Ritbhatmarathi

Search
Close this search box.

©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

थंडीने काठ गाठला होता. दात  दातावर आदळत होते, धुक्याची दाट चादर भुईवर पसरली होती. सुर्याचं दर्शनही मुश्कीलच झालं होतं. एवढी कडाक्याची थंडी. या थंडीतच बायजाच्या थोरल्या लेकाच्या मुलाचं लग्न होतं.

लेक नि सुनबाई पत्रिका ठेवायला आली होती,देवळात. भली मोठी गाडी..त्यात कधी नाही ते बायजाला बसवलं लेकाने नि देवळात घेऊन गेला. लेक न् सून जोडीने देवासमोर पत्रिका ठेवत होते. देवाला फुलं वहात होते.

बायजा देवाकडे बघत होती. मागच्या जत्रेला धाकट्या लेकासोबत रिक्षेतून आलेली ती आणि आता थोरल्या लेकासोबत मोठ्या गाडीतनं आलेली ती..देवाला ती कोणत्याही गाडीतनं आली तरी सारखीच होती. देव पैशाच्या तुलनेत भाविकांचं मोजमाप करत नव्हता. त्याला राव,रंक सर्व सारखेच होते. मलमलचं कापड नेसणारी,सोन्याने भरलेली बायजाची थोरली सून नि वर्षाला दोन कापडं घेणारी, गळ्यात दोन पेडाचं मंगळसूत्र तेवढं असणारी धाकटी सून..देवाला दोन्ही सारख्या होत्या.

गावच्या सरपंचाने, उपसरपंचाने..नि आणिक मान्यवर लोकांनी बायजाच्या थोरल्या लेकाला सहपरिवार केळवणासाठी बोलावलं होतं. चाराठ दिवसांत घरात काय त्यांचा पाय टिकला नव्हता. कधी पुढल्या आळीतल्या आबाकडे केळवण तर कधी पाणवठ्याजवळच्या वकीलसाहेबांकडे. या लोकांची धुणी मात्र धाकट्याच्या लेकी धुईत होत्या. न्याहारीला कधी दशम्या तर कधी गुळपोहे,शिरा असं धाकटी सून करुन घालत होती.

टेम्पो भरुन माणसं गेली गावातनं.. बायजाही धाकट्या सुनेसोबत आली होती. धाकट्या सुनेने बाजारातनं रंगीत बांगड्यांचा चुडा आणून बायजाच्या हातांत भरला होता. लग्नाला जाताना नेसायला म्हणून बायजासाठी चौकडची लुगडी आणली होती, बायजाला हवे तसे व्ही गळ्याचे,बंद पाठीचे पोलके तिने स्वतः शिवले होते. बायजाच्या चपलातलं एक चप्पल कुत्र्याने पळवलं म्हणून बायजाच्या मापाचं मऊ,लुकलुकीत चप्पलसुद्धा घेऊन आली होती.

बायजाचा धाकटा लेक शाळेत शिपाई होता. शेतीही करत होता. वाडवडिलांनी दिलेली जमीन जपत होता. नागंरणी,खुरपणी करायचा, दोन म्हसरं बाळगलेली. एकुणच धाकट्याचं नांदतं घर होतं. दोन मुली होत्या धाकट्याला. म्हातारीने लाख हट्ट करुनही धाकट्याने तिसरा चान्स घेतला नव्हता म्हणून की काय धाकट्या सुनेवर म्हातारी खार खाऊन होती.

थोरला लेक मोठ्या गाडीच्या कंपनीत नोकरीला होता शिवाय राजकारण्यांसोबत त्याची उठबस असायची. त्याचा बोलका स्वभाव कामाला आला होता नि त्याची बायको चंद्रकलादेवी नगरसेविका बनली होती. वॉर्डात मान होता तिला. तिच्या अक्ष्यक्षतेखाली बक्षिससमारंभ,शिबीरं व्हायची. सगळी उस्तवार  करायचा म्हातारीचा लेक पण नगरसेविका म्हणून बायकोची सही उपयोगी पडत होती.

लग्नाला आलेल्या म्हातारीने थोरल्या सुनेला न्याहाळलं. मुळची गोरी काया अधिकच गोरीपान दिसत होती..कितली कितली दुधाने अंघोळ केल्यासारखी. वजन दुपटीने वाढलं होतं. चांगलीच गुबगगुबीत झाली होती, गाजराच्या कुरणातला ससाच जणू.

घरात सगळ्या कामाला मोलकरणी होत्या..भांडी,कपडे,केरवारा,स्वैंपाक, अगदी संडासबाथरुम धुवायलाही नोकर. म्हातारीला नवलच वाटलं. शहरात येण्याची बायजाची ही पहिलीच वेळ होती. बायजाच्या मनात लाख यायचं..थोरल्या लेकाचा बंगला बघून यावं पण मला घेऊन चल तुझ्याकडे..असं म्हणायला तिची जीभ रेटली नव्हती.

तीच मंडळी वर्षादोनवर्षाने एकदा गावी खेप मारीत..चारेक दिवस रहात..निघताना देवाच्या पाया पडावं तसं बायजाच्या पाया पडीत नि निरोप घेऊन शहराकडे परतत. बायजाला कधी येतेस का म्हणाली नव्हती. चारपाचशे रुपये, थोरली सून निघताना बायजाच्या हातावर टेकवायची..एवढाच काय तो थोरल्याच्या कुटुंबाशी बायजाचा संबंध होता.

बायजा अंथरुणावर निजल्यानिजल्या विचार करत होती..दोघांची मिळकत महिन्याची असून ती किती असणार नि मग हे सगळे नोकरचाकर,थाटमाट,अंग वाकून जाईल इतकं गळाभर सोनं..आणलं कुठून म्हणायचं..

बायजाला गावाकडे कोण मान होता. येताजाता बायामाणसं, म्हातारी तब्येत बेस हाय न्हवं?असं विचारायची,जागमाग घ्यायची.  बायजा उन्हाला बसली की तिच्या गप्पांना जाऊन बसायची. काय अडलंनडलं तर बायजाचा सल्ला घ्यायची. कुणाचं पोर किरकिर करीत आसलं तर बायजा त्याची मीठ,मोहरी,मिरचीने द्रुष्ट काढायची.

कोण आठवड्याच्या बाजारात जाणारं असलं की आठवणीने म्हातारीसाठी पानसुपारी,बामाची बाटली घेऊन यायची. इथे आल्याबरोबर थोरल्या सुनेनं,चंद्रकलादेवीनं सांगितलं,” कमरेला बामबिम चोळू नका..घरभर वास पसरतो तो..आजाऱ्याची खोली असल्यागत वाटतं. पदरबिदर नीट घेऊन बसत जा. चार मोठी माणसं येतजात असणार. आपल्या स्टेटसप्रमाणं वागलं पाहिजे.” ते ऐकून बायजा अधिकच बावरली न् अंग आक्रसून बसली.

धाकटी सून,तिच्या लेकी घरात काही नं काही कामं करत होत्या. थोरलीच्या माहेरच्यांना मोठा मान होता. नक्की सासर कुणाचं बायजाच्या थोरल्या लेकाचं का सुनेचं असा प्रश्न पडत होता.

धाकटा लेक तिथे उपऱ्यासारखा बसला होता. थोरला लेक कोण पाहुणेमंडळी आली की धाकट्या भावाची त्यांच्याशी रुजवात घालून द्यायला लाजत होता. त्याच्या श्रीमंतीच्या चौकटीत हे गावाकडचं कुटुंब बसत नव्हतं..अगदी त्याची हातापायांना सुरकुत्या पडलेली, अंगभर पदर डोईवरनं घेणारी त्याची आई, बायजासुद्धा त्याच्या श्रीमंती चौकटीत बसत नव्हती.

लग्नाच्या आदल्यादिवशी हळदीचं जेवण होतं..ती प्रथा गावात नसतानासुद्धा शहरातल्या रीतीप्रमाणे हळदीचं जेवण,डिजेवर नाचगाणी चालली होती.

लग्न अगदी थाटामाटात झालं. लग्नात सगळ्या पाहुण्यांना स्टेजवर बोलावून त्यांचे फोटो काढण्यात आले. अपवाद होता तो धाकट्याच्या कुटुंबाचा नि म्हातारीचा.

म्हातारी शहराकडे येताना किती स्वप्नं उराशी घेऊन आली होती. शहरातच रहावं..इथे हक्काचा नातू.वंशाचा दिवा आहे. .आता पणतुही होईल..पण त्याच वंशाच्या दिव्याने तिला आज्जी म्हणून हाकारलं नव्हतं की पाया पडायला जोडीने आला नव्हता.

म्हातारी बिल्डींगीतनं बाहेर पडली. नुकतच सुर्यनारायणाचं दर्शन होत होतं. म्हातारी गेटजवळ गेली. तिथे छान कोवळं ऊन पसरलं होतं. म्हातारी तिथेच टेकली. हलत्या मानेसोबत तिच्या कानातली कुडीही मोठाल्या भोकातनं डुलत होती.

वॉचमन दांडा घेऊन आला,”ए बुढिया इधर गेटपे बैठना मना है। चल अंदर। कहाँ कहाँ से चले आतै है।” तितक्यात पांढरीशुभ्र गाडी बाहेर निघाली..त्यात म्हातारीची नगरसेविका सून नि थोरला लेक होता. वॉचमनने त्यांना सलाम ठोकला. थोरल्या लेकाने म्हातारीला ओळखसुद्धा दाखवली नाही.

याच थोरल्या लेकाने रात्री म्हातारीला जवळ घेतलं होतं..म्हणाला होता,”गावच्या जमिनीजवळ विमानतळ होतय. सोन्याचा भाव येणार तिला. विकून टाकुया. माझ्या नावावर करुन द्यायला सांग, धाकट्याचाबी वाटा. इथे मोठी बिल्डींग बांधतो. बिल्डींगीला बाचं नाव देतो. धाकट्याला मोठा बुलाक देतो..त्याच्या पोरींचीबी लग्न लावून देतो.” म्हातारीने कापत्या मानेने त्याचं म्हणणं ऐकलं होतं..उन्हाळ्यात घरला आलास की सांगते म्हणाली.

थोरला म्हातारीचा होकार धरुन चालला होता. ग्रीष्मापर्यंत त्यालाही इतर कामं हातावेगळी करायची होती मग म्हातारीची सही घेतली की तो मोकळा होणार होता.

म्हातारी डोईवरचा पदर सारखा करत आभाळाला टक लावून उभी होती. मनात सतरा विचार पिंगा घालत होते. बालपणातली माहेराच्या अंगणात खेळणारी ती,वयात यायच्या आधीच बापाने उजवलेली..नंतर देहधर्मानुसार दोन मुलांची आई झाली..सगळे निर्णय दादलाच घ्यायचा. पोटी पोरगी हवी होती एकतरी पण दादल्याने दोन मुलगे हायेत तर तिसरी पणवती कशाला पायजेल म्हणून नकार दिलेला. दादला वयाने पंचवीस वर्ष मोठा..तो लवकर सोडून गेला नि म्हातारीचं उठणंबसणं मुलांच्या मर्जीबरहुकुम होऊ लागलं.

पण धाकटी सून आल्यापासनं यात बदल झालेला. धाकटी म्हातारीला मान द्यायची. तिला गरमगरम दुधात भाकरी चुरुन खाऊ घालायची,दवापाणी करायची. धाकटीमुळे धाकटा लेकही तिला जीव लावू लागला होता. नातीही आज्जी आज्जी करत भोवताली पिंगा घालायच्या.

म्हातारी विचार करत होती..’धाकटी सून लाभली नसती तर पोतेऱ्यासारखी गत झाली असती माझी. माणूस महत्त्वाचं. धाकटी सून हयात असेतागद सांभाळेल..तिलाच घालूनपाडून बोलिते मी पण तिच्या तोंडून कंदी अधिकउणा शबुद नाय आला. आता काय द्याचं ते धाकट्या सुनेला नि नातींना..वंशाच्या दिव्याचं मोप कवतिक केलं आता नातींच करीन.’

तितक्यात धाकटी सून आली,लेकींसोबत,”मामींनू,आमी चाललो गावाला. तुमी नीट रावा. कंदीबी येयाचं झालं की ह्यास्नी कळवा,”म्हणत तिथेच म्हातारीचे पाय धरले.

“मला गं सोडून कुठं जातासा. मीबी येते तुमच्यासंग गावाला. चलाचला.” म्हणत म्हातारी त्यांच्यापुढे वाटेला लागली.

(समाप्त)

–©️®️ सौ.गीता गजानन गरुड.

==================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *