Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मी कशाला आरशात पाहू गं!! (भाग दुसरा..अंतिम भाग)

©® गीता गजानन गरुड.

निर्माता,दिग्दर्शक खूष झाले. त्यांनीच वासंती व सुली, ललगीला घरी न्हेऊन सोडलं. पेढ्यांचा पुडा त्यांनी रंगीम्हातारीच्या हाती दिला व म्हणाले,”शंभर नंबरी सोनं आहे तुमची सूनबाई. आम्ही आमच्या पुढच्या चित्रपटासाठी वासंतीची निवड करत आहोत.” रंगीम्हातारीने वासंतीची अलाबला काढली.

इतक्यात वासंतीचा नवरा चंदू पुढे आला. छाती पुढे करत म्हणाला,”ही बायकोय माझी. हिला पिक्चरात काम करायला माझी परमिशन घ्यावी लागलं आणि ती मी माझ्या बायकोला देणार नाय. हजार लोकांसमोर तोंडाला रंग फासून काम करायचं नाय म्हंजे नाय.”

“तुम्ही परत शांतपणे विचार करा.” दिग्दर्शक म्हणाले यावर रंगी म्हातारी तावातावाने ढुंगण घसटीत लेकाजवळ गेली व म्हणाली,”लगीन करुन आणलीस म्हून मालक झालास व्हय तिचा! दिस, रात काय बगीत नायस. ढोरावानी मारतुयास. सिनमातल्या नट्या बघायसाठी शेतातली कामं टाकून जातोयास नि बायकोला पायपुसण्यावानी वागवतुयास. ते कायबी चालायचं न्हाय. माजी सून जानार या सायबांवांगडा कामाला नि घरातली गुरंढोरं, शेती तू बघायचीस. बायकोच्या जीवार वरीसभर मज्जा मज्जा केलीस. आता शेतात राब. तरच खायला गावल तुला धेनात ठेव.”

वासंती सासूच्या या रुपाला अनिमिष नेत्रांनी बघत होती. जणू दुर्गामाता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती.

चल गं वैनी म्हणत सुली नं ललगी जाऊ लागल्या. ललगी वैनीकडे बघत गुणगुणू लागली
मी कशाला आरशात पाहू गं
मीच माझ्या रुपाची राणी गं!!

वासंती फिल्म युनिटसोबत गेली. दिग्दर्शकांनी तिला मीनात्याकडे सोपवलं व म्हणाले,”मीनात्या, आपल्या चित्रपटाला हवं तसं सावळं मटेरिअल मिळालय बघ.अगदी नेचरल. हिला चांगले ड्रेस घेऊन द्या. नवीन फ्याशनचेपण घालायला लावा. चार माणसांत कसं बोलायचं, कसं खायचं सगळं सगळं शिकवा हिला. आणि एक हिचं नाव वासंती थोडं जुनं..थोडं काय बरंच पुरान्या जमान्यातलं वाटतय. आपण हिचं नाव वैजूराणी ठेवुया. काय आवडलं, वैजूराणी?वासंतीने मान हलवून होकार दिला.

मीनात्याने न्रुत्य शिकवणाऱ्या संजूला बोलावून घेतलं.
“संजू ही आपली वैजूराणीय. हिला जमतील असे स्टेप्स शिकव. आधीच काहीतरी भन्नाट करेल अशी अपेक्षा नको. हळूवार उमलुदेत या कमळाला.” मीनात्याने तंबी दिली तसं संजू म्हणाला,”तुम्ही म्हणाल तसंच होईल. वैजाराणीला अशी तयार करतो की आताच्या यशस्वी नट्याही तोंडात बोटं घालतील.”

“हो पण तिच्या कलानं.”

“होय जी मीनात्या. तुमच्या शब्दाबाहेर नाही मी.”

न्रुत्याचे, अभिनयाचे धडे वैजूराणी घेऊ लागली. चांगलंचुंगलं खाऊ लागली. केळी, सफरचंद,संत्री,मोसंबी,डाळींब अशी नाना फळं, पिस्ता,अक्रोड,बदाम,अंजीर सारखी सुकी फळं, मसाला दूध..हा असा सकस आहार मिळायला लागल्याबरोबर शुष्क झाडावर पालवी फुटावी तशी वैजूराणीची काया मोहरु लागली. चेहऱ्यावर अधिकच तेज येऊ लागलं.

एका रात्री इमारतीखाली दंगा ऐकू येत होता. खाली जाऊन पाहिलं तर चंदू होता. पिऊन टर्र झालेला. तो मला माझी बायको पाहिजे. मी घेऊन जायला आलोय तिला म्हणत बाटली घेऊन धडपडत होता.

दिग्दर्शकाने दोनचार लगावली त्याला ते पाहून वैजूराणीचं काळीज कळवळलं. कितीही झालं तरी चंदू तिचा पती होता. पती पत्नीवर हात उगारतो तेंव्हा पत्नी एकवेळ सोसेल पण आपल्या पतीवर कुणी दुसऱ्याने हात उगारलेला ती सहन करु शकत नाही. वैजूराणी बाहेर आली. “साहेब, असाल तुम्ही मोठे दिग्दर्शक पण
माझ्या नवऱ्याला मारायचा अधिकार कुणी दिला तुम्हाला? मी जाते माझ्या घरी.”

आता मात्र दिग्दर्शकाची पाचावर धारण बसली. शेवटी चर्चाविनिमय करून चंदूला दारुमुक्ती केंद्रात पाठवून द्यायचं ठरलं. गावातलंच एक जोडपं रंगी म्हातारीची शेती व तिचं खाणंपिणं बघायला ठेवलं. वर्षभर तरी वैजूराणीला गमावणं निर्मात्याला परवडणारं नव्हतं.

वैजूराणीला अभिनयाची आवड होतीच. तिचं पाठांतर पक्कं होतं. निरीक्षणशक्ती अफाट होती शिवाय युनिटमधे कुकपासनं हिरोपर्यंत सगळ्यांशी ती अदबीने बोले. गर्वाचा गंधवारा तिच्या आसपास फिरकला नव्हता.

मिनात्याने सांगितल्याप्रमाणे ती स्वत:शीच शर्यत करत होती. अधिकाधिक स्वत:ला सुधारत होती. प्रेक्षकांच्या मनात तिला आपली अशी खास जागा बनवायची होती. निर्माता मात्र तिला या चित्रपटासाठी परफेक्ट म्हणूनच बघत होता. तिच्या पुढच्या कारकिर्दीशी त्याचं काहीही देणंघेणं नव्हतं. मीनात्या मात्र तिला लेक मानू लागली होती. ती तिचं करिअर घडवायला सर्वतोपरी दत करणार होती.

चित्रपटातचं प्रमोशन सुरु होतं नि इकडे रंगीम्हातारी आजारी पडली. जातेय की रहातेय अशातली गत. निर्माते, दिग्दर्शक वैजूराणीला सोडायला मागेनात. वैजाराणीला रंगीम्हातारी आठवू लागली. काय करीत आसलं बिचारी. मी तिला एक नातवंडबी नाय देऊ शकले पण कधी वाईटसाईट बोलली नाय मला. घरातून बाहेर पडायचं झालं तर पाठीशी उभी राहिली. एक आई आपल्या मुलीसाठी करणार नाही एवढं धारिष्ट्य केलं तिनं. मला फिल्मलाइनमधे जाऊ दिलं, सिनमात काम करू दिलं आणि आता ती आजारी पडली तर मला जाता येत नाहीए.

रंगीम्हातारी चार दिवस हॉस्पिटलमध्ये होती. प्रायव्हेट हॉस्पिटल, स्पेशल वॉर्ड, अनुभवी डॉक्टर,डायट वगैरे
म्हातारीची तब्येत सुधारू लागली पण आपण आजारी असताना आपला लेक, आपली सून आपल्याला बघायला आली नाहीत याचं तिला खूप वाईट वाटायचं.

या वाईट वाटण्याला इलाज नव्हता. आपल्या सुनेकडनं कधीही वाईटवंगाळ काम होणार नाही याची रंगीम्हातारीला खात्री होती आणि तशीच अडचण आसलं नैतर आल्या बिगर र्हायली नसती माझी सूनबाय अशी ती मनाला समजवायची.

आजुबाजूच्या स्टाफला सांगायची..माज्या सुनबायचा पिच्चर येणार हाय. माझा लेकव गुणी हाय पन दारुन वाया गेलाया. सूनबायनं त्याला बरं व्हायला नाशकाच्या केंद्रात धाडलय.

वॉर्डमधल्या आयाबाया रंगीम्हातारीचं कीर्तन ऐकत रहायच्या. कुणी गुपचूप हसायच्या, मागून खिल्लीही उडवायच्या पण तो दिवस रंगीसाठी नवी सकाळ घेऊन आला.

रंगी आता कुणाचा आधार न घेता चालू लागली होती. ती बाथरूममध्ये जाऊन अंग धुऊन आली. आपल्या वेणीफणीची पेटी उघडून तिने आरशात बघत केस विंचरायला सुरुवात केली. विरळ झालेल्या काळ्यापांढऱ्या केसांची ल्हानशी आंबोडी बांधली नि बाहेरच्या पायरीवर येऊन बसली असता एक वॉर्डबॉय पेपर घेऊन धावतच आला.

“म्हातारे, तुझी सून..”

“आरं काय झालं माझ्या सुनंला. दमानं सांग जरा.”

“आगं काय झालं म्हून काय इचारतीस. सुनेचा फोटू छापून आलाय तुझ्या. ‘सुनेची माया’ म्हून नइन पिक्चर आलाय. तेतूर नटी हाय तुझी सूनबाय. मला तरी कुठचं कळायचं. त्या पेपरवाल्यान सांगितलन आपल्याच गावची नटी आहे. पिक्चर जरूर बघा. म्हून कळलं बघ.”

रंगीम्हातारीने पेपर हातात घेतला. मिणमिणत्या डोळ्यांनी सुनेच्या फोटोला पाहिलं. मायेची बोटं फिरवली फोटोवर. म्हातारीच्या डोळ्यातली दोन आसवं त्या फोटोवर ओघळली.

“अरे ही तर पयली पायरी हाये. माजी सून सगळ्या नट्यांना पाठी टाकल बघीत र्हावा.”म्हातारी बोलली नि तिने कनवटीचे दोनशे रुपये काढून वॉर्डबॉयला दिले नि स्टाफला पेढे वाट म्हणून सांगितलं.

चंदू आता बराच सुधारला होता. केंद्रात सकाळी उठून प्रार्थना,व्यायाम, रोजगार देणारी कामं, वेळोवेळी होणारे प्रेरणादायी लेक्चर्स ऐकून हळूहळू तो त्याच्या मनावर कंट्रोल करू शकला. दारू, सिगारेट या व्यसनांपासनं दूर होताना त्याला प्रचंड मानसिक त्रासही झाला पण केंद्रातील डॉक्टरांच्या मदतीने त्याने ही लढाई जिंकली. स्वतः म्हातारीला घरी घेऊन गेला. वासंती करायची तसं सगळं घरदार झळझळीत केलन. आता त्याच्या घरादारासाठी, शेतीसाठी तो स्वतः राबणार होता. मातीतनं सोनं पिकवणार होता.

मित्र पुन्हा आले भेटायला.  म्हणू लागले,”मित्रा आता तुझी वासंती तुझी राहिली नाय. ती आता लै मोठी नटी झाली. नावबी बदललं वैजूराणी ठेवलय.”

चंदूला वाईट वाटलं. तो मनाशीच विचार करू लागला,’वासंती माझी वासंती पण मी तिला कधी आपलं मानलं नाही. मित्रांच्या नादी लागलो. पदरात सोनं आलं असताना बाहेर पितळ हुडकीत फिरायचो. वासंतीला मार मार मारायचो, शिव्याशाप घालायचो. पैसे मागायचो तिच्याकडं, माहेरून आण म्हणून लाथा हाणायचो भेटेल तिथे. तिच्यातली कला कधी जाणली नाही का कधी तिच्या स्वैंपाकाचं तोंड भरून कौतुक केलं. ती कला जाणली त्या बड्या लोकांनी. गुणांचं चीज केलं तिच्या. आता तिनं मला नवरा नाय म्हंटलं तरीबी चाललं. माझ्या पापाची शिक्षा म्हून भोगीन पण दुसरं लग्न करायचो नाय. वासंतीच्या आठवणीत पुढचं आयुष्य काढीन. एक प्रगतीशील शेतकरी होऊन दाखवीन.’

इतक्यात बाहेर गाडीचा आवाज आला. वैजूराणीला बघायला अख्खा गाव लोटला होता. सरपंचानं सभा घेतली. वैजूराणीचा सत्कार केला. फुलांचा गुच्छ, हार काठपदराची साडी,वेणी, नारळ..गावातल्या यशस्वी सुनेचा मानपान केला. रंगीम्हातारीच्या अंगणापुढला सडा टाळ्यांनी दुमदुमला.

वैजूराणीला दोन शब्द बोलायची विनंती केली. तिने माइक हातात घेतला. उपस्थितांना नमस्कार केला व बोलू लागली,”गावकऱ्यांनो आज जे यश मला मिळालय ते माझ्या सासूमुळे. तिने मला घरचा उंबरठा ओलांडू दिला. माझ्यावर विश्वास ठेवला.

माझा नवरा चंदू स्वभावाने खूप चांगला पण वाईट संगतीने बाद गेला होता.खूप मारायचा मला पण नंतर माझी माफीही मागायचा. त्याच्यावर त्याचा कंट्रोल नव्हता. व्यसनमुक्तीकेंद्रात जाऊन तो सुधारला. तिथल्या डॉक्टरांच्या मी संपर्कात होते. माझ्या चंदूत होणारा सकारात्मक बदल ते मला सांगत असायचे. खरंतर त्यामुळेच मी माझ्या कामात व्यवस्थित लक्ष घालू शकले.”

उपस्थितांना चहापाणी, चिवडा दिला गेला. गोडतिखट जेवणही घालू लवकरच म्हणून आश्वासन दिलं. संध्याकाळी रंगीम्हातारी नि मुलगासून तिघंच होती घरात. देव्हाऱ्यात देवापुढे ज्योत तेवत होती. सुनेचा पायरव घरदार ऐकत होतं.

वासंतीने ज्वारीच्या भाकऱ्या थापल्या. कांदापात घालून वांग्याचं भरीत केलं. चंदूने बुक्कीने कांदा फोडला. बुडकुल्यातलं दही घेतलं. तिघंही कित्येक दिवसांनी एकत्र, भरपेट जेवली. रंगीम्हातारी म्हणाली,”मी भांड्यांवर हात मारते. तू जा झोपायला.”

वासंती खोलीत गेली. खोलीत बाजेवर गोधडी अंथरली होती. चंदू तिची वाट बघत होता. तिला पहाताक्षणी पुढे येत म्हणाला,”वासंती, मला माफ करशील ना.”

“चंदू, अरे माफी कशासाठी..तुला व्यसन लागलं होतं आणि त्यातून तू स्वतःला सोडवलयस.”

“मी खूप खूप त्रास दिलता ना तुला.”

“तो आपला भूतकाळ झाला. आता आपण गोडीगुलाबीने रहायचं. मला जवळ घे की आता.”

“काय म्हणलीस..अरं..इसरलोच..घेतो की जवळ..”असं म्हणत चंदूनं वासंतीला आपल्या बाहुपाशात घेतलं. वासंती त्याला घट्ट बिलगली. मधून वाराही जाणार नाही इतकी घट्ट, एखाद्या झाडाला वेलीनं बिलगावं तशी.

दोघांचे उबदार श्वास एकमेकांत मिसळले. आता ती वैजूराणी नव्हती..आता ती होती फक्त नि फक्त तिच्या चंदूची राणी. ओठांची साखरपेरणी होत राहिली. कित्येक दिवसांचा उपवास पौर्णिमेच्या चंद्राच्या रुपेरी उजेडात सुटत होता. दोघंही त्रुप्तीच्या लाटेवर तरंगत होते.

वासंतीच्या वेणीतला मोगरा गोधडीवर पसरला होता. त्याच्या मंद गंधाने दोघांची मिठी अधिकच सुगंधी झाली होती. पुनवेच्या चांदण्यात दोन अनाव्रुत्त देह न्हाऊन निघाले होते, प्रीतीचा लाल गुलमोहर वासंतीच्या गालावर फुलला होता नं त्याला चंदूच्या ओठांनी जायबंदी केले होते.

चंद्राम्हातारीने भांडी घासून वाकळीवर अंग टेकलं होतं. तिच्या मिटल्या डोळ्यांत स्वप्न साकारत होतं. घरभर दुडूदुडू धावणाऱ्या, गळ्यात काळ्यापिवळ्या मण्यांची माळ ल्यायलेल्या बाळाचं. काळंभोर जावळ ल्यायलेलं बाळ..त्याच्या तोंडातून हसताना गळत असलेली लाळ, लाळेचे फुर्र फुर्र करत काढलेले फुगे, त्याचे हसरे डोळे, दाताच्या कण्या, इवल्याइवल्या मुठी, इवलीइवली पावलं, त्याची गोड गळामिठी.

आता रंगीम्हातारी कैक वर्षे जगणार होती..सुनेला बाळ झाल्यानंतर पुन्हा सिनमात काम करण्याची ऑफर आली तर तिला नक्की जा मी आहे घराकडे नको काळजी करू म्हणून सांगणार होती. सुनेचा बांधा सडसडीत रहावा म्हणून मालीशवाली ठेवणार होती. जुनी लुगडी धुवून त्यांनी सुनेचं पोट बांधणार होती. चंदूनं पिकवलेलं हिरवंकंच सोनं ती डोळे भरून बघणार होती. नातवापाठी वरणभाताचे घास घेऊन तुरुतुरु पळणार होती, त्याला खूप साऱ्या गोष्टी सांगणार होती.

वासंतीच्या मनातली दुर्दम्य इच्छा फळाला येणार होती. नवरा व सासूच्या साथीने ती घर व करिअर दोन्हीचा डोलारा समर्थपणे सांभाळणार होती.  तीच तिच्या रुपाची, सोन्याच्या गुणांची राणी होती.

–समाप्त.

=================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *