Ritbhatmarathi

Search
Close this search box.

Narali Purnima information in marathi:

श्रावण महिन्यात येणारा दुसरा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. हा सण कोळीबांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. समुद्रावर ज्यांची उपजिविका चालते ते आपले कोळीबांधव यादिवशी समुद्राविषयी आपली क्रुतज्ञता प्रकट करतात.

पाऊस सुरु झाला की दर्या आक्राळविक्राळ रुप धारण करतो. याकाळात बोटींना, खलाशांना, कोळीबांधवांना सक्तीची विश्रांती असते. दुसरे एक कारण म्हणजे हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. याकाळात मासेमारी थांबविली तर माशांची पैदास मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत होते.

या जुन,जुलैच्या काळात मग बोटीवरील खलाशी  आपल्या मुळ गावी जातात. आपल्या कुटुंबियांसोबत काही दिवस मजेत घालवितात, आराम करतात.

कोळी बांधवही पर्यटनाला, देवदर्शनाला जातात, जाळी ठीकठाक करतात पण नारळीपुनव जवळ आली की पावसाचा जोर ओसरू लागतो. दर्याचं तुफानी रुप शांत होऊ लागतं नि कोळी बांधवांची पावलं पुन्हा कर्मभूमीकडे वळू लागतात. नारळी पौर्णिमेस समुद्रदेवतेची यथासांग पूजा करून, नैवेद्य दाखवून बोटी पुन्हा समुद्रात सोडल्या जातात नि मासेमारीला प्रारंभ होतो.

नारळीपौर्णिमेदिवशी कोळणी नारळी भात, पुरणपोळ्या, ओल्या नारळाच्या करंज्या बनवतात. सुर्यास्तावेळी कोळीवाड्यातील प्रत्येक गल्लीतनं आबालवृद्धांची मिरवणूक निघते. स्त्रीपुरुष पारंपारिक वेष परिधान करतात. कोळणी नवी साडी नेसतात. सोन्याच्या दागिन्यांनी सजतात. केसांच्या आंबाड्यांवर तर्हेतर्हेच्या वेण्या माळतात, सन आलाय गो नारत्ळी पुनवेचा अशी गाणी गातात.
सगळे जमून समुद्राची यथासांग पुजा करतात. सोनेरी रंगाच्या वेष्टनात गुंडाळलेला नारळ समुद्रात सोडतात व प्रार्थना करतात.

हा नारळ समुद्राला अर्पण करताना टाकायचा नसतो,समुद्रात फेकायचा नसतो तर हलकेच समुद्राच्या पाण्यात सोडायचा असतो.

समुद्रात पश्मिमेची देवता वरुण वास्तव्य करते असं मानतात. कोळी लोक मासेमारीसाठी बोटीने दूरवर समुद्रात गेले असतात त्यावेळी ते तिथे सुखरुप रहावेत, घरी परत यावेत व त्यांना मुबलक मासळी मिळावी यासाठी कोळी बायका समुद्राला व समुद्रातील वरुण देवतेला गार्हाणे घालतात.

बोटीची डागडुजी केलेली असते. तिला नवीन रंग काढलेला असतो व पताक्यांनी सजवले जाते. समुद्र व बोटीची पुजा केल्यावर त्यांना नारळीभात, नारळाच्या करंज्या[पूर्ण्या) यांचा नैवेद्य अर्पण करतात . काही कोळीवाड्यांत रावसासारख्या खवले असलेल्या माशाची तळलेली तुकडीही नैवेद्यात ठेवतात तसेच दारुची धार सोडतात.

खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी गावू दे… असे गाऱ्हाणे कोळी भगिनी समुद्राला घालतात.

पंचमहाभुतांचा तेजःपुंज अवतार असलेला कोल्हापूरचा ज्योतिबा माहिती आणि कथा

आपल्याला ज्ञान देणाऱ्या, जगण्याची नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या गुरूंना मानवंदना देणाऱ्या या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया …..

या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवर्‍याप्रमाणे गतिमान असतात.

समुद्रात वास्तव्य करणारी वरूणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते.

नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्त्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात.

नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते; म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते.

यानिमित्ताने काही खेळ खेळले जातात. नारळ एकमेकांवर आपटायची स्पर्धा असते. त्यात जो जिंकतो त्यास बक्षीस म्हणून नारळ देतात.
केळवा बीचवर लोखंडी बॉलने चार पाच वीतावर ठेवलेला नारळ फोडायची स्पर्धा घेतात. बॉल नारळावर फेकून मारतात. जो जिंकतो त्यास नारळ बक्षीस देतात.

मुंबईतील कुलाब्याच्या दांडीपासून गुजरातच्या सुरवाडा गावापर्यंत आणि गोवा, दमण, दीवच्या समुद्रकिनारपट्टीत मांगेली बोली बोलली जाते.

मांगेले लोक आंध्रातील तेलगू, द्रविड शाखेचे मूलत: असावेत.  सप्तगोदावरी प्रदेशात ते मुळात मच्छिमारीचा धंदा करीत असावेत आणि पश्चिम किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी तो धंदा कोकण किनाऱ्यावरही सुरू केला असावा.

यांचीच नारळीपौर्णिमा सणाची मांगेली बोलीभाषेतील ही गीते.

भादव्या मयन्या पुनवेला रे
रामानारळी पुनीवे सणाला।।
धनी माहो गेलेन बारान डोलीला
अवचित हुटले वादळवारो रे
रामाहुटले वादळवारो ।।
धनी माहा कहे येतीन गराला
रे रामा, कहे येतीन गराला ।।
धन्या जीवावर संसार दखलो
रेरामा जीवावर संसार दखलो
होन्याहो नारळ वाहिन दरीयाला ।।
धन्या तारू येऊन दे बंदरालारे रामा,
तारू येऊन दे बंदराला ।।

वेसावची पारु नेसली गो
नेसली गो नवसारा
जाऊ चल गो बंदराला गो परु दर्याचे पुजेला
नार लिंगाला हाय सोन्याच्या
मान देवाला दर्याचा
देवा वादल नको दर्याला
नको उसाण मारु घराला
आज मनाचे दिसाला
होर जिद्दी निघालय दमनिला
कोलिओ काशीराम नाखवा
होर कारलय धंद्याला न जाऊ चल
म्हवऱ्याची रास हानावला
लोक जमलय गो बघावला
माझे वेसावचे पारुला
तुझा नाखवा बघ कसा सजलाय
तुला आनंद मनात झयलाय
आज पुणवेचे दीसाला
तुझे हातानं घालिन हीरवा चुरा
आपले लग्नाचे दिसाला
नवस करुन देवाला न भरीन
शिंदुर तुझे माथाॅला
वेसावची पारु नेसली गो
नेसली गो नवसारा
जाऊ चल गो बंदराला गो परु दर्याचे पुजेला

सण आयलाय गो आयलाय गो
नारली पुनव चा
मनी आनंद मावणा
कोळ्यांचे दुनियेचा

सण आयलाय गो आयलाय गो
नारली पुनव चा
मनी आनंद मावणा
कोळ्यांचे दुनियेचा

अरे बेगीन बेगीन चला किनारी जाऊ
देवाचे पुंजेला
हाथ जोरूंशी नारल सोन्याचा
देऊया दरीयाला

या गाण्यांतून कोळीबांधवांचे आपल्या कुटुंबाविषयी,व्यवसायाविषयीचे प्रेम, त्यांचे उत्सवप्रेम, त्यांच्या चालीरीती प्रतित होतात. कोणीबांधव हे मुळातच हौशी व दर्यादिल असतात. दर्याकडूनच त्यांना हा गुण मिळाला असावा.

यादिवशी कोळीस्त्रिया एकमेकींना उखाणेही घ्यायला लावतात.

कोळीबांधवांचे संपुर्ण जीवन सागराशी एकरूप झालेले असते. त्यामुळे सागराची आपल्यावर कायम कृपा राहावी याकरीता त्याची प्रार्थना करून त्याचे उतराई होण्याच्या हेतुने नारळीपौर्णिमेचा हा उत्सव मोठया उल्हासाने कोळी बांधव साजरा करतांना दिसतात.

–समाप्त.

©️®️ गीता गरुड.

==========

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *