Ritbhatmarathi

Search
Close this search box.

सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

आज नीता अगदी खूश होती. सुदृढ बालक स्पर्धेत जयला पहिलं बक्षीस मिळालं होतं त्याचा रिझल्ट नुकताच डिक्लिअर झाला होता. एक ते पाच वयोगटांतील बालकांत जयचा पहिला नंबर आला होता. जय होताच तसा, गोरा रंग, गुटगुटीत, कुरळे केस, गालावर खळ्या अगदी दुसरा बाळकृष्णच. त्याच्याकडे पाहून जर कुणाला भुरळ पडली नाही तर नवलच. एका नजरेत तो समोरच्याला आपलंस करून टाकत असे.
नीताला काय करू नी काय नको असं झालं होतं. तिच्या सासूबाई म्हणाल्या,
‘‘नीता, जयची दृष्ट काढते हो थांब…’’
‘‘हो आई, काढायलाच हवी, कुणाची कशी नजर असेल सांगता येत नाही.’’
‘अगदी खरं गं बाई, गुलाम हसतोय बघ कसा, जणू याला सगळं कळलंय आपला नंबर आलाय वगैरे…’’
‘‘हो ना, स्वारी जाम लाडात आलीय हा मगाचपासून सगळे नखरे चालू आहेत, हा बघा आज भात नको म्हणून सांगतोय आणि शिरा हवा असा हट्ट चालू आहे.’’
‘‘अग मग करते ना मी शिरा, किती वेळ लागतोय.’’
‘‘अहो पण आई, अशा लाडानेच हा बिघडेल, लाडोबा झालाय नुसता ते काही नाही, आत्ता हा भातच खायचा संध्यकाळी करू शिरा.’’
‘‘असुदे ग रोज नाही हट्ट करत तो शहाणा आहे हो माझा नातू. करते बघ अत्ता शिरा मस्त गरम गरम काजू, बेदाणे घालून जसा माझ्या बाळाला आवडतो तसा.’’
‘‘तुम्ही पण ना आई…’’
‘‘अग त्याला बक्षीस म्हणून आणि तुलाही त्याचा नीट सांभाळ केल्याबद्दल..’’
‘‘आई…’’
‘‘राहुदे काही बोलू नकोस. मला कळतंय तुझ्या मनात काय चलबिचल होत असेल, पण आता काही आठवू नकोस, या जयमुळे आपल्या आयुष्यात जो आनंद आलाय तोच आपण अनुभवायचा मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जायचं…’’
‘‘हो ते आहेच, पण कधीकधी सारं आठवतं हो.’’
‘‘चल चल मी शिरा करते, तू आवरून घे बाकीचं…’’ म्हणत रमाताई कामाला लागल्या.

आता त्या शिरा करता करता भूतकाळात शिरल्या. नीता आणि गौतमचं लग्न झालं खरंतर त्यांना हे लग्न मान्यच नव्हतं. नीता एका श्रीमंत बापाची मुलगी आणि आपली परिस्थिती ही अशी मध्यमवर्गीय. खाऊनपिऊन सुखी. तसं पाहिलं तर आपणही काही गरीब नाही, पण नीताच्या मनानं गरीबच.
सुरुवातीला नीताला आपल्या कुटुंबात जुळवून घेणं खूपच कठीण गेलं, पण ती तशी स्वभावाला चांगली असल्याने तिने हळूहळू सर्वांना आपलंस करून घेतलं. गावातच तिचं माहेर होतं, पण खूप कमी वेळा ती आई-बाबांकडे जायची. लग्नाला तीन-चार वर्षं झाली बाकी नीता आणि गौतमचा संसार सुखाने चालला होता. फक्त एकाच गोष्टीची कमी होती, त्या दोघांना अजून मूल-बाळ नव्हते. कधीतरी रमाताईंचा तोल ढळत असे, आणि त्या म्हणत,
‘‘अजून किती दिवस जाणार आमचे असेच नातवंडाविना?’’ नीता बिचारी चुपचाप ऐकून घेत होती. पण एक दिवस रमाताई हट्टालाच पेटल्या.
‘‘गौतम, अरे आता आमचे हात-पाय थकले रे बाबा.’’ रमा
‘‘असं काय म्हणतेस आई, तुला काय होणारे?’’ गौतम.
‘‘अरे अशा गोष्टी काय सांगून होतात का? एकच इच्छा राहिलीय बघ मनात.’’ रमा.
‘‘कोणती आई, तुला आणि बाबांना परदेशवारी करायची आहे का? चल मी तिकीटं काढून आणतो आत्ताच.’’
‘‘अरे मला नाही रे बाबा परदेशी जायची आवड. मला आता एकच वाटतं की, नातवंड खेळवावं मांडीवर.’’
‘‘हो आई, पण तू बघतेसच आहेस ना? आम्हाला काही नकोय का मूलबाळ? नीताला तर किती आवड आहे मुलांची? पण आता नाही होत तर काय करावं?’’
‘‘आता उद्याच तुम्ही दोघं डॉक्टरांकडे जाऊन या.’’
दुसर्या दिवशी नीता आणि गौतम डॉक्टरांकडे जाऊन आली. चार-पाच दिवस असेच गेले. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना बोलावले. त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून गौतमला तर शॉकच बसला. त्याला काही बोलवेना.
घरी आल्यावर अधीर मनाने आईने विचारलं,
‘‘काय म्हणाले डॉक्टर.’’ रमाताई
‘‘अगं आधी पाणी तरी दे त्यांना.’’ वडील.
दोघं चुपचाप बसून राहिली. कोणी काही बोलेना. रमाताईंची प्रश्नांची सरबत्ती चालूच.
‘‘होईल म्हणाले ना डॉक्टर सगळं सुरळीत?’’ रमाताई.
सगळे शांत ‘‘अरे असं शांत बसलात तर कसं कळेल आम्हाला?’’ रमाताई परत चिडून म्हणाल्या.
‘‘आई, आम्हाला दोघांना मूल होऊ शकत नाही.’’ गौतमने शेवटी नाइलाजाने सांगितलं.
‘‘बघ मी तुला म्हणत होते, की तू या मुलीशी लग्न…’’
‘‘आई, दोष तिच्यात नाहीये, दोष माझ्यात आहे….’’ असं म्हणून धाडकन गौतम तिथून निघून खोलीत निघून गेला.
नीताला कळेना सासूला सावरू का नवर्याला आवरू? गजानन रावांनी तिला खूण केली की, तू गौतमकडे जा मी इकडं बघतो. ती खोलीत निघून गेली.
रात्रीच्या जेवणाची कोणाला इच्छाच नव्हती. पण रमाताईंनी खिचडी केली आणि त्या गौतमला आणि नीताला बोलवायला गेल्या. ती दोघं सुन्न बसून होती.
‘‘गौतम, नीता चला जेवायला.’’
‘‘भूक नाही आई.. तुम्ही घ्या जेवून.’’ नीता
‘‘अगं असं करून कसं चालेल, चला जेवुया घासभर.’’
त्या दिवसापासून रमाताईंनी मुलांना खूप आधार दिला.

‘‘अहो आई, झाला का शिरा?’’ नीताने हॉलमधूनच विचारलं.
‘‘हो हो आलेच हा.’’ म्हणत रमाताईंनी डोळे पुसले. काजू-बेदाणे घातलेला चांगला खमंग गरम गरम शिरा ताटलीत बघताच गाल फुगवून बसलेल्या जयने आनंदाने उडी मारली.
‘‘अरे थांब, गरम आहे शिरा अजून…’’
‘‘ग .. ल .. म.. फू फू…’’ जय
‘‘हो हो थांब फुंकर मारुया.’’ नीता.
‘‘शिरा खाऊन होऊदे मग तुम्हा मायलेकांची दृष्टच काढते.’’ रमाताई
‘‘आता माझी कशाला? जयची काढा.’’
‘‘असुदे…’’

‘‘आई, तुम्ही याला भरवता का? मी आवरते सगळा पसारा.’’ नीता
‘‘हो दे.’’
चिऊ-काऊची गोष्ट सांगत जयला भरवताना रमाताईंना स्वर्गसुख मिळत होतं. असं वाटत होतं परमेश्वराने सगळं सुख आपल्या दारात आणून टाकलंय या नातवाच्या बाललीलांनी सगळं घर आनंदानं न्हाऊन निघालंय. त्यांनी कौतुकाने त्याचा गोड पापा घेतला. शिरा खाताच जयला चांगलीच गुंगी आली त्याला गाणं म्हणत झोपवता झोपवता रमाताई परत भूतकाळात गुंग झाल्या.
‘‘आपण बाळ दत्तक घेऊया.’’ नीता.
‘‘नको.’’ गौतम.
‘‘का?’’ नीता
‘‘मला नाही पटत असं दत्तक वगैरे.’’ गौतम
‘‘अरे त्यात न पटण्यासारखं काय आहे?’’नीता.
‘‘मी एकदा सांगितलं ना तुला. तुला जर मूल हवं असेल तर तू मला सोडू शकतेस.’’ गौतम.
‘‘गौतम.. अरे काय बोलतोस तू?’’ नीता.
‘‘माझा निर्णय फायनल आहे.’’ गौतम.
डॉक्टरांकडून आल्यापासून गौतमचं थोडं बिनसलंच होतं. नीताही मग गप्प राहिली. आता महिनाभर तरी या विषयावर काहीच बोलायचं नाही असं तिनं ठरवलं. तिने सासू-सासर्यांना विश्वासात घेऊन याबद्दल कल्पना दिली. त्यामुळे त्या दोघांनीही ठरवलं की, इतक्यात हा विषय काढायचाच नाही. नीताबद्दल आता रमाताईंना अभिमानच वाटला कारण त्यांना कळून चुकलं होतं की, नीताने किती प्रेम केलंय गौतमवर.
त्याच दरम्यानं नीताला एक कुणकुण लागली तिची दूरची आत्तेबहीण तिसर्यांदा प्रेग्नंट होती आणि तिला मूल नको होतं. ‘कुणाला सांगू नको, तुला म्हणून सांगते..’ असं करत करत ती बातमी नीतापर्यंत आली होती. नीताने ताबडतोब तिला भेटायला जायचं ठरवलं.
सासूबाईंना सांगून ती त्या बहिणीला भेटायला बाहेर पडली. बहिणीशी मनमोकळ्या गप्पा मारून नीताने तिला पटवून दिलं की, ‘‘तिला ते मूल हवं आहे.’’ बहीणही तयार झाली कारण तिची आर्थिक परिस्थिती नव्हती तिसरं मूल सांभाळायची. पण अॅलबॉर्शन करून त्या न जन्माला आलेल्या जिवावर तिला अन्यायही करायचा नव्हता. त्या बहिणीला नुकताच चौथा महिना लागला होता. तिच्या थायरॉईड प्रॉब्लेममुळे तिला दिवस गेलेले कळलेच नव्हते. नीताने तिला प्रेमाने थोपटले आणि विश्वास दिला की, ती तिचे मूल समर्थपणे सांभाळेल.
नीताची बहीण म्हणजे मेघना हिला तर समजावलं, पण आता प्रश्न होता गौतमचा त्याला समजवायची जबाबदारी गजाननरावांनी पार पाडली.
‘‘गौतम, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.’’ गजाननराव.
‘‘बोला ना बाबा…’’ गौतम
‘‘हे बघ नीता काही तुला सोडून जाणार नाही हे तुलाही माहीत आहे.’’
‘‘हो खरंच आणि ती गेली तर मी राहू कसा शकेन?’’
‘‘तू एवढं प्रेम करतोस का तिच्यावर?’’
‘‘बाबा, तुम्हाला शंका आहे का?’’
‘‘नाही शंका नाही. पण मग तिची एक इच्छा तू पूर्ण कर.’’
‘‘कोणती? एका का दहा इच्छा पूर्ण करेन. पण ते दत्तक.. ’’
‘‘आता ती तिच्या बहिणीचं मूल घ्यायचं म्हणतेय.’’ मग गजाननरावांनी त्याला सर्व परिस्थिती सांगितली.
‘‘तू तिला अडवू नयेस असं मला वाटतं. नीताच्या मातृत्वाच्या आड तू येऊ नकोस, तसंच रमाचीही फार इच्छा आहे.’’ हे सगळं ऐकून गौतमही तयार झाला.
मेघनाला नववा महिना लागताच नीताने तिला आपल्या घरी आणले. तिची खूप सेवा केली. यथायोग्य वेळी तिने सुंदर, गोड बाळाला जन्म दिला. दवाखान्यातून मेघनाला परत नीताने आपल्याच घरी आणले. दीड महिना मेघना बाळाबरोबर राहिली आणि एक दिवस ती नीताला म्हणाली,
‘‘मी आता जाते. तू या बाळाला सांभाळ.’’ मेघना
‘‘अगं पण अजून त्याला आईच्या दुधाची…’’ नीता
‘‘मी जितके दिवस जास्त या बाळात गुंतेन तितकं मला कठीण जाईल त्याला सोडून जाताना.’’ मेघना.
‘‘तेही खरंच.’’ नीता
‘‘मला खात्री आहे नीता, तू आता याला नीट सांभाळशील. आणि एक वचन दे, की तू या बाळाला सांगू नकोस की, तू त्याची आई नाहीस. एकतर मी त्याला नाकारलं असं त्याला वाटायला नको आणि आई आपली नाही हे दु:ख नको या चिमुकल्या मुलाला’’ मेघना.
‘‘होय नीता नक्की…’’
आणि मग मेघना पाठीमागे जराही वळून न बघता भरल्या अंत:करणाने घराबाहेर पडली. नीता त्या छोट्याशा बाळाला कुशीत घेऊन खूप रडली. तिला वाटत होतं, ‘‘आपण केलं ते चूक की बरोबर?’’ इतक्या लहान बाळाला आईपासून तोडलं, असंच तिला वाटत होतं.
मग रमाताईंनी तिची समजूत घातली आणि तिला सांगितलं, ‘‘तू या बाळाचं उत्तम संगोपन कर.’’
‘‘आई, आई अहो आवरताय ना? आपल्याला बक्षीस समारंभाला जायचंय ना? गौतमचा फोन आला होता, तोही लवकर निघालाय ऑफिसमधून, जाम खूश आहे. आपण सगळ्यांनी मिळूनच जायचं आहे…’’ असा नीताचा आवाज आल्या आल्या रमाताई एकदम भूतकाळातून जाग्या झाल्या. मांडीवर झोपलेल्या जयकडे पाहून रमाताईंना भरून आलं.
‘‘अगं हो आवरतेच आहे.’’ रमाताई.
‘‘आई, अहो मला सांगताय जुनं काही आठवायचं नाही आणि तुम्ही मात्र.’’ नीता.
‘‘नीता, आता खरंच आजपासून आपण जुनं काही आठवायचंच नाही. जयला मिळालेलं हे सुदृढ बालकाचं बक्षीस म्हणजे तुझ्या उत्तम मातृत्वाचा सुंदर पुरावा आहे. इथून पुढेही तू आणि आपण सर्व त्याची अशीच काळजी घेऊ यात शंकाच नाही.’’

तेवढ्यात गौतम चाहूल लागली आणि सास्वा-सुनांनी गप्पा आवरत्या घेतल्या.
‘‘चला मंडळी चला. अरे हे काय उत्सवमूर्ती झोपलेत वाटतं.’’ गौतम
‘‘शू ऽ ऽ हळू बोल ना गौतम.’’ नीता
‘‘अरे हो’’ गौतम
‘‘जय झोपलाय तेवढ्यात आपण सर्वांनी आवरून घेऊया. चला.’’ नीता.
संध्याकाळी पाच वाजता सर्व सभागृहात हजर आले. आणि सुदृढ बालक या स्पर्धेत अनाऊंसमेंट झाली.
तर आजच्या या आपल्या स्पर्धेचा विनर आहे, ‘जय-गौतम.’ जय आणि त्याचे आई-बाबा नीताजी आणि गौतम यांनी कृपया स्टेजवर यावे.
सुदृढ बालक म्हणून मिळालेला मुकूट जयच्या डोक्यावर घातला गेला. जयही आनंदाने टाळ्या वाजवत. ‘मु कु त, मु कु त’असं करत नीताला बिलगला होता. सारं सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात न्हाऊन निघालं होतं आणि नीता मातृत्वाच्या सुखाने न्हाऊन निघाली होती.
समाप्त

=========================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

कथा आवडल्यास आमच्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *