Ritbhatmarathi

Search
Close this search box.

अनामिका कितीतरी दिवसांनी आज अशी शांत पडली होती. ती आणि तिच्या मनातलं वादळ शांत झालं होतं.अमर एकसारखा तिच्याकडे पाहत होता आणि त्याचवेळी एफ्.एम्. वर
नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो,
हे गाणं वाजत होतं.नकळतच त्याला सारं आठवत गेलं. खरंच अनामिका घरात नसते तेव्हा आपला संसार फाटका होतो.तिच्या वाचून घर, मुलं इतकच काय मी सुद्धा अधुरा आहे.
लाडाकोडात वाढलेली अनामिका अमरची बायको म्हणून त्याच्या आयुष्यात आली. कुठेतरी दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि पाहता क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे दोघं.अनामिका,अमरच्या घरच्यांना फारशी आवडली नव्हती पण अमरच्या हट्टा पुढे त्यांचे काही चालले नाही. त्यांनी अनामिकाला सून म्हणून स्वीकारले पण फक्त ते दाखवण्यापुरते. त्यांना मनापासून अनामिका कधीच आवडली नव्हती. तिच्या बाबतीत त्यांच्या मनात प्रचंड पूर्वग्रह होते आणि त्यामुळेच अमरच्या घरचे अनामिकाकडे कधीच निर्मळ अंतःकरणाने पाहू शकले नाहीत.तिच्यातला चांगुलपणा त्यांना कधीच दिसला नाही. ती मात्र नेहमी सगळ्यांचे मन राखण्याचा प्रयत्न करायची. जेवढी उठा ठेव करता येईल तेवढी करायची.या सगळ्यात तिने स्वतःचे स्वत्व गमावले होते. ती अखंड याला काय वाटेल,त्याला काय वाटेल याचा विचार करत असायची. कधीतरी माझ्या घरचे बदलतील आणि मला मनापासून स्वीकारतील या खोट्या आशेपाई तिने स्वतःकडे कधीच लक्ष दिले नाही. स्वतःकडे ती नेहमीच दुर्लक्ष करायची.अमरचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं. सगळ्यांची मनं राखता राखता, तिचं मन मात्र कोमेजून गेलं होतं.आपल्यावाचून घरात कुणाचाच पान हालत नाही,याच भ्रमात ती असायची. उठल्यापासून ते झोपेपर्यंत तिचा हात अखंड चालू असायचा. हाताखाली मावशी असल्या तरीही त्या घरातल्या सारखं थोडं काम करतात असं तिचं म्हणणं असायचं. नवऱ्याला काय हवं नको ते बघणं, मुलांचा अभ्यास,त्यांची दुखणी, सासू-सासर्‍यांची आजारपणं यात तिचा दिवस कधी सरायचा हे तिचं तिलाच कळायचं नाही. मधून अधून घरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार ती मनापासून करायची. कितीही थकलेली असली तरी तिच्या घरून कधीही कुणी निर्मुखी गेलं नाही. तसं करणं तिला आवडतही नव्हतं आणि पटतही नव्हतं. पण आज काल तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं, तिला सतत अस्वस्थ वाटायचं.ती सतत थकलेली दिसायची. अमरला ते जाणवत होतं पण त्याच्या व्यापातून त्याला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता. कामाचा ताण,मुलांची शिक्षण,आई-वडिलाचं आजारपण, डोक्यावर असलेलं कर्ज या सगळ्या गोष्टीतून तो मनाने अनामिकापासून दूर चालला होता. त्यांच्यात कधीतरीच संवाद व्हायचा त्यातही सासू-सासरे आणि मुलं आणि भविष्याची चिंता एवढंच असायचं. त्याच्या ताणाविषयी आणि हिच्या आरोग्याविषयी बोलायला त्यांना वेळच कुठे होता.कित्येक दिवस हे असंच चालू होतं. अनामिकाने आता पस्तिशी ओलांडली होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा थकवा जाणवायचा. हसती खेळती अनामिका आजकाल सतत कोमेजलेली असायची. हळूहळू तिचं वजनही घटत चाललं होतं, डोळ्याखाली काळी वर्तुळ आली होती. केसांमध्ये डोक्यावर पांढरी केस डोकावू लागली होती.चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत होत्या. म्हातारपणाची चिन्ह दुसरं काय ?
एक दिवस असंच काम चालू असताना ती अचानक कोसळली.मुलांनी फोन करून अमरला पटकन बोलावलं. अमर आला त्याने अनामिकाला हॉस्पिटलमध्ये नेले. बराच वेळ अनामिका बेशुद्ध होती. खूप साऱ्या तपासण्या करून झाल्या.चागंल्या आठवडाभर वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या आणि अखेर अनामिकाला आतड्याचा कॅन्सर झाला आहे,असं डॉक्टरांनी सांगितलं.अमरच्या पोटात तर गोळाच आला.आत्ता कुठे आपला संसार सुरू झालाय आणि अनामिका ही अशी बेडवर पडून आहे, हे त्याला सहन होत नव्हतं. मुलं डोळ्यांपुढे दिसत होती.चारच दिवस झाले अनामिका हॉस्पिटलमध्ये आहे, तर घरात सगळं कसं अस्ताव्यस्त पडलं होतं. किती खरंय ना घरातली स्त्री झोपली की सारं घर झोपतं. आज तसंच काहीसं झालं होतं.अमरने डॉक्टरांशी बराच वेळ चर्चा केली.डॉक्टर म्हणाले आता कुठे सुरुवात झाली आहे.फर्स्ट स्टेजचा कॅन्सर आहे.आपण चांगल्यातले चांगले उपचार करू आणि अनामिका बरं करू. डॉ. शहा हे अमरच्या वडिलांचे वर्गमित्र होते त्यामुळे त्यांनी अमरला बराच धीर दिला. “घरदार,शेती जे काही असेल ते सगळं विकायला लागलं तरी चालेल पण माझ्या अनामिकाला बरं करा.”हात जोडून अमर डॉक्टरांना वारंवार विणवण्या करत होता. अनामिकाची खरी किंमत त्याला आता कळत होती. अनामिकाला असं झोपून राहिलेलं त्याने कधीच पाहिलं नव्हतं. अनामिका म्हणजे उत्साहाचा अखंड झरा, सतत वाहणारा.तो ऑफिसमधून घरी आल्यावर त्याचं हसून स्वागत करणारी, पाण्याचा ग्लास पुढे करणारी, अनामिका त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. ती हसरी अनामिका अमरला परत हवी होती. त्या हसण्यावरच तर भाळला होता अमर. तिच्या गालावरची खळी त्याला वेडावून सोडायची.तिच्या डोळ्यातली चमक त्याला फार आवडायची. आज तेच डोळे निस्तेज झाले होते आणि हसणं तर जणू कुठेतरी हरवून बसलं होतं. डोळ्यात येणारं पाणी पुसत,अनामिकाला लवकर बर कर, म्हणून देवासमोर तो हात जोडत होता.अखेर अनामिका शुद्धीवर आली. तिने एकदाच अमरकडे पाहिले आणि अमरच्या जीवात जीव आला. त्याच्या अंगात दहा हत्तींचं बळ संचारलं .
अनामिकाने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि तिला पुन्हा ग्लानी आली. डॉक्टरांनी लगेचच पुढच्या काही तपासण्या केल्या आणि अनामिका वर उपचार करायला सुरुवात केली. अनामिकाला,या सगळ्या गोष्टी तिच्या कलाने सांगणे फार गरजेचे होते.डॉक्टरांनी सांगितले,” आता आपण तिला थोडं बरं वाटू देऊ,तिला घरी जाऊ द्या. घरात मुलांमध्ये तिला थोडंस रमू द्या, मग पुढच्या आठवड्यात चेकअप साठी घेऊन याल तेव्हा तिला आपण सगळ्या गोष्टींची कल्पना देऊ”. तिला या अवस्थेत गोळ्या औषधांपेक्षा मानसिक आधाराची गरज जास्त आहे.अमर तू तिचा आधार आहेस. इतके दिवस ती खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी राहिली आता तुझी वेळ आहे,तिच्यासोबत उभा राहण्याची. अमर, ठीक आहे म्हणाला आणि अनामिकाला घरी घेऊन आला.
अनामिका तास-दोन तास कुठे बाहेर गेली तर, घरातला पसारा अगदी उंबरठ्यापर्यंत आलेला तिला दिसायचा.पण आज कसं अगदी साप सुधर घर पाहून तिला कसंसच झालं. आपण नक्की आपल्याच घरात आलोत ना असा प्रश्न तिला क्षणभर पडला.तिचंच घर होतं ते.चारच दिवसात तिची किंमत घरातल्या सगळ्यांना कळली होती.अनामिकाच राहिली नाही तर घराचा जीवच राहणार नाही असं झालं होतं. मुलांची दप्तर, कपडे, खेळणी सगळं कसं अगदी जागच्या जागी होतं. सासुबाईंची बामची वाटली आज सोप्यावर दिसत नव्हती. सासऱ्यांचा चष्मा त्यांच्या खोलीतच होता. किचनमध्ये डोकावलं तर सगळी भांडी कशी शहाण्या बाळासारखी स्वतःच्या जागेवर दिसली.किचन ओटा चकचकीत दिसला. नवऱ्याबरोबर ती हळूहळू बेडरूम मध्ये गेली तिथेही सगळं कसं टापटीप होतं.बेडवर ओला टॉवेल नव्हता की, धुवायचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले नव्हते. एवढेच काय बाथरूमही अगदी स्वच्छ होतं. चार दिवसांच्या आजारपणाने झालेला हा घराचा कायापालट तिच्या सहजासहजी पचनी पडणारा नव्हता. चार दिवस दवाखान्यात राहिल्यामुळे आणि आजारपणामुळे आलेला अशक्तपणाही इतक्यात जाणार नव्हताच.तिला अचानक चक्कर आल्यासारखं झालं आणि ती बेडवर टेकली. नवऱ्याने तिला आराम कर तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो असं म्हणून तिला बेडवर झोपवलं.
आज कितीतरी दिवसांनी अमर तिची मनापासून काळजी घेत होता. तिला भरून आलं,ती तशीच डोळे मिटून शांत पडून राहिली. तिला अचानक डोळा लागला.अमर अनामिकाजवळ बसला होता. याच घरात प्रवेश करून आलेली ती नववधू काळेभोर लांब सडक केस, चमकदार डोळे, तरतरीत नाक,गोरा नसला तरी आकर्षूण घेणारा तिचा सावळा रंग. तिचं नव्या नवरीचं रूप अमरला जास्तच भुरळ घालत होतं. त्याला ते सगळे दिवस आठवले.सगळ्यांचं सगळं करायची ती. कुणाकडून कसलीही अपेक्षा न ठेवता आणि आपण मात्र तिला गृहीत धरत आलो. करेल ती, सांगेल ती,जाईल ती, येईल ती, प्रत्येक ठिकाणी तिला गृहीत धरलं.तिच्या मनाचा थोडासा विचार करायला हवा होता. अमरच्या हुंदक्याने अनामिकाला जाग आली. अमरने तोंड लपवत पटकन डोळे पुसले.पण अनामिकाच ती, तिच्यापासून ते थोडीच लपणार होतं. ती हळूच उठून बसली आणि अमरला तिने विचारलं, काय झालं खरं सांगा तुम्ही का रडत होतात? आता मात्र त्याच्या अश्रूंचा बांध फुटला त्याने अनामिकाला घट्ट मिठीत घेतलं आणि सगळं काही सांगितलं.संसाराच्या भात्यात तालून-सुलाखून निघालेली अनामिका लोखंडाएवढीच ताकदीची होती. ती तशीच पाय रोवून भक्कम उभी राहिली आणि तिने अमरला धीर दिला. एवढ्यात मरण मला नाही नेवू शकत. माझी गुडघ्याएवढी मुलं, वयस्कर सासू-सासरे आणि हा असा हळवा नवरा याला सोडून मी इतक्यात तरी जाणार नाही. आणि त्यालाही मला नेऊ देणार नाही. अमरला तिच्या या धाडसाचं खूप कौतुक वाटलं.एवढे दिवस कोणी काही बोललं तर मुळूमुळू रडणारी, अनामिका आज मात्र रडणाऱ्या अमरला धीर देत होती. अमर तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला,”मीही तुला काही होऊ देणार नाही, अगदी जग इकडचे तिकडे झाले तरी मी तुला यातून बाहेर काढणार”. अनामिका चुकलं माझं इतके दिवस मी तुला गृहीत धरलं. तुला वेळ दिला नाही, पण काय करू माझ्याही मागे खूप ताण होता.जाऊ दे ,जे झालं ते झालं यापुढे मी कायम तुझ्या सोबत असेल. मला तुझी, तुझ्या प्रेमाची खूप गरज आहे. माझी साथ अशी अर्ध्यावर सोडून जाऊ नकोस. आज कितीतरी दिवसांनी अमर आणि अनामिका एकमेकांच्या कुशीत विसावले होते बराच वेळ ते दोघे तसेच पडून राहिले.थोडासा आराम करून अनामिका उठली फ्रेश झाली. चार दिवस लोळून लोळून तिला कसंसच झालं होतं. तिला वाटलं जरा वेणी फनी करावी तेवढंच फ्रेश वाटेल. तिने केसांमध्ये कंगवा घातला, त्याबरोबर तिला तिच्या आजाराची जाणीव करून देत एक मोठी बोट तिच्या हातात आली.दोन मिनिट तिला खूप गलबलून आलं. किती जपायची ती त्या केसांना मोठ्या हौसेने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच वाढवलेले मोठे केस तिची ओळख होते. आजी तर लाडाने तिला सुकेशनी म्हणायची. तिला ते सारं आठवलं पण तिने तेही पॉझिटिव्हली घेतलं आणि विचार केला चला यानिमित्ताने का होईना माझी बॉबकटची हौस पूर्ण होईल.
संध्याकाळच्या चहाची वेळ झाली होती.तिने सगळ्यांसाठी मस्त आल्याचा चहा केला. तब्बल एका आठवड्यानंतर तीच्या हातचा चहा पिऊन घरातल्या सगळ्यांनाच तरतरी आली. चहा घेता घेताच तिने अमरला सांगितले,मला पार्लरमध्ये जायचंय. अमर म्हणाला, ‘अगं आता तुझी तब्येत ठीक नाही.यावर ती म्हणाली थोडा वेळ, हवं तर तुम्ही चला माझ्यासोबत लगेच जाऊन येऊ आपण. मला तेवढेचं बरं वाटेल. तोही तिला नाही म्हणू शकला नाही.
अनामिका मुद्दामच अमरला बाईकवर जाऊ म्हणाली.कितीतरी दिवसांनी ते दोघेच असे बाहेर पडले होते.अनामिकाची तब्येत ठीक नसतानाही अमरने नाईलाजाने बाईक काढली.अनामिका मात्र खुश होत,ती त्याच्या पाठीमागे बसली आणि हळूच त्याला बिलगली.जवळच्या पार्लरमध्ये न जाता तिने थोडं लांबच पार्लर निवडलं.जाता जाता दोघांनाही लग्नाआधीचे ते गुलाबी दिवस आठवत होते.असेच फिरायचो नाही लग्नाआधी आपण अमर नकळत बोलून गेला.
अमर तुम्हाला प्रीती झिंटा आवडते ना?तिची हेअर स्टाईलही तुम्हाला खूप आवडते,हो ना?मलाही केस कापायचे आहेत, थोडे कमी करूया का प्रीती झिंटा सारखे?अमरही लगेच हो म्हणाला. ती पार्लरमध्ये गेली आणि छान बॉब कट करून बाहेर आली.लांब सडक केसांच्या अनामिकाच्या प्रेमात जसा अमर पडला होता तसाच पुन्हा एकदा तो तीच्या या रूपावरही भाळला. तो पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला. तिला घेऊन तो मस्त कॉफी प्यायला गेला. दोघांनी कॉफी घेतली. आज कितीतरी वर्षांनी ते दोघे फक्त दोघेच होते. काहीही न बोलता दोघांनाही एकमेकांच्या मनातलं सारं काही कळत होतं.
अमर जगातल्या सगळ्या गोष्टी मी करू शकते. फक्त तुम्हाला सोडून जाणं मला जमणार नाही. मी कायम तुमच्यासोबत असेल.अजून खूप छळायचं बाकी आहे,बरं का तुम्हाला, एवढ्यात तुमची सुटका नाही.अनामिका बोलत होती.हो का? राणी सरकार असं म्हणत अमर आज कितीतरी दिवसांनी दिलखुलास हसला. तेवढ्यात दोघांच्याही कानावर कॉफी शॉपमध्ये चालू असलेलं

“जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे”
हे गाणं आलं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवले.
कॅन्सरने अनामिकाच्या संसाराची विस्कटलेली घडी बसवली खरी, पुन्हा एकदा विस्कटण्यासाठी…..

ॲड. अश्विनी सचिन जगताप.
-सुरेखकन्या…

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *