाळी सुनबाईच्या दारात हजर.

“कढत पाणी काढ गं मला. न्हाऊन घेते. अंग आंबलं माझं.”

सुनबाईने कढत पाणी काढलं..कपाटातली धुतल्या सुती पातळाची घडी नि पोलकं,मऊसूत पंचा काढून दिला.

नानी न्हाऊन आली. सूनबाईस दारात रांगोळी काढावयास सांगितली. आरतीची तळी तयार केली. लेक नं नातू प्राजक्ताला आणण्यास गेले होते.  नानीने नातसुनेला ओवाळलं..तिला चंपाकळीचा घास भरवला. नातवालाही भरवला.

ऋतु म्हणालाच,”नानी,तुझी नातवावरची माया पातळ झाली म्हणायची.”

“पातळ कशाने होतेय माया! तू दुधावरली घट्ट साय आहेस तर ही प्राजू म्हणजे लोणी आहे लोणी..दोघंही मला तितकीच प्रिय..असं म्हणत नानीने नातसुनेचा मुका घेतला.

आस्तिक व नास्तिक..दोन विचारसरणीचे आपापले पदर सांभाळत एक नवीन नातं उमलत होतं. नानीचं नातसुनेला तिच्या विचारांसहीत स्वीकारणं खरंच कौतुकास्पद होतं. वसंतरावांना नानीचा रास्त अभिमान वाटला.

जेवणखावण झाल्यावर नानी म्हणाली,”ऋतु, अरे हनिमुनला जाणार होता नं.”

“अगं आज्जी, समाजसेविकेशी लग्न केलं म्हणजे तडजोड करावीच लागणार.”

“हा. ते बाकी खरंय. कुटुंबातील प्रत्येकाने ती केली पाहिजे नि प्राजक्ताच्या कार्यास उत्तेजन दिलं पाहिजे. शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्यांच्या घरात असं नको व्हायला.”

यावर प्राजू मनापासून हसली.

“हसतेस काय अशी! तुम्ही कुठं ते हनिमुनला जाणार होता ते परतावं लागलं नं तुम्हाला. आता आमच्याकडे चला. भरपूर एकांत मिळेल तुम्हाला. फिरायला मिळेल शिवाय मलाही चांगलंचुंगलं करुन घालता येईल तुम्हाला.”

“आज्जी डन..आम्ही येतोय तुमच्यासोबत.” प्राजूनं आज्जीच्या हातावर टाळी दिली तशी आज्जीची सूनबाई हडबडली पण आज्जीला फार बरं वाटलं. नातसूनेची बोटं तिनं चाचपली, चांगली लांबसडक होती कापसाच्या वातींसारखी.”

नानी,वसंतरांव नवीन जोडप्याला घेऊन घरी आले. रात्री प्राजुनं मटारपुलाव केला. नानी मनातच म्हणाली,’पोरीच्या हाताला चव आहे पण आता उद्यापासनं त्यांना मस्त हिंडुफिरु दिलं पाहिजे. हनिमुन क काय तो साजरा व्हायला हवा बाई! आमच्या वेळेला कुठे फ्याड होतं हे पण यांच्या वेळेस आहे तर यांना तरी मज्जा घेऊदेत.’

वसंतराव अंगावर पांघरुण ओढत म्हणाले,”नानी, एकटीच काय हसतेस!”

“तुम्हाला नाही समजायचं ते. आमची गंमत.” असं म्हणत नानी लगबगीने उठली नि बाहेर आली. प्राजू न् ऋतु कसला इंग्रजी मुव्ही बघत बसले होते. नानीने स्टुल घेतलं वरती चढायला.

“आज्जी, काय करतेस असं. पडशीलबिडशील. थांब मी देतो काढून. काय हवं ते सांग.”

“बरं तर चढ या स्टुलावर नं वरच्या कप्प्यातली थोरली गोधडी काढं.”

ऋतुने काढली ती वजनदार गोधडी. सुती पातळाचं पाल होतं तिला..गुलबक्षी रंगाची..अंगावर पांढऱ्या बारीक फुलांची नि पोपटी  इवलाल्या पानांची नक्षी.

“किती उबदार..”प्राजू गोधडीत तोंड खुपसत म्हणाली.”

“भली थोरली आहे हो. दोघांना पुरुन उरेल..” आज्जी लाडीक हसत म्हणाली. तिचे डोळे लुकलुकले.

प्राजक्ता नि ऋतु रात्रभर त्या गोधडीची उब घेत प्रणयाराधनेत रत झाले.

प्रसन्न पहाट उगवली. आज्जी न्हाऊन आली. बघते तर समोर  फुलांनी भरलेली परडी घेऊन प्राजक्ता उभी. छान घेरदार फ्रॉक घातला होता तिने. कुरळे केस असे मानेवर सोडले होते नं गालावर खळ्या,डोळ्यात निर्व्याज हसू.

“आज्जी, मी देते गं हार बनवून तुला माझ्या म्हणजे प्राजक्ताच्या फुलांचा..तिचे केशरी ओठ चिवचिवले.”

आज्जी ओले केस पंचाने पुसत, दोऱ्यात फुलं गुंफणाऱ्या  तिच्या लाडक्या नातसूनेकडे समाधानाने पहात होती.

(समाप्त)

©️®️सौ. गीता गजानन गरुड.

=======================================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *