Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️सौ.गीता गजानन गरुड.

पारुलचे ड्याडी गेले. तिला नातेवाईकाचा फोन आला. एका कंपनीत असिस्टंट म्यानेजरच्या पदावर कार्यरत होती ती. बॉसला सांगून घरी आली. हे घर नुकतच नोकरीला लागल्यावर विकत घेतलेलं तिने.

चारेक ड्रेस ब्यागेत भरले..तसं त्या घराशी तिचं नातं वयाच्या आठव्या वर्षापासनंच तुटलेलं..फक्त ड्याडींसाठी समर व्हेकेशनमधे जायची पारुल..कधीकधी नन्सना मस्का लावून तिथेच होस्टेलवर रहायची सुट्टीत..थोडी वयात आली तशी मैत्रिणींच्या घरी सुट्ट्या घालवायची. सगळ्यांना ती हवीहवीशी होती.

पारुल दिसायला निमगोरी,कुरळ्या केसांची, मोठाले डोळे,काळीभोर बुब्बुळं..इतकी छान की बघणाऱ्याला वाटे जळात मासोळ्या फिरताहेत..बोलणं अगदी आर्जवी..अजिबात आक्रस्ताळेपणा नाही. नन्सचे संस्कार होते तिच्यावर. हिंदू असून जिजस तिचा लाडका झाला. प्रेयरला ती पुढे असायची. काही चुकलं तर कन्फेशन बॉक्समधे जाऊन कन्फेस करायची.

कधी अगदीच एकटं वाटलं तर मेरीच्या जिजस बाळाला घेतलेल्या पुतळ्याच्या पायथ्याशी बसायची. जणू हीच आपली माय असं वाटायचं पारुलला. एखाद्या ननचं लक्ष गेलं की मायेचा हात फिरायचा तिच्या पाठीवरनं.

शॉवर,नाश्ता,जेवण सगळं बेलच्या आवाजावर..त्यामुळे वागण्यात शिस्त आपसूक आलेली.जी आता नोकरीला लागल्यावर कामी येत होती.

ती ट्रेनमधे बसली. ट्रेन सुरु झाली तसे तिला ड्याडी आठवू लागले. मम्माच्या मानाने उंचीला कमी, घारे डोळे..तिचे डोळे मात्र मम्मासारखे होते. ड्याडी नि मम्मामधे सख्य नव्हतं. भांडणं नाही व्हायची पण घरात एकप्रकारचा जीवघेणा अबोला असायचा. कामापुरतं बोलणं..तिथे श्वास गुदमरायचा पारुलचा..समजुतीत आल्यावर जास्तच. ड्याडी सांगायचे..पारुल सुट्टीला इथे ये . आपण कुठेतरी लांब फिरायला जाऊ..पारुल काहीतरी कारणं सांगायची.

तिचा बर्थडे समरमधे..ती तो कुटुंबासमवेत साजरा करु शकत होती पण मम्माच्या गुड विशेसही तिला नको असायच्या.

तिथे दूर गर्ल्स कॉन्व्हेंटमधे मुली कुणाच्या असायच्या तर ज्यांची मम्मी करिअर ओरिएंटेड असेल किंवा खूप आजारी असेल किंवा ज्यांचं घर दुर्गम भागात असेल अशाच..पण यातलं एकही कारण नव्हतं नं पारुलला कॉन्व्हेंटमधे ठेवण्यासाठी..मग का ठेवलंन..पारुलच्या नकळत तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं..तसं समोरच्या आंटीने विचारलं,”बेटी, कुछ परेशानी में लगती हो? कुछ हुआ है क्या?”

तसं तिने डोळे पुसत ड्याडीची डेथन्युज सांगितली. ती आंटी मग तिला काहीबाही समजवत राहिली. जो आता है उसको इक न् इक दिन बुलावा आता है। अभी मम्मी का ध्यान रखो। हिम्मत हार बैठी तो मम्मी को कौन देखेगा।

पारुल मान डोलावत राहिली. मनात मात्र तिला हसू येत होतं..मम्मीका ध्यान रखो। अशा मम्माचं..जिने माझं बालपण चुरगळलं. घरात असताना,मुंबईसारख्या मोठ्या शहरात बंगला असताना मला इतक्या लांब डेहराडूनला कॉन्व्हेंटमधे ठेवलं.

त्या आंटीने दुपारी तिला आपल्या मुलांसोबत खायला लावलं. पुरीभाजी फारच छान होती..विशेष म्हणजे ती एका आईने बनवलेली..आईच्या हाताची चव होती तिला.

आंटीची दोन्ही मुलं तिच्या दोन मांड्यांवर दोन बाजूला डोकं ठेवून निजली. ती खाली पडतील या भितीने आंटी झोपेना. पारुलने तिला सांगितलं,”आप सो जाइये। मैं हूँ ना।” आंटीला बरं वाटलं. पारुल त्या बछड्यांकडे पहात होती..त्याक्षणी ती मुलं तिला कितीतरी भाग्यवान वाटली..मायेची कुस तिला कधीच अनुभवता आली नव्हती.

पारुल घरी पोहोचली तेंव्हा सगेसोयरे जमले होते तिथे. पारुलसाठी बॉडी शवागारात ठेवून दिली होती..ती आणली. पारुलने मम्माकडे पाहिलं..तिच्या डोळ्यात ठिपूस नव्हता..पारुलच्या मनात आलं,”कसली पाषाणह्रदयी बाई आहे ही. हिला काळीज नसावं.”ती स्वतः मात्र खूप रडली. अगदी आकांत केला. ड्याडा,नाऊ आय बिकेम ऑरफन. व्हाय यू लेफ्ट मी? गॉड, व्हाय विथ मी? तिचा आकांत ऐकून सारे हळहळत होते.

त्या रात्रीनंतर ती जी वरच्या बेडरुममधे गेली ती निघतानाच खाली आली.

“चाललीस..पारुल. मम्मासोबत बोलणार नाहीस!”

“काय बोलायचं..आपल्यातला धागा तुटलाय. आता परत इथे येईनसं वाटत नाही. कुणाला आपली ओढ असली तर त्या व्यक्तीकडे आपली पावलं वळतात..इथे..या वास्तुत माझं आता कुणीच नाही. या वास्तुवरही कधी प्रेम जडलं नाही कारण इथे मला राहूच दिलं नव्हतं..असो बाय अँड टेक केअर..काही गरज लागली माझी तर फोन करुन कळव मला.”

“हाक नाही मारणार मला मम्मा म्हणून..मिठीत नाही घेणार मला पारुल.. पारुल..”

“तुला खरंच गरज आहे..जीवाभावाच्या स्पर्शाची? मम्मा जेंव्हा मला तुझ्या कुशीची गरज होती तेंव्हा लाथाडलंस मला. मम्मा, आठवतं तुला..कॉन्व्हेंटच्या गेटजवळ मी मातीत लोळण घातली होती. माझ्या डोळ्यातून, नाकातून पाणी येत होतं..मी प्रचंड घाबरले होते..इवलीशी आठ वर्षाची होते मी..पण तू माझा हात झिडकारला होतास..ड्याडी उचलून घेऊ पहात होते मला पण त्यांचा हात धरुन गाडीत जाऊन बसलीस..किती रात्री रडून काढल्यात मी..तुला कल्पना नाही. “यु आर विकेड पर्सन ममा. यू डोंट ह्याव हार्ट.” पारुल आता रागाने थरथरत होती.

“पारुल..दिसतं तसं नसतं बेटा. तू तिथे रुळावीस म्हणून मला कडक वागावं लागलं. मी तुझ्यावर माया केली असती तर तुझा जीव तिथे लागला नसता.”

“ओ डोन्ट टेल मी द्याट. काय गरज काय होती मला तिथे ठेवायची..एवढ्या लहान वयात..माझे आईबाप जीवंत असताना..बरं मला सांभाळायचं नव्हतं तर जन्माला कशाला घातलत? का असा माझा छळ मांडलात?

मी खेळणं वाटलं होतं का तुम्हाला? माझं मत कधीही विचारात घेतलं नाहीत. नुसते माझ्या पालनपोषणासाठी पैसे फेकत राहिलात.

मला तुमच्या मायेची गरज होती मम्मा. ड्याडी तरी कधीतरी सुट्टीला बोलवायचे, पत्र लिहायचे..पण तू..सावत्रपणाची वागणूक दिलीस मला..तरी मी आले ते ड्याडींसाठी आणि मदर सांगते,”दुसरा वाईट वागला आणि आपणही तसेच वागलो त्याच्याशी तर आपल्यात नि त्याच्यात फरक काय!”

“पारुल, तुला जायचय ना. तुला वाटतं नं तुझी मम्मा वाईट आहे..तर तसं समज..पण बेटा एखादी व्यक्ती आगळी वागते..का..तेही समजून घेत जा. बाहेरुन तर फणसही काटेरी दिसतो गं..पण आत मधुर गरे असतात. शहाळं बाहेरुन कडक असतं..टणक असतं..आत मलाई असते..पांढरीशुभ्र..आणि चवदार मलाई..”

“ओ कमऑन मम्मा..आता तू स्वतःला टेंडर कोकनट म्हणणारैस?”

“तसंच समज. तुझ्यासारखीच होते गं मी..तत्वनिष्ठ..निरागस..तुझे ड्याडी एकदा साताऱ्याला आले होते पिकनिकला..माझ्या मामाच्या होमस्टेमधे राहिली होती ती मंडळी..तुझ्या ड्याडींचं गाणं..त्या आवाजाची भूरळ पडली मला..नि ते बुडाले माझ्या भोकर डोळ्यांच्या डोहात. मामाकडे मागणी घातली. आईबापाविना पोरकी पोर मी..नाही म्हंटलं तरी त्यांच्यावर ओझं होतं माझं. ते लगेच तयार झाले.

लग्न झाल्यावर काही महिने खरंच सुखात गेले आणि एका रात्री तुझा ड्याडी मला म्हणाला..एका बिझनेस क्लायंटला बोलवतोय..छान जेवण कर..चांगलीसी साडी नेस..तयार हो..मला वाटलं..काहीतरी सरप्राईज वगैरे..

मी मोहरुन गेले. डाळींबीची ऊसळ,वरणभात,चटणी,कोशिंबीर,फुलके..चारीठाव स्वैंपाक केला.

सिल्कची साडी नेसले..स्वत:कडे पाहिलं आरशात..माझं कमनीय शरीर त्या साडीला शोभा देत होतं. केसांच्या बटांना पिनअप करुन ते मोकळे सोडले..तुझ्या ड्याडीला आवडायचे तसे..तो क्लायंट आला तसं मी पानं वाढली.

मीही बसले त्यांच्यासोबत. मला वाटलं घरगुती गप्पा होतील..पण तो फक्त मला निरखत होता. त्याची नजर माझ्या कपड्यांतून आरपार जात होती. मला कसंसच झालं.

तू तेंव्हा पोटात होतीस..पाच महिन्याची पोटात होतीस तू तेंव्हा..मी निजायच्या खोलीत गेले..प्रचंड संतापले होते..तर तुझा ड्याडी आला..त्या क्लायंटला शरीरसुख दे सांगू लागला.

मी संतापले..चिडले..काही उपयोग झाला नाही. त्या क्लायंटने त्याचा कार्यभाग साधला..असेच मग त्याचे क्लायंट महिनादोनमहिन्याने येत राहिले. वेश्येत नि माझ्यात काहीच अंतर नव्हतं..कुणाला सांगेन तर तेवढी हिंमत नव्हती माझ्यात..आईवडील नव्हते.

मामा पैसे मागायला आला तेंव्हा त्याच्याजवळ हा विषय काढला..तो म्हणाला,” सहन कर बाई. मला माझ्या मुली उजवायच्या आहेत. तुला इतकी वर्ष पोसलं. आता तुझ्या नशिबाची तू. मामा त्यानंतर पैसे मागायलाही आला नाही कधी. भाची मेली त्याच्यासाठी. मी मात्र या कुंटणखान्यात रहात होते.

इथली छायासुद्धा तुझ्या देहावर पडू नये म्हणून दगडाचं काळीज करुन तुला कॉन्व्हेंटला धाडलं. तुझं बालपण हिरावलं तुझ्यापासून मी.

तुझं शिक्षण पुरं झालं तेंव्हा मोह झालेला तुला हे सारं सांगायचा , इथे बोलावून घ्यायचा पण कदाचित तुझ्या ड्याडाने तुझाही वापर केला असता..त्या विचारानेच थरथरले मी नि मग ठरवलं तुझ्या डोळ्यांत वाईट ठरले तरी चालेल पण तुला या नरकात पडू देणार नाही. मी अगतिक होते गं.पारुल..स्वत:चा बचाव करू शकले नाही न् तुलाही सुख देऊ शकले नाही. शक्य झाल्यास क्षमा कर या मम्माला.”

मम्माचा शब्दन्शब्द पारुलचं ह्रदय चिरत होता. तिच्या डोळ्यांवरचे गैरसमजाचे पडदे बाजूला सरत होते. मम्माच्या तुसडेपणामागचं हळवं सत्य ऐकून तिचे शब्दच गोठले.

तिने धावत जाऊन मम्माचे पाय पकडले. मम्माने तिला उभं केलं नि मिठीत घेतलं..कितीतरी वेळ दोघींचे खांदे भिजत होते. नाण्याची दुसरी बाजू पारुलला कळली होती. द्वेषाचं घनदाट मळभ बाजूला सरुन मायलेकींच आभाळ निरभ्र झालं होतं.

(समाप्त)

©️®️सौ.गीता गजानन गरुड.

==================================

फोटो साभार – शशिकांत धोत्रे

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *