Ritbhatmarathi

Search
Close this search box.

माझ्या नवऱ्याची सासू

“ए समीर उठ ना, ट्रेन येईलच इतक्यात. कसा लगेच उठशील म्हणा? कारण माझी आई येणार आहे ना. तुझ्या आईला आणायला बरे पहाटे पाच वाजताच उठून जातोस ते! मी गेले असते. पण एवढ्या लांब ड्रायव्हिंगची सवय नाही रे मला.” दिशा आपल्या नवऱ्याला उठवत म्हणाली.

“अगं काय कटकट आहे? उठतोय मी.”

पाच मिनिटात समीर फ्रेश होऊन खोलीतून बाहेर आला.

“हे काय? नवीन पडदे, नवीन बेडशीट, पिलोकव्हर? सगळं घर एकदम चकाचक? तुझी सासू आल्यावर तरी घर एवढं स्वच्छ असतं का? समीर दिशाने आणलेला चहा घेत म्हणाला.

“अरे आपल्या लग्नानंतर आई पहिल्यांदाच येते आहे आणि माझी सासू येते ना तेव्हाही सारं घर स्वच्छच असतं. फक्त ते तुम्हाला दिसत नाही इतकंच. बरं मी गाडी काढते. चहा घेऊन पट्कन खाली ये.”

थोडयाच वेळात समीर आणि दिशा स्टेशनवर पोहोचले. आईला पाहताच दिशाला खूप आनंद झाला. लग्नानंतर जवळ जवळ दोन वर्षांनी आई भेटत होती तिला. समीर आपल्या सासुबाईंच्या पाया पडायला खाली वाकला. तश्या सासुबाई म्हणाल्या, “जावईबापू तेवढ्या बॅगा उचला हं माझ्या. फार नाहीत, पाचच आहेत.” असे म्हणत दोघी मायलेकी गाडीत जाऊन बसल्या देखील. ‘सासुबाईंना एकदाही विचारावं वाटलं नाही, जावईबापू कसे आहात म्हणून?’
कशाबशा समीरने बॅगा उचलल्या आणि तो गाडीजवळ गेला. डिक्कीत बॅगा ठेऊन पाहतो तर, ड्रायव्हिंग सीटवर दिशा बसली होती आणि तिच्या बाजुला सासुबाई!

‘अगं आत्ता तर तुला कॉन्फिडन्स नव्हता ना इतक्या लांबवर गाडी चालवायचा? मी सोबत फक्त बॅगा उचलायला आलो की काय मग?’ हे शब्द समीरच्या ओठवर येऊनही मनातच राहिले आणि तो चरफडत मागच्या सीटवर जाऊन बसला.

“दिशू, अगं किती छान चालवतेस गाडी!” आई आपल्या लेकीच कौतुक करत म्हणाली आणि दोघी माय-लेकी घरी जाईपर्यंत गप्पा मारत राहिल्या.

आईला घर खूप आवडलं. “दिशू किती छान ठेवलं आहेस घर. एकदम चकचकीत, स्वच्छ! हे ऐकत ऐकत आणलेल्या बॅगा समीरने जवळ जवळ खाली टाकल्या.

“अहो अशा टाकू नका बॅगा. त्यात महागडे गिफ्टस् आहेत. तुम्हालाच द्यायला आणलेत ते.” सासुबाईंच्या या वाक्यावर समीर आपला राग आवरत त्यांना सॉरी म्हंटला.

चहा -पाणी झाल्यावर सासुबाईंनी सगळ्या बॅगा ओपन करून ‘हे तुमच्यासाठी’ म्हणत समीरच्या हातावर शर्टपीस आणि पँटपीसची एक पिशवी ठेवली आणि दिशाला साडी, एक पर्स, खाऊच्या पिशव्या, लोणची, चटण्या असा बराच जामानिमा दिला.

तसा समीर चिडला. ‘दिशाला मात्र एवढं सारं आणि माझ्या हातावर हे एवढंच?’ पण ओठावर आलेले शब्द गिळून तो आवरायला पळाला.

“अरे आज जाऊ नको ना ऑफिसला. सुट्टी काढ. काहीतरी प्लॅन करू.” दिशा आत येत समीरला म्हणाली.

“नको मी जातो. चालु दे तुमचं. दोघी माय-लेकीत मी कशाला पाहिजे मध्येच? तसही मागाचपासून पाहतो आहे मी.. तुझ्या आईला साधं विचारावं देखील वाटलं नाही. जावईबापू कसे आहात म्हणून? साधी विचारपूस नाही की चौकशी नाही. सगळं कौतुक आपल्या मुलीचं आणि काय गं, जर तुलाच गाडी चालवायची होती तर मला सोबत कशाला घेऊन गेलीस? त्या जड बॅगा उचलायला?
तुमचं तुम्ही दोघी काहीही करा. पण मी ऑफिसला जाणारच.” असे म्हणत समीर बाथरूममध्ये शिरला आणि ‘त्यात काय एवढं?’ अशा आविर्भावात दिशा पुन्हा बाहेर आली.

काही वेळातच समीर आवरून बाहेर आला.
“समीर आज कॅन्टीनमध्ये जेवशील? सॉरी म्हणजे डबा नाही केला अजून.” दिशा समीरला पाहताच म्हणाली.

“अगं, पण तुला माहितीये ना मला कॅन्टीनचं जेवण नाही आवडत? समीर वैतागून म्हणाला.

“अरे गप्पा मारण्याच्या नादात विसरलेच मी.” दिशा म्हणाली. तशा सासुबाई मागून म्हणाल्या,
“अगं जेवतील ते ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये. एका दिवसाने काय होत? बरं मी विश्रांती घेते. आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं आहे ना?”

सासुबाई गेल्या तशा समीर धाडकन दार आपटून बाहेर पडला.

रात्री समीर घरी आला, तेव्हा दोघी माय-लेकी घरात नव्हत्या. स्वयंपाकाचाही पत्ता नव्हता. दुपारी जेवला नसल्याने त्याला जाम भूक लागली होती. कसाबसा त्याने चहा करून प्यायला. तोपर्यंत या दोघी आल्या.
“समीर आम्ही दोघी जेवूनच आलो आहोत. तुला काही मागवू का? की खिचडी टाकू पट्कन?” दिशा घाईघाईने म्हणाली.

“काही नको. मी झोपतो उपाशीच. उगीच त्रास कशाला तुला?” असे म्हणत समीर रागारागाने तिथून निघून गेला. पण रात्रभर दिशा आणि सासुबाईंच्या बोलण्याने समीरला झोपही लागली नाही.

दुसऱ्या दिवशी त्याला उठायला उशीर झाला. आज मात्र त्याचा डबा तयार होता. तो आवरून ऑफिसला जायला निघणार इतक्यात
सासुबाई त्याच्या हातात डबा देत म्हणाल्या, “जावईबापू आज सगळं जेवण मी माझ्या हातांनी बनवला आहे. बघा आवडतं का.”

तसा काहीच न बोलता डबा घेऊन समीर ऑफिसला निघून गेला.

आई शेवटी वैतागून म्हणाली, “दिशू अगं हे असं खोटं वागायला नाही गं जमत बाई मला. आज रात्री जावईबापूंना खरं काय ते सांगून टाकू.
तशी दिशाने मान डोलावली.

समीर रात्री आनंदात घरी आला. दुपारचे सासुबाईंच्या हातचे जेवण त्याला आवडले होतेच. शिवाय प्रमोशनच्या यादीत त्याचं नावही होतं.

“समीर जरा तुमच्याशी बोलायचं होतं.” त्याचा मूड पाहून सासुबाई म्हणाल्या.

“बोला.” आता काय? अशा आविर्भावात समीर
सासुबाईंच्या समोर बसला.

“समीर, तुमच्या आई, दिशाच्या सासुबाई तिला सारखे बोल लावतात. सतत मला फोन करून तिच्या तक्रारी सांगत राहतात. तुमची मुलगी अशीच वागते, तशीच वागते! पाहायला गेलं तर मला या दोन दिवसात तक्रार करण्यासारखं काहीच जाणवलं नाही. मुली शिकतात हो हळूहळू. जसा मुलांना नसतो तसाच, त्यांनाही अनुभव नसतो संसाराचा. आम्ही मोठ्या माणसांनी त्यांना समजावून, कधी रागावून सांगायचं. कधी सुनेचं कौतुक करावं, तर कधी हक्काने रागवावं. पण तिला दुर्लक्षित करू नये, किंवा केवळ कामापुरतेच बोलू नये तिच्याशी.
माझा स्वभाव कोणाला त्रास देण्यासारखा नाही आणि मी तक्रारही करत नाही. फक्त काळजीने बोलते इतकेच. जशी मुलाच्या आईला आपल्या मुलाची काळजी असते, तशीच लेकीच्या आईला लेकीची काळजी असते.
खरंतर माझ्या लेकीच्या संसारात लक्ष घालणे हा माझा हक्कच नाही. आम्ही फक्त तुम्हाला थोडा अनुभव यावा, म्हणून गेले दोन दिवस हे असं वागलो. तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका बरं. आत्ताशी कुठे तुमच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. छान एंजॉय करा. मस्त राहा.”

“इतकेच ना? मी आईला समजावतो. आई तुम्ही नका काळजी करू.” समीर आपल्या सासुबाईंना म्हणाला.

“बघ. दोन शब्द गोड बोलले, तर तुझ्या सासुला तू आई म्हणालास. मग माझी एवढीच अपेक्षा आहे की सासुबाईंनी माझ्याशी फक्त प्रेमाने बोलावं.” दिशा समीरला म्हणाली.

“या असल्या गोष्टी आम्ही पुरुष लोकं कधीच मनावर घेत नाही. जाऊदे, सर्वांच्या घरी हे असेच असते, म्हणून सोडून देतो. याचा त्रास आपल्या बायकोला किंवा आपल्या आईला होत असेल असे आम्हाला वाटतही नाही. केवळ आम्हाला त्रास नको म्हणून आम्ही या गोष्टी सोडून देतो.
पण खरचं आई तुम्ही नका काळजी करू. मी आईला नक्की समजावेन आणि ती माझे ऐकेलही.” समीरने आपल्या सासुबाईंना विश्वास दिला.
तसे दिशाच्या आईला समाधान वाटलं, आपल्याला समजूतदार जावई मिळाला याचं.

©️®️सायली

====================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *